Sustainable Agriculture: एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन : शाश्‍वत शेतीचा पाया

Ecosystem Health: नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर करून माती व पाण्याची गुणवत्ता सुधारून जैवविविधता टिकवत पर्यावरणाचा समतोल राखून अन्नधान्यांचे गुणवत्तापूर्ण उत्पादन करणे आवश्यक आहे. हे साध्य करण्यासाठी शाश्‍वत पद्धती काळाची गरज आहे.
Agriculture
AgricultureAgrowon
Published on
Updated on

नरेश देशमुख

Sustainable Farming Practices: दिवसेंदिवस हवामानाचे स्वरूप बदलत आहे. वाढते तापमान, दुष्काळ, अवेळी पाऊस, अतिवृष्टी यासह इतर हवामान घटकांचा शेतीसह सर्वच क्षेत्रावर प्रतिकूल परिणाम होत आहे. मर्यादित शेतीयोग्य जमीन आणि नैसर्गिक साधनसंपत्तीची घट हे मोठे आव्हान आहे. शेतीमध्ये विविध निविष्ठांचा बेसुमार अनियंत्रित वापर केल्यामुळे उत्पादक आणि शाश्‍वत परिसंस्थेसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या संवेदनशील माती-वनस्पती-सूक्ष्म जीवपर्यावरण प्रणालीवर प्रतिकूल परिणाम होतो. या परिणामांसाठी पूर्वतयारी, उपायांचा शोध घेऊन परिस्थितीला जुळवून घेणारी शाश्‍वत पद्धती विकसित करणे काळाची गरज आहे. त्यावर शाश्‍वत शेती पद्धती उत्तम पर्याय आहे.

शाश्‍वत शेती म्हणजे जमीन, हवामान, पर्यावरण, पशुधन या संसाधनांचा सुयोग्य वापर करत शेतमाल उत्पादन करणे. या शेती पद्धतीमध्ये नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर करून माती व पाण्याची गुणवत्ता सुधारून जैवविविधता टिकवत पर्यावरणाचा समतोल राखून अन्नधान्यांचे गुणवत्तापूर्ण उत्पादन करणे शक्य आहे. शाश्‍वत शेतीमुळे उत्पादन खर्चात बचत करून उत्पन्न वाढ मिळविणे शक्य आहे. तसेच जमिनीची धूप कमी करता येते.

जमिनीची गुणवत्ता व अन्नद्रव्ये, हवामान परिस्थिती, बियाणे निवड, सूक्ष्म सिंचन प्रणालीचा अवलंब, मातीतील ओलावा निरीक्षण, जल-मृदा संधारणाचे तंत्र, पीक फेरपालट, सेंद्रिय पदार्थांची वृद्धी, एकात्मिक पीक व्यवस्थापन, जीपीएस-निर्देशित उपकरणे, ड्रोन मॉनिटरिंग यंत्रणा, खत वापरासाठी आधुनिक पद्धतींचा वापर आदी बाबी पीक उत्पादकता वाढीसह शाश्‍वत शेतीचा पाया उभारण्यास मदत करतात.

Agriculture
Sustainable Agriculture : शाश्‍वत शेती व्यवसाय काळाची गरज

अन्नद्रव्ये वापराची कार्यक्षमता आणि कृषी उत्पादकतेत झालेली घट हा जमिनीचे ढासळत्या आरोग्याचा थेट परिणाम आहे. हवामान बदलामुळे ही परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. पाणी आणि पोषक अन्नद्रव्ये टिकवून ठेवण्यासाठी, मुळांच्या वाढीस चालना देण्यासाठी, जमिनीतील उपयुक्त जिवाणूंची संख्या वाढविण्यासाठी तसेच मातीचा होणारा ऱ्हास कमी करून पर्यावरणीय प्रदूषण टाळण्यासाठी जमिनीच्या आरोग्य व्यवस्थापनावर भर देणे आवश्यक आहे.

सेंद्रिय कर्ब

सेंद्रिय खते किंवा कंपोस्ट खताचा वापर केल्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढतो. यामुळे मातीची रचना सुधारण्यास मदत होते. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामुळे माती, पीक आणि हवामानानुसार जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढू शकतो.

अन्नद्रव्यांचा वापर

एनपीके खतांचे आदर्श प्रमाण गुणोत्तर ४:२:१ इतके आहे. मात्र सध्या भारतातील एनपीके गुणोत्तर हे

१०.९:४.४:१ असे आहे. ते आदर्श प्रमाणाच्या तुलनेत जास्त आहे. जमिनीतून सातत्याने होणारी अन्नद्रव्यांची उचल, सेंद्रिय खतांचा अपुरा पुरवठा आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता यामुळे पोषक तत्त्वांची कमतरता निर्माण झाली आहे. या असमतोलामुळे खतांच्या प्रतिसादात आणि पीक उत्पादकतेत अडथळा निर्माण झाला आहे.

Agriculture
Sustainable Farming: शाश्‍वत शेतीकडे वाटचाल हवी: डॉ. आदिनाथ चव्हाण

कमी अन्नद्रव्ये वापर, कार्यक्षमता

भारतीय जमिनीत अन्नद्रव्ये वापराची कार्यक्षमता ३० ते ५० टक्के (एन), १५ ते २० टक्के (पी), ६० ते ७० टक्के (के), ८ ते १० टक्के (एस) आणि १ ते २ टक्के (सूक्ष्म अन्नद्रव्ये) पर्यंत असते. निचरा होणाऱ्या नायट्रोजनमुळे भूजल प्रदूषण होते, तर जमिनीच्या धुपीमुळे स्फुरद आणि पालाश यांचे नुकसान होते.

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन

पीक पोषणासाठी सर्वच पोषक घटकांची कमी अधिक प्रमाणात आवश्यकता असते. समतोल पीक पोषणासाठी संतुलित अन्नद्रव्ये व्यवस्थापन आवश्यक आहे. मुख्य, दुय्यम किंवा सूक्ष्म अन्नद्रव्ये वनस्पतीच्या चयापचयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. पोषक घटकांच्या कमतरतेमुळे पिकांत अन्नद्रव्ये कमतरतेची विविध लक्षणे दिसून येतात. त्यामुळे दुय्यम (कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, गंधक) किंवा सूक्ष्म अन्नद्रव्ये (जस्त, बोरॉन, मॉलिब्डेनम, लोह, मँगेनीज इ.) या पोषक घटकांचा योग्य प्रमाणात पुरवठा होणे अत्यंत आवश्यक आहे.

यामुळे संतुलित पीक पोषणासह जमिनीचे आरोग्य राखण्यास मदत होते. पिकांच्या गरजेनुसार सेंद्रिय-आधारित खतांचा समावेश असलेल्या विविध स्रोतांच्या माध्यमातून पोषक अन्नद्रव्यांचा वापर करणे काळाची गरज आहे. त्यामुळे मातीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म इष्टतम पातळीवर राखणे आणि सुधारणे शक्य होते.

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन हे वनस्पती आणि जमिनीतील उपयुक्त सूक्ष्मजीवांचे कार्य सुरळीत होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी रासायनिक खते, सेंद्रिय खते, जैवखते, पीक अवशेषांचा वापर, पीक पद्धतीत बदल आदींचे काटेकोर नियोजन करणे क्रमप्राप्त ठरते. संतुलित अन्नद्रव्ये व्यवस्थापनासाठी माती परिक्षण महत्त्वाचे आहे. माती परीक्षणामधून जमिनीची सामू, उपलब्ध पोषक घटक यांची माहिती होते.

त्याआधारे जमिनीत कमतरता असलेल्या अन्नद्रव्यांचा पुरवठा करणे शक्य होते. आवश्यक पोषक घटकांचा पुरवठा करून जमिनीची सुपीकता, रचना आणि आरोग्य राखणे शक्य होते. त्यामध्ये कंपोस्टचा वापर महत्त्वपूर्ण ठरतो. शिवाय मातीची धूप रोखण्यासाठी व जमिनीचे आरोग्य राखण्यासाठी मशागतीय पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे.

Agriculture
Sustainable Development : गरजा कमी केल्या तरच नैसर्गिक घटकांचे संवर्धन

संतुलित पोषणाची तत्त्वे

पिकाच्या गरजेप्रमाणे योग्य खतांची निवड.

खतांचा योग्य प्रमाणात वापर.

योग्य वेळी अन्नद्रव्यांची उपलब्धता.

पिकास उपलब्ध होईल अशा योग्य ठिकाणी अन्नद्रव्यांचा वापर.

व्यवस्थापनातील बाबी

पीक फेरपालट

जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी, कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी व जैवविविधतेला चालना देण्यासाठी पिकांची फेरपालट करणे आवश्यक आहे.

आंतरपिकांची निवड

उत्पादन वाढविण्यासाठी, कीड व रोग आटोक्यात ठेवण्यासाठी व जमिनीच्या आरोग्य सुधारण्यासाठी मुख्य पिकामध्ये आंतरपिकाची लागवड करावी.

एकात्मिक कीड व्यवस्थापन

कीड-रोग नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे. प्रादुर्भावासाठी पिकांचे नियमित निरीक्षण करणे.

कीड नियंत्रणासाठी नैसर्गिक भक्षक किंवा परजीवी या जैविक नियंत्रण पद्धतीचा वापर करावा. विविध मशागतीय पद्धतीचा अवलंब करावा.

जैविक घटकांच्या वापरावर भर

शेतीमध्ये रासायनिक खते व कीडनाशकांचा किमान वापर करण्यावर भर द्यायला हवा. कीड व रोगांच्या नियंत्रणासाठी जैविक घटकांच्या वापरावर भर द्यावा. पशुधन संगोपनातून उत्तम प्रतीचे शेणखत तयार होते. जमिनीची सुपीकता वाढीसाठी शेणखत वापरावर भर द्यावा.

सिंचन व्यवस्थापन

पीक व्यवस्थापनामध्ये सिंचन व्यवस्थापन महत्त्वाची भूमिका बजावते. रेन वॉटर हार्वेस्टिंग करून पावसाचे पाणी सिंचन व इतर शेती वापरासाठी साठवून ठेवता येते. पाण्याचा अपव्यय कमी करून कार्यक्षम वापर वाढविण्यासाठी सूक्ष्म सिंचन प्रणाली महत्त्वाची आहे. जमिनीत ओलावा टिकवून ठेवण्यासाठी तसेच बाष्पीभवन कमी करण्यासाठी आणि जमिनीतील उपयुक्त जिवाणूंना चालना देण्यासाठी मल्चिंगचा वापर फायदेशीर ठरतो.

पीक उत्पादनातील वाढत्या अडथळ्यांमध्ये कृषी उत्पादकता टिकवून ठेवण्याच्या आव्हानाला एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन हा उत्तम उपाय आहे. यामुळे उत्पादकता वाढीसह पीक उत्पादनातही स्थैर्य प्राप्त होते. त्यामुळे मातीचे आरोग्य आणि गुणवत्ता सुधारण्यास चालना मिळते. पारंपरिक शेतीमध्ये क्रांती घडवण्याची क्षमता शाश्‍वत शेती पद्धतीमध्ये आहे. त्यासाठी जैवविविधता, नूतनीकरणीय नैसर्गिक संसाधने, जलसंवर्धन यांना प्राधान्य देऊन अधिक लवचिक परिसंस्था निर्माण करणे शक्य आहे.

- नरेश देशमुख ९८२२५ ९९७४२

(लेखक महाधन ॲग्रीटेक लिमिटेड या कंपनीमध्ये चीफ ऑपरेटिंग ऑफिसर या पदावर कार्यरत आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com