Tur Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Tur Farming : तूर उत्पादकता वाढीसाठी महत्त्वाची सूत्रे

Tur Cultivation : बहुतांश ठिकाणी तूर पिकाची लागवड जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात पूर्ण झाली असेल. त्याच्या उत्पादकता वाढीसाठी पुढील सूत्रे लक्षात ठेवावीत.

जितेंद्र दुर्गे

जितेंद्र दुर्गे

Tur Crop Farming Management : तूर पिकाच्या व्यवस्थापनामध्ये येणाऱ्या विविध समस्या लक्षात घेऊन काही मुद्दे किंवा सूत्रे मांडली आहेत. त्यांचा आपल्या तूर पिकाच्या व्यवस्थापनामध्ये समावेश केल्यास उत्पादकतेत निश्‍चितच वाढ होते.

तूर पिकाच्या ओळींमध्ये काही कारणास्तव खांडण्या पडल्या असल्यास, दोन झाडांतील अंतरानुसार मजुरांद्वारे खांडण्या भरणे.

ट्रॅक्टर अथवा बैलजोडी चलित पेरणीयंत्राने तुरीची पेरणी केलेली असल्यास निंदणी वेळी (खुरपणीच्या वेळी) विरळणी करणे.

तूर पिकाचे शेंडे छाटणे.

ओलिताची व्यवस्था असल्यास आणि जमिनीतील ओल कमी झालेली असल्यास शेवरा अवस्थेपूर्वी आणि शेंगांमध्ये दाणे भरताना ओलीत करणे.

शेवरा अवस्थेच्या सुरुवातीला, फुलोरा अवस्थेच्या सुरुवातीला, शेंगांमध्ये दाणे भरताना कीड, रोग आणि अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी फवारणीचे नियोजन करणे.

सलग तुरीची डोबीव/ टोकण पद्धतीने पेरणी असल्यास जोडओळ पद्धतीचा अवलंब करणे.

बीटी कपाशी : तूर आंतरपीक पद्धतीमध्ये दोन्ही पिकांची जोडओळ पद्धतीने पेरणी करणे.

मूग, उडीद, सोयाबीन यासोबत आंतरपीक म्हणून तूर घेताना सोडओळ (पट्टापेर) पद्धतीचा अवलंब करणे.

तूर पिकाच्या ओळीतील खांडण्या भरणे

तूर पिकाच्या ओळीमध्ये विविध कारणांमुळे सुरुवातीलाच खांडण्या पडतात. तूर बियाण्याचे जमिनीत अंकुरण झाल्यावर डुकरांच्या उपद्रवामुळे मोठे नुकसान होते. तुरीचे पीक रोपट्याच्या प्राथमिक अवस्थेत असताना जास्त तीव्रतेचा पाऊस आल्यास तूर पिकाच्या ओळीत पाणी साचून मूळसड प्रादुर्भावामुळे मोठे नुकसान होते.

बियाण्याला पेरणीच्या वेळी बीजप्रक्रिया केलेली नसल्यास सुद्धा बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव बियाण्यांची कुज होते. झाडांची योग्य संख्या राखण्याकरिता तूर पिकासाठी शिफारशीत दोन झाडांतील अंतर १५ ते २० सेंमी यानुसार मजुरांद्वारे खांडण्या भरून घ्याव्यात. काही ठिकाणी खांडण्या बुजविण्यासाठी डोबणी २-३ वेळाही करावी लागते. पण झाडांची संख्या योग्य राखली तरच अपेक्षेप्रमाणे उत्पादन मिळू शकते.

निंदणीवेळी विरळणी

ट्रॅक्टरचलित अथवा बैलजोडीचलित पेरणीयंत्राणे आंतरपीक म्हणून तूर पेरणी केल्यास निंदणीच्या वेळी विरळणी करणे अत्यावश्यक असते. कारण ट्रॅक्टर अथवा बैलजोडीचलित पेरणी यंत्राने मूग, उडीद अथवा सोयाबीन या मुख्य पिकांमध्ये तूर पेरली असल्यास त्यांच्या दोन झाडांतील अंतरानुसार तुरीचीही दाट पेरणी होते. सोयाबीनसाठी दोन झाडांतील अंतर ५ सेंमी या प्रमाणे कॅलिब्रेट केलेल्या पेरणीयंत्राद्वारे तुरीचीही पेरणी केली जाते. खरेतर तुरीचे खोड बळकट होण्यासाठी दोन झाडांतील अंतर हे शिफारशीनुसार १५ ते २० सेंमी एवढे राखले गेले पाहिजे.

सोयाबीन : तूर आंतरपीक पद्धतीमध्ये सोयाबीनला मुख्य पिकाचा तर तुरीला दुय्यम पिकाचा दर्जा असतो. सोयाबीन पिकाची पूर्ण वाढ होताना संपूर्ण शेत आच्छादले जाते. त्यामध्ये तुरीच्या ओळी दबून जातात. तुरीचे फक्त शेंड्यांची वर – वर वाढ होते. जेवढ्या उंचीपर्यंत सोयाबीनचे पीक वाढलेले आहे, तेवढ्या उंचीपर्यंत तुरीच्या खालील फांद्या व पाने पिवळ्या पडून वाळतात, गळतात किंवा सडतात.

पिकामध्ये फिरता येत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या ते लक्षातही येत नाही. सोयाबीनची काढणी होईपर्यंत तुरीचे पीक पूर्णपणे दुर्लक्षित असते. तूर पिकासाठी फारसे वेगळे व्यवस्थापन केले जात नाही. परिणामी, तुरीचे उत्पादन कमी येते. म्हणूनच ही बाब टाळण्यासाठी सोयाबीन : तूर आंतरपीक पद्धतीमध्ये नावीन्यपूर्ण सुधारित पट्टापेर पद्धतीचा अवलंब करावा. सलग तूर लागवडीमध्ये जोडओळ पद्धतीचा अवलंब करण्याचे आपण नेहमीच सुचवीत आलो आहोत.

सोयाबीन प्रति एकर ३० किलो व यासोबतच तूर ५-६ किलो प्रति एकर यानुसार एकरी ३५-३६ किलो बियाणे उनारल्या जाते. नवीन शिफारशीनुसार प्रति एकरी २४ किलो सोयाबीन बियाणे पेरणीसाठीची शिफारस आहे. सोयाबीन ६ ओळी आणि तूर एक ओळ आंतरपीक करताना ट्रॅक्टरचलित सात फण्याच्या पेरणीयंत्राने ६ ओळी सोयाबीन : १ ओळ तूर अशी पेरणी केली जाते. म्हणजेच प्रत्येक सातवी ओळ तूर पिकाची असते. म्हणजेच जुन्या शिफारशीनुसार सोयाबीनची उनारी सव्वाचार किलोने कमी केली पाहिजे.

तर तूर पिकाची फक्त १.५ किलो उनारी व्हावला पाहिजे. परंतु आपल्याकडे पेरणी यंत्र सोयाबीनसाठी कॅलिब्रेट केलेले असल्याकारणाने ही बाब शक्य होत नाही. तूर पिकाचे बियाणे जास्त (एकरी ५-६ किलो) पेरले जाते. म्हणूनच मजुरांच्या साह्याने दोन झाडांतील अंतर शिफारशीप्रमाणे १५-२० सेंमी राखून विरळणी करून घेण्याची गरज असते. अन्यथा, पुढील समस्या उद्‌भवतात.

तूर पिकाची उभट वाढ होते. तूर रोपटे अवस्थेत असताना मोठ्या तीव्रतेचा पाऊस आल्यास जमिनीत बुरशीचा प्रादुर्भाव होतो. मूळसडचा प्रादुर्भाव होऊन झाडे जळतात. हे केवळ झाडे अत्यंत जवळ असल्यामुळे होते. याकरिता निंदणी (खुरपणी) करत असताना बळकट रोप ठेवून अन्य रोपे काढून टाकावीत.

तुरीचे शेंडे छाटणे तूर पिकाच्या झाडांची उंची वाढविण्याऐवजी फांद्याची संख्या वाढणे उत्पादकतेच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. तूर झाडाच्या मुख्य खोडावर मुख्य फांद्या, मुख्य फांद्यावर उपमुख्य फांद्या, उपमुख्य फांद्यावर उपफांद्या म्हणजेच तोरंबे येतात. उत्पादकता वाढीसाठी तोरंब्याची संख्या आणि लांबी जेवढी जास्त तेवढे चांगले. पीक साधारणतः एक महिन्याचे असताना मुख्य खोडावर मुख्य फांद्या येण्यास सुरुवात होते, तर दोन महिन्यांचे होताना उपमुख्य फांद्या फुटू लागतात. साधारणतः तीन महिन्यांचे पीक होताना उपफांद्या येऊ लागतात.

उपफांद्याची संख्या वाढण्यासाठी पीक २५ ते ३० दिवसांचे असताना शेंडे छाटून घ्यावेत. अलीकडे शेंडे छाटण्याची सुरक्षित अशी छोटी यंत्रे मिळतात. या वेळी प्रत्येक झाडाच्या शेंड्यावरील केवळ कोवळा पर्णगुच्छ मशीनद्वारे छाटावा. अशाच प्रकारे पीक ५५ ते ६० दिवसांचे असताना आणि पुढे ८० ते ९० दिवसांचे असतानाही कोवळे शेंडे छाटून घ्यावेत. शेंडे छाटणीवेळी जमिनीत मुबलक ओल असावी.

या वेळी पावसाळी वातावरण असल्यास छाटणी केल्यानंतर बुरशीनाशकाची फवारणी अवश्य करावी. या वेळी तज्ज्ञांच्या सल्ल्याने वाढरोधकाचाही वापर करता येईल. मजूर व अन्य काही कारणामुळे केवळ दोन वेळाच छाटणी शक्य असल्यास पेरणीपासून ३५ दिवसांनी व ७० दिवसांनी करावी. केवळ एक वेळा छाटणी शक्य असल्यास पीक साधारणतः ६० ते ७० दिवसांचे असताना करावी. तुरीचे पीक सरसकट सतरा पानांवर असताना मशिनद्वारे छाटणी केल्यास प्रत्येक झाडावर सुमारे सतरा फुटवे येत असल्याचा प्रगतिशील शेतकऱ्यांचा अनुभव आहे.

प्रा. जितेंद्र दुर्गे, ९४०३३०६०६७ (सहयोगी प्राध्यापक - कृषी विद्या, श्री शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhan Sabha Election Results : काँग्रेसच्या दिग्गजांना मोठा धक्का, पृथ्वीराज चव्हाण, थोरात, देखमुखांसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर

Climate Change Issue : हवामान बदलाच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी हवे ‘हवामान वित्त’

Maharashtra Vidhansabha Result 2024 : लाडकी बहिण योजनेचा महायुतीला फायदा; सोयाबीन दराचा मुद्दा ठरला 'फेल'?

Maharashtra Assembly Election : कोल्हापूर जिल्ह्यातील डझनभर कारखानदारांचे भवितव्य ठरणार, पहिल्या ३ तासांचा काय सांगतो कल

Farmers Exploitation : कोणा सांगाव्या शेतकऱ्यांच्या व्यथा

SCROLL FOR NEXT