Village Story Agrowon
ॲग्रो विशेष

Village Story : मातीचे पाय

Rural Story : नुकतेच गोरखभाऊ पत्नी भामाकाकूसह पुण्यातल्या त्यांच्या मुलाकडे काही दिवसांसाठी राहायला गेले होते. मुलाचा आणि सुनेचा त्यासाठी फार आग्रह होता. भाऊंना तपकिरीचे अफाट व्यसन होते.

Team Agrowon

समीर गायकवाड

Story : गोरखभाऊ आणि भामाकाकूंनी पुण्यात आपल्याकडे येऊन राहावे म्हणून मुलाचा आणि सुनेचा फार आग्रह होता. त्याचा शब्द मोडवेना म्हणून ते दोघे मुलाच्या-विश्‍वंभरच्या- आलिशान सोसायटीतल्या फ्लॅटमध्ये अखेर डेरेदाखल झाले. काही दिवस इथे निवांत राहायचे, असा त्यांचा विचार होता. भाऊंना तपकिरीचे अफाट व्यसन होते. आपली ही सवय कुठे आड येऊ नये यासाठी थोडी खबरदारी आणि थोडा त्याग करायची मनाची तयारी भाऊंनी केली होती. अनुराधा ही देखणी, हुशार सुनबाईही विश्‍वंभरसोबत त्यांच ऑफिसमध्ये कामाला होती. त्यांना भानू हा सहा वर्षांचा मुलगा होता.

भाऊंचे सुरुवातीचे एक-दोन दिवस घरात बसून राहण्यात गेले. तिसऱ्या-चौथ्या दिवशी पुणे परिसर व देहू-आळंदीचे दर्शन घेऊन झाले. पुढचा दिवसही उनाड गेला. त्या दिवशी गोरखभाऊंना राहवले नाही. खाली जाऊन फिरून येतो म्हणून तासाभराने परत आले. खरे तर लिफ्ट म्हणजे त्यांना एक गंमत वाटत होती. त्यांनी लिफ्टने पाच-सहा वेळा खालीवर केले. परतल्यावर सत्यभामेच्या कानात काहीतरी पुटपुटले त्यामुळे त्या जरा गोंधळल्या. संध्याकाळी विश्‍वंभर घरी आल्या आल्या म्हणाला, ‘‘असे आईवर एकटीवर घर टाकून जाणे योग्य नाही.’’ त्याला ते कळलं, कारण सीसीटीव्हीची कमाल होती. आई-वडिलांना खाली जायला अडचण नको म्हणून त्याने दुसऱ्याच दिवशी ऑफिसमधल्या गोपीला अटेंडंट म्हणून घरी ठेवला.

मुलगा, सून दिवसभर कामामुळे बाहेर राहत अन् नातू चार वाजेपर्यंत शाळेत. नातू घरी आला की तो हातात मोबाइलचे डबडे घेऊन बसे. शेजारी जावे तर दारे सदानकदा बंद. म्हातारीकोतारी माणसे खाली भेटत, पण सारी तोंडावरून इस्त्री फिरविल्यासारखी वाटायची. सोसायटीत मंदिर होते, पण तिथे यांचा जीव लागत नव्हता. दोघांनाही तिथे गुदमरून गेल्यासारखे होऊ लागले. पुढच्याच दिवशी हे सगळे घराबाहेर पडल्यावर भाऊ आणि काकू गोपीसोबत खाली आले. थेट मेनगेटपाशी आले आणि गेटवरच्या सिक्युरिटी गार्डशी त्यांनी संवाद झाडला. तिथल्या उपस्थितांच्या नजरा यांच्यावर खिळल्या.

भानू शाळेतून येण्याआधी ते दोघे फ्लॅटवर परतले. त्याच्या दुसऱ्या दिवशीही परत हाच प्रकार घडला. मात्र त्याकडे विश्‍वंभरने दुर्लक्ष केले. त्याने रात्री भाऊ, काकूंना तळमजल्यावरच्या कॉमन हॉलमध्ये नेले. तिथे सोसायटीचा स्नेहमेळावा होता. विश्‍वंभरने आपल्या आईवडिलांना मंचावर नेले, सगळ्यांशी ओळख करून दिली. त्या दिमाखदार गर्दीला पाहून ते दोघेही कावरेबावरे झाले. तिथे बसल्या-बसल्या एक गोष्ट भाऊंच्या लक्षात आली ती म्हणजे त्यांच्या जवळून जाणारी माणसे नाक वेंगाडून किंवा नाकपुड्या बंद करून जात होती.

दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाण्यापूर्वी विशू भाऊंच्या जवळ आला आणि भाऊ तपकीर खाणे का सोडत नाहीत असं विचारू लागला. रात्रीच्या गर्दीने काही तरी सुनावलं म्हणूनच तो हे विचारतोय का, असा भाऊंनी प्रतिप्रश्‍न केला. विशू, अनुराधा ऑफिसला जाताच भाऊ आणि काकू गोपीसोबत बाहेर निघाले. भामाकाकूंनी एक मोठी पिशवी आपल्या पोटाला लावून धरली होती. त्यानंतरच्या दिवशी विशू, अनुराधाने भाऊ, काकूंना ऑफिसमध्ये नेलं. चकचकीत ऑफिस पाहून मायबापाचा उर भरून आला. मात्र ऑफिसमध्ये शिरल्यापासून ते परत गाडीत बसेपर्यंत त्यांना लोकांच्या नाके मुरडण्याचा अनुभव पुन्हा आला.

पुढच्या रात्री भाऊ विशूजवळ जाऊन म्हणाले, की गावाकडे आपले मन ओढ घेतेय, तेव्हा आम्हा म्हातारा-म्हातारीला गावाकडे पाठवायची सोय कर. त्यांनी आणखी काही दिवस थांबावं म्हणून विशू, अनुराधा आग्रह करू लागले. तेव्हा भाऊ म्हणाले, “अरे गोठ्यातली गाय, दुधावरची साय, देवळातले इठू-रुखमाई, शिवारातली काळी आई, पारावरची पिंपळकळा आणि गावातला गोतावळा ही सगळी माझ्या स्वप्नात येत्येत. मला जायला पाहिजे.” महिना- दीड महिना राहतो म्हणून आलेले आई-वडील निघण्याचा हट्ट करू लागल्याने उभयतांना वाईट वाटले.

विशूला भाऊंचा स्वभाव माहिती असल्याने त्याने फारसा आग्रह केला नाही. दुसऱ्याच दिवशी कारमधून त्याने आई-वडिलांना गोपीसोबत गावी पाठवले. भाऊंनी गाडीत बसण्यापूर्वी एक जाड लालसर नाणे आपल्या नातवाच्या हातावर ठेवत त्याला सांगितले, ‘‘हा माझ्या लहानपणीचा ढब्बू पैसा आहे, तुला देतोय आठवण म्हणून. जपून ठेव.’’

भाऊंना गावी परतून आठवडा उलटला. एकेदिवशी एसटीने उतरलेल्या दोन व्यक्ती भाऊंच्या वाड्यावर आल्या. वाड्याच्या दारातच उभ्या उभ्या त्या दोघांचे डोळे वाहू लागले. भामाकाकू आणि भाऊंनी त्यांना शांत केले. क्षेमकुशल विचारले. जेऊ घालून, शेतशिवार दाखवून आणलं. दुसऱ्या दिवशी त्यांना त्यांच्या गावी परत पाठवलं. काही काळाने विश्‍वंभर गावी आलेला. न्याहरी उरकल्यानंतर त्याचे लक्ष भिंतीवर टांगलेल्या दगडूशेठ गणपतीच्या नव्याकोऱ्या फ्रेमकडे गेले. भाऊ पुण्यात आल्यावर त्यांना दगडूशेठच्या मंदिरात नेलेलं, पण हा फोटो घेतला नव्हता मग हा फोटो इथे कुठून आला? त्यानं घाबरतच भाऊंना फोटोबद्दल विचारलं.

भाऊ विश्‍वंभरजवळ येऊन बसले. दोन्ही नाकपुढ्यात तपकीर भरत म्हणाले “तू आणि सूनबाईनी अपार माया, प्रेम. मान, आदर सर्व काही दिलं, पण तिथं आमचं मन रमलं नाही. सातव्या मजल्यावरच्या त्या घरात सोन्याच्या दोरखंडाच्या शिक्याला टांगलेल्या मटक्यासारखी आमच्या जिवाची अवस्था झाली होतं. चहूबाजूला बांधल्यागत होतं, कुठं हालायला सुद्धा जागा नव्हती. माणसं माणसाशी बोलत नव्हती. मग मी त्या पाळण्यातल्या - लिफ्टमधल्या माणसाशी दोस्ती केली.

तो तुमच्या सगळ्याशी इंग्रजी- हिंदीतून बोलतो, पण माझ्याशी तो मराठीतूनच बोलायचा. तो पोट भरायला पुण्यात आलाय. तुमच्या गेटवरचा वॉचमन तर आपल्या जिल्ह्यातलाच निघाला. मला गोपीने सांगितले, की वॉचमन, लिफ्टवाला, ड्रायव्हर अशांशी मोठे लोक व त्यांच्या घरातली माणसं बोलत नसतात. कुणी त्यांच्याशी बोललंच तर त्याला गावंढळ समजतात. मी मात्र ते ऐकलं नाही. गोपीला बरोबर घेऊन विठू-रुखमाईचं जवळचं देऊळ हुडकून काढलं. पण तिथेही मन लागेना. शेवटी या साध्यासुध्या गरीब माणसांतला देव आम्ही जाणला. त्यांच्याशी स्नेह वाढवला. तुझ्या सोसायटीच्या वॉचमनची आई दोन महिन्यांपूर्वी वारलीय.

त्याची मुलं आईजवळ गावाकडे होती. ती त्याने पुण्यात आणली होती. पण आजीच्या मायेला आसुसलेली त्या पोरांना तिथे राहू वाटत नव्हतं. मग एकेदिवशी त्याने त्याच्या घरी आम्हाला नेलं. तुझ्या आईला ती नातवंडं अशी काही बिलगली की जीव कळवळला. तुम्हाला देण्यासाठी गावाकडनं आणलेला फराळाचा डबा तिने त्यांना दिला. आजीच्या हातचं खाऊन ती पोरं शांत झाली. त्या माणसाच्या मनावरचं ओझं हलकं झालं.

लिफ्टमधला शांताराम तर अगदी भला माणूस आहे. वडिलांच्या इलाजासाठी त्याला तातडीने पैशाची फार गरज होती. त्याला फायनान्सचे पैसे मिळणार होते, पण त्याला बराच वेळ लागत होता. त्याची ही नड ऐकून तुझ्या आईने आणि मी जे पैसे पुण्याला जाताना वरखर्चासाठी म्हणून नेले होते ते सगळे त्याच्या हवाली केले. तुझ्या आईने तिची पाटली त्याच्या हातावर टेकवली. तो काय रडला म्हणून सांगू विशू तुला?”

इतक्या वेळ शांत ऐकत बसलेला विशू लगेच म्हणाला, “काही लोक असेच असतात. भोळी माणसे बघून लगेच तोंड वासतात, शेवटी घातला ना गंडा त्यांनी तुम्हाला?”

“गप बैस, एक अक्षर बोलू नकोस.” भाऊ गरजले. “तुझी मोठी माणसं बघितली मी. त्यांना माझ्या तपकिरीचा वास सुद्धा सहन झाला नाही. त्यांनी माझ्या कपड्याचा वास घेतला. घृणा केली. आमचे फक्त बाह्यरूप बघितले. या दोघांनी आमच्या दोघांच्या अंतरंगाचा वास घेतला. आम्ही त्यांच्यात देव बघत मदतीचा हात पुढे केला. आम्ही गावाकडे आल्यावर काही दिवसांतच शांतारामने पैसे आणि गहाण टाकलेली पाटली परत आणून दिली.

आम्ही त्याला गोड बोलून पैसे परत दिले. त्याचे वडील आता बरे झालेत. वॉचमनला तुझ्या आईने डबा भरून लाडू दिलेत. त्या दोघांनीच हा फोटो भेट दिलाय. पैसा काय आज आहे, उद्या नाही, माणसे जोडली पाहिजेत विशू! तुझ्या निरागस पोराला मोबाइलच्या डबड्यातून बाहेर काढ. पूर्वी ढब्बू पैशात काय येत होते ते त्याला सांग. आम्ही दहाच दिवस तुझ्याकडे राहूनदेखील तुझ्या घराजवळची दोन माणसं आम्हाला भेटायला गावी आली. हे तुझ्यासोबत का घडलं नाही याचा तू विचार कर. गाव सोडून शहरात जायला काहीच हरकत नाही, मात्र माणसाने आपले पाय मातीचे असू द्यावेत!’’

समीर गायकवाड, ८३८०९७३९७७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Temperature Rise Problem : तापमानवाढ नियंत्रणासाठी कधी एकत्र येणार?

Pimpalgaon Joge Canal : पिंपळगाव जोगे धरणाच्या कालव्याची दुरवस्था

Sharad Pawar : राज्यात कोणी दाब दडपशाही करत असेल तर ते खपवून घेणार नाही : शरद पवार

Cotton Market : बारामती बाजार समितीत शनिवारपासून कापूस विक्री

Devendra Fadnavis : आमचे सरकार आले तर पूर्ण कर्जमाफी देणार : फडणवीस

SCROLL FOR NEXT