Village Story : पाच रुपयांची नोट...

Rural Story : पांडुरंगाने पाच रुपयांचा एकच वडा खाल्ला, उरलेली पाच रुपयांची नोट वडिलांना परत दिली. ‘‘अण्णा, लई खर्च होतोय, मला जास्ती भूक नाही. एकच वडा बास. बरा झाल्यावर उरलेल्या पाच रुपयांचा वडा खाईन. नाहीतर आत्ता आईला एक वडापाव घेऊन द्या,’’ तापाने पिवळट चेहरा झालेला पांडुरंग कसनुसं हसत उद्गारला.
Village Story
Village StoryAgrowon
Published on
Updated on

समीर गायकवाड

Story : आठ वर्षांपूर्वी माझ्या वडिलांचा अपघात झाला. अपघाताने त्यांच्या मेंदूला इजा पोहोचली. रक्तस्राव झाला. हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केलं. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. काही तास वडील बेशुद्धावस्थेत होते.

त्या दिवसानंतर त्यांची प्रकृती कमी-जास्त होत राहिली. त्यामुळे दिवसभर दवाखान्यात थांबणे होऊ लागले. पहिले दोन दिवस दुःखाच्या ओझ्याखाली दबून होतो. जसजसा तिथला मुक्काम वाढू लागला तसतसे तिथल्या इतर लोकांकडे माझे लक्ष जाऊ लागले.

हॉस्पिटलला आत जाण्याचा एक मुख्य मार्ग वगळता आणखी एक प्रवेशद्वार होते जे आयपीडीत ॲडमिट पेशंटच्या रूम्सच्या दिशेने असलेल्या जिन्याकडे उघडत होते. ओपीडीचे पेशंट या बाजूने ये-जा करत नसत.

वडिलांना इथं आणल्या दिवसापासून या जिन्यात एक माणूस बसलेला दिसे. बिनइस्त्रीचा चुरगळलेला पांढरा ढगळ पायजमा, सदरा त्यांच्या अंगात असे, सदऱ्याचे हातुपे दुमडलेले असत. डोईवर गांधी टोपी, पायांत जाडजूड रबरी सोल मारलेली काळी चामडी पायताणं असत.

अदमासे पस्तीस - सदतीस वर्षांचा हा इसम डोळे मिटून सदैव हात जोडून बसलेल्या मुद्रेत रंग रंग असा जप करत बसलेला दिसे. त्याच्या रापलेल्या काळपट तेलकटलेला चेहऱ्यावर चिंतेचं जाळं ओघळत असे. वरच्या मजल्यावरून डॉक्टरांनी त्यांच्या नावाचा पुकारा केला की ते अस्वस्थ होऊन वर धाव घेत असत. त्यांचे कोण इथे ॲडमिट आहे हे मला कळले नव्हते.

शिवाय ते नेहमी एकटेच कसे काय दिसतात, त्यांचे अन्य नातलग येत नाहीत का, त्यांना इतकी चिंता कशाची असावी असे प्रश्‍न त्यांना पाहताच डोक्यात यायचे. त्यामुळे दोनेक दिवसानंतर पहाटेच्या वेळेस हॉस्पिटलसमोरील चहाच्या हातगाडीवर मी मुद्दामच आपण होऊन त्यांच्याशी बोललो. त्यांचं नाव बहुधा नवनाथ पवार होतं.

मोहोळ तालुक्यातल्या रोपळ्याजवळ त्यांची वस्ती होती. दोन-पाच एकर कोरडवाहू जमीन त्यांच्याकडे होती. शिक्षण बेताचेच झालेलं त्यामुळे शेतातली कामं सरली की गावातल्या एकमेव असलेल्या मारवाडी कुटुंबाच्या दुकानात कामाला जात.

त्यांची पत्नीही त्याच कुटुंबाच्या घरी घरकामास जाई. त्यांना तीन मुली होत्या. मोठी मुलगी जेमतेम सोळा वर्षांची, तर धाकटी बारा वर्षांची. तीन मुलींच्या पाठीवर चार वर्षांच्या अंतराने मुलगा झालेला.

आपला हा मुलगा नवसा सायासाने आणि देवाच्या कृपेने झाला अशी त्यांची श्रद्धा. त्यांचं सगळं घर माळकरी. त्यामुळे मुलाचं नाव पांडुरंग ठेवलेलं. अगदी पापभीरू, सालस अशी ती माणसं. मुलाच्या जन्मानंतर साक्षात विठ्ठल घरी आल्याच्या आनंदात कुटुंब न्हाऊन निघालं.

Village Story
Village Story : गावपण भारी देवा...

दिवस वेगाने पुढं जात राहिले. त्यांची चारही अपत्यं शाळेत जाऊ लागली. पांडुरंगाची अभ्यासात गोडी जास्ती होती. वर्गात अव्वल नंबर असे. एकेदिवशी आक्रीत घडलं. नऊ वर्षाच्या पांडुरंगास बारीक ताप आला. तरीही तो शाळेत गेला.

एक-दोन दिवस ताप कमी जास्त झाला. त्याच्या वडिलांनी त्याला गावातल्या दवाखान्यात नेलं. तिथल्या डॉक्टरांनी त्याची जुजबी तपासणी केली, इंजेक्शन्स, औषधे दिली. त्याने ताप किंचित कमी झाला; पण नंतर पुन्हा अधूनमधून ताप येऊ लागला. पुन्हा दवाखाना आणि पुन्हा शाळा असं चक्र सुरू राहिलं.

पुढच्या आठवड्यात त्याला फणफणून ताप आला. काही केल्या कमीच होत नव्हता. अखेर त्याला तालुक्याच्या गावी नेलं. तिथल्या डॉक्टरांनी काही उपचार केले. यात पुन्हा पंधरा दिवस गेले.

एकेदिवशी तो तापात चक्कर येऊन पडला, तेव्हा मात्र डॉक्टरांनी काही तपासण्या करून त्यांना सोलापुरातील मेंदूच्या तज्ज्ञ डॉक्टरांना दाखविण्याचा सल्ला दिला. पांडुरंगास घेऊन ते इथं सोलापुरात हॉस्पिटलमध्ये आले. डॉक्टरांनी त्याच्या तपासण्या केल्या. त्याच्या मेंदूत मोठी गाठ असून मेंदूत ताप उतरला असल्याचे निदान झाले.

पवारांची परिस्थिती अत्यंत बेताची होती. दवाखान्यातील उपचार त्यांच्या हाताबाहेरचे होते. तरीही पहिले दोन दिवस त्यांनी तग धरले. तिसऱ्या दिवशी पांडुरंगाचे ऑपरेशन करण्याचे ठरले. किडूकमिडूक विकून त्यांनी पैसे गोळा केले. पांडुरंगाच्या आईस सोलापूरला बोलवलं गेलं.

त्या रात्री पांडुरंग शुद्धीत होता. आईच्या कुशीत त्याला छान झोप लागली. ती माउली मात्र रडवेली झालेली. मुलाची नजर चुकवून सारखा डोळ्याला पदर लावून राही. ती माउली आपल्या मुलाला घट्ट ओढून विसावली होती.

काही खायचंच असेल तर भल्या पहाटे उठून त्यांना हलक्या स्वरूपाचं अन्न पोटात घेण्याची अनुमती होती. कारण शस्त्रक्रियेआधी काही तास त्याचं पोट रिते असणे आवश्यक होतं. त्याच्या आईवडिलांनी वडापावसाठी दहा रुपये त्याच्या हातावर ठेवले. तिघे मिळून खाली आले.

त्यांनी चहावाल्या भय्याला विनंती करून खास बटाटेवडा बनवायला सांगितला. पांडुरंगाने पाच रुपयांचा एकच वडा खाल्ला, उरलेली पाच रुपयांची नोट वडिलांना परत दिली. ‘‘अण्णा, लई खर्च होतोय, मला जास्ती भूक नाही. एकच वडा बास. बरा झाल्यावर उरलेल्या पाच रुपयांचा वडा खाईन. नाहीतर आत्ता आईला एक वडापाव घेऊन द्या,’’ तापाने पिवळट चेहरा झालेला पांडुरंग कसनुसं हसत उद्‍गारला.

त्याच्या त्या काळीज गलबलून टाकणाऱ्या उद्‍गारांनी ते नवरा, बायको खचले. ते ढसाढसा रडले. त्यांनी पोराला करकचून पोटाशी आवळून धरलं. त्यांची ती पाखरागत अवस्था पाहून चहा विकणाऱ्या हातगाडीवाल्याने त्यांना शांत केले. त्यांना धीर दिला.

Village Story
Village Story : जुनी माणसं भेटली की जुन्या गोष्टी ऐकायला मिळतात

त्या दिवशी पांडुरंगावर शस्त्रक्रिया पार पडली. काही तासांत आपला मुलगा शुद्धीवर येईल या आशेने ते जिन्यात बसून होते तर पांडुरंगाची आई ऑपरेशन थिएटरबाहेर गोठून गेलेल्या अवस्थेत बसून होती. त्यांची स्थिती इतकी हलाखीची होती, की खर्च खूप होईल म्हणून तो माणूस गावाकडून डबा येईपर्यंत एक कप चहावर बसून राही.

आईने तर कडकडीत उपवास सुरू केलेले. डॉक्टरांनी या शस्त्रक्रियेचे धोके त्यांना आधीच सांगितले होते. पांडुरंगाची शस्त्रक्रिया झाल्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्या वडिलांना तिथे दाखल केलेले. त्यामुळेच पांडुरंगाचे वडील मला कायम जिन्यात बसलेले दिसत.

त्यांना आशा होती, की आज ना उद्या आपला मुलगा शुद्धीवर येईल. पुढे खर्च परवडेनासा झाला तेव्हा त्यांनी मुलाला जनरल आयसीयूत ठेवले. बायकोला गावी परत पाठवून दिले. दरम्यान, त्यांच्या गावी ही बातमी सर्वांना कळली आणि अख्ख्या गावाचा जीव हळहळला.

अनेक बायाबापड्या कळवळून गेल्या. लोकांनी मदतीचा ओघ सुरू केला. पण या सर्व रकमा तुटपुंज्या होत्या. जमीन गहाण टाकून झाली, सोनंनाणं विकून झालं. पार मोकळे झाले ते! तरी हाताशी काही लागलेलं नव्हतं.

मनात साचलेलं हे सगळं मळभ पहाटेच्या कातरवेळी माझ्यापाशी रितं करताना त्यांच्या डोळ्यातून चंद्रभागा वाहत होती. त्यांच्या हातात ‘ती’ नोट तशीच होती आणि दूर धुरकट अंधारात साक्षात विठ्ठल डोळे पुसत उभा होता.

असेच आणखी काही दिवस गेले. पांडुरंग काही शुद्धीवर आला नाही. एकेदिवशी पांडुरंगाची तब्येत खूप खालावल्याचे डॉक्टरांनी त्यांना कळवले. त्वरेने गावाकडे सांगावा धाडला गेला. दुपारी दोनच्या सुमारास त्यांच्या तीन मुली तिथे आल्या.

त्यांच्या लाडक्या भावाला दवाखान्यात आणल्यापासून त्यांना भेटीस येता आलं नव्हतं. त्या दिवशी आल्यावर मात्र त्यांनी जिवाचा आकांत केला. अखेर त्या तिन्ही मुलींना शांत करण्याचे काम त्या अभागी बापाला करावे लागले. पांडुरंगाची आई त्यांना सोबत घेऊन गावाकडे परतली.

ती संध्याकाळ फारच जड गेली. दिगंताला सूर्यगोल अंधारात बुडून गेला आणि पांडुरंगाचे प्राणपाखरू उडून गेले. अहोरात्र जिन्यात बसून असणाऱ्या पांडुरंगाच्या वडिलांनी आपल्या पोराच्या निष्प्राण कलेवरास कवटाळून आक्रोश केला.

सकाळ होताच डॉक्टरांनी स्वखर्चाने शववाहिकेत त्याचा अचेतन देह गावाकडच्या अखेरच्या प्रवासाला पाठवून दिला. हॉस्पिटलचे बिलदेखील त्यांनी माफ केले. त्या दिवशी दुपारी तो जिना खूपच रिकामा वाटला. एका हरलेल्या बापाचे ओझे वाहून आणि अश्रू झिरपून तिथं एक उदासी आली होती.

पांडुरंगाच्या वडिलांनी आपल्या पोराने दिलेली ती पाच रुपयांची नोट अजूनही जपून ठेवली असेल आणि नंतरही जरी कधी कितीही कडकी आली तरी ती नोट ते कधीच खर्च करणार नाहीत याची मला खात्री आहे. पांडुरंगाच्या निधनाने मला जबर मानसिक धक्का बसला अन् बळही मिळाले.

कारण माझ्या वडिलांचा दवाखाना प्रदीर्घ लांबला. त्यांना प्रचंड त्रास झाला. त्यांनी मोठी झुंज दिली. दोन वर्षांनी त्यांचे निधन झाले. या सर्व अतिव दुःखाच्या काळात ‘त्या’ हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये निपचित पडून असलेला पांडुरंग आणि खिन्न अवस्थेत जिन्यात बसून असणारे त्याचे वडील सावली बनून माझ्या मनाच्या गाभाऱ्यात राहत होते, धीर देत माझे मन घट्ट करत होते.

त्यांच्या आभाळाएवढ्या दुःखाने ते बापलेक माझे दुःख नकळत हलके करत गेले. आजही कधी त्या हॉस्पिटलजवळून गेलो तर पांडुरंगाचे अभागी वडील तिथे वावरत असल्याचा भास होतो अन् घामाने मळकटलेली ती पाच रुपयांची नोट डोळ्यापुढे तरळते.

समीर गायकवाड, ८३८०९७३९७७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com