Moong Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Moong Bean Farming: उत्पादनवाढीसाठी उन्हाळी मुगाचे सुधारित वाण: शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन

Summer Moong Variety: उन्हाळी मूग हे कमी कालावधीचे पीक असून, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि उष्ण हवामानामध्ये चांगले उत्पादन देण्याची क्षमता, कीड-रोगाचा तुलनेने कमी प्रादुर्भाव या बाबी लक्षात घेता पाण्याची उपलब्धता असलेल्या ठिकाणी उन्हाळी मुगाच्या सुधारित वाणांची लागवड फायदेशीर ठरू शकते.

संजय बडे 

Moong Farming Tips: मूग हे कमी कालावधी व तुलनेने कमी पाण्यावर येणारे पीक आहे. या पिकांच्या मुळावरील गाठीमध्ये रायझोबिअम जिवाणू हवेतील नत्र शोषून घेतात. या पिकांची नत्राची गरज परस्पर भागवली जाते. शिवाय या पिकानंतर त्याचा बेवड चांगला मानला जातो. त्याचे अवशेष जमिनीत गाडल्यास हिरवळीचे पीक घेतल्याप्रमाणे जमिनीचा कस सुधारण्यास मदत होते. मानवी आहाराच्या दृष्टीनेही मूग विशेष महत्त्वाचे असून, त्यात २० ते २५ टक्के प्रथिने असतात.

ही प्रथिने तृणधान्यातील प्रथिनांना पूरक असल्याने त्यांचा रोजच्या आहारात समावेश केल्यास फायदा होतो. मात्र महाराष्ट्रातील मुगाची उत्पादकता ही कमी असून, ती वाढविण्यासाठी अधिक उत्पादनक्षम सुधारीत किंवा संकरित वाणाची निवड, योग्य जमिनीची निवड, पूर्वमशागत, बियाण्याचे योग्य हेक्टरी प्रमाण, वेळेवर पेरणी, रासायनिक खतांच्या शिफारशी यांचा वापर करण्याची आवश्यकता आहे.

जमीन :

उन्हाळी मुगासाठी मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन योग्य ठरते.

चोपण, पाणथळ, क्षारयुक्त जमिनीत हे पीक चांगले येत नाही.

आम्लयुक्त जमिनीत मुळावरील रायझोबिअम जिवाणूंच्या गाठींची वाढ होत नसल्यामुळे रोपे पिवळी पडतात आणि उत्पादनात घट येते.

साधारणत: ६.५ ते ७.५ सामू असलेली जमीन या पिकाला योग्य असते.

हवामान :

या पिकास २१ ते २५ अंश सेल्सिअस तापमान चांगले मानवते. ३० ते ३५ अंश सेल्सिअस तापमानात हे पीक चांगले येते. खरीप हंगामाच्या तुलनेत उन्हाळी हंगामात स्वच्छ सूर्यप्रकाश, उष्ण हवामान यामुळे मुगावर रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी राहून अधिक उत्पादन मिळते.

पूर्वमशागत :

खरीप/ रब्बी पिकाचे जमिनीवर पडलेले अवशेष, पालापाचोळा वेचून घेऊन जमीन स्वच्छ करावी.

जमिनीची खोल नांगरटीनंतर २ कुळवण्या करून जमीन भुसभुशीत करावी.

उन्हाळी मुगास पाणी पाळ्या देण्यासाठी योग्य अंतरावर सारा अथवा सरी - वरंबा पद्धतीचा अवलंब करून रानबांधणी करावी.

जमिनीच्या उताराला काटकोनात सारे अथवा साऱ्या पाडाव्यात. दोन ओळीतील अंतर ३० सें.मी. ठेवावे.

पेरणीची वेळ :

उन्हाळी मुगाची पेरणी २० फेब्रुवारी ते १५ मार्च या दरम्यान करावी. पेरणीस फार उशीर करून नये अन्यथा पीक मॉन्सूनच्या पावसात सापडण्याची शक्यता असते.

बियाण्याचे प्रमाण व लागवडीचे अंतर :

अपेक्षित उत्पादन मिळविण्यासाठी हेक्टरी रोपांची संख्या योग्य असणे गरजेचे असते. पेरणी करताना दोन ओळीत ३० सेंटीमीटर आणि दोन रोपात १० सेंटिमीटर अंतर ठेवावे. या पद्धतीने पेरणी केल्यास एकरी ५ ते ६ किलो बियाणे पुरेसे होते.

पेरणीसाठी घरचे बियाणे वापरत असाल तर दर ३ वर्षांनी त्यात बदल करावा.

बीजप्रक्रिया आणि जिवाणू संवर्धन :

बियाण्याची उगवण चांगली होण्यासाठी आणि रोपावस्थेत बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रती किलो बियाण्यास थायरम २ ग्रॅम अधिक कार्बन्डाझीम २ ग्रॅम या बुरशींनाशकाची बीजप्रक्रिया करावी किंवा जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रती किलो बियाणे या प्रमाणात लावावे. यानंतर नत्र स्थिर करणारे जिवाणू (रायझोबियम जापोनिकम) व स्फुरद विरघळवणारे जिवाणू (पीएसबी) प्रत्येकी २५ ग्रॅम प्रती किलो बियाण्यास लावावे.

गुळाचे द्रावण तयार करण्यासाठी एक लिटर पाण्यात १२५ ग्रॅम गूळ घेऊन तो विरघळेपर्यंत पाणी कोमट करावे. ते थंड केल्यावर त्यात २५० ग्रॅम वजनाच्या पाकिटातील संवर्धन मिसळून द्रावण तयार करावे. हे द्रावण १० किलो बियाण्यास पुरेसे होते. बियाणे एक तासभर सावलीत सुकवून लगेच पेरणी करावी. यामुळे मूग पिकाच्या मुळावरील ग्रंथींचे प्रमाण वाढून हवेतील नत्र शोषण्याची क्षमता वाढते. उत्पादनवाढीसाठी मदत होते.

सुधारित वाणांची निवड :

फुले चेतक : हे ६५ ते ७० दिवसात तयार होणारे अधिक उत्पादनक्षम वाण आहे. भुरी रोगाला प्रतिकारक असलेल्या या वाणाचे हेक्टरी १२ ते १५ क्विंटल उत्पादन मिळते.

फुले एम-२ : हे ६० ते ६५ दिवसात तयार होणारे, खरीप आणि उन्हाळी अशा दोन्ही हंगामासाठी शिफारशीत वाण असून, त्यापासून हेक्टरी ११ ते १२ क्विंटल उत्पादन मिळते.

विराट : हे ५२ ते ५६ एवढ्या कमी दिवसात तयार होणारे वाण असून उन्हाळी हंगामासाठी उत्तम मानले जाते. या शिवाय हे वाण पिवळा विषाणूसाठी प्रतिकारक आहे. हेक्टरी १० ते ११ क्विंटलपर्यंत उत्पादन शक्य.

वैभव : महाराष्ट्र राज्यासाठी प्रसारित, ७०-७५ दिवसाचे वाण आहे. त्याची वैशिष्ट्ये : १) खरीप आणि उन्हाळी हंगामासाठी प्रसार, २) जास्त उत्पादन देणारे, मध्यम हिरवे बियाणे, ३) भुरी रोगास प्रतिकारक्षम, ४) उत्पादन १४ ते १५ क्विंटल/हे.

PKV AKM-४ : महाराष्ट्र राज्यासाठी प्रसारीत, ६५-७० दिवसाचे वाण आहे. त्याची वैशिष्ट्ये : १) उच्च उत्पादन देणारे, मध्यम आकाराचे धान्य, २) एकल पिकणारे वाण, ३) भुरी रोगास प्रतिकारक्षम, ४) उत्पादन १० ते १२ क्विंटल/हे.

बी.एम. २००३-२ : महाराष्ट्र राज्यासाठी प्रसारित, ६५-७० दिवसाचे वाण आहे. त्याची वैशिष्ट्ये : १) मध्यम आकाराचे धान्य, एकच पिकणारे वाण, २) भुरी रोगास प्रतिकारक्षम, ३) उत्पादन १२-१४ क्विंटल /हे.

बी.एम. -२००२-१ : महाराष्ट्र राज्यासाठी प्रसारित, ६५-७० दिवसाचे वाण आहे. त्याची वैशिष्ट्ये : १) टपोरे दाणे, लांब शेंगा, जास्त उत्पादन, २) एकल परिपक्व वाण, ३) भुरी रोगास प्रतिकारक्षम, ४) उत्पादन १२-१४ क्विंटल /हे.

PKV ग्रीन गोल्ड : विदर्भासाठी प्रसारित, ७०-७५ दिवसाचे वाण असून, त्याची वैशिष्ट्ये : १) जास्त उत्पादन देणारी, मध्यम आकाराची धान्ये, २) एकाच वेळी पिकणारी जात, ३) भुरी रोगास प्रतिरोधक, ४) खरीप आणि उन्हाळी हंगामासाठी योग्य, ५) उत्पादन १०-११ क्विंटल/हे.

B.P.M.R. १४५ : महाराष्ट्र राज्यासाठी प्रसारित, ६५-७० दिवसाचे वाण असून, त्याची वैशिष्ट्ये : १) टपोरे, हिरव्या बिया, लांब शेंगा, २) भुरी रोग प्रतिरोधक, ३) खरीप आणि उन्हाळी हंगामासाठी उपयुक्त, ४) उत्पादन १२-१४ क्विंटल /हे.

फुले उत्कर्ष : महाराष्ट्र राज्यासाठी प्रसारित, ६५-७० दिवसाचे वाण असून, त्याची वैशिष्ट्ये – उच्च उत्पादन, चमकदार हिरव्या बिया उत्पादन १२-१४ क्विंटल /हे.

आंतरमशागत व तण नियंत्रण :

सुरुवातीच्या काळात पीक तणाविरहित ठेवणे गरजेचे असते. कोळप्याच्या साहाय्याने पीक २० ते २५ दिवसाचे असताना पहिली कोळपणी करावी. पीक ३० ते ३५ दिवसाचे असताना दुसरी कोळपणी करावी. गरजेनुसार एक दोन खुरपण्या वेळीच द्याव्यात.

पाणी व्यवस्थापन :

उन्हाळी मुगाकरिता वेळेवर पाण्याच्या पाळ्या देणे अतिशय महत्त्वाच्या ठरतात. वाढत्या तापमानामुळे या काळात. ओलिताच्या साधारणपणे ५ ते ६ पाळ्या द्याव्यात. जमिनीच्या मगदुराप्रमाणे साधारणतः ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाण्याची पाळी द्यावी. विशेषतः फुले येताना आणि शेंगा भरताना ओलाव्याची कमतरता भासू देऊ नये. पीक ५० दिवसांचे झाल्यानंतर पाणी तोडावे. त्यामुळे पीक एकाच वेळी पक्वतेस येऊन उत्पादनात वाढ होते.

काढणी, मळणी आणि साठवण :

मुगाच्या शेंगा ७५ टक्के वाळल्यावर पहिली तोडणी व त्यानंतर ८ ते १० दिवसांनी राहिलेल्या सर्व शेंगा तोडाव्यात. शेंगा खळ्यावर चांगल्या वाळल्यावर काठीच्या साहाय्याने झोडपून दाणे अलग करावेत. हेक्टरी १० ते १२ क्विंटल उत्पादन मिळते. ते साठवणीपूर्वी मूग ४ ते ५ दिवस उन्हात वाळवून पोत्यात किंवा कोठीत साठवावे. साठवण कोंदट किंवा ओलसर जागेत करू नये.

खत व्यवस्थापन :

चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट १० ते १५ गाड्या प्रती हेक्टर प्रमाणे पेरणी अगोदर शेवटच्या कुळवणीच्या वेळी पसरावे. पेरणी करताना मूग पिकास २० किलो नत्र आणि ४० किलो स्फुरद प्रती हेक्टर या प्रमाणात द्यावे.

संजय बडे ७८८८२९७८५९

साहाय्यक प्राध्यापक, कृषी विद्या विभाग, दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय, दहेगाव, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT