Chemical Fertilizers : रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर

Agriculture Management : खत वापर कार्यक्षमता जास्तीत जास्त करण्यासाठी मातीचा प्रकार, हवामान, पीक विविधता आणि व्यवस्थापन पद्धती यासारख्या घटकांचा विचार करावा.अन्नद्रव्यांचा वापर आणि पिकांचे अन्नद्रव्य शोषण यांच्यात योग्य संतुलन साधणे आवश्यक आहे.
Chemical Fertilizers
Chemical FertilizersAgrowon

डॉ.सागर जाधव, सागर कडाव, योगेश सावंत

Efficient Use of Chemical Fertilizers : कृषी, पर्यावरण विज्ञान आणि मानवी आरोग्यासह विविध क्षेत्रांमध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन हा महत्त्वाचा घटक आहे. रासायनिक खतांमधून दिलेल्या वेगवेगळ्या अन्नद्रव्यांची अन्नद्रव्य वापर कार्यक्षमता वेगवेगळी आहे. स्फुरदाची अन्नद्रव्य वापर कार्यक्षमता बहुतांश पिकांमध्ये १५ ते २० टक्के असते.

नत्राची कार्यक्षमता भात पिकांमध्ये फक्त ३० ते ४० टक्के आणि इतर पिकांमध्ये ५० ते ६० टक्के असते. पालाशची कार्यक्षमता ६० ते ८० टक्के तर गंधकाची कार्यक्षमता ८ ते १२ टक्के एवढी आहे. सूक्ष्म अन्नद्रव्यांच्यामध्ये फक्त ५ टक्के अन्नद्रव्य वापर कार्यक्षमता आहे. सद्यस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात खते वापरूनही बहुतांश वनस्पतींमध्ये नत्र व जस्ताची कमतरता दिसते.

पाणी गुणवत्ता

जमिनीत दिलेली खते पावसाच्या पाण्यात मिसळून नदी, नाले, ओढे आणि तलावामध्ये येतात. त्यामुळे तेथील पाण्यात शेवाळाचे प्रमाण वाढते. पाण्यामध्ये प्राणवायूची कमतरता भासते. त्या ठिकाणची जैवविविधता नष्ट होऊ लागते. पाण्याच्या गुणवत्तेचे रक्षण करण्यासाठी खतांचा अचूक प्रमाणात, अचूक वेळेवर आणि अचूक पद्धतीने वापर करावा. ज्यामुळे अन्नद्रव्यांचे पाण्यात वाहून जाण्याचे प्रमाण कमी होईल.

कृषी उत्पादकता

वनस्पतींची वाढ आणि विकास अन्नद्रव्यांच्या उपस्थितीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतो. अन्नद्रव्यांचे योग्य व्यवस्थापन करून, पिकांना योग्य प्रमाणात आणि वेळेवर आवश्यक घटक मिळू शकतात. याचा थेट परिणाम कृषी उत्पादकतेवर होतो. परिणामी पीक उत्पादन आणि पिकाची गुणवत्ता सुधारते.

Chemical Fertilizers
Fertilizer Using : कसा कराल खतांचा कार्यक्षम वापर?

संसाधन कार्यक्षमता

अन्नद्रव्यांची कार्यक्षमता वाढविल्यामुळे पिकाची खत मात्रा कमी करता येईल. जमिनीत खतांसोबत जाणारे अनावश्यक घटक कमी होतील. खतांच्या अतिवापरामुळे जमिनीमध्ये असणाऱ्या अन्नद्रव्यांमध्ये असंतुलन निर्माण होते, मातीचा ऱ्हास, जलप्रदूषण होते. अन्नद्रव्यांचे संतुलित पद्धतीने व्यवस्थापन करून संसाधनांचे संरक्षण करता येते. पर्यावरणाची हानी कमी होते.

जमिनीचे आरोग्य

सुपीकता योग्य राखण्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन महत्त्वपूर्ण आहे. अयोग्य प्रमाणात अन्नद्रव्यांचा वापर केल्याने जमिनीचे आरोग्य कमी होते. अन्नद्रव्यांच्या वापरात समतोल राखून मातीची रचना, सूक्ष्मजीव क्रियाकलाप आणि एकूण परिसंस्थेचे कार्य टिकून राहू शकते.

हवामानातील प्रभाव

शेतामध्ये वापरली जाणारी वेगवेगळी खते विशेषतः नत्रयुक्त व गंधकयुक्त खते नायट्रस ऑक्साईड व डाय-हायड्रोजन सल्फाईड यांसारख्या हरितगृह वायूंचे उत्सर्जन करण्यात योगदान देतात. हा हवामान प्रभाव कमी करण्यासाठी या अन्नद्रव्यांचा वापर कमी करावा. शेतीमधील खतांचे व्यवस्थापन जर योग्य पद्धतीने केले तर शेतीमधून होणारे हरित वायूंचे उत्सर्जन कमी होते.

आर्थिक दृष्टिकोन

रासायनिक खतांच्या अत्याधिक वापरामुळे पीक उत्पादकतेमध्ये सुधारणा न होता शेतीखर्चामध्ये वाढ होते. खतांचे योग्य व्यवस्थापन केल्यामुळे पिकांना खताची मात्रा कमी द्यावी लागते. रासायनिक खतांवरील खर्च कमी होतो.

मानवी आरोग्य

शेतीतील अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा पिकांच्या पौष्टिक मूल्यावर थेट प्रभाव पडतो. पिकांमध्ये पोषक तत्त्वांचा योग्य समतोल राखल्याने त्यांची पौष्टिक गुणवत्ता वाढते. जी नंतर सेवन केल्यावर व्यक्तींच्या आरोग्यावर परिणाम करते.

रासायनिक खतांच्या अतिरेकी वापरामुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणामही होतात. उदा. जर कॅडमियमचा अतिरेक झाल्यास चेतन संस्थेवर विपरीत परिणाम होतो. बोरॉनचे प्रमाण जास्त झाल्यास लहान बाळांची वाढ थांबते, पोट व किडनीचे आजार उद्भवतात.

नत्रयुक्त खतांच्या अतिवापरामुळे जलस्त्रोतांमध्ये जर नायट्रस ऑक्साईडचे प्रमाण जास्त झाले आणि असे पाणी गर्भवती महिलेने पिल्यास त्यांच्या होणाऱ्या बाळाला ‘ब्लू बेबी सिंड्रोम’आजारही होऊ शकतो.

शाश्वत शेती

शाश्वत कृषी पद्धतीमध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. शाश्वततेला प्राधान्य देणारी शेती प्रणाली, उत्पादकता, आर्थिक व्यवहार्यता आणि पर्यावरणीय कारभार यांच्यातील समतोल साधण्याचा प्रयत्न करतात.

दीर्घकालीन अन्नसुरक्षा

जागतिक लोकसंख्येच्या सतत वाढीसह प्रभावी अन्नद्रव्य व्यवस्थापनाद्वारे मातीची सुपीकता राखणे आणि वाढवणे आवश्यक आहे. भविष्यातील पिढ्यांसाठी स्थिर अन्नपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी हे महत्त्वपूर्ण आहे.

Chemical Fertilizers
Onion Crop : सुक्ष्मसिंचन प्रणाली, खतांचा कार्यक्षम वापर. काटेकोर व्यवस्थापन आवश्यक

नत्रयुक्त खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी उपाय

खते बियाणे किंवा झाडांच्या मुळांजवळ खोलवर गाडून द्यावीत.

पिकांना नत्र देताना एकदम न देता दोन ते तीन वेळा विभागून द्यावीत.

नत्र स्थिरीकरण करणाऱ्या जैविक खतांचा वापर करावा.

खतांमधून हळुवारपणे अन्नद्रव्य सोडणाऱ्या नत्रयुक्त खतांचा वापर करावा.

पीक फेरपालट करत असताना डाळवर्गीय पिकांची पीक किंवा हिरवळीचे खत म्हणून लागवड करावी.

सेंद्रिय खतांचा वापर वाढवावा. पिकांचे अवशेष शेतामध्येच गाडावेत.

एकत्रित अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा.

पालाशयुक्त खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी उपाय

पिकांद्वारे उचल केल्या गेलेल्या पालाशच्या एकूण मात्रेपैकी ६० ते ७० टक्के पालाश पिकाच्या पेंढ्यांमध्ये असतो, म्हणून जमिनीमध्ये पालाशचे प्रमाण वाढविण्यासाठी पिकांचे अवशेष जमिनीमध्ये गाडावेत.

राखेमध्येही पालाशचे भरपूर प्रमाण असते, म्हणून ही राख शेतामध्ये टाकावी.

बटाटे, रताळे पिकास पालाशचे प्रमाण खूप लागते. या पिकांना शिफारशीनुसार खत द्यावे.

आम्लधर्मीय वाळूयुक्त जमिनीमध्ये पालाशचे पाण्यासोबत वाहून जाण्याचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे अशावेळी पालाश खत विभागून दोन ते तीन वेळा द्यावे.

स्फुरदयुक्त खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी उपाय

माती परीक्षणामधील शिफारशीनुसार स्फुरद द्यावे.

ओळीमध्ये लावलेल्या पिकांना स्फुरद देत असताना जमिनीमध्ये गाडले जाईल याची काळजी घ्यावी.

पाण्यात विरघळणाऱ्या स्फुरदयुक्त खतांपेक्षा रॉक फॉस्फेट या स्फुरदयुक्त खताला प्राधान्य द्यावे.

सेंद्रिय खतांचा वापर वाढवावा. पिकांचे अवशेष शेतामध्येच गाडावेत.

तृणधान्य व डाळवर्गीय पीक प्रणालीमध्ये डाळवर्गीय पिकाच्या वेळी आवश्यक प्रमाणामध्ये स्फुरदाची मात्रा द्यावी.

स्फुरदाची मात्रा देत असताना आपल्या जमिनीमध्ये स्फुरदाचे प्रमाण किती आहे, हे तपासावे.

स्फुरद देण्यासाठी डायअमोनियम फॉस्फेट (डीएपी) ऐवजी सिंगल सुपर फॉस्फेट खताला प्राधान्य द्यावे. ज्यामुळे स्फुरद सोबतच गंधकही पिकाला मिळते.

कमी कालावधीच्या पिकांसाठी पाण्यात विरघळणारी स्फुरदयुक्त खते फायदेशीर ठरतात.

आम्लयुक्त जमिनीमध्ये जास्त दिवस चालणारे पीक घ्यावयाचे असल्यास रॉक फॉस्फेट आणि बोनमिल वापरावे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com