Medical Services Agrowon
ॲग्रो विशेष

Medical Services : वैद्यकीय सेवेत हवा सेवाभाव

human life : अधिकचे पैसे मिळविण्यासाठी अनेक वेळा काही डॉक्टर्सकडून चुकीची कामे केली जातात. विनाकारण सलाइन, इंजेक्शन, विनाकारण तपासण्या करणे हे टाळणे आवश्यक आहे.

Team Agrowon

सचिन होळकर

Medical : आरोग्य सेवा ही मानवी जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे. शहरांमध्ये पावलोपावली मोठमोठी हॉस्पिटल्स असल्याने रुग्णांना तत्काळ सेवा मिळू शकते. मात्र ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा ही आजही कमकुवत आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सेवेचा संपूर्ण बोजा हा गावातील फॅमिली फिजिशियन्स किंवा जनरल प्रॅक्टिशनर्स यांच्यावर असतो आणि त्यांनी तो भार समर्थपणे पेलला आहे. जनरल प्रॅक्टिशनर हा साधा सर्दी-तापावरचा डॉक्टर असतो, असा अनेकांचा भ्रम आहे मात्र हे वास्तव नाही. जनरल प्रॅक्टिस करणारे डॉक्टर बीएएमएस, बीएचएमएस किंवा क्वचित प्रसंगी एमबीबीएस पदवीधारक असतात. नवीन पिढीतील बरेचसे एमबीबीएस पदवी घेणारे शक्यतो पदव्युत्तर शिक्षण घेऊन शहरात प्रॅक्टिस करत आहेत. जुन्या पिढीतील अनेक एमबीबीएस डॉक्टर्स आजही ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा पुरवत आहेत.

वैद्यकीय सेवेतील बरेच यश हे डिग्रीवर नसून अनुभवांवर अवलंबून असते हे तितकेच खरे आहे. ग्रामीण भागात सोयीसुविधांचा अभाव असताना अनेक शारीरिक चाचण्यांची सोय नसताना, यंत्रसामग्री आणि इतर सुविधांचा अभाव असताना वैद्यकीय सेवा देणे म्हणजे तारेवरची कसरत आहे. मोठ्या हॉस्पिटल्समध्ये सर्व तपासण्या आणि चाचण्यांच्या आधारे निदान केले जाते. त्यामुळे आजारांचे निदान करणे त्यांना सुलभ जाते, ग्रामीण भागात मात्र तशी परिस्थिती नाही.
‘डब्ल्यूएचओ’च्या मानकानुसार भारतातील डॉक्टर्सचे प्रमाण हे खूप कमी असल्याने येथील डॉक्टरांवर कामाचा मोठा ताण असतो. कोरोना संक्रमण काळात किंवा साथीचे रोग पसरल्यावर दवाखान्यात होणाऱ्या गर्दीवरून आपल्याला हे लक्षात येईल.

ग्रामीण भागात चाचण्या आणि तपासण्यांची सुविधा नसते मात्र निम शहरी भागात असणारी सुविधादेखील परिपूर्ण असत नाही. सोनोग्राफी, एक्सरे, रक्ताच्या काही महत्त्वाच्या चाचण्या यांना मर्यादा येत असतात. अशा कठीण प्रसंगातून इथले डॉक्टर सेवा पुरवत असतात, त्यात यांच्याकडे येणारे बरेचसे रुग्ण हे सर्वसामान्य ते अति सामान्य कुटुंबातून येत असल्याने वैद्यक सेवा देताना त्यांच्या बजेटचाही विचार डॉक्टरांना करावा लागतो. कमी दराच्या आणि कमीत कमी औषधांनी रुग्णांवर उपचार करणे त्यांना बंधनकारक असते. या परिस्थितीत आजवर या डॉक्टर्सने उत्कृष्ट सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रामीण भागातील जनरल प्रॅक्टिशनर किंवा फॅमिली फिजिशन आणि त्यांच्या रुग्णांमध्ये डॉक्टर आणि रुग्णाच्या नात्याच्या पलीकडे संबंध असतो. अगदी घरगुती अडीअडचणी, ताणतणाव इतर काही समस्यांवर देखील यांच्यात संवाद होत असतो. फॅमिली फिजिशियन हा अनेक घरांचा फॅमिली मेंबर देखील होत असतो. त्यामुळे रुग्णाच्या घरातील त्याचे जीवनमान, त्याचे कामकाज, खानपान इत्यादी अनेक बाबी त्यांना माहीत असतात. त्यामुळे त्यांना होणाऱ्या आजाराचे निदान लवकर होते. रुग्णाच्या कुटुंबातील मागच्या पिढीतील लोकांना असणारा आजार, आनुवंशिकता याबाबत देखील त्यांना इत्थंभूत माहिती असल्याने अचूक उपचार करणे सोपे जाते. म्हणून बऱ्याच रुग्णांना शहरातील मोठ्या डॉक्टर्सपेक्षा स्थानिक डॉक्टर्सकडून लवकर गुण येतो, असा अनुभव आहे.

मोठ्या हॉस्पिटलमध्ये रुग्णाला लवकर आराम मिळावा म्हणून कधी कधी गरज नसताना जास्त तीव्रतेच्या औषधांचा वापर केला जातो. अनेकदा रुग्णांना त्याचा त्रास होतो. बीपी अथवा रक्तदाब यावरील औषध ठरवताना वरच्यावर रक्तदाब तपासून औषध ठरवणे आवश्यक असते, हे काम फॅमिली फिजिशियन उत्तम करू शकतो. हृदयविकार, पक्षाघात, सर्पदंश इत्यादी अनेक गंभीरप्रसंगी जनरल फिजिशियनने केलेले प्राथमिक उपचार रुग्णाचे प्राण वाचवत असतात. असे असताना देखील अनेकदा रुग्णांकडून त्यांना हिणवले जाते हे योग्य नाही. कोरोनाच्या काळात ज्या वेळेस हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने भरलेले होते, लोकांचे मानसिक धैर्य खचले होते अशा प्रसंगात गावातील अनेक डॉक्टरांनी हजारो-लाखो रुग्णांना केवळ गोळ्या औषध देऊन बरे केले तर अनेकांना मानसिक आधार दिला, हे विसरून चालणार नाही.

व्यक्ती म्हटला की त्याला गुणदोष हे असणारच मग ती व्यक्ती रुग्ण असो की डॉक्टर. अनेक रुग्णांना लवकर परिणाम हवा असतो. अशावेळी तो एका डॉक्टरच्या भरवशावर न राहता लगेच दुसऱ्या डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेण्यासाठी जातो. त्यामुळे पहिली ट्रीटमेंट करणारा डॉक्टर विनाकारण बदनाम होत असतो. मुळात प्रत्येक आजाराला आणि त्यावर दिलेल्या औषधांच्या प्रतिसादाला एक ठरावीक वेळ लागणे स्वाभाविक असते. त्यासाठी रुग्णांनी संयम ठेवणे आवश्यक आहे. डॉक्टरांनी दिलेली औषधे आणि पथ्ये तंतोतंत पाळणे खूप आवश्यक असते. डॉक्टरने तपासणीसाठी बोलावलेल्या वेळा न पाळणे हे देखील रुग्णांकडून अनेकदा होत असते. डॉक्टरांच्या औषधासोबत अनेकदा रुग्णांकडून गावठी किंवा मेडिकल्समध्ये मिळणारे ओटीसी औषधे घेण्याचे सुरू असते, याची कल्पना मात्र डॉक्टरांना देणे खूप आवश्यक आहे. मधुमेह, रक्तदाब इत्यादी आजारांची औषधे वेळच्या वेळी घेणे उपचाराच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असते. अनेकदा रुग्णांकडून ते पाळले जात नाही. अशा आजारांवर रुग्ण अनेकदा जाहिराती बघून फसवे औषधे देखील घेत असतात. त्यामुळे त्यांचे नुकसान होते. आजारावर फरक पडल्यास मध्येच डॉक्टरांना न विचारता औषध बंद करण्याचे प्रकार रुग्णांकडून नेहमी घडत असतात. त्यामुळे परत उद्‍भवणाऱ्या त्रासासाठी जनरल प्रॅक्टिशनर किंवा फिजिशियनला बदनाम केले जाते, याबाबत रुग्णांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

फॅमिली फिजिशियन ने देखील आपल्या सेवेत काही बदल करणे आवश्यक आहे. वैद्यकीय सेवा देत असताना त्यातील सेवाभाव जिवंत ठेवण्याची गरज आहे. अधिकचे पैसे मिळवण्यासाठी अनेक वेळा काही डॉक्टर्सकडून चुकीची कामे केली जातात. विनाकारण सलाईन, इंजेक्शन, विनाकारण तपासण्या करणे हे टाळणे आवश्यक आहे. अति आत्मविश्वासाच्या भरात काही वेळा रुग्णांचे नुकसान होत असते. अशा प्रसंगी फिजिशियनने त्यांची जबाबदारी ओळखणे गरजेचे आहे, काही शंका असल्यास निश्चितपणे त्या क्षेत्रातील तज्ञांशी सल्ला मसलत करून उपचार करणे गरजेचे आहे. वैद्यकीय कचरा, धूळ, कोळ्याची जाळे, अस्वच्छ बेड, डास, माश्या, अस्वच्छ शौचालय या बाबींवर डॉक्टरने विशेष लक्ष देण्याची गरज आहे. दवाखान्यातील कंपाउंडर हा फक्त काही कामांसाठीच नेमलेला असावा. सलाईन लावणे ते काढणे, औषध सोडणे, इंजेक्शन देणे, बीपी तपासणे ही सर्व जिकिरीची कामे डॉक्टर्सने स्वतः करणे आवश्यक आहे.

रुग्णाला औषधी देताना घाई न करता व्यवस्थित विचार करून रुग्णाला ॲलर्जीची विचारणा करूनच औषधी द्यावी. गर्दी असल्यावर अनेकदा हे प्रकार होत असतात. अनेक आजाराची प्राथमिक लक्षणे सारखीच असतात. त्यामुळे वैद्यकाचे निरीक्षण, अनुभव खूप महत्त्वाचे आहे. दवाखान्याच्या वेळा तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न डॉक्टरांनी केला पाहिजे, मोठ्या हॉस्पिटल्समधील डॉक्टरांपेक्षा आपल्यावर जास्त जबाबदारी असल्याची जाणीव फॅमिली फिजिशियनने ठेवणे आवश्यक आहे. रुग्णांना उपचारांसोबतच व्यायामाचे महत्त्व, व्यसनमुक्ती, आहार-विहाराबाबत मार्गदर्शन, प्राणायाम, ध्यानधारणा, योगासने या बाबी शिकवणे आणि त्याचे महत्त्व विशद करण्याची गरज आहे. मात्र हे करीत असताना या सर्व बाबी आपल्या जीवनात देखील असाव्यात याबाबत काळजी घेणे खूप गरजेचे आहे.

सचिन होळकर
९८२३५९७९६०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT