Education System Agrowon
ॲग्रो विशेष

Educational Changes : आनंददायी शिक्षणासाठी...

Team Agrowon

शिवाजी काकडे

Life Skills Learning Process : गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची ‘पोपटाचं शिक्षण’ ही एक प्रसिद्ध कथा आहे. ती कथा अशी. एक राजा होता, त्याच्या राज्यात एक गाणे गाणारा पोपट होता. हा पोपट आनंदाने उडायचा, उड्या मारायचा. एकेदिवशी राजा म्हणाला, ‘‘या पोपटाला गाण्याशिवाय दुसरं काहीच येत नाही याला शास्त्र शिकवा.’’ मग सुरू होते पोपटाचे शिक्षण. पोपटासाठी सुंदर सोनेरी पिंजरा बनवला जातो.

पोपटाला शिकविण्यासाठी पंडित बोलावले जातात. गाडीभर पुस्तके विकत आणली जातात. आता पोपटाच्या आजूबाजूला अन्न, पाणी, या ऐवजी भरपूर पुस्तके होती. पोपटाचे शिक्षणात लक्ष लागावे यासाठी पोपटाचे पंख छाटण्यात येतात.

पोपट शास्त्रपारंगत व्हावा यासाठी रोज खूप साऱ्‍या पुस्तकांची पाने पेनाच्या टोकाने पोपटाच्या तोंडात कोंबली जातात. आता पोपटाचं गाणंच काय ओरडणही बंद झालं. शेवटी पोपट गत‌प्राण होतो.

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी खूप वर्षांपूर्वी लिहिलेली ही गोष्ट आजच्या शिक्षणपद्धतीला तंतोतंत लागू पडते. ‘विद्यार्थी आत्महत्या : भारतामध्ये पसरत जाणारा साथरोग’ या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालाप्रमाणे देशातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचा दर चिंताजनकरीत्या वाढत चालला असून, त्याच्या वाढीचा दर हा शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपेक्षाही अधिक आहे.

शिक्षण म्हणजे काय?

सध्या आपण ज्याला शिकणं म्हणतो ते मुळी शिक्षणच नव्हे. पालक मुलांना नोकरीसाठी शिकवतात आणि शिक्षक परीक्षा उत्तीर्ण होण्याची तयारी करून घेतात. आजचा विद्यार्थी ज्ञानार्थी नव्हे तर परीक्षार्थी होत आहे. ‘पैसा’ हा शिक्षणाचा केंद्रबिंदू होत आहे. विद्यार्थी शब्दाचा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे.

विद् म्हणजे जाणणे, अर्थी म्हणजे इच्छा असलेला. ज्याला जाणून घेण्याची इच्छा आहे तो विद्यार्थी. केवळ नोकरी मिळविण्यास किंवा यशस्वी होण्यासाठी मदत करते ते शिक्षण नव्हे. शिक्षण म्हणजे केवळ कुणाचे अनुकरण करणे नव्हे.

मुलांना विचार करायला शिकवते ते शिक्षण. शिक्षण म्हणजे शोध घेणे. आज गुगलवर सारे काही शोधता येते, शिवाय स्वतःला सोडून. ‘स्व’चा शोध घ्यायला शिकवते ते खरे शिक्षण. प्रत्येक व्यतीला मी कोण?

आणि जग जाणण्याची जिज्ञासा असते. जिज्ञासेतूनच ज्ञानाची निर्मिती होते. मुलांच्या शिकण्यासाठी त्यांच्या जिज्ञासू वृत्तीचा पालक आणि शिक्षकांनी सन्मान केला तर शिकणं आनंददायी होतं.

जिज्ञासू वृत्तीचा सन्मान करा

प्रत्येक मूल जिज्ञासू वृत्ती जन्माबरोबरच सोबत घेऊन येते. जिज्ञासा म्हणजे जाणून घेण्याची इच्छा, जगण्याची इच्छा. जगण्यासाठी जग जाणून घेणे आवश्यक असते. प्रत्येक मुलामध्ये हे जग कसे चालते, हे जाणून घेण्याची इच्छा असते. या जगात मुले स्वतःला देखील शोधत असतात.

लहान मुले कुतूहलाने, जिज्ञासेने पालकांना प्रश्‍न विचारून भंडावून सोडतात. मुलांच्या मनातील प्रश्‍नांना योग्य प्रतिसाद द्यावा. काही प्रश्‍नांची उत्तरे द्यावी काही प्रश्‍नांची उत्तरे त्याला शोधण्यासाठी मदत करा.

बिनकामाचे प्रश्‍न किंवा वायफळ बडबड म्हणून मुलांकडे दुर्लक्ष करू नये. मुलांच्या जिज्ञासेचा योग्य आदर, सन्मान करा. मुलांच्या उत्सुकतेचा सन्मान करायचा असेल तर पालक किंवा शिक्षक म्हणून आमच्याकडे समानानुभूती कौशल्य असायला हवे. मुलांनी केलेल्या गोष्टीकडे मुलांच्या दृष्टिकोनातून पाहता यायला हवे. त्याक्षणी आम्हाला मुलांना समजून घेता आले पाहिजे.

मागील वर्षी पहिलीत शिकणाऱ्या माझ्या मुलाने मला प्रश्‍न विचारला, ‘‘पप्पा, या जगात एक नंबर म्हणजे सगळ्यात आधी काय तयार झाले?’’ त्याच्या जिझासूवृत्तीचा सन्मान करत मी त्याला म्हणालो, ‘‘मलाही नक्की माहीत नाही, पण आपण दोघे शोधू. त्याचे फारसे समाधान न झाल्याने त्याने हाच प्रश्‍न माझ्या मोठ्या भावाला विचारला.

त्याने ‘देव’ हे उत्तर दिले आणि देवाने सर्वांना निर्माण केले, असे सांगितले. त्याचे तात्पुरते समाधान झाले, पण जिज्ञासा काही शमली नाही. झोपताना त्याने मला विचारते, ‘‘देव सगळ्यात पहिले तयार झाला मग देवाची मम्मी कोण?’’ म्हणजे देव कसा निर्माण झाला. ही त्याची जिझासा! ‘‘आता तूच शास्त्रज्ञ हो आणि काढ बरं शोधून,’’ असे मी त्याला सुचवले.

काही दिवसांनी त्याने मला सांगितले, ‘‘माणसाच्या अगोदर झाडे तयार झाली असतील, कारण झाडापासून ऑक्सिजन तयार होतो. आपण आधी तयार झालो असतो तर आपल्याला ऑक्सिजन मिळाला नसता.

म्हणून झाडे अगोदर निर्माण झाली. या शोधाचा त्याला विलक्षण आनंद झाला होता. पण जिज्ञासा मात्र संपली नव्हती. काही दिवसांनी त्याने मला सांगितले, ‘‘पप्पा झाडांच्या पण अगोदर पाणी तयार झालं असेल. कारण पाण्याशिवाय झाड कसं उगवणार.’’

प्रत्येक मुलं स्वतःच ज्ञानाचा रचियता असते, याचा अनुभव मला आला. आणि ही ज्ञाननिर्मिती जिज्ञासेतून होते. मुलांना शिकतं करण्यासाठी मुलांच्या जिज्ञासू वृत्तीचा सन्मान करावा. सन्मान करणे म्हणजे शोधून देणे नाही तर शोधायला मदत करणे. मुलांची जिज्ञासा अधिक वाढीला लागावी असे वातावरण मुलांना द्यावेत.

‘ककाकिकी’ची बाराखडी

आचार्य विनोबा भावे घोकंपट्टीवर आधारित शिक्षण प्रणालीवर टीका करताना म्हणतात, ‘‘एखाद्या बालकाची क्षमता नष्ट करायची असेल तर त्याला घोकंपट्टी करायला शिकवा.’’ आज शाळांमध्ये देखील मुलांच्या प्रश्‍न विचारण्याच्या क्षमतेला योग्य न्याय मिळत नाही.

घरात आई-वडिलांचं ऐकायचं अन् शाळेत शिक्षकांचं, याचे नाव शिक्षण. विचार करणं हे आपलं काम नाही, हे मुलांच्या मनावर ठसवले जाते. बाल्यावस्थेत देखील मुले विचार करतात हे मान्य करायला हवं. मुलांच्या मनात सतत ‘ककाकिकी’ची बाराखडी सुरू राहावी. कसं, का, काय, किती, कुठे, केव्हा, कोण हे प्रश्‍न मुलांना सतत पडावेत.

मग याची उत्तरे शोधणे ही मुलांसाठी आनंददायी प्रक्रिया होते. आजच्या शाळा, क्लासेसमध्ये शिक्षक मुलांना अशा प्रश्‍नांची उत्तरे शोधून देतात, की ज्या प्रश्‍नांची उत्तरे मुलांना माहीत नाहीत. शिक्षकांनी मुलांच्या मनात असे प्रश्‍न निर्माण करावे, जे प्रश्‍न मुलांना माहीत नाहीत. मुलांच्या मनात जिज्ञासा जागृत झाल्यावर जे शिक्षण होते ते मुलांना आनंद देणारे असते.

खेळणे हा मुलांसाठी उत्तम व्यायाम असतो, म्हणून मुले काही व्यायामासाठीचे कर्तव्य म्हणून खेळत नाहीत. खेळताना मुले तहान, भूक विसरून खेळतात. पडून वेदना झाल्या तरी खेळतात. कारण मुलांना खेळताना आनंद मिळतो. असंच एखाद्या गोष्टीचं रहस्य काय हे जाणून घेण्यासाठी मुले त्याच्या मागे लागतात तेव्हा अभ्यास हा सुद्धा एक खेळ होतो.

जिज्ञासा माणसाला अभूतपूर्व असे नवीन करायला लावते. ती अनोख्या आनंदाची मोहिनी घालते तसेच संकटाचीही भुरळ घालते. ही जिज्ञासा माणसाला अज्ञात विश्‍वात घेऊन जाते. ती माणसाला ज्ञानकारिणी, ज्ञानपोषिणी बनवते.

केवळ परीक्षा, नोकरी आणि पैसा हे शिक्षणाचे साध्य नव्हे. भौतिक सुविधा आणि सोन्याच्या पिंजऱ्‍यासारख्या इमारती ही साधने आहेत, साध्य नाही हे पालक, शिक्षक आणि शिक्षण व्यवस्थेने समजून घ्यावे. अन्यथा असेच पोपट मरत राहतील.

(लेखक सहायक शिक्षक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tur Stock Limit : तूर, हरभऱ्यावरचे स्टाॅक लिमिट काढले; नवी तूर बाजारात येण्याच्या आधी स्टाॅक लिमिट काढल्याने दिलासा

Amravati Zila Parishad : अमरावती जिल्हा परिषदेत विधानसभा च्या तोंडावर, अधिकाऱ्यांची कमतरता

Crop Insurance Compensation : विमा कंपनीच्या पोर्टल बंदमुळे पूर्वसूचना थांबल्या

Onion Subsidy : राज्यातील १३ हजार कांदा उत्पादकांचे रखडलेले २४ कोटी आचारसंहितेपूर्वी द्या, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची मागणी

Rabbi Season : रब्बीमध्ये हरभऱ्याला सर्वाधिक पसंती शक्य

SCROLL FOR NEXT