Watershed Management : पृथ्वीच्या पृष्ठभागावरील अथवा भूपृष्ठासंबंधित कोणत्याही भौगोलिक माहितीचे संग्रहण, संकलन, संघटन आणि विश्लेषण करण्यासाठी संगणकीय प्रणाली वापरली जाते. या संगणकीय आज्ञावलीला भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) म्हणतात.
त्यात भूसंदर्भीय माहितीचे विविध माध्यमांतून एकत्रीकरण केले जाते. ती साठवून त्यावर आवश्यकतेनुसार प्रक्रिया किंवा विश्लेषण केले जाते. त्यावरून एखाद्या विशिष्ट प्रदेशांतील परिस्थितीचे प्रारूप तयार केला जाते. या तंत्रज्ञानामध्ये एकाच वेळी अनेक घटकांचे पृथक्करण करण्याची क्षमता आहे.
२००८ च्या पाणलोट क्षेत्र विकासाच्या सामायिक मार्गदर्शक सूचनेनुसार देशामध्ये सविस्तर प्रकल्प अहवाल बनवण्यासाठी शासकीय व बिगर शासकीय प्रकल्प कार्यान्वयीन यंत्रणाना भौगोलिक माहिती प्रणालीचा वापर अनिवार्य केला आहे.
या संदर्भात प्रशिक्षण व क्षमता बांधणीसाठी प्रादेशिक भौगोलिक माहिती प्रणाली व सदूर संवेदन केंद्र, नागपूर यांची एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत मदत घेण्यात आली होती.
पाणलोट क्षेत्र उपचारांचे आराखडे बनवतना निवडलेल्या पाणलोट क्षेत्रांच्या संगणकीय स्थलदर्शक भौगोलिक क्षेत्र माहिती (Morphometric analysis) प्रणालीचा वापर करण्याच्या सूचना केंद्र व राज्य शासनाने दिल्या होत्या. यात माहितीचे विश्लेषण करून पाणलोटामध्ये अस्तित्वात असलेल्या नैसर्गिक नाल्यांच्या जाळ्याचा व त्यांच्या प्रकारांचा अभ्यास केला जातो.
नाला वर्गीकरणाचे (Stream orders)
गट कसे करतात?
पाणलोटक्षेत्रांमध्ये माथ्याच्या रेषेपासून (Ridge Line) छोटे छोटे प्रवाह तयार होतात, त्यास नाला क्रमांक (स्ट्रीम ऑर्डर) एक असे म्हटले जाते. नाला क्र. एकचे दोन छोटे प्रवाह किंवा ओढे एकत्र येऊन पुढे नाला क्रमांक दोन तयार होतो. यापुढे दोन क्रमांकाचे दोन प्रवाह एकत्र येऊन नाला क्रमांक तीन तयार होतो. उदाहरणासाठी कृष्णा नदीच्या पाणलोट लोट क्रमांक २२ चे विश्लेषण करू.
या छायाचित्रामध्ये निळ्या रंगाच्या रेषा नाला क्र. १ दर्शवितात. जेव्हा दोन निळ्या रेषा एकत्र येऊन गुलाबी रंगाची ओहोळ किंवा प्रवाह तयार होतो, त्यास नाला क्र. २ म्हणतात. जेव्हा गुलाबी रंगाच्या दोन प्रवाहांच्या एकत्रीकरणानंतर तयार होणारा प्रवाह दर्शविण्यासाठी लाल रंगाची रेषा (नाला क्र. ३) दाखवली आहे. दोन लाल रेषांनी दर्शविलेल्या प्रवाहांच्या एकत्रीकरणानंतर तयार होणारा प्रवाह (नाला क्र. ४) जांभळ्या रेषेने दाखवला आहे. याच प्रकारे पुढील प्रवाह तयार होतात. छोट्या ओढ्यापासून सुरुवात होऊन पुढे विस्तीर्ण नदी पात्रात त्याचे रूपांतर होते.
कृष्णा नदीच्या २२ व्या पाणलोट क्षेत्रामध्ये गट क्रमांक एक मध्ये एकूण ५७८ छोटे प्रवाह आहेत, तर गट क्रमांक दोन मध्ये १५१ प्रवाह आहेत. गट क्रमांक तीनमध्ये ३२ प्रवाह तर गट क्रमांक चारमध्ये सात प्रवाह आहेत. गट क्रमांक पाच मध्ये आठ प्रवाह तर गट क्रमांक सहा मध्ये एक प्रवाह आहे. तिथे छोट्या नदीची निर्मिती दिसून येते.
या पाणलोट क्षेत्रामध्ये एकूण ७७७ ओहोळ, प्रवाह किंवा नाले आहेत. या प्रवाहांची एकूण लांबी ४९५ किलोमीटर इतकी आहे. पाणलोट क्षेत्राच्या विज्ञानामध्ये हे छोटेच ओढे किंवा नदी प्रवाह शेतकऱ्यांसाठी भाग्यरेषा ठरतात. जगभरातील ८० टक्के पाण्याचे प्रवाह हे वर्गीकरणाप्रमाणे नाला क्र. एक ते तीन या दरम्यान येतात. नाला क्र. चार ते सहामध्ये मध्यम आकाराच्या प्रवाहांचा छोट्या नद्यांचा किंवा ओहोळांचा समावेश होतो.
यानंतर नाला क्र. सहा ते बारा यामध्ये येणाऱ्या क्षेत्रास नदी प्रवाह म्हणून ग्राह्य मानले जाते. याची वेगवेगळी आपणास उदाहरणे पाहता येतील. अमेरिकेमध्ये ओहिओ नदीचे पाणलोट क्षेत्र नाला क्र. आठ मध्ये आहे. तर मिसिसीपी या नदीचे वर्गीकरण नाला क्र. दहा मध्ये येते. तर दक्षिण अमेरिकेच्या ॲमेझॉन नदीचे जगातील लांब नद्यांपैकी एका नदीचे नाला वर्गीकरण गट क्र. बारामध्ये करण्यात येते.
नालाक्षेत्र वर्गीकरणानुसारच हवेत पाणलोट उपचार
नाला वर्गीकरणाची ही पद्धत स्ट्र्हलर या शास्त्रज्ञाने १९६४ मध्ये प्रथम मांडली. या पद्धतीमुळे पाणलोट क्षेत्रांचे उपचार निश्चितीसाठी फायदा होतो. भारतामध्ये एकात्मिक व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत या माहिती प्रणालीच्या वापरासंदर्भात निर्देश असूनही शासकीय आणि बिगरशासकीय प्रकल्प कार्यान्वयीन यंत्रणांनी सविस्तर प्रकल्प अहवाल बनवताना त्याचा वापर केल्याचे फारसे दिसत नाही.
राबविल्या जाणाऱ्या पाणलोट क्षेत्र प्रकल्पांची शाश्वतता अशा विज्ञानावरच अवलंबून असते. उदा. सविस्तर प्रकल्प अहवाल बनवताना कृषी विभागाच्या तालुका किंवा जिल्हा कार्यालयाकडून पाणलोट क्षेत्रांचे उपचार नकाशे भौगोलिक माहिती प्रणाली द्वारे घेणे अनिवार्य होते.
काही अंशी प्रकल्पांमध्ये हे नकाशे वापरले गेले असले तरी त्याचा खऱ्या अर्थाने प्रभावी वापर झाल्याचे दिसत नाही. विशेष म्हणजे सिमेंट नालाबांध किंवा माती नाला बांध हे तांत्रिकदृष्ट्या नाला क्र. एक मधील ओढा, नाला किंवा ओहोळांवर (तेही सर्वसाधारणपणे १ ते ३ टक्के उताराच्या जमिनीवर) बांधणे अपेक्षित आहे. मात्र बऱ्याच प्रकल्पांमध्ये विज्ञान बाजूला सारून नाला क्र. दोन किंवा तीन वरही असे उपचार केलेले दिसतात.
तिथे कमी काळात अधिक पाऊस किंवा ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण झाल्यास त्या पाणलोटामध्ये वेगाने आलेल्या प्रवाहांमुळे माती नाला बांध किंवा सिमेंट बांध फुटून जातात. बांध तुटल्याने शासनाचे आर्थिक नुकसान होत असले तरी त्यापुढील सर्व शेतकऱ्यांची सर्व सुपीक माती वाहून गेल्यामुळे कधीही भरून न येणारे नुकसान होते.
पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनमध्ये केवळ पाण्याच्या प्रवाहानुसार नाल्यांचे वर्गीकरण केले जात असले तरी त्याचा जैव, भौगोलिक, जीवशास्त्र या अनुषंगाने वेगळा विचार त्या क्षेत्रातील शास्त्रज्ञ मांडतात. पाणलोट क्षेत्रातील माथ्याची (चढाची) रेषा (रीज लाइन) ते नदीपर्यंत क्षेत्र यामध्ये निरनिराळ्या टप्प्यांमध्ये विभागले जाते.
त्या टप्प्यानुसार जैवविविधतेमध्ये बदल दिसून येतात. यासंदर्भात नद्यांची क्षेत्रीय संकल्पना प्रतिकृती (River Continuum Concept model) वापरले जाते. छोटे छोटे नैसर्गिक प्रवाहापासून अधिक क्षेत्र तयार होईपर्यंत विपूल अशी जैवविविधता (वनस्पती, प्राणी, शेती पद्धती, पिकांचे वाण, फळझाडे, पक्षीसंपदा, सूक्ष्मजीव साखळ्या, अन्नद्रव्य साखळ्या इ.) प्रदेशनिहाय तयार होते.
ही जैवविविधता स्थलकालानुरूप तयार होत असते. सिंचन प्रदेशातील पाणलोट क्षेत्रातील समस्या व अवर्षण प्रवण पाणलोट क्षेत्रातील समस्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या आहेत. आपण मात्र केवळ पाण्याच्या अपेक्षेने नैसर्गिक ओढे, नद्यांमध्ये निसर्गाच्या मर्यादा ओलांडून आवश्यक, अनावश्यक हस्तक्षेप करतो. विज्ञान विसरल्याने होणाऱ्या विध्वंसासाठी पुन्हा निसर्गालाच दोष देत राहतो.
- डॉ. चंद्रशेखर पवार, ९९२३१२२७९१, (संचालक, शिवश्री पर्यावरण संस्था, पुणे)
- डॉ. सतीश पाटील, ९४२२७०७२६१, (प्राध्यापक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.