
Orange Farming Management:
शेतकरी नियोजन । पीक ः संत्रा
शेतकरी नाव : राजकुमार ईश्वरकर
गाव : हिरापूर, ता. अंजनगावसूर्जी, जि. अमरावती
एकूण शेती : एकूण ६० एकर
संत्रा क्षेत्र : ३२ एकर
एकूण झाडे : ४०००
अमरावती जिल्ह्यातील हिरापूर (ता. अंजनगाव) शिवारात राजकुमार ईश्वरकर यांची ६० एकर शेती आहे. त्यातील ३२ एकरांत संत्रा लागवड केली आहे. संत्र्याची एका एकरात १२० झाडे आहेत. ही झाडे ७, १०, १५ वर्षे वयाची आहेत. संपूर्ण लागवड टप्प्याटप्प्याने केली आहे. संत्रा झाडांची लागवड १६ बाय १६ फूट अंतरावर करण्यात आलेली आहे. बागेतील झाडांवर फुटीचा अंदाज घेऊन बहर घेण्याचे नियोजन केले जाते.
फूट जास्त असेल त्यानुसार आंबिया किंवा मृग बहर घेण्याचे नियोजन केले जाते. वातावरणातील बदलानुरुप याबाबतचा निर्णय घेतला जातो, असे राजकुमार ईश्वरकर यांनी सांगितले. सध्या तापमानात वाढ झाली असल्याने फळगळ टाळण्यासाठी पाटपाणी देण्यात आले आहे.
आंबिया बहराचे नियोजन
आंबिया बहर धरण्यासाठी नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत बाग ताणावर सोडली जाते. डिसेंबरच्या अखेरीस बागेला पाणी देऊन ताण तोडला जातो.
बागेचा ताण तोडण्यापूर्वी फवारणीद्वारे तसेच ठिबकच्या माध्यमातून रासायनिक खते आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या मात्रा दिल्या जातात.
बागेत दरवर्षी घरच्या गोठ्यातील शेणखताचा वापर करण्यावर भर दिला आहे. दर्जेदार शेणखताची उपलब्धता होण्यासाठी घरच्या गोठ्यात ४० जनावरांचे संगोपन केले जाते. गोठ्यातील शेणखताचा शेतीमध्ये वापर केल्यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारण्यासह उत्पादन खर्चावर नियंत्रण मिळविणे शक्य झाले आहे. शेणखताची मात्रा दिल्यानंतर फॉस्फेट, पोटॅशिअम, युरिया, डीएपी या खतांच्या मात्रा देण्यात येतात.
फळगळ रोखण्यासाठी उपाय
सध्या आंबिया बहरातील फळे बोराच्या आकारापेक्षा थोडी मोठी झाली आहेत. तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने फळगळ होण्याची शक्यता अधिक असते. फळगळ टाळण्यासाठी शिफारशीत घटकांची फवारणी तसेच पाटपाणी देण्यात आले. याशिवाय सिंचनाचा कालावधी वाढविण्यावर भर देण्यात आला. त्यामुळे बागेत थंडावा निर्माण होऊन फळगळ नियंत्रणात येण्यास मदत झाली आहे.
तण नियंत्रण
पाऊस सुरु होण्याच्या आधी बागेतील तण नियंत्रण केले जाईल. त्यासाठी रोटाव्हेटरचा वापर केला जातो. तण नियंत्रणासाठी रोटाव्हेटरचा वापर केल्यामुळे संत्रा झाडांच्या मुळांना धक्का लागत नाही. कालांतराने तण जागेवरच कुजून त्याचे खतामध्ये रूपांतर होते. त्याचा झाडांना फायदा होतो. त्यामुळे प्रभावी तण नियंत्रणासाठी मागील काही वर्षांपासून हाच पर्याय अवलंबिण्यात येत आहे. त्यापुढील काळात तणांचा प्रादुर्भाव दिसून आल्यास, तणनाशकाची फवारणी केली जाते.
शेणखत, गोमूत्र ठरते फायदेशीर
संत्रा बागेत चांगल्या कुजलेल्या शेणखताचा वापर करण्यावर भर दिला जातो. दर्जेदार शेणखत बागेत वापरल्यामुळे जमिनीची सुपीकता आणि आरोग्य सुधारण्यास मदत झाली आहे. याशिवाय भटकंतीवरील जनावरांना शेतात बसविण्यावर भर दिला जातो. याद्वारे जनावरांपासून मिळणारे शेण आणि गोमूत्र सातत्याने जमिनीला मिळते. त्याचा मातीचा कर्ब, सुपीकता वाढीस फायदा झाला आहे.
मागील कामकाज
सध्या झाडांवर बोराच्या आकारापेक्षा थोडी मोठी फळे लागलेली आहेत. मागील काही दिवसांपासून तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे पाटपाणी देण्यावर भर दिला आहे. या माध्यमातून झाडांना पुरेसे पाणी उपलब्ध होण्यास मदत मिळते.
पाटपाणी दिल्यामुळे बागेत ओलावा कायम राहून तापमान नियंत्रित होते. त्याचा झाडांना फायदा होतो. शिवाय फळगळ टाळण्यासही मदत मिळते.
बागेतील फळांवर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यासाठी शिफारशीत कीडनाशकांची फवारणी घेतली आहे.
आगामी नियोजन
आगामी काळात फळांचा आकार वाढीसह दर्जा राखण्यावर भर दिला जाईल. त्यासाठी शिफारशीनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी घेतली जाईल.
फळांवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता असते. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शिफारशीत कीडनाशक, बुरशीनाशकांची फवारणी केली जाईल.
तापमानाचा अंदाज घेऊन झाडांची पाण्याची गरज पाहून पाटपाणी देण्यावर भर दिला जाईल.
- राजकुमार ईश्वरकर, ९८५०३४५३३५
(शब्दांकन : विनोद इंगोले)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.