
Ratnagiri News : पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ३५ हजार ८०१ बागायतदारांनी आंबा व काजू क्षेत्रावरील विमा उतरवला आहे. मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदा १ हजार बागायतदारांनी विमा योजनेकडे पाठ फिरविली आहे.
शासनाने दहा गुंठे क्षेत्र असेल त्यांनाच विमा योजनेत सहभागी करून घेण्याच्या अटीमुळे बागायतदारांच्या संख्येत घट झाली आहे. पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यात अर्थार्जन मिळवून देणाऱ्या आंबा व काजू या पिकांचा फळपीक विमा योजनेत समावेश करण्यात आला आहे.
अवकाळी पाऊस, कमी-जास्त तापमान, वेगाचा वारा, गारपीट यापासून संरक्षणासाठी फळपीक विमा योजना निर्धारित काळासाठी राबविण्यात येत आहे. १ डिसेंबर ते ३१ मार्च आणि १ एप्रिल ते १५ मे हा कालावधी अवकाळी पावसासाठी निश्चित केला आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यास परतावा दिला जातो.
गतवर्षी ७० कोटी रुपये परतावा बागायतदारांना वितरित करण्यात आला होता. यंदा या योजनेत सहभागी होण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत होती. त्याचा लाभ जिल्ह्यातील बागायतदारांनी घेतला. यावर्षी जिल्ह्यातील ३५ हजार ८१२ बागायतदारांनी विमा उतरवला. गतवर्षी ३६ हजार ८१८ बागायतदारांनी विमा घेतला होता. सुमारे १ हजार बागायतदारांनी यंदा या योजनेकडे पाठ फिरवली आहे.
शासनाने कोकणासाठी विमा निकषात बदल केले आहेत. १० गुंठ्यापेक्षा कमी क्षेत्रावरील आंबा, काजू लागवडीवर विमा उतरविता येणार नाही, अशी अट ठेवली आहे. कोकणात जुन्या काळात कमी जागेत लागवड केली जाते. एका गुंठ्याला एक कलम असे धरले तर दहा गुंठ्याला दहा झाडे असतात.
त्या क्षेत्रावरील झाडांचा विमा उतरवला गेला नाही, तर संबंधित बागायतदारांचे नुकसानच आहे. त्यामुळे कमी क्षेत्र असलेल्या बागायतदारांना या योजनेचा लाभ दिला गेलेला नाही. याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.