
Agriculture Success Story : वाशीम जिल्ह्याची संत्रा उत्पादनात ओळख आहे. मात्र पारंपरिक पद्धतीने हे पीक घेतले जात असल्याने उत्पादकता कमी होती. शेतकऱ्यांचे अर्थकारण समाधानकारक नव्हतेअनेक अडचणींना त्यांना सामोरे जावे लागत होते. ज्ञान व तंत्रज्ञान यांची जोड देणे गरजेचे होते. अशावेळी करडा- वाशीम येथील कृषी विज्ञान केंद्राने (केव्हीके) दहा वर्षांपूर्वी जिल्ह्यातील संत्रा उत्पादकात वाढवण्यासाठी पुढाकार घेतला.
समस्यांचा केला अभ्यास
केव्हीकेचे उद्यानविद्या तज्ज्ञ निवृत्ती पाटील यांनी जिल्ह्यातील गावागावांत जाऊन कमी उत्पादकतेची कारणे शोधली. त्यातून महत्त्वाचे पुढील मुद्दे पुढे आले.
या पिकातून डाळिंब किंवा अन्य व्यावसायिक फळाप्रमाणे पैसे मिळत नाहीत असा नकारात्मक दृष्टिकोन शेतकऱ्यांमध्ये तयार झाला होता.
तंत्रज्ञान, रोगमुक्त कलमे, तंत्रशुद्ध छाटणी आदी बाबींचा अभाव होता.
लागवड पद्धत पारंपरिक होती. पाणी व अन्नद्रव्ये व्यवस्थापन यात सुधारणा गरजेची होती.
डिंक्या, फायटोप्थोरा व अन्य रोग- किडींच्या समस्या होत्या.
काढणी पश्चात व्यवस्थापन, प्रतवारी, साठवण, विपणन पद्धती, पायाभूत सुविधा आदी बाबींचे बळकटीकरण गरजेचे होते.
...असा राबविला उपक्रम
केव्हीकेतर्फे वाशीम जिल्ह्यातील सहाही तालुक्यांत गटशेतीची बीजे रुजविण्यात आली. वडजी गावात एका शेतकऱ्याच्या बागेपासून तंत्रज्ञान प्रसारास सुरुवात झाली. हळूहळू जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढू लागला. गाव पातळीवर १५० हून अधिक शिवारफेऱ्या व प्रशिक्षण कार्यक्रम, तालुका स्तरीय १५ कार्यशाळा, बांधावरील भेट, ऑनलाइन चर्चासत्र, प्रात्यक्षिके, विक्री पद्धती आदींविषयी मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आले.
...असा झाला तंत्रज्ञानाचा वापर (ठळक बाबी)
तंत्रज्ञान मुख्यत्वे मृग बहराच्या फळांसाठी वापरण्यात आले.
ज्या ठिकाणच्या जमिनी भारी आहेत, तेथे पाण्याचा निचरा चांगला होण्यासाठी गादीवाफा (बेड) पद्धतीने लागवड.
अल्पभूधारक शेतकऱ्यांना बेड तयार करण्यासाठी अधिक खर्च येत असल्यास केवळ एक एकरांतच गादीवाफा. शेताच्या चारही बाजूंना अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी चर. ठिबक सिंचन पद्धतीचाही वापर. पाण्याचे काटेकोर नियोजन केल्याने डिंक्याची समस्या कमी झाली.
इंडो इस्राईल पद्धतीने २० बाय १० फूट पद्धतीने सघन लागवड. या पद्धतीत एकरी सव्वादोनशे झाडे बसतात. पूर्वीच्या लागवड पद्धतीत ११० ते १२० झाडेच एकरात बसायची.
पूर्वी सुमारे चार फूट उंचीच्या कलमांचा वापर व्हायचा. आता पिशवीतील दीड ते २ फूट उंचीच्या कलमांची निवड शेतकरी करू लागले. त्यामुळे झाडाची वाढ चांगल्या प्रकारे व जलद होऊ लागली. नागपुरी संत्रा हेच वाण वापरले. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामधूनच रोपे घेण्यात आली. त्यामुळे ती खात्रीशीर मिळाली.
वाढीच्या कालावधीत ठरावीक वेळेतच मे व डिसेंबरमध्ये छाटणी व ताण देण्यास सुरुवात केली.
फळे सुरू होण्याच्या आधीच्या अवस्थेपर्यंत शिफारशीत खते तीन समान टप्प्यांत म्हणजे आंबिया, मृग व हस्ताच्या नवतीच्या आधी देण्यास सुरुवात झाली. फळे विकसित होण्याच्या अवस्थेतील बागांमध्ये पाच टप्प्यांमध्ये खते देण्यास सुरवात झाली.
शक्यतो बागा जास्तीत जास्त चौथ्या वर्षी
उत्पादनक्षम करण्यावर भर. अशा बागांमध्ये पानांची संख्या, आकार योग्य ठेवणे तसेच अन्नसाठाही योग्य राखणे, जमिनीच्या मगदुराप्रमाणे १५ दिवसांपासून ते ४५ दिवसांपर्यंत पाण्याचा ताण देणे या बाबींचा अवलंब केला.
जिवाणू खते व सेंद्रिय खतांच्या वापरावर भर दिला.
सायला, काळी माशी, फुलकिडे, लाल कोळी, फळगळ आदी समस्यांवरील उपायांसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर
केव्हीकेचे अध्यक्ष अनंतराव देशमुख, प्रमुख डॉ. रवींद्र काळे, उद्यान विद्या तज्ज्ञ निवृत्ती पाटील, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, डॉ. डी. एम. पंचभाई, डॉ. दिनेश पैठणकर, डॉ. योगेश इंगळे, डॉ. शंशाक भराड, जिल्हा कृषी विभागाचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळाले.
उत्पादकता वाढली
सन २०१४-१५ मध्ये जिल्ह्यात संत्र्याखाली सुमारे १९०० हेक्टर क्षेत्र होते. उत्पादकता ९.२१ टन हेक्टर होती. आजमितीला २०२४ पर्यंत क्षेत्र १२ हजार हेक्टरवर पोचले आहे. केव्हीकेचे तंत्रज्ञान दीड हजाराच्या आसपास शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले आहे. सुमारे २० मास्टर शेतकरी तयार झाले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी हेक्टरी ३५ ते ४० टनांपर्यंत उत्पादकता गाठली आहे. काही शेतकरी ५० ते ६५ टनांपर्यंतही पोहोचले आहेत.
ब्रॅण्ड तयार झाला
उत्पादनासोबत विपणनातही गती साधली. संत्रा उत्पादकांनी नवचैतन्य कृषी विकास शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली. त्याद्वारे वाशीम ऑरेंज हा ब्रॅण्ड तयार केला. दोन वर्षांपासून थेट ग्राहक विक्री हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पूर्वी हुंडी पद्धतीने शेतकरी बागा द्यायचे. आता क्रेट किंवा किलो पद्धतीने ते विक्री करू लागले आहेत. अनेक शेतकरी बागेच्या चौथ्या वर्षापासून उत्पादन घेऊ लागले आहेत. विदर्भातील शेतकऱ्यांना त्यांच्यापासून प्रेरणा मिळत आहे. आपल्याच भागातील स्थानिक वाण वापरून त्याची उत्पादकता वाढविण्यास मदत मिळाली असून, सह्याद्री या नाशिक येथील प्रसिद्ध शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातूनही विक्रीला चालना देण्याचे प्रयत्न असल्याचे केव्हीकेचे निवृत्ती पाटील म्हणाले.
मृग बहर व्यवस्थापनाच्या अनुषंगाने सद्य:स्थितीत करावयाचे नियोजन
फळ काढणीपूर्वी म्हणजे २० जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत शिफारशीत खताचा पाचवा हप्ता (१२०:००:१०० ग्रॅम नत्र- स्फुरद- पालाश) प्रति झाड द्यावा. सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता दिसत असल्यास झिंक, फेरस, मॅग्नेशिअम ५० ते १०० ग्रॅम प्रमाणात प्रति झाड मुळांच्या परिघात द्यावीत.
फळेकाढणीही पाणी नियमित सुरू ठेवावे.
मृग बहरातील फळे तोंडणीनंतर वाळलेल्या फांद्या थोड्या हिरव्या भागासहित काढून शिफारशीत बुरशीनाशकाची फवारणी करावी
मार्च महिन्यात किंवा त्यानंतर झाडांना नवी नवती यायला नको याची काळजी घ्यावी
संत्रा पिकाच्या ८० टक्के केशमुळ्या फक्त १० इंच खोलीपर्यंत असतात. त्यामुळे बागेत खोल मशागत करू नये. मृग बहरासाठी जमिनीचा मगदूर, झाडाचे वय व अवस्था पाहून आपल्या मागील अनुभवानुसार पाण्याचा ताण द्यावा. एक मीटर खोलीच्या जमिनीत ५० दिवसांचा व हलक्या जमिनीमध्ये ३० ते ४० दिवसांचा पाण्याचा ताण द्यावा. पाण्याचा अतिरिक्त ताण बसल्यास बऱ्याचवेळा झाडे दगावतात. त्यामुळे पाणी देण्याकरिता पर्यायी व्यवस्था (ठिबक) तयार ठेवावी
अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्यासाठी गरजेनुसार किमान तीन फूट खोलीचे चर घ्यावेत. ताणाच्या कालावधीत अवेळी पाऊस झाल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्याने वाढरोधकाची तत्काळ फवारणी घ्यावी.
मृग बहरासाठी बहर येण्यासाठी किमान तीन इंच पाऊस, तापमान ३८ अंशापेक्षा कमी असावे. आर्द्रता किमान ६५ ते ७० टक्के असावी.
ताण सोडण्यापूर्वी पुढीलप्रमाणे शिफारशीत खते द्यावी. ५० किलो कुजलेले शेणखत अधिक ३६०- १६०- ४० नत्र- स्फुरद- पालाश प्रति झाड). झाडांच्या खोडाला बोर्डो मलम लावावे.
फुलोरा किंवा फळधारणेच्या अवस्थेत पावसात खंड पडल्यास ठिबक किंवा रेन पाइप वा तुषारद्वारे ओलित करावे.
शरद वामन खंडागळे (रा. गोकसावंगी, ता. मालेगाव) यांची दोन एकरांत २५० झाडांची १२ वर्षांची संत्रा बाग आहे. त्यांना मागील दोन वर्षांत दोन एकरांतून ३९ ते ४० टन उत्पादन मिळाले आहे. हेक्टरी ५० टनांची उत्पादकता त्यांनी मिळवली आहे. यंदा दर चांगला राहिल्याने उत्पन्नही चांगले मिळाले.
उद्धवराव राऊत (रा. वनोजा ता. मंगरूळपीर) यांची २० वर्षे वयाची चार एकर बाग असून, एकूण ५३० झाडे आहेत. त्यामधून त्यांना या वर्षी १०२ टन उत्पादन मिळाले. हेक्टरी ६० ते ६३ टनांपर्यंत उत्पादकता त्यांनी गाठली आहे.
- निवृत्ती पाटील, ९९२१००८५७५ , (उद्यानविद्या तज्ज्ञ, केव्हीके, करडा, वाशीम)
केशवराव बोरकर (वडजी, ता. रिसोड) यांची इंडो-इस्राईल तंत्रावर आधारित दोन एकरांत सहा वर्षांची बाग आहे. तिसऱ्या वर्षापासून ते उल्लेखनीय उत्पादन घेत आहेत. पाचव्या वर्षी एकूण क्षेत्रातून ३३ टन (४१.२५ टन/हेक्टरी), तर सहाव्या वर्षी ६२.४ टन उत्पादन त्यांनी घेतले आहे. हेक्टरी सुमारे ४१ ते ७५ टनांपर्यंत उत्पादकता त्यांनी साध्य केले आहे.
केशवराव बोरकर, ८८३०९८७०८३
वडजी येथील शिवाजी पंडितराव बोरकर यांची दोन एकरांत ३१० रोपांची २०१८ मध्ये लागवड केलेली बाग आहे. चौथ्या वर्षापासून ते उत्पादन घेत आहेत. त्या वर्षी एकूण क्षेत्रातून ३६.८ टन, पाचव्या वर्षी ४३.७ टन, तर सहाव्या वर्षी ५४.२ टन उत्पादन त्यांनी घेतले. हेक्टरी ५० ते ६५ टनांपर्यंत उत्पादकता त्यांनी गाठली आहे.
शिवाजी बोरकर, ७४९९०१५६११
गजानन निवृत्ती इडोळे (अडोळी, ता. वाशीम) यांची अडीच एकरांत ४३५ झाडांची नऊ वर्षांची बाग आहे. या वर्षी मृग बहराचे ५५ टन, तर आंबिया बहराचे ७.२५ टन असे एकूण ६२.२५ टन उत्पादन त्यांना मिळाले. विशेष म्हणजे मागील सहा वर्षांपासून एकही वर्ष बाग उत्पादनाविना खाली राहिलेली नाही.
गजानन यांचे पुतणे नंदकिशोर म्हणाले, की अकोला तसेच स्थानिक व्यापारी जागेवर येऊन फळांची खरेदी करीत आहेत. यंदा आम्ही हुंडी पद्धतीने साडे १४ लाख रुपये दराने बाग दिली आहे. मागील वर्षी संत्र्याला दर किलोला १०, २० ते २२ रुपये एवढे कमी होते. कमाल दर ३५ रुपये होता. यंदा मात्र दर तेजीत असून, ३५ रुपयांच्या पुढे दर मिळत आहे. २० ते २२ किलोच्या क्रेटला ७०० ते ११०० रुपये दर मिळतो.
नंदकिशोर इडोळे, ९०४९८८९५१५
योगेश मोतीराम गावंडे (कारली, ता. मानोरा) यांनी २०१९ मध्ये दोन एकरांत इंडो- इस्राईल पद्धतीने ४३० कलमांची लागवड केली. चौथ्या वर्षी पहिला बहर घेतला. त्यातून ३३.६ टन उत्पादन त्यांनी घेतले. ८११ रुपये प्रति क्रेट दराने विक्री केली.
योगेश गावंडे, ९६५७५६०४१९
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.