विकास झाडे
Ayodhya Ram Mandir Inauguration Ceremony : अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला काँग्रेसचे नेते जात नाहीत म्हणून ते हिंदूविरोधी असल्याचे राजकारण भारतीय जनता पक्षाने सुरू केले आहे. तर केवळ सत्तेसाठीच अर्धवट बांधलेल्या राम मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येत असल्याचा आसूड काँग्रेस भाजपवर उगारतो आहे.
येत्या २२ जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. धार्मिक मान्यतेनुसार शंकराचार्य हे हिंदू धर्मातील धर्मगुरूचे सर्वोच्च पद आहे. लोकसभा निवडणुकीचा बिगुल फुंकण्याची वेळ आली असल्याने घाईघाईने का होईना मंदिराचे उद्घाटन करून मोदी सरकारला हुकमी एक्का सोडायचा आहे.
मात्र ज्योतिर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सोहळ्याचे आयोजन शास्त्रानुसार केले जात नसल्याची टीका केली आहे. मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे, तर आम्ही काय टाळ्या वाजवायला जायचे का, असा प्रश्न करीत गोवर्धन मठाचे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती यांनी प्राणप्रतिष्ठा, मूर्तिस्थापना खेळ नाही, यात दर्शन-व्यवहार-विज्ञान एकत्रित असावे लागते, याकडे लक्ष वेधले.
मंदिराचे बांधकाम पूर्ण न झाल्याचा मुद्दा उपस्थित केल्याने आता शंकराचार्यही भाजप प्रवक्त्यांच्या रडारवर आले आहेत. राम मंदिर ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी श्रीराम मंदिर फक्त रामानंद पंथाचे असल्याचे विधान केल्याने वातावरण पुन्हा एकदा तापले.
भाजपमय सोहळा
हा एकूण सोहळाच भाजपमय झाल्याचे आता लपून राहिलेले नाही. का होऊ नये? जेव्हा भाजपचे संसदेतील प्रतिनिधी अगदीच नगण्य होते, तेव्हा भाजपने राममंदिराचा विषय घरोघरी पोहोचवला होता. १९९० मध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी कारसेवा सुरू केली होती. भाजपच्या प्रत्येक वचननाम्यात मंदिराच्या उभारणीचा विषय असे.
आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने का होईना राम मंदिराचे बांधकाम सुरू असताना त्याचे श्रेय भाजपने घेणे हे स्वाभाविकच आहे. परंतु या कार्यक्रमाला सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि अधीररंजन चौधरी हे काँग्रेसचे नेते जात नसल्याने ते हिंदूविरोधी कसे ठरतात, हाही प्रश्न आहेच. आम्हाला वाटेल तेव्हा आम्ही श्रीरामाच्या दर्शनाला जाऊ, भाजपच्या राजकीय कार्यक्रमाला जाणार नाही, ही या नेत्यांची भूमिका रास्त नाही, असे कसे म्हणता येईल?
गेली हजारो वर्षे श्रीराम हा भारतीय सांस्कृतिक ऐक्याचा तसेच आदर्श कुटुंब व राज्य व्यवस्थेचा केंद्रबिंदू राहिलेला आहे. ब्रिटिशांविरुद्ध राष्ट्रीय लढा उभारताना महात्मा गांधींनी श्रीरामाचा मोठ्या खुबीने उपयोग करून घेतला होता. त्यांनी रामराज्य संकल्पनेला विराट स्वरूप दिले होते. त्यांच्या नजरेतील रामराज्य हे विशाल मानवतावादाचे समग्र रूप होते. २ जानेवारी १९३७ रोजीच्या ‘हरिजन’मध्ये गांधीजी म्हणतात,
रामराज्य म्हणजेच नागरिकांच्या नैतिकतेवर आधारलेले राज्य’. आता श्रीरामाचा आधार आदर्श राज्याच्या संकल्पनेऐवजी राजकीय स्वार्थासाठी घेतला जातो आहे. अर्थात, रामामुळे भारतीय सांस्कृतिक ऐक्य कधीही धोक्यात आल्याचा इतिहास नाही आणि असे कोणी प्रयत्न केले तरी ते यशस्वी झालेले नाहीत. याचे कारण म्हणजे अयोध्या हीच मुळात विविध संस्कृतींच्या मिलापाची आणि ऐक्याची भूमी राहिलेली आहे.
इसवी सनपूर्व चौथ्या शतकातील ‘जम्बुद्विपोन्नती’ या ग्रंथानुसार अयोध्येचे मूळचे नाव विनीयनगरी असे होते. या नगराची स्थापना जैन धर्माचे पहिले तीर्थंकर ऋषभनाथ यांनी केली. पुढे कालौघात या नगराची नावे इक्ष्वाकूनगर, साकेत अशी बदलत शेवटी गुप्तकाळात अयोध्या असे कायम झाले. ही नगरी अनेकदा ओस पडलेली आणि पुन्हा पुन्हा वसवली गेल्याचे दाखले इतिहासात आढळतात. वाल्मीकी रामायण या महाकाव्यापूर्वीच इसवी सनाच्या पहिल्या शतकात विमल सुरीकृत ‘पउमचरिउ’ या महाकाव्यात रामकथा गायली गेली होती.
बौद्ध साहित्यातील सुत्तपीटकातील दशरथ जातकात रामकथा वेगळ्या स्वरूपात सांगितली गेली होती. दक्षिणेतही प्राचीन संगम साहित्यात रामकथा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अवतरलेली आहे. अजितनाथ, अभिनंदननाथ, सुमतीनाथ आणि अनंतनाथ या जैन तीर्थंकरांचा जन्मही अयोध्या येथेच झाला. त्याचाही उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भूमिपूजन प्रसंगी केला होता. बौद्ध साहित्यानुसार गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर यांनी आठ वर्षे अयोध्या येथे वास्तव्य केले होते.
रामराज्य संकल्पनेचे गारुड
अयोध्येत वादग्रस्त जागा आणि परिसरात अनेकदा उत्खनने झालेली आहेत. या उत्खननांमध्ये अनेक प्राचीन अवशेष मिळाले. १९७६ मध्ये पुरातत्त्ववेत्ते बी. बी. लाल यांनी केलेल्या उत्खननात जैन तीर्थंकरांची इसवीसनपूर्व चौथ्या शतकातील प्राचीन प्रतिमा मिळाली. ही प्रतिमा जैनांच्या इतिहासातील सर्वांत प्राचीन अवशेषांपैकी एक आहे. अयोध्या नगरीत बौद्ध स्तुपांचेही अनेक अवशेष प्राप्त झालेले आहेत. अहिल्यादेवी होळकरांनी अयोध्येला राममंदिरासकट अजून चार मंदिरे बांधली तेव्हा अयोध्येवर आसिफौद्दुला अमानी या सुभेदाराचे राज्य होते.
१७३६ मध्ये अयोध्येच्या सुभेदाराचा दिवाण केसरी सिंग याने अयोध्येमध्ये जन्म घेतलेल्या पाच जैन तीर्थंकरांची पाच मंदिरे उभारली होती. मुस्लिम शासक असूनही ही मंदिरे उभारली गेली. आक्रमकही मवाळ होत जनभावनांशी कसे समरस झाले, याचा हाही एक इतिहास आहे. अयोध्येत एकेकाळी वैदिक, जैन, बौद्ध इत्यादी धर्मधारांमध्ये तात्त्विक चर्चेला उधाण आले होते. एका अर्थाने ती देशाची सांस्कृतिक राजधानी बनली होती.
भारतीय जनमानसावर रामराज्य या संकल्पनेचे गारुड हजारो वर्षे कायम आहे. रामायणात रामाच्या राज्याभिषेकानंतर भरताने वर्णन केल्यानुसार, रामराज्यात कधीही दुष्काळ पडत नसे. लोक दीर्घायुषी असून बापाला कधी मुलाचे अंत्यसंस्कार करावे लागत नसत. राज्यात कोणी विधवाही नव्हती. सारे लोक वैभवात राहत. लोक आनंदी व समाधानी होते. महात्मा गांधींनी रामराज्य संकल्पनेला अजून विराट मानवतावादी रूप दिले.
१९ सप्टेंबर १९२९ रोजीच्या ‘यंग इंडिया’मध्ये महात्मा गांधी लिहितात, ‘मी रामराज्याचा अर्थ हिंदू राज्य असा समजत नाही. रामराज्य हे देवाचे राज्य आहे, असे मी मानतो. माझ्यासाठी राम आणि रहीम हे दोन्हीही एक आणि सारखेच आहेत; सत्य आणि सद्गुणांव्यतिरिक्त मी दुसऱ्या कुठल्याही देवाला मानत नाही.’ थोडक्यात, राम ही भारतीय लोकांचे ऐक्य घडवून आणू शकणारी धर्मातीत शक्ती आहे, यावर त्यांचा विश्वास होता.
अयोध्येतील राममंदिर होत असताना ‘धर्माधिकाऱ्यांचा’ एक गट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धर्माचे नेतृत्व करण्याच्या प्रयत्नांना आव्हान देतानाही दिसू लागला आहे. त्यांना कौशल्याने हाताळणे यातच मोदींचे यश अवलंबून आहे. मंदिरातील मूर्तीची लवकरच प्राणप्रतिष्ठा होत आहे. आता त्याबाबतचे राजकारण थांबवून देशाच्या दूरगामी हिताच्या दृष्टीने निर्णय घेऊन प्रयत्न केले गेले पाहिजेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.