Sericulture Farming : अल्पभूधारक युवकाचे रेशीम शेतीत धवल यश

Article by Vikas Jadhav : सातारा जिल्ह्यातील संगम माहुली (खेड) येथील धनंजय मोहिते या उच्चशिक्षित युवकाने आठ वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून ही गोष्ट सिद्ध केली आहे. युवकांपुढे धनंजय यांचे उदाहरण नक्कीच प्रेरणादायी ठरावे.
Dhananjay Mohite
Dhananjay MohiteAgrowon

Success Story Of Sericulture Farming : सातारा शहरापासून पाच किलोमीटरवर संगम माहुली (खेड) येथे ३३ वर्ष वयाचे युवक धनंजय शिवाजी मोहिते यांचे घर आहे. त्यांनी पुणे येथून २०१५ मध्ये ‘एमसीए’ ची पदवी घेतली. त्यांची केवळ एक एकर शेती आहे.

त्यात वडील उसाचे पीक घ्यायचे. धनंजय पुणे येथील आयटी कंपनीत ग्राफिक डिझाईन विभागात नोकरी करू लागले. पण शेतीची आवड जपली होतीच. वडिलांच्या निधनानंतर नोकरी सोडून त्यांना घरची जबाबदारी सांभाळण्यासाठी गावी यावे लागले.

शेती एक एकरच होती. त्यातूनच घरचे अर्थकारण मजबूत करणे आव्हानाचे होते. पण धनंजय मोठ्या धीराचे व हिम्मतवान होते. त्यांनी पॉलिहाऊस, फूलशेती, शेळीपालन, कुक्कुटपालन, रेशीम शेती आदींचे पर्याय अभ्यासले. त्यातून तुलनेने कमी गुंतवणूक असलेल्या रेशीम शेतीचा पर्याय अधिक भावला.

मार्गदर्शनातून सुरवात

सुरवात करण्यापूर्वी दहा शेतकऱ्यांकडील रेशीम युनिटला भेटी दिल्या. तत्कालीन रेशीम अधिकारी रमेश भोसले, रायगाव येथील रेशीम उत्पादक संभाजी निकम व गोजेगाव येथील दत्ता घोरपडे तसेच अनुभवी रेशीम उत्पादकांकडून व्यवसायातील सर्व बारकावे समजावून घेतले.

नोव्हेंबर २०१६ मध्ये आपले संपूर्ण एक एकर क्षेत्राचा वापर करीत व्ही-१ या तुती वाणाची लागवड केली. सन २०१७ मध्ये राहत्या घराच्या मागे ५० बाय २० बाय फूट लांबी- रुंदीचे दक्षिण उत्तर शेड उभारले.

शेड व आतील कामासाठी सुमारे तीन लाख रुपये खर्च केले. दीडशे अंडीपुंजांची पहिली बॅच घेतली. त्यासाठी नजीकच्या संदीप केसकर यांच्याकडून चॉकी कीटक व मार्गदर्शन घेतले.

Dhananjay Mohite
Sericulture Farming : रेशीम शेतीतून रोजगारनिर्मिती

पहिल्या यशातून वाढला आत्मविश्‍वास

पहिल्याच बॅचला १५० किलो कोष उत्पादन मिळाले. कर्नाटकातील रामनगर येथे किलोस सरासरी ४०० रुपये दर मिळाला. सुरवातच चांगली झाल्याने आत्मविश्वास निर्माण झाला. व्यवसायात वाढ करण्याच्या दृष्टीने २०१९ मध्ये शेडची उंची वाढवून विस्तार सुरू केला.

त्यासाठी दोन लाख रुपये खर्च आला. दीड एकर क्षेत्र पाच वर्षासाठी खंडाने घेऊन त्यामध्ये तुती लागवड केली. त्यामुळे ३०० अंडीपुंजांची बॅच घेणे शक्य झाले. व्यवसायातही गती आली. आज पाच वर्षांचा करार संपला आहे. पाला आता कमी पडणार असल्याने पुन्हा १५० अंडीपुजांची बॅच घेण्यास सुरवात केली आहे.

वर्षभरात दहा बॅच घेण्यात येतात. प्रति १५० अंडीपुंजाच्या बॅचपासून १२५ ते १३० किलो कोषांचे उत्पादन मिळते. पूर्वी रामनगर (कर्नाटक), पापर्डे, अंतवडी आदी ठिकाणी विक्री केली. सध्या तासगाव (जि. सांगली) येथील एका धागेनिर्मिती युनिटला कोषांचा पुरवठा होतो.

त्याससरासरी ४०० रुपये प्रति किलो दर मिळतो. बारामती येथेही विक्रीसाठी पर्याय आहे. आठ वर्षांच्या कालावधीत किलोला सर्वाधिक ६८५ रुपये दर मिळाला आहे. खर्च वजा जाता प्रति बॅच ७० ते ७५ टक्के नफा मिळतो.

कोषांच्या दरातील चढ-उताराचा थोडा फार परिणाम होतो. मात्र उत्पन्नात सातत्य आहे. जिल्हा रेशीम अधिकारी प्यारसिंग पाडवी, रमेश भोसले, अनिकेत गुजर यांचे मार्गदर्शन मिळते. व्यवसाय वृद्धीसाठी पुन्हा करार पद्धतीने जमीन मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानंतर प्रति ३०० अंडीपुंजांची बॅच घेण्याचे उद्दिष्ट आहे.

Dhananjay Mohite
Sericulture Research : रेशीम शेतीविषयक संशोधनासाठी निधी उपलब्ध करून द्यावा : डॉ. इंद्र मणी

धनंजय यांचा रेशीम व्यवसाय

आठ वर्षांपासून रेशीम शेतीत सातत्य.

तुतीला मिश्र खते तसेच अळ्यांच्या विष्ठेचा वापर. ‘रोटेशन’ पद्धतीने पाल्याची छाटणी.दर्जेदार पाल्याचे उत्पादन. ठिबक सिंचन व गरजेनुसार पाटपाण्याचा वापर.

बागेची तीन वर्षातून छाटणी.

चॅाकी कीटक बाहेरून घेण्यात येतात. त्यामुळे संपूर्ण बॅचचा कालावधी दहा दिवसांनी कमी होऊन उत्पादन लवकर हाती येते.

घरानजिकच शेड असल्याने सकाळी सहापासूनच कामास सुरवात.

दिवसातून दोन वेळा पाला देण्यात येतो. त्यात १२ तासाचे अंतर.

युनिट मध्ये चार रॅक्सची योजना. गारवा राहण्यासाठी पत्र्यांवर बारदान, गरजेवेळी स्प्रिंकलरचा वापर.

प्रत्येक बॅच आटोपल्यानंतर शेडचे काळजीपूर्वक निर्जंतुकीकरण.

बहुतांश सर्व कामे धनंजय पत्नी प्रियांका यांच्या साथीने करतात. आवश्यकतेवेळीच मजुरांची मदत. आई शालन यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांची आत्तापर्यंत मोलाची साथ मिळाली.

रेशीमशेतीत खूप संधी असून नोकरीप्रमाणे चांगले उत्पन्न व यश मिळते. शिवाय तुम्ही मालक असल्याचा आनंद असतो. याच व्यवसायाच्या बळावर आरसीसीचे दुमजली घर बांधता आले. कौटुंबिक अर्थकारण मजबूत करता आले.
धनंजय मोहिते ९७६५३६६५५६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com