
डॉ. संतोष मोरे
हुमणी ही बहुभक्षी कीड असून, अनेक पिकामध्ये ती नुकसानकारक ठरत आहे. महाराष्ट्रातील बहुतांश ऊस उत्पादक पट्ट्यामध्ये पावसाळ्यात हुमणी अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यामुळे ऊस पीक उत्पादनात घट होते. या किडीच्या नियंत्रणासाठी मेटारायझीम हे जैविक कीडनाशक हा शाश्वत पर्याय ठरू शकतो.
पुणे येथील कृषी महाविद्यालयामध्ये अखिल भारतीय जैविक कीड नियंत्रण प्रकल्प राबवला जात आहे. त्याअंतर्गत जैविक घटकांचे उत्पादन व उपयोग या कार्यानुभवात्मक शिक्षण प्रकल्पाचे व्यवस्थापन डॉ. संतोष मोरे आणि प्रियांका शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.
यात इएलपी, मोड्यूलमधील प्रांजल कारंडे, प्राची कुंभार, साक्षी लोखंडे, भूमिका खरे, खुशी शर्मा, गीतांजली जगदाळे व सानिका कोकरे या विद्यार्थिनी सहभागी आहेत. या प्रकल्पामध्ये ‘फुले मेटारायझीम’ हे जैविक कीडनाशक तयार केले जात आहे. त्याचा उपयोग हुमणी अळी, पिठ्या ढेकूण, पांढरी माशी, मावा, फुलकिडे, तुडतुडे, इ. किडींच्या नियंत्रणासाठी होऊ शकतो.
प्रामुख्याने, ऊस, भात, भुईमूग, मका, बाजरी, इ. पिकांसाठी नुकसानकारक ठरणाऱ्या हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी मेटारायझीम हे प्रभावी जैविक कीडनाशक आहे.
हुमणीमुळे होणारे नुकसान :
प्रथमावस्थेतील अळ्या पिकाची तंतुमुळे खातात. ती उपलब्ध नसल्यास सेंद्रिय पदार्थ खातात. तंतुमुळांचा फडशा पाडल्यानंतर मुख्य मुळे खाण्यास सुरू करतात. परिणामी झाड वाळते. एका झाडाचे मूळ कुरतडून खाल्ल्यानंतर हुमणी दुसऱ्या झाडाकडे वळते.
अशा प्रकारे शेतात एका ओळीत झाडे वाळल्याचे दिसून येते. प्रामुख्याने ऑगस्ट-सप्टेंबर या महिन्यांमध्ये हुमणी अळीच्या प्रादुर्भावामुळे जास्त नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी पहिल्या पावसानंतरच बाहेर येणाऱ्या भुंगेरे गोळा करण्यापासूनच हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे असते.
मेटारायझीम विषयी :
मेटारायझीम हे बुरशीपासून तयार केले जाणारे जैविक कीडनाशक आहे. ही बुरशी हुमणी अळीच्या शरीराच्या ओलाव्यावर वाढते. त्यानंतर काळातच आत शिरून तिच्यावर उपजीविका करते. त्यामुळे मेटारायझीमच्या संपर्कात आलेली अळी साधारण १० ते १५ दिवसांत मरते.
मेटारायझीम कसे वापरायचे?
१) प्रति एकरी ऊस पिकासाठी ८ किलो मेटारायझीम शेणखतात मिसळून पिकास द्यावे.
२) प्रति लिटर पाण्यात ५ ग्रॅम मेटारायझीम मिसळून रान वाफश्यावर असताना उसाच्या खोडात आळवणी करता येते.
संपर्क : डॉ. संतोष मोरे, ७५८८९५५५०१
(प्राध्यापक, कृषी महाविद्यालय पुणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.