Biological Pesticides : जैविक कीटकनाशकांचे शास्त्र, कार्यपद्धती जाणून घेणे गरजेचे

Fungal, Bacteria Update : बुरशी, विषाणू व जिवाणू यांच्यावर आधारित जैविक कीटकनाशकांचे महत्त्व अलीकडे वाढू लागले आहे. अधिक अधोरेखित होऊ लागले आहे. या कीटकनाशकांमागील शास्त्र, कार्यपद्धती व वापराबाबत महत्त्वाच्या बाबी जाणून घेतल्यास त्यांचे चांगले परिणाम मिळतील. त्याचा शेतकरी आणि पर्यावरण अशा दोघांनाही चांगला फायदा होईल.
Biological Pesticides
Biological PesticidesAgrowon
Published on
Updated on

डॉ. मुकुंद देशपांडे

Organic Farming : सन १९४० च्या आधी म्हणजे थोडक्यात रसायनांचा शेतीमध्ये प्रसार होण्याच्या आधी जगभर सेंद्रिय शेतीच केली जायची. जसजशी लोकसंख्या वाढायला लागली तसतशी धान्याची कमतरता भासू लागली. सेंद्रिय शेती कडून लोक रासायनिक शेतीकडे वळले. सन १९६२ मध्ये रॅचेल कार्सन या लेखिकेच्या ‘सायलेंट स्प्रिंग या पुस्तकाने मात्र जुने ते सोने ही विचारधारा पुन्हा आणली.

त्यामुळे जैविक कीडनाशकांचे महत्त्वही वाढले. किडींबाबत बोलायचे तर घाटेअळी, पिठ्या ढेकूण, मावा, तुडतुडे, पाने खाणारी अळी आदी विविध प्रकारच्या किडीमुळे विविध पिकांचे ३० ते ५० टक्के व काहीवेळा त्याहून नुकसान होते. लाभदायक विषाणू, जिवाणू आणि बुरशी हे जैविक घटक प्रामुख्याने किडींचे नियंत्रण करण्यासाठी वापरले जातात.

विषाणू आणि जिवाणू पचनमार्गाद्वारे किडीमध्ये रोग पसरवतात आणि किडीला मारतात. तर बुरशी किडीच्या संरक्षण कवचातून आत प्रवेश करते. विषाणू व जिवाणू यांच्या यजमान कीटकांची संख्या तशी कमी आहे. बुरशी मात्र पतंग, माशी, मावा, बीटलवर्गीय अळ्या, डास अशा अनेक किटकांचे नियंत्रण करते.

जैविक कीटकनाशकांचे फायदे

रासायनिक कीटकनाशके ही लक्ष्य कीटकांशिवाय अन्य सजीव, पिके व मानवाला धोकादायक असतात. पण जैविक कीटकनाशके प्रामुख्याने किडींनाच लक्ष्य करतात. बुरशीचे बीजाणू (कोनिडिया) मोठ्या प्रमाणावर सहजपणे तयार केले जाऊ शकतात. ते फवारता येतात तसेच जमिनीतूनही देता येतात.

मुख्य म्हणजे त्यांच्या विषारी अवशेषांचा धोका नसतो. त्यामुळे ते पर्यावरणास सुरक्षित आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बुरशीप्रति कीटक समुदायांमध्ये प्रतिकारक्षमता विकसित झाल्याची उदाहरणे आढळत नाहीत.

याचे श्रेय या जैविक घटकांच्या कीड मारण्याच्या प्रक्रियेला दिले जाऊ शकते. आजपर्यंत ३७७ बुरशी, २७ जाती आणि ४६ प्रजाती या किटकांचे नियंत्रण करणाऱ्या घटक म्हणून ओळखल्या जातात.

Biological Pesticides
Organic Farming : लोहा तालुक्यात होणार सेंद्रिय शेतीचे क्लस्टर

जैविक घटक सुरक्षित व प्रभावी

मेटारायझियम ही बुरशी प्रथम १८८० साली मेशनिकोफ आणि क्रासिलचेक ह्या संशोधकांनी शेतातील बीटलवर्गीय अळी नियंत्रित करण्यासाठी वापरली. नंतर युरोप आणि अमेरिकेत मेटारायझियम आणि बिव्हेरिया बॅसियाना या जैविक घटकांचा वापर शेतीसाठी कीटकनाशक म्हणून होऊ लागला.

परंतु १९४० च्या सुमारास रासायनिक कीटकनाशके बाजारात आल्यानंतर बुरशीजन्य घटक वापरणे बंद झाले. त्यावर बंदीही आणण्यात आली. कारण त्यांच्यामुळे मधमाशी, रेशीम कीटक अशा शेतीला उपयोगी कीटकांना धोका पोहोचू शकतो असा गैरसमज पसरविण्यात आला. पण प्रत्येक बुरशी ही विशिष्ट यजमान-कीटकांनाच मारते.

मेटारायझियम आणि बिव्हेरियाच्या काही प्रजाती अनेक प्रकारच्या किडींना मारतात. तर काही प्रजाती विशिष्ट कीटकांनाच मारतात. व्हर्टिसिलियमच्या काही प्रजाती कीटक, सूत्रकृमी आणि काही बुरशींना मारू शकतात. एन्टोमोपथोरा ही बुरशी मावा नियंत्रित करू शकते.

मित्रबुरशींचे गट व कार्यपद्धती

मित्रबुरशींचे तीन गट शेतात आढळतात. नेहमी वापरात येणाऱ्या बुरशी म्हणजे मेटारायझियम, बिव्हेरिया नोमुरिया आणि पॅसिलोमायसेस. तर व्हर्टिसिलियम, एन्टोमोपथोरा आणि एन्टोमोफागा या कमी क्षमतेच्या आहेत.

ॲस्परजीलस, फ्युझारियम आणि पेनिसिलियम सारख्या बुरशी जखमी किटकांवर वाढतात, पण त्या खऱ्या अर्थाने कीटकनाशक किंवा कीटक रोगजनक मानल्या जात नाहीत. बुरशी संपर्काने प्रभावी असल्याने बीजाणूंच्या साहाय्याने कीटकांच्या शरीराला चिकटतात. मग विकरांच्या साहाय्याने यजमान कीटकांत प्रवेश करतात, वाढतात आणि कीटकाला मारतात.

यातील प्रत्येक पायरी प्रभावी जैविक कीटकनाशक विकसित करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. कीटक मृत झाल्यानंतर त्यावर बुरशी वाढते आणि नवीन बीजाणू तयार होतात. या बुरशी शेतात तसेच जंगलातील मातीतही आढळतात. अनेकदा जंगलात मिळणाऱ्या जाती आणि प्रजाती या कीटकांचे नियंत्रण करण्यासाठी अधिक प्रभावी वा जालीम (व्हिरूलन्ट) असतात.

त्याचे महत्त्वाचे कारण जंगलात कीटक आणि या बुरशी एकत्र असतात हे असावे. त्याचप्रमाणे निलगिरी, पपई, कडुनिंब, अशा अनेक वनस्पतींमध्ये मेटारायझियम, बिव्हेरिया आणि अन्य अनेक बुरशी सहजीवन व्यतीत करीत असतात. या बुरशी वनस्पतीचे कीटक मारण्याचे गुण आत्मसात करू शकतात.

जैविक कीटकनाशकांची परिणामकारकता

बुरशीची परिणामकारकता ही बाजारपेठेतून ते उत्पादन घेतल्यापासून शेतात कधी फवारायची या कालावधीवर अवलंबून असते. जेंव्हा शेतकरी अशी कीटकनाशके विकत घेतात तेव्हा त्यावर असणारी उत्पादनाची तारीख ही कालबाह्य होणाऱ्या तारखेपेक्षा महत्त्वाची असते.

जिवंत बीजाणूंची (कोनिडिया) संख्या महत्वाची असते. ती प्रयोगशाळेत तपासता येते. एकवेळ अशा सर्व बाबी योग्य असू शकतात. पण बीजाणूंचा जालीमपणा (व्हिरूलन्स) मोजण्याची काही यंत्रणा नसते.

खूपदा प्रयोगशाळेत सातत्याने बीजाणू वाढविल्यामुळे त्यांचा जालीमपणा कमी होतो. बुरशींची विकर निर्माण करण्याची क्षमता पाहूनही हा जालीमपणा लक्षात येतो. बुरशीचा जालीमपणा वाढवायचा असेल तर बुरशी कीटकांवर वाढविता येतात.

जैविक घटक वापरण्याची योग्य वेळ

बीजाणू प्रयोगशाळेत कसे वाढवितात यावर बरीच उलटसुलट चर्चा सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ करतात. हे बीजाणू फक्त हवेतील कवकजालावरच तयार होतात. द्रव किण्वन प्रक्रियेने ते प्रयोगशाळेत वाढविता येत नाहीत. त्यासाठी फक्त आणि फक्त घन पदार्थ म्हणजे धान्ये, तांदळाचा कोंडा, उसाची चिपाडे वगैरे घटक वापरले जातात.

तांदूळ, बाजरी, गहू अशा धान्यांवर बीजाणू १० ते १२ दिवसांत दिसायला लागतात. त्यानंतर ते चाळणीच्या साहाय्याने वेगळे करता येतात आणि शेतात फवारता येतात. बीजाणूंपासून कवकजाल तयार होण्यासाठी हवेतील आर्द्रता आणि तापमान महत्त्वाचे असते. सकाळी लवकर किंवा संध्याकाळी बीजाणूंची फवारणी झाली तर कीटकांचे नियंत्रण चांगले होते.

रासायनिक कीटकनाशकांच्या तुलनेत बुरशी कीड मारण्याला जास्त वेळ घेते. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपयोग करणे हे जास्त फायदेशीर असते. हाच मुद्दा समजून घेणे गरजेचे आहे. पिकाच्या जीवनचक्रात कीड कधी येते हे जर अभ्यासले गेले तर वेळीच बुरशीची फवारणी करून किडीचे नियंत्रण करता येते.

Biological Pesticides
Organic Farming : सेंद्रिय शेतीसाठी स्वतंत्र कृषितंत्र हवे

सर्वांनी देऊया चालना

कीड नियंत्रणाबरोबर मेटारायझियम, बिव्हेरिया या बुरशी जमिनीतील रासायनिक कीटकनाशकांचे विघटन देखील करू शकतात. तसेच पिकाच्या वाढीसाठीही त्या उपयुक्त ठरतात. जागतिक बाजारपेठेत बुरशीजन्य कीटकनाशकांची बाजारपेठ ०.६ अब्ज अमेरिकी डॉलर आहे.

तर रासायनिक कीटकनाशकांची बाजारपेठ ६६ अब्ज डॉलर म्हणजे जवळपास १०० पट अधिक आहे. आजच्या घडीला भारतात २५० हून अधिक जैविक कीडनाशक उत्पादने अधिकृतपणे नोंदली गेली आहेत. पण त्यांचा म्हणावा तितका उपयोग अजून होताना दिसत नाहीत.

सेंद्रिय शेतीचे प्रमाण जगात १.५ टक्के आहे, भारतात ते २ टक्क्याच्या जवळपास तर काही देशात ते ५ ते १० टक्के किंवा जास्त आहे. कीड मारणाऱ्या बुरशीला खूपच मोठा पल्ला बाजारपेठेत गाठायचा आहे. त्यासाठी आपण सर्वांनीच मिळून वापराला चालना देण्याची गरज आहे.

संपर्क - डॉ मुकुंद देशपांडे-९०११३५८९७७, (लेखक सूक्ष्मजीवशास्त्र विषयातील शास्त्रज्ञ व कृषी उद्योजक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com