Tur Crop Protection : तुरीच्या पिकाचे संरक्षण: किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय!

Tur Crop Pest Management : खरीप केलेल्या लागवडीच्या वेळेनुसार तूर हे पीक सध्या फुलोरा, शेंगा व काढणीच्या अवस्थेत असेल. तूर पिकावर २०० पेक्षा अधिक किडींचा प्रादुर्भाव होत असला तरी फुलोरा व शेंगाच्या अवस्थेमध्ये शेंग पोखरणारी अळी, शेंगमाशी आणि पिसारी पतंग या मुख्य किडी आहेत.
Tur
Tur
Published on
Updated on

डॉ. प्रेरणा चिकटे, डॉ. जी. एस. जेऊघाले, कु. सारिका मोरे

Tur Crop Farming : खरीप केलेल्या लागवडीच्या वेळेनुसार तूर हे पीक सध्या फुलोरा, शेंगा व काढणीच्या अवस्थेत असेल. तूर पिकावर २०० पेक्षा अधिक किडींचा प्रादुर्भाव होत असला तरी फुलोरा व शेंगाच्या अवस्थेमध्ये शेंग पोखरणारी अळी, शेंगमाशी आणि पिसारी पतंग या मुख्य किडी आहेत. त्यांच्यामुळे फुलोरा व शेंगाचे आर्थिकदृष्ट्या मोठे नुकसान होते.

तुरीवरील शेंग पोखरणारी अळी

या किडीचे शास्त्रीय नाव हेलीकोव्हरपा आर्मिजेरा असून, ती बहुभक्षी कीड आहे. बहुतांश सर्व डाळवर्गीय पिकांमध्ये उदा. उडीद, मूग, हरभरा, वाटाणा व मसूर आढळते. या अळीचा तूर या पिकावर ७० टक्क्यांपर्यंत प्रादुर्भाव आढळून येतो. या किडीच्या चार अवस्था असून, त्यातील अळी अवस्था हानिकारक आहे.

ओळख

हेलिकोव्हरपा या किडीचा पतंग शरीराने दणकट, पिवळसर असून त्याच्या पुढील तपकिरी पंखजोडीवर काळे ठिपके असतात. मागील पंखाच्या कडा भुरकट रंगाच्या असतात. मादी पतंग पीक फुलोरा अवस्थेत फुले, कळी आणि शेंगावर सुमारे ८० टक्के अंडी घालतात. अंडी अवस्था ३ ते ४ दिवसांची असते. त्यातून बाहेर पडलेली अशी ही पिकानुसार वेगवेगळ्या रंगाची असते. पूर्ण विकसित अळी सामान्यतः पोपटी रंगाची दिसते. तिच्या शरीराच्या बाजूवर तुटक करड्या रेषा आढळतात. अळी अवस्था १७ ते २३ दिवस असते. त्यानंतर ती कोषावस्थेत जाते. कोष कातासारख्या गडद तपकिरी (कथिया) रंगाचा असतो.

Tur
Tur Disease : अतिवृष्टीनंतर तुरीवर मर रोगाचा प्रादुर्भाव

नुकसान

लहान अळ्या सुरुवातीस तुरीची कोवळी पाने व त्यानंतर फुले व कळ्या यांचे नुकसान करतात. नंतरच्या अवस्था फुलांपेक्षा शेंगावर जास्त आढळून येतात. शेंगांना अनियमित आकाराचे मोठे छिद्र पडून अर्धी आत व अर्धी बाहेर अशा स्थितीत शेंगातील अपरिपक्व दाणे खाताना आढळतात. एक अळी साधारणत: २० ते २५ शेंगांचे नुकसान करते. ती नोव्हेंबर ते मार्च महिन्यांपर्यंत क्रियाशील असते. प्रति झाडावर एक अळी असल्यास हेक्टरी १३८ किलो घट येते. तर एका झाडावर तीन अळ्या असल्यास हेक्टरी ३०८ किलो घट येते.

एकात्मिक कीड व्यवस्थापन

प्रतिबंधात्मक उपाययोजना

बांधावरील तुरीच्या शेंगा पोखरणाऱ्या अळीचे पर्यायी खाद्य (उदा. कोळशी, रानभेंडी, पेटारी इ.) ही तणे वेळोवेळी काढून नष्ट करावीत.

पूर्ण वाढ झालेल्या अळ्या वेचून नष्ट कराव्यात.

पक्ष्यांना बसण्यासाठी ३ ते ५ काड्यांचे हेक्टरी ५० पक्षिथांबे लावावेत. पीक कळी अवस्थेत असताना निंबोळी अर्क (५ टक्के) प्रमाणे फवारणी करावी.

शेंगा पोखरणाऱ्या हिरव्या अळीसाठी एच.ए.एन.पी.व्ही. ५०० एल.ई (१×१० चा ९ वा घात तीव्रतेचे) विषाणूजन्य कीटकनाशक फवारावे. (१ मि.लि. प्रति लिटर असे द्यावे.)

शेंगा पोखरणाऱ्या अळीसाठी पीक कळी अवस्थेत असताना पिकापेक्षा १ फूट उंचीवर हेक्टरी ५ फेरोमोन सापळे (हेलिल्युअर गंधगोळीयुक्त) लावावे.

आर्थिक नुकसानीची पातळी (ईटीएल)

शेंगा पोखरणारी अळी ः १ अळी प्रति झाड किंवा ५ ते १० टक्के शेंगांना छिद्र आढळून आल्यास.

पिसारी पतंग : ५ ते १० अळी प्रति झाड आढळून आल्यास. किडींनी आर्थिक नुकसान पातळी गाठली असे लक्षात घेऊन रासायनिक कीटकनाशक फवारणी करावी.

Tur
Tur Pest Management : तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या किडींचे नियंत्रण व्यवस्थापन

रासायनिक उपाययोजना

वरिल सर्व उपायांच्या अंमलबजावणीनंतरही किडीने आर्थिक नुकसान पातळी गाठल्यास केंद्रीय कीटकनाशक मंडळाद्वारे शिफाराशीत कीटकनाशकांचा वापर करता येईल. पीक ५० टक्के फुलोऱ्यात असताना पहिली फवारणी घ्यावी. त्यानंतर दुसरी फवारणी १५ दिवसांनी व अगदीच गरज भासल्यास तिसरी फवारणी २० दिवसांनी कीडनाशके बदलून घ्यावी.

(फवारणी प्रमाण ः प्रति १० लिटर पाणी)

इथिऑन (५० टक्के प्रवाही) २५ मि.लि. किंवा

थायोडीकार्ब (७५ डब्लू.पी.) २० ग्रॅम किंवा

क्विनॉलफॉस (२५ टक्के ई.सी.) २० मि.लि. किंवा

इंडोक्झाकार्ब (१५.८ ई.सी.) ७ मि.लि. किंवा

इमामेक्टीन बेन्झोएट (१८.५ एस.सी.) २.५ मि.लि.

किंवा फ्लूबेनडायअमाइड (३९.३५ टक्के एस.सी.) २ ग्रॅम.

तिसऱ्या फवारणीची गरज भासल्यास, (प्रमाण प्रति १० लिटर पाणी)

क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (९.३) अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (४.६ टक्के) (संयुक्त कीटकनाशक) ४ मि.लि.

(सर्व कीडनाशकांना लेबल क्लेम आहेत.)

पिसारी पतंग

ओळख

या किडीचा पतंग नाजूक निमुळता करड्या व भुऱ्या रंगाचा असतो. पुढील पंख लांब दुभंगलेले असून, त्यांच्या कडावर नाजूक केसांची दाट लव असते. त्यामुळे त्यांना पिसारी पतंग म्हणतात. त्यांचे पाय लांब व बारीक असतात. अळी हिरव्या रंगाची १५ मिमी लांब असून मध्यभागी फुगीर व दोन्ही टोकांकडे निमुळती असते. पाठीवर काटेरी लव असते. कोष लालसर तपकिरी रंगाचे असतात.

नुकसान

अंड्यातून बाहेर निघालेली अळी कळ्या फुले व शेंगाना छिद्र पाडून खाते. पूर्ण वाढ झालेली अळी प्रथम शेंगाचा पृष्ठभाग खरडून खाते. नंतर शेंगाना, शेंगाच्या बाहेर राहून खाते. ही अळी शेंगाच्या आत कधीच शिरत नाही. अळी अवस्था ११ ते १६ दिवसांची असते. ही अळी पावसाळा संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात तुरीवर येते.

शेंगमाशी

ओळख

शेंगमाशी आकाराने लहान (१.५ मिमी लांब) असून, हिरवट रंगाची असतो. अळी बारीक गुळगुळीत व पांढऱ्या रंगाची, बिनपायांची असते. तिच्या तोंडाकडील भाग निमुळता असतो. अळी शेंगेतच कोषावस्थेत जाते.

नुकसान

हेलिकोव्हरपा अळीनंतर शेंगामाशी पिकांचे सर्वांत जास्त नुकसान करते. सुरुवातीला या किडीचे कुठलेही लक्षण शेंगेवर दिसत नाही. मात्र पूर्ण वाढ झालेली अळी कोषाअवस्थेत जाण्यापूर्वी शेंगेला छिद्र पाडते. शेंगेला पाडलेले हे छिद्र म्हणजे कोषावस्था पूर्ण झाल्‍यानंतर बाहेर पडणाऱ्या माशीला शेंगेबाहेर जाण्यासाठी केलेली तरतूद असते. त्या वेळी या किडीचा प्रादुर्भाव लक्षात येतो. ही शेंगमाशी ८० टक्के अंडे शेंगावर टाकते. अंडे घालण्याचा कालावधी डिसेंबर व जानेवारी असतो. ही अळी शेंगेत शिरून, दाणे अर्धवट कुरतडून खाते. त्यामुळे दाण्याची मुकणी होते. त्यावर बुरशी वाढून दाणे कुजतात. या किडीमुळे उत्पादनात १० ते ५० टक्के घट आढळून येते.

डॉ. प्रेरणा चिकटे, ८०८७२५७०२५

(सहायक प्राध्यापक - कीटकशास्त्र, कृषी महाविद्यालय अंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com