Farming Management:
शेतकरी नियोजन । पीक : भाजीपाला
शेतकरी : सौ. मीनाक्षी अजित नेंदुर्गे
गाव : सांगवडे, ता. करवीर, जि. कोल्हापूर
एकूण शेती : साडेतीन एकर
काकडी लागवड : ३० गुंठे
सांगवडे (ता. करवीर) हे नृसिंह देवस्थानसाठी प्रसिद्ध गाव. या गावातील सौ. मीनाक्षी नेंदुर्गे यांनी पती अजित यांच्या सहकार्याने साडेतीन एकर क्षेत्रामध्ये बहुपीक पद्धतीतून शेती फुलविली आहे. एकाच पिकाचे उत्पादन न घेता, टप्प्याटप्प्याने ऊस, सोयाबीनसह भाजीपाला, कडधान्ये उत्पादन घेण्यावर त्यांचा भर असतो. गेल्या पाच वर्षांपासून भाजीपाला लागवडीत सातत्य राखले आहे. विशेष करून दोडका व काकडी लागवडीत मल्चिंग तंत्रासह सुधारित पद्धतीचा अवलंब करण्यावर मीनाक्षीताईंचा भर असतो. शेणखताच्या वापरावर भर दिला जातो. त्यासाठी गोठ्यात जनावरांचे संगोपन करण्यात आले आहे. शेणखताचा शेतामध्ये वापर करून शेतीमध्ये रासायनिक खतांचा कमी वापर करून दर्जेदार उत्पादन घेण्याचा मीनाक्षीताई प्रयत्न करतात.
मार्चमध्ये त्यांनी ३० गुंठे क्षेत्रावर काकडी लागवड केली आहे. सध्या पीक वाढीच्या अवस्थेत असून काटेकोर सिंचनावर भर दिला जात आहे. दरवर्षी ऊस व भाजीपाला अशी पीक फेरपालट केल्याने जमिनीची पोत चांगला राहतो. शिवाय पावसाळ्यापर्यंत काकडी निघून गेल्यानंतर याच प्लॉटमध्ये खरीप पिकांची लागवड करणे शक्य होते, असे मीनाक्षीताई सांगतात.
लागवड नियोजन
दरवर्षी उन्हाळ्यात एकूण क्षेत्रापैकी काही क्षेत्रात हमखास उत्पन्न देणाऱ्या भाजीपाला पिकांची लागवड केली जाते. या वर्षी ३ मार्चला ३० गुंठे क्षेत्रावर काकडीची लागवड केली आहे. लागवडीसाठी निवड केलेल्या क्षेत्रामध्ये आधी खोडवा ऊस होता. जानेवारीत खोडवा गेल्यानंतर क्षेत्र काकडी लागवडीसाठी तयार केले.
खोडवा गेल्यानंतर सलग दोन महिने रान तापू दिले. त्यात चार ट्रॉली चांगले कुजलेले शेणखत विस्कटून घेतले. त्यानंतर रान तयार करून घेतले. साडेचार फुटी सरी सोडून माती लावली. खोल नांगरणी करून छोट्या ट्रॅक्टरच्या साह्याने बेड तयार केले. त्यानंतर सिंचनासाठी ठिबकच्या नळ्या अंथरून घेतल्या. ठिबकच्या नळ्या अंथरल्यानंतर सलग दोन दिवस सऱ्या पूर्णपणे भिजवून घेतल्या. जेणेकरून जमीन वाफसा स्थितीमध्ये येईल. संपूर्ण तयारी झाल्यानंतर बेडवर मल्चिंग अंथरून घेतले. मल्चिंगवर छिद्रे पाडून त्यात काकडीच्या बियाणांची सव्वा फूट अंतरावर टोकण केली. बी टोकल्यानंतर ठिबकने पुन्हा पाणी देण्यात आले. त्यानंतर साधारण पाचव्या दिवशी बियांची उगवण झाली.
पीक व्यवस्थापन
रोपे चार पानांवर आल्यानंतर ह्युमिक ॲसिड, बुरशीनाशक आदी घटकांचा आळवणीद्वारे वापर केला. त्यानंतर ‘वन टू वन’ पद्धतीने रोपांसाठी तारकाठ्या लावून घेतल्या. जेणेकरून प्रत्येक रोपाला आधार मिळेल. काकडी पिकामध्ये पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात जाणवतो. यासाठी चिकट सापळ्यांचा वापर केला जातो. या माध्यमातून पांढऱ्या माशीला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच चार दिवसांनी रासायनिक कीटकनाशकांची फवारणी घेतली जाते. मल्चिंगवर काकडी लागवड केल्यामुळे नियंत्रण करणे अधिक सोयीचे होते, असा मीनाक्षीताईंचा अनुभव आहे. सध्याच्या ढगाळ हवामानामुळे किडींचा प्रादुर्भाव वाढतो. या काळात कीड नियंत्रण करणे अडचणीचे होते. त्यामुळे सध्या दर चार दिवसांनी रासायनिक कीटकनाशकांची फवारणी सुरू आहे.
स्वत: शेतीकामे करण्यावर भर
मीनाक्षीताई सकाळी लवकर घरातील सर्व कामे आवरून शेती कामे करण्यास जातात. घरकाम, गोठ्यातील कामे व शेतीकामे असे सूत्र त्यांनी जपले आहे. दैनंदिन कामांचे योग्य नियोजन करून कामांचे व्यवस्थापन केले जाते. पती अजित यांच्यासह मुलगा ऋषभ आणि वर्धमान या दोघांची साथ त्यांना मिळते. ऋषभ हा इलेक्ट्रिशियन, तर वर्धमान हा पशुवैद्यकीय व्यवसायात आहे. या सर्वांचे शेतीकामांच्या नियोजनामध्ये सहकार्य मिळते, असे मीनाक्षीताई सांगतात.
सिंचन व्यवस्थापन
उन्हाळ्याच्या दिवसांत पिकाची पाण्याची गरज वाढते. त्यामुळे पिकास अतिरिक्त पाणी देणे आवश्यक असते. त्यानुसार सिंचनाचा कालावधी वाढविला जातो. सध्या प्रतिदिन दोन तासांपर्यंत सिंचन करण्यावर भर दिला आहे. लागवड केल्यानंतर साधारण ३९ व्या दिवशी काकडीचा तोडा सुरू झाला. त्यामुळे सिंचनाचे काटेकोर नियोजन करण्यावर भर दिला जात आहे.
तोडणी नियोजन
सध्या काकडी तोडणीची कामे सुरू आहेत. पहिला तोडा साधारण १२ एप्रिलच्या दरम्यान करण्यात आला. पहिल्या तोड्यात ३५ किलो काकडी उत्पादन मिळाले. सुरुवातील उत्पादन कमी मिळते, मात्र हळूहळू प्रत्येक तोड्यात उत्पादन वाढत जाते. आतापर्यंत ११ तोडे झाले आहेत. सरासरी अडीचशे किलो उत्पादन मिळाले आहे. उत्पादित काकडीची स्थानिक बाजारात घाऊक प्रमाणात विक्री केली जात आहे. सध्या उन्हाळा असल्याने बाजारात काकडीला चांगली मागणी आहे. दररोज सकाळी काकडी तोडून बाजारात विक्रीसाठी पाठविली जाते. अजून पुढील १५ दिवस काकडीचे तोडे सुरू राहतील, असा अंदाज आहे. मागणी कायम असल्याने दर चांगले राहतील असे मीनाक्षीताई सांगतात.
मीनाक्षी नेंदुर्गे ९४२०३३०३१८
(शब्दांकन : राजकुमार चौगुले)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.