Humani Pest Agrowon
ॲग्रो विशेष

Humani Pest Control: हुमणी किडीच्या भुंगेऱ्यांचे नियंत्रण

Humani Pest Management: हुमणी किडीच्या भुंगेऱ्यांमुळे पिकांचे मोठे नुकसान होते. वेळेत उपाययोजना केल्यास या किडीवर नियंत्रण मिळवता येते आणि उत्पादन वाढवता येते.

Team Agrowon

डॉ. अभयकुमार बागडे, शुभम पाटील, रवींद्र पालकर

Pest Control in Farming: साधारणपणे मे-जून महिन्यात हुमणीचे भुंगेरे पहिल्या पावसानंतर जमिनीतून मोठ्या प्रमाणात बाहेर येतात. मात्र मागील वर्षी (मार्च २०२४) पासून वळवाच्या पावसाच्या आधीच भुंगेरे जमिनीतून बाहेर पडण्याचे प्रमाण वाढले आहे. सद्यःस्थितीत किडीसाठी अनुकूल स्थिती असून, संभाव्य नुकसान टाळण्यासाठी वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे

सद्यःस्थितीत काही जिल्ह्यांमध्ये वळवाचा पाऊस झाला आहे. ओलिताच्या ऊस क्षेत्रामध्ये सामान्यतः मे-जून महिन्यांत आढळणारे होलोट्रॅकिया सेराटा या प्रजातीचे हुमणी भुंगेरे या वर्षी लवकर दिसून येण्यास सुरुवात झाली आहे. मागील काही वर्षांत हवामान बदल आणि अवेळी पावसामुळे प्रादुर्भाव झपाट्याने वाढला आहे. ऋतूतील अस्थिरतेमुळे हुमणीच्या जीवनचक्रावर परिणाम होत असून, मागील वर्षी (मार्च २०२४) पासून वळवाच्या पावसाच्या आधीच भुंगेरे जमिनीतून बाहेर पडण्याचे प्रमाण वाढले आहे.

यामागे जमिनीचे वाढते तापमान, ढगाळ वातावरण, एकच पीक पद्धती, हलकी जमीन आणि पाण्याची कमतरता आदी कारणे आहेत. सध्याच्या परिस्थितीत हुमणीच्या वाढीस अनुकूल स्थिती निर्माण होत असून, संभाव्य नुकसान टाळण्यासाठी वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे.

किडीची ओळख व जीवनक्रम

हुमणीच्या अंडी, अळी, कोष या तीन अवस्था मातीमध्ये, तर प्रौढ भुंगे जमिनीवर (झाडांवर) आढळतात.

अंडी अवस्था छ

मादी भुंगे एकेरी पद्धतीने ओलसर जमिनीत ७ ते १२ सेंमी खोलीवर अंडी घालते. अंडी शाबुदाण्यासारखी लांबट व गोलसर असतात.

अळी अवस्था :

अळी पिवळसर, पांढऱ्या रंगाच्या असतात. जमिनीत तीन अवस्थांमध्ये ५ ते ६ महिने राहतात.

१) पहिली अवस्था : अळी फिक्कट पांढऱ्या रंगाची असते. ती जमिनीतील सेंद्रिय पदार्थांवर उपजीविका करते.

२) दुसरी (३० ते ४० दिवस) आणि तिसरी अवस्था (३५ ते ५० दिवस) ः या अवस्थांमध्ये अळी पिकांच्या मुळ्या खाते. पूर्ण वाढ झालेली तिसऱ्या टप्प्यातील अळी पांढऱ्या रंगाची आणि इंग्रजी ‘C’ आकाराची असते.

कोष अवस्था :

अळी अवस्था पूर्ण झाल्यानंतर जमिनीत २० ते ४० सेंमी खोलीवर कोषावस्थेत जाते.

प्रौढ अवस्था :

हुमणीचे भुंगे सूर्यास्तानंतर अगोदर मादी कीड व त्यानंतर नर कीड या क्रमाने बाहेर पडते. प्रौढ भुंगेरे तांबूस काळसर, लांबी २ सें.मी. व रुंदी १ सें.मी. असते. मादी भुंगे नरापेक्षा मोठे असतात. प्रौढ अवस्था जानेवारी महिन्यानंतर विकसित होते, परंतु पाऊस पडण्यापूर्वी ते सुप्त अवस्थेमध्ये राहतात. संध्याकाळी हे भुंगे बाभूळ, बोर, पेरू, जांभूळ, जंगली बदाम आणि कडुनिंबाच्या झाडांची पाने खातात. याच कालावधीत नर आणि मादी यांचे मिलन होते.

भुंगेरे बाहेर येण्यासाठी पोषक घटक

जमिनीतील ओलावा :

हुमणी भुंगेरे जमिनीत सुप्तावस्थेत राहतात आणि मातीमध्ये पुरेसा ओलावा उपलब्ध झाल्यावर बाहेर पडतात. प्रौढ भुंगेरे बाहेर पडण्यासाठी मातीमध्ये २० ते २३ टक्के ओलावा पुरेसा होतो.

जमिनीचे तापमान :

हुमणीचे भुंगेरे जमिनीखाली २० ते ३० अंश सेल्सिअस तापमानाच्या दरम्यान सुप्त अवस्थेत जातात. जमिनीचे तापमानात अचानक बदल झाल्यास प्रौढ भुंगेरे बाहेर पडतात.

पाऊस :

पहिल्या पावसानंतर हुमणी बाहेर येते. या वर्षी एप्रिल महिन्याआधीच काही ठिकाणी पाऊस झाल्यामुळे भुंगेरे बाहेर पडल्याची शक्यता आहे. जमिनीतील उष्णता आणि ओलावा संतुलित झाल्यास भुंगेरे बाहेर पडण्याचे प्रमाण वाढते.

हवेतील आर्द्रता ः

हुमणी बाहेर पडण्याच्या कालावधीत सापेक्ष आर्द्रता ७० ते ८० टक्क्यांपर्यंत असते.

नुकसानीचे स्वरूप

अळी सुरुवातीला कुजलेले सेंद्रिय पदार्थ खाते. परंतु, दुसऱ्या आणि तिसऱ्या अवस्थेत पिकांच्या मुळांवर उपजीविका करते. किडीची अळी पिकाची मुळे कुरतडते. त्यामुळे पिकाला पाणी आणि अन्नद्रव्यांचा पुरवठा होत नाही. परिणामी, पाने पिवळसर होऊन नंतर संपूर्ण झाड वाळते.

प्रादुर्भावग्रस्त पीक हलकेसे ओढले तरी सहज उपटते. पीक उपलटल्यानंतर मुळांजवळ २ ते ३ अळ्या दिसून येतात.

प्रादुर्भाव पिकामध्ये बहुतेक वेळा सरळ रेषेत आढळतो.

आर्थिक नुकसान पातळी

एक अळी प्रति चौरस मीटर

एकात्मिक कीड व्यवस्थापन

सायंकाळी ७ नंतर शेताजवळील निंब, बोर, पेरू, बदाम, जांभूळ, बाभूळ, उंबर व इतर वनस्पतींवर हुमणीचे भुंगेरे उपजीविका करतात. या वनस्पतींवर भुंगेरे दिसू लागताच झाडाखाली एकरी १ या प्रमाणे एक प्रकाश सापळा लावावा. प्रकाश सापळ्यात अडकलेले भुंगेरे डिझेलमिश्रित पाण्यात टाकून नष्ट करावेत. किंवा

कडुनिंब सारख्या झाडाखाली विजेचा बल्ब लावून त्याखाली पसरट भांडे ठेवून किंवा वाफा बनवून त्यात डिझेलमिश्रित पाणी टाकावे. विजेच्या प्रकाशाकडे भुंगेरे आकर्षित होऊन पाण्यात पडून मरतात. ही प्रक्रिया गावपातळीवर सामूहिकपणे करावी.

होलोट्रॅकिया सेराटा या प्रजातींचा प्रादुर्भाव जास्त असलेल्या ठिकाणी प्रकाश सापळ्याशेजारी कामगंध सापळे एकरी ४ प्रमाणे वापरून त्यात हुमणीचा ल्यूर वापरावा.

एरंडीच्या बियांचा सापळा

एरंडी बिया १ किलो (बारीक), यीस्ट पावडर ५० ग्रॅम, बेसन पीठ ५० ग्रॅम, ताक अर्धा लिटर हे सर्व मिश्रण २ लिटर पाण्यामध्ये भिजवून २ ते ३ दिवस आंबवून घ्यावे. तयार मिश्रणाची ५ लिटर क्षमतेचे मातीचे मडके एकरी ५ मडकी या प्रमाणे मातीमध्ये ठेवावे. याकडे भुंगे आकर्षित होतात.

जैविक नियंत्रण (अळी अवस्था)

ऊस पिकामध्ये मेटाऱ्हायझियमचा वापर

नांगरट करण्यापूर्वी, मेटाऱ्हायझियम एकरी ४ ते ८ किलो प्रमाणे शेणखतात मिसळावे. हे मिश्रण दोन दिवस पाणी मारून झाकून ठेवून नंतर शेतामध्ये समानरीत्या पसरवावे.

सऱ्या पाडलेल्या असल्यास, शेणाची स्लरी करून मेटाऱ्हायझियम १ किलो एकरी मिसळून आळवणी करावी.

उगवणीनंतर, १५ लिटर पंपाच्या पाण्यात १०० ग्रॅम मेटाऱ्हायझियम मिसळून नोझल काढून आळवणी करावी.

मोठी भरणी झाल्यानंतर, १५ दिवसांनी पाडेगाव पहारीने वापश्यावर प्रति एकर १ किलो मेटाऱ्हायझियम प्रमाणे तिरक्या नाळेने नोझल काढून आळवणी करावी.

खोडवा उसासाठी, १५ दिवसांच्या अंतराने वाफशावर २ वेळा तिरक्या नाळेने नोझल काढून प्रति एकर १ किलो मेटाऱ्हायझियम आळवणी करावी.

(टीप ः जमिनीत ओलावा टिकून राहणे गरजेचे आहे. १५ दिवस आधी आणि नंतर रासायनिक घटकांचा वापर टाळावा).

रासायनिक नियंत्रण (अळी अवस्था)

एका सरळ रेषेत पीक पिवळे पडलेल्या शेतात प्रति घनमीटर एक हुमणी अळी दिसल्यास,

फिप्रोनील (४० टक्के) अधिक इमिडाक्लोप्रिड(४० टक्के डब्ल्यूजी) (संयुक्त) ०.५ ग्रॅम किंवा

क्लोथियनिडीन (५० टक्के डब्ल्यूडीजी) ०.२५ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे आळवणी करावी. किंवा

थायमेथॉक्झाम (०.४ टक्का) अधिक बायफेन्थ्रिन (०.८ टक्के जीआर) ५ किलो प्रति एकर प्रमाणे वापर करावा.

रासायनिक कीटकनाशकांचा वापर करताना, किडीच्या अवस्थेनुसार रासायनिक कीटकनाशकांची निवड करणे गरजेचे असते. त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन व्यवस्थापन करावे.

- डॉ. अभयकुमार बागडे ९४२३२९७०२७

(कीटकशास्त्र विभाग, राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय, कोल्हापूर तथा प्रकल्प समन्वयक, अखिल भारतीय मृदा आर्थ्रोपॉड कीटक संशोधन नेटवर्क प्रकल्प, कोल्हापूर)

- शुभम पाटील ७०८३८३९५८९

(पीएच. डी. स्कॉलर, कीटकशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT