Kantilal Patil and Family Agrowon
ॲग्रो विशेष

Kantilal Patil : संशोधकवृत्तीने शेती करायला शिकलो

Article by Kantilal Patil : माझे बालपण एकत्रित कुटुंबव्यवस्थेत गेलेलं. वडील भोमराज शेतीत, मधले काका काशिनाथ नोकरी तर लहान काका गंगाधर गावात व्यवसाय करायचे.

Team Agrowon

Agriculture Article : माझे बालपण एकत्रित कुटुंबव्यवस्थेत गेलेलं. वडील भोमराज शेतीत, मधले काका काशिनाथ नोकरी तर लहान काका गंगाधर गावात व्यवसाय करायचे. “शेतीत कष्ट नको, म्हणून कुटुंबातील मुलांनी शिकावं” असा वडीलधाऱ्यांचा आग्रह होता. त्यानुसार जळगाव शहरातील रावसाहेब रूपचंद विद्यालयात प्राथमिक व माध्यमिक शिक्षण, पुढे नूतन मराठा महाविद्यालयातून बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले.

पदवीचे शिक्षण घेत असताना घरी येणे होत असे. दरम्यान, पदवीच्या अंतिम वर्षात असताना २००० मध्ये कुटुंब विभक्त झाले. वडील घरात मोठे होते. वडिलांच्या वाट्याला १७ एकर शेती आणि १ बैलजोडी आली. शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीच्या मागे न लागता मी शेती करण्याचा निर्णय घेतला. शेतीचा फारसा अनुभव नव्हता. शेती करताना आलेल्या समस्यांचा वेध घेऊन शास्त्रीय माहितीच्या आधारे त्यावर मात करत शेतीमध्ये सातत्य राखले. त्यातूनच टरबूज, खरबूज, केळी, कापूस या पिकांच्या दर्जेदार उत्पादनासह गुणवत्तेतही यश संपादन केले.

...अन् उमेद निर्माण झाली

कुटुंब विभक्त झाल्यावर शेतीकामांमध्ये वडील आणि भाऊ योगराज यांना मदत करायला जायचो. एकदा कापूस पेरणीसाठी वडील व भावासोबत शेतात गेलो होतो. औत चालवत असताना सरी सरळ रेषेत येत नव्हती. हे पाहून जवळची काही मंडळी हसू लागली. त्या वेळी मनाला वेदना झाल्या, मात्र पर्याय नव्हता. अखेर हळूहळू शेतीकामे शिकत गेलो. अखेर प्रयत्नांनी मशागत व शाळेत शिकलेल्या भूमितीचे ज्ञान वापरून कुटुंबीयांच्या मदतीने एक दोरीत कापूस लागवड करून दाखवली.

लोक हसल्याचे वाईट वाटून घेतले नाही, तर त्यापासून धडा घेतला. नियोजनपूर्वक काम झाल्याने कापूस पीक तरारून आले. शेजारील शेतातील पिकाच्या तुलनेत पीक चांगले आल्याने आत्मविश्‍वास वाढला. त्यातून शेतीमध्ये काहीतरी करून दाखविण्याची नवी उमेद निर्माण झाली. प्रयोगशीलतेमुळे जोमदार पिके हाती येऊ लागली. आणि हळूहळू शेतीमध्ये रूळत गेलो.

दरम्यानच्या काळात २००२ मध्ये मोठे बंधू योगराज यांचा शेतातून घरी येताना ट्रॅक्टर पलटी होऊन अपघातात मृत्यू झाला. त्या वेळी मधले बंधू सुधाकर हे जामनगर (गुजरात) येथे नोकरीला होते. त्यामुळे शेतीची संपूर्ण जबाबदारी माझ्या खांद्यावर आली. पारंपरिक पद्धतीने शेती केली तर आपला टिकाव लागणार नाही. त्यावर शेतीचे तांत्रिक ज्ञान व अभ्यास हाच पर्याय होता. मग त्यादृष्टीने शेतीत नवे पर्याय अभ्यासत वाटचाल सुरू ठेवली. नंदुरबार जिल्ह्यातील प्रयोगशील मिरची, खरबूज उत्पादक शेतकऱ्यांचे मार्गदर्शन मिळत गेले. त्यातून शेतीतील प्रयोगशील तरुणांच्या भेटी आणि संवाद वाढू लागला.

संकटांशी भिडलो, पुढे आलो...

गावामध्ये एक बियाणे कंपनीचा प्रतिनिधी येत असे. एकेदिवशी सायंकाळी उशीर झाल्याने तो आमच्याकडे मुक्कामी थांबला. त्याने खरबूज लागवडीविषयी सखोल शास्त्रीय माहिती दिल्यानंतर लागवडीचा निर्णय घेतला. पहिल्याच वर्षी एक एकरातून चांगले उत्पादन मिळाले. कमी दिवसांत चांगले उत्पन्न हाती आल्याने कामाची दिशा ठरली. उपलब्ध भांडवल आणि उत्पादन यांचा अभ्यास केला. पुढे ५ एकरांतील केळी बागेत आंतरपीक म्हणून खरबूज लागवड केली.

१० जानेवारी २००९ ला झालेल्या गारपिटीत टरबूज व केळीचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर २०१३ मध्ये विषाणूजन्य रोगांमुळे पुन्हा टरबूज लागवडीचे अतोनात नुकसान झाले. असे दोन मोठे फटके बसले. त्यातही “संकटांशी भिडायचं आणि पुढे जायचं” हा बाणा कायम राखला. त्यातूनच सुरुवातीला अवघड वाटणारी वाट अजूनच सुकर होत गेली.

बदलत्या शेतीचे मिळाले चौफेर ज्ञान

२००४ मध्ये पुणे येथे कृषी प्रदर्शनात सुधारित यांत्रिकीकरण पाहण्यासाठी गेलो होतो. परतीच्या प्रवासात राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील फलोत्पादन विभागाचे डॉ.शिवाजी गोहिल यांची भेट झाली. त्यांच्याकडून नवीन संकल्पना कळाल्या. त्यानंतर कीडनियंत्रण, माती परीक्षण कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून अधिक माहिती घेतली.

यासह परिसरातील प्रयोगशील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अपडेट घेऊ लागलो. शेतीकामे अन् सोबतीला कृषी साहित्याचे वाचन असा दिनक्रम ठरलेला होता. विविध शेतकरी मासिके आणि दैनिक ‘ॲग्रोवन’ हे दिवसभरातील मित्र होते. त्यातून बदलत्या शेतीचे चौफेर ज्ञान मिळू लागले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election : शेतकरी संघटनांना भुलवतेय आमदारकीची मोहमाया

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची ससेहोलपट

Sanjay Kulkarni Death : ‘जलसंपदा’ला दिशा देणारे संजय कुलकर्णी यांचे निधन

Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीक कर्जाचे ६८५ कोटींचे उद्दिष्ट

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रात थंडीची चाहूल

SCROLL FOR NEXT