Orange Orchard Agrowon
ॲग्रो विशेष

Orange Farming: सेंद्रिय पद्धतीने संत्रा उत्पादनावर भर

Citrus farming without chemicals: अमरावती जिल्ह्यातील युवराज बरडे यांनी साडेनऊ एकरावर सेंद्रिय पद्धतीने संत्रा लागवड केली आहे. वाफसा स्थिती, ठिबक सिंचन, सेंद्रिय निविष्ठा आणि काटेकोर नियोजन यामुळे उत्पादनात दर्जाही आणि टिकवण क्षमताही वाढली आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Orange Harvesting Techniques:

शेतकरी नियोजन । पीक : संत्रा

शेतकरी : युवराज बरडे

गाव : गव्हाणकुंड, ता. वरुड, जि. अमरावती

एकूण शेती : १२ एकर

संत्रा लागवड : साडेनऊ एकर

संत्रा झाडे : १५००

Orange Farming Tips:

अमरावती जिल्ह्यातील गव्हाणकुंड (ता. वरुड) गावातील शिवारात युवराज बरडे यांची १२ एकर शेती. त्यातील एक एकरावर भाजीपाला, एक एकरावर फणस, अर्धा एकर आंबा लागवड असून त्यासोबतच साडेनऊ एकर क्षेत्रावर संत्रा लागवड करण्यात आली आहे. बांधावर सीताफळ लागवड करण्यात आली आहे. संत्रा लागवड २० वर्षे जुनी असून लागवड १८ बाय १८ फूट अंतरावर करण्यात आली आहे.

संत्रा बागेत मृग आणि आंबिया असे दोन्ही बहार घेण्यावर भर दिला जातो. बागेचे सेंद्रिय आणि रासायनिक अशा दोन्ही पद्धतींचा समतोल राखत व्यवस्थापन करण्यावर भर दिला जातो. बागेत वाफसा स्थिती कायम राखत सिंचनाचे काटेकोर नियोजन केले जाते. आच्छदनासाठी बागेत वाढलेले गवत ग्रासकटरने कापून जागेवरच कुजण्यास ठेवून दिले जाते. त्यामुळे जमिनीस फायदा होतो, शिवाय सेंद्रिय आच्छादन म्हणूनही उपयुक्त होते, असे श्री. बरडे सांगतात.

या माध्यमातून बाष्पीभवन कमी होऊन बाग वाफसा स्थितीत राहून सिंचनाच्या पाण्याची गरज कमी भासते, असा त्यांचा अनुभव आहे. सध्या साडेनऊ एकर क्षेत्रापैकी ४ एकरावरील बागेतील झाडांवर आंबिया बहर धरण्यात आलेला आहे. बागेत आवळा आकाराची फळधारणा झाली असून आगामी काळात सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन करत फळांचा दर्जा राखण्यावर भर देण्यात येणार आहे. असे युवराज बरडे यांनी सांगितले.

आंबिया बहर नियोजन

आंबिया बहर धरण्यासाठी बागेतील झाडे २० नोव्हेंबरच्या दरम्यान ताणावर सोडण्यात आली. हा ताण साधारणपणे २५ डिसेंबरच्या दरम्यान पाटपाणी देऊन तोडण्यात आला.

ताण कालावधीत सिंगल सुपर फॉस्फेट आणि पोटॅश खताची मात्रा दिली. त्यानंतर मशागतीची कामे करण्यात आली.

ताण तोडताना पहिले पाटपाणी देतेवेळी झाडाभोवती रिंग पद्धतीने सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि १०ः२६ः२६ या खताची मात्रा प्रति झाड मात्रा दिली.

कीड-रोगांच्या प्रादुर्भावासाठी बागेचे सातत्याने निरिक्षण करण्यात आले. सिट्रस सायला किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यानंतर रासायनिक कीटकनाशक आणि निंबोळी अर्काची फवारणी करण्यात आली. रासायनिक कीटकनाशकांची केवळ एकच फवारणी बागेत घेण्यात आलेली आहे.

जानेवारी ते मार्च महिन्याच्या कालावधीत ठिबक सिंचन पद्धतीने आठवड्यातून दोन वेळा २ ते ३ तास सिंचन करण्यात आले.

सिंचनाचे काटेकोर नियोजन

संत्रा बागेत सिंचनाचे काटेकोर नियोजन करण्यावर भर दिला जातो. झाडांच्या खोडजवळ पाणी दिल्यामुळे फायटोप्थोरा या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी बागेत योग्य पद्धतीने सिंचन करण्यावर भर असतो. बागेत सिंचनाकामी ठिबकचा पर्याय अवलंबिण्यात आला आहे. विहीर आणि बोरवेलमधील उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन केले जाते.

मागील कामकाज

१ एप्रिल ते ५ एप्रिल या कालावधीत ठिबकद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या मात्रा देण्यात आल्या.

साधारणपणे ११ एप्रिलच्या दरम्यान कोळी किडीच्या नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यात आल्या.

मागील काही दिवसांत तापमान चांगलेच वाढले होते. त्यामुळे नियमितपणे ठिबकद्वारे सिंचन करून बागेत वाफसा स्थिती कायम राखण्यावर भर देण्यात आला. अतिरिक्त पाणी देणे टाळले आहे.

आगामी नियोजन

सध्या बागेतील फळे आवळा आकाराची झाले आहेत. पुढील काळात फळांचा दर्जा राखण्यासाठी प्रयत्न केले जातील.

मे महिन्यात तापमानाचा अंदाज घेऊन ठिबकद्वारे सिंचनावर भर दिला जाईल. जेणेकरून फळगळीचा धोका टाळला जाईल.

तापमानाचा अंदाज घेऊन सिंचनाचा कालावधी कमी-जास्त केला जाईल.

आगामी काळात फळांवर किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यासाठी बागेत पिवळे चिकट सापळे लावण्यात येतील. रासायनिक फवारणी टाळली जाईल.

ढगाळ हवामानाच्या स्थितीत प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दशपर्णी अर्क, जीवामृताची फवारणी घेतली जाईल.

सेंद्रिय व्यवस्थापनावर भर

संत्रा बागेत प्रामुख्याने सेंद्रिय घटकांचा वापर करण्यावर भर दिला जातो. त्यात मुख्यतः शेणखत, गांडूळखत यांचा वापर केला जातो. रासायनिक खतांचा किमान आणि संतुलित वापर करण्यावर भर दिला जातो. त्यामुळे उत्पादन खर्चावर नियंत्रण मिळविणे शक्य झाले आहे.

बागेत शेणखताचा दरवर्षी हिवाळ्यामध्ये वापर केला जातो. चांगले कुजलेले शेणखत बागेमध्ये वापरण्यापूर्वी त्यामध्ये ई-एम द्रावणाचा वापर आणि जिवामृताची प्रक्रिया केली जाते. त्यानंतरच प्रक्रिया केलेले शेणखत बागेमध्ये वापरले जाते. जेणेकरून शेणखतामधून रोगरकारक बुरशींचा शिरकाव बागेत होणार नाही. प्रति झाड १० किलो याप्रमाणे दरवर्षी हिवाळ्यात हे शेणखत दिले जाते.

सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन करताना जीवामृत, निमअर्क यांच्या वापरावर भर दिला जातो. ट्रायकोडर्मा, मायक्रोरायझा, पीएसबी व इतर घटकांची उपलब्धता देखील केली जाते.

बागेत कीड नियंत्रणासाठी चिकट सापळ्यांचा वापर करण्यावर भर दिला जातो. मावा, तुडतुडे, फुलकिडे या किडीच्या नियंत्रणासाठी निमअर्क आणि दर्शपर्णी अर्काचा वापर केला जातो. कीड नियंत्रणासाठी सेंद्रिय पद्धतीचा अवलंब केल्यामुळे उत्पादन खर्चावर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. सेंद्रिय पद्धतीने उत्पादित फळांची टिकवणक्षमता आणि गुणवत्ता चांगली मिळून दरही चांगले मिळत असल्याचे युवराज सांगतात.

- युवराज बरडे ७७७००३८१२९

(शब्दांकन : विनोद इंगोले)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT