Foreign Vegetable Farming: परदेशी भाज्यांच्या शेतीत उच्चशिक्षित तरुण

Agriculture Success Story: सागर शिंदे या बीटेक-एमबीए युवकाने नोकरी सोडून परदेशी भाज्यांच्या सेंद्रिय शेतीत यशाचे पीक घेतले आहे. स्मार्ट मार्केटिंग, आंतरपीक पद्धती व शेडनेटच्या वापरातून त्यांनी शेती आर्थिकदृष्ट्या फायदेशीर बनवली आहे.
Agriculture
AgricultureAgrowon
Published on
Updated on

सूर्यकांत नेटके

Organic Farming in India: चांदेगाव (जि. अहिल्यानगर) येथील सागर शिंदे या बीटेक- एमबीए तरुणाने नोकरीपेक्षा व्यावसायिक शेतीला प्राधान्य दिले. पीक व्यवस्थापनासोबत बाजारपेठांचाही सूक्ष्म अभ्यास करून परदेशी भाजीपाला, शेडनेटमध्ये रंगीत ढोबळी मिरची व नगदी पिकांमध्ये आंतरपीक पद्धती विकसित केली.त्यातून उत्पादन खर्च कमी करण्यासह शेती आर्थिकदृष्ट्या फायदेशीर केली.

अलीकडील काळात शेतीत वैशिष्ट्यपूर्ण पीक पद्तीचा वापर करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. काही शेतकऱ्यांचा परदेशी भाज्यांच्या लागवडीकडे कल आहे. मात्र बाजारपेठेतील मागणीनुसार चक्राकार पद्धतीने उत्पादन घेण्याचे तंत्र त्यांनी अवगत केले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर-राहुरी तालुक्याच्या सीमेवर चांदेगाव आहे. या भागात प्रवरा नदीचे पाणी उपलब्ध असल्याने ऊसक्षेत्र अधिक आहे.

गावातील भीमाशंकर शिंदे यांची प्रगतिशील शेतकरी अशी ओळख असून त्यांची १० एकर शेती आहे. त्यांना राजकीय पार्श्‍वभूमीही आहे. मुलगा सागर उच्चशिक्षित असून बीटेक व एमबीए अशा पदव्या त्यांनी संपादित केल्या आहेत. शिक्षण घेऊन पुणे येथे प्रसिद्ध कंपनीच्या मॉलमध्ये गुणवत्ता अधिकारी पदावर त्यांनी नोकरीचा अनुभव घेतला. त्या दरम्यान विविध शेतीमालांची गुणवत्ता, ग्राहकांकडून असलेली मागणी व बाजारपेठ यांचा अभ्यास झाला.

Agriculture
Agriculture Success Story: शेतीला मिळाली मसाला उद्योगाची जोड

दरम्यान, आपल्या शेतीत कोणत्या व्यावसायिक पीक पध्दतीचा अंगीकार करता येईल याचे आराखडे मनात सुरू होते. त्या वेळी परदेशी व व्यावसायिक भाजीपाला पिकांचा अधिक अभ्यास झाला. कोरोना काळात नोकरीचा राजीनामा देऊन पूर्णवेळ शेती करण्याचे निश्‍चित केले.

परदेशी भाज्यांची व्यावसायिक शेती

मागील तीन ते चार वर्षांपासून सागर अडीच ते तीन एकरांत परदेशी (एक्सॉटिक) भाज्यांचे उत्पादन घेण्यात रमले आहेत. साधारण १० गुंठ्यांपासून ते अर्ध्या एकरापर्यंत ते विविध भाज्या घेतात. यात आइसबर्ग, लेट्यूस ग्रीन- रेड, सेलेरी, ब्रोकोली आदींचा समावेश आहे. वीस गुंठ्यात शेडनेट उभारले असून त्यात लाल व पिवळ्या ढोबळी मिरचीचे उत्पादन घेण्यात येत आहे. आइसबर्ग साधारण ४५ ते साठ दिवसांत, सेलेरी ८० ते ९० दिवसांत तर ब्रोकोली ७० ते ८० दिवसांत उत्पादन देते.

शेणखत, कोंबडीखत व अन्य सेंद्रिय घटकांवर अधिक भर असून ७० टक्के सेंद्रिय व ३० टक्के रासायनिक अशा पद्धतीचा वापर होतो. कमी कालावधीच्या या पिकांची काढणी झाल्यानंतर त्या जागेत ते पीक पुन्हा घेतले जात नाही. थोडक्यात, फेरपालट केली जाते. अशा रीतीने वर्षभरात सुमारे तीन वेळा भाज्यांचे उत्पादन चक्राकार पद्धतीने घेतले जाते. उन्हाळ्यात एप्रिल व मे महिन्यात जमिनीला विश्रांती देण्यात येते. प्रातिनिधिक सांगायचे तर ब्रोकोलीचे अर्ध्या एकर क्षेत्रात दीड ते दोन टनांपर्यंत, तर आइसबर्गचे १० गुंठ्यांत तीन टनांपर्यंत उत्पादन मिळते.

Agriculture
Agriculture Success Story: पंचवीस वर्षांपासून गयाबाई सांभाळतात शेतीची धुरा

परदेशी भाज्यांचे मार्केट

सागर सांगतात, की नाशिक, दादर- मुंबई या ठिकाणी परदेशी भाज्यांची विक्री करतो. यापूर्वी मॉलमध्ये नोकरीचा अनुभव असल्याने विविध मॉल्सची मागणी लक्षात घेऊन त्यांना विक्री करण्यात येते. उन्हाळ्यात ब्रोकोली, आइसबर्ग आदींचे उत्पादन कमी असल्याने किलोला ९० ते १०० रुपयांपर्यंत दर मिळतात. हिवाळ्यात उत्पादन अधिक असल्याने हेच दर ४० ते ५० रुपयांपर्यंत असतात. सेलेरीला हिवाळ्यात ३० ते ४० रुपये तर उन्हाळ्यात अधिक दर मिळतात. मागील हंगामात आइसबर्गला किलोला २०० रुपये दर घेतल्याचे सागर सांगतात. प्रत्येकी १० गुंठ्यांत असलेल्या लाल व पिवळ्या ढोबळीचे मिळून साडेपाच टनांपर्यंत उत्पादन हाती आले आहे. किलोला ७० ते त्याहून अधिक रुपयांचा दर मिळत आहे. नाशिक व संगमनेर या ठिकाणी विक्री होते.

आंतरपीक पद्धती सन २०१५ पासून आंतरपीक पद्धतीला प्राधान्य दिले आहे. उसात कांद्याचे व ब्रोकोलीचे आंतरपीक घेऊन मुख्य पिकाचा खर्च कमी केला जातो. उसाच्या चार फुटी पट्ट्यातील मधल्या भागात ब्रोकोली असते. डाळिंबाची १४ बाय आठ फूट अंतरावर लागवड असते. यात चौदा फुटांच्या जागेत प्रत्येकी चार फुटांमध्ये ब्रोकोलीच्या तीन ओळी असतात. वर्षभरात दोन ते तीनवेळा हे आंतरपीक घेतल्याने उत्पन्नाचा स्रोत कायम राहतो.

उसाचे एकरी ७० ते ७५ टनांपर्यंत तर कांद्याचे १५ ते १८ टनांपर्यंत उत्पादन घेण्यात येते. कांद्याला दहा वर्षापासून शेणखताचा भरपूर वापर असल्याने उत्पादनासह गुणवत्ता व टिकवणक्षमतेतही चांगली वाढ झाली आहे. दरांच्या प्रतीक्षेत दीर्घकाळ साठवणूक केली तरी नुकसान होत नाही. ऊस व कांदा पद्धतीत सुरू हंगामात कांद्याची आधी व एक महिनाभराने उसाची लागवड होते. पुढे कांद्याची काढणी झाल्यानंतर उसाच्या रोपांचीही निर्मिती करण्याचेही या जागेत नियोजन होते.

शेतीत समाधान

राहुरी तालुक्यातील चांदेगावासह परिसरातील अनेक गावांतील शेतकरी लसूणघासाचे उत्पादन घेतात. चाऱ्यासाठी विक्री करतात. शिंदे कुटुंबानेही अनेक वर्ष त्याचे उत्पादन घेतले. सहा ते सात एकरांपर्यंत त्याचे क्षेत्र असायचे. वीस वर्षांहून अधिक काळ ऊस, कापूस आदींचे उत्पादन ते घेत आहेत. प्रवरा नदीचे पाणी असल्याने सिंचनाची समस्या येत नाही. तीस वर्षाहून अधिक काळापासून पशुपालन केले जाते. कालवडी घेऊन मोठ्या झाल्यावर विक्री करण्यावर भर असते.

पशुपालनातून शेणखतही सहज उपलब्ध होते. सध्या चार गायी, आठ कालवडी आहेत. पूर्वी नोकरी करायचे त्यावेळी सागर यांना समाधानकारक उत्पन्न मिळत नव्हते. पूर्वी एकत्रित कुटुंब होते. त्या वेळी द्राक्ष शेती व्हायची. विभागणी झाल्यानंतर व्यावसायिक शेतीला सुरवात केली. आता बाजारपेठा व उत्पादन खर्च यांचा विचार करून निवडलेल्या पीकपद्धतीतून त्यांनी चांगल्या प्रकारे आर्थिक स्थैर्यता मिळविण्यास सुरुवात केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com