Amaravati News : गत हंगामातील आंबिया बहारातील आपदग्रस्त शेतकऱ्यांना विमा परतावा मंजूर झाल्याने दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील ३,४३८ शेतकरी त्यासाठी प्रतीक्षेत होते. त्यांना १३.०६ कोटी रुपयांचा परतावा मंजूर झाला आहे.
वर्ष २०२३-२४ या हंगामातील आंबिया बहारातील ३४९८ शेतकऱ्यांनी फळ पीकविमा योजनेत सहभाग नोंदवत ३.९४ कोटी रुपयांचा प्रीमियम भरला होता. नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी विमा परताव्याची मागणी कंपनीकडे केली होती. मात्र ती वेळेत मिळत नसल्याने रोष निर्माण झाला होता.
यातील काही शेतकऱ्यांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचाही इशारा दिला होता. जिल्हाधिकाऱ्यांना त्यासंदर्भातील निवेदनही देण्यात आले होते. निवडणुकांमुळे जिल्हाधिकारी या मागणीकडे लक्ष पुरवू शकले नाहीत. दरम्यान विमा कंपनीने विमा मंजूर करण्यात आल्याचे व त्याचे वितरण सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातील ३४३८ केळी, संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांसाठी १३ कोटी ५ लाख ८६ हजार ७५५ रुपये विमा परतावा मंजूर झाला आहे.
आंबिया बहारादरम्यान झालेल्या अवकाळी पावसाने संत्रा, मोसंबी व केळीचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानापोटी विमा योजनेअंतर्गत मिळणारा परतावा देण्याची मागणी शेतकऱ्यांची होती. मात्र कंपनी त्यासाठी टाळाटाळ करू लागल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा धारण केला.
प्रशासनावर आलेल्या दबावानंतर विमा कंपनीचे कान जिल्हाधिकाऱ्यांनी टोचल्याने आता परतावा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्ह्यातील ३४३८ शेतकऱ्यांना परतावे मिळणार आहेत.
या गावातील शेतकरी ठरले पात्र
केळी ः अचलपूर, परसापूर, पथ्रोट, रासेगाव, अंजनगावसुर्जी, भंडारज, सातेगाव, विहिगाव.
मोसंबी ः मोर्शी, शिरखेड, लोणी, पुसला, राजुराबाजार, शेंदूरजनाघाट, वाठोडा.
संत्रा ः पथ्रोट, अचलपूर, सदपूर, परतवाडा, परसापूर, रासेगाव, डवरगाव, अंजनगाव, निंबा, बेलोरा, भंडारज, तेगाव, विहिगाव, आमला, दूररेल्वे, पळसखेड, सातेफळ, ब्राम्हणवाडा, आसेगाव, चांदूरबाजार, करजगाव, शिरजगाव कसबा, तळेगाव मोहना, अंजनसिंगी, अंबाडा, धामणगाव, हिवरखेड, मोर्शी, नेरपिंगळाई, रिद्धपूर, शिरखेड, दाबा, कुऱ्हा, मोझरी, वऱ्हा, वरखेड, बेनोडा, लोणी, पुसला, राजुराबाजार, शेंदूरजनाघाट, वरुड व वाठोडा.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.