Village Story : अस्सं गाव सुरेख बाई...

Vegere Village Success Story : पुणे शहराची जीवनवाहिनी असलेल्या मुठा नदीचे उगमस्थान आणि सह्याद्री पर्वतरांगांच्या कोंदणात वेगेरे (ता. मुळशी. जि. पुणे) गाव वसले आहे. टेमघर धरणामुळे गाव विस्थापित झाले असून, सहा वाड्या वस्‍त्यांमध्ये विखुरले आहे.
Vegere Village
Vegere VillageAgrowon
Published on
Updated on

Rural Development : पुणे जिल्ह्यात वेगेरे (ता. मुळशी) हे सह्याद्री पर्वतरांगांमध्ये पश्‍चिम घाटात वसलेले गाव आहे. पुणे शहरापासून लांब अंतर नसले, तरी दुर्गम असल्याने दुर्लक्षित राहिलेले गाव आहे. डोंगराळ भाग असल्याने शेतीतील प्रयोगांना मर्यादा येऊन केवळ भातशेतीवरच शेतकऱ्यांना अवंलबून राहावे लागे. भातहंगाम संपल्यावर ग्रामस्थांना रोजगारासाठी पुणे, मुंबईला स्थलांतर करावे लागे. काही जण तर या शहरांमध्ये स्थायिकच झाले. केवळ जत्रा-यात्रांपुरताच त्यांचा गावाशी संपर्क राहिला. आज लोकसंख्या सहाशेपर्यंत आहे. असे असले तरी आपल्या गावाच्या विकासासाठी या ग्रामस्थांची मोठी धडपड सुरू आहे.

गावाने जपलेली वैशिष्ट्ये

देशी गोवंश संवर्धन

टेमघर धरणामुळे विस्थापित झालेले वेगेरे गाव सहा वाड्यावस्‍त्यांमध्ये विखुरले आहे. अप्रतिम निसर्गसौंदर्य लाभलेल्या या छोट्या गावाने अनेक वैशिष्ट्ये जपली आहेत. त्या बळावर कृषी निसर्ग पर्यटन विकासाकडे गावाची वाटचाल सुरू आहेत. येथील वाड्यावस्त्यांवर देशी गोवंशाचे पालन केले जाते. घरटी ५ ते १० गायी असून, गावात मिळून तीनशेहून अधिक पशुधन असावे. दुधासोबत दही, तूप, ताक आदींचे उत्पादन घेतले जाते. डोंगरांमधील गवतावरच या गोधनाचे मुख्य पोषण होते. पर्यटन केंद्र म्हणून गावाचा विकास करताना गोवंशाचा खुबीने वापर करण्याचा ग्रामस्थांचा प्रयत्न आहे.

Vegere Village
Village Story : गावपण भारी देवा...

भाताचा तांबेसाळ वाण

वेगेरे खोऱ्यात पिकणारा तांबेसाळ हा भाताचा देशी वाण वैशिष्ट्यपूर्ण आहे. येथील शेतकऱ्यांनी त्याचे अनेक वर्षांपासून संवर्धन केले आहे. ज्येष्ठ शेतकरी बाळू बावधने सांगतात की उच्च पोषणमूल्ये असलेल्या या भातावरच आमची मुख्य उपजीविका होते. गावात अद्याप तरी संकरित वाणांना आम्ही प्रवेश दिलेला नाही.

जात्यावरील ओव्यांची परंपरा

गावात वीज आली. पाणी आले. मात्र गावातील महिलांनी जात्यावरील ओव्यांची परंपरा आजच्या आधुनिक युगातही कायम ठेवली आहे. प्रत्येक घरात जात्यावर दळण दळले जाते. आणि तेही विशेषतः नाचणीच्या भाकरीसाठी.

Vegere Village
Village Development : गावच्या सर्वांगीण विकासाचे ठेवा ध्येय्य

मुठा नदीचा उगम, स्वच्छ पात्र

मुठा नदीचा उगम याच वेगेरे गावातून झाला आहे. गावातून स्वच्छ, नितळ वाहणारे हे पात्र पुणे शहरात मात्र प्रदूषित होऊन वाहते आहे याचे वेगेरे ग्रामस्थांना दुःख आहे. आपल्या गावातील हे पात्र मात्र जसेच्या तसे स्वच्छ ठेवण्यासाठी ग्रामस्थ दक्ष आहेत.

पाण्याचा सुटला प्रश्‍न

जानेवारीनंतर गावात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होई. नैसर्गिक झऱ्यांतून थेंब थेंब ठिबकणारे पाणी जमा करण्यासाठी महिलांना मोठे कष्ट व प्रतीक्षा करावी लागे. प्रसंगी रात्री खोल दरीत उतरून पाणी काढण्याची वेळ यायची. जनावरांसाठी मेमध्ये बॅरलमध्ये पाणी साठवून ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागायचा. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून डोंगरावर तीन लाख लिटर क्षमतेची टाकी उभारली. त्यात मूगाव हद्दीतील विहिरीतून पाणी साठविण्यात येई. परंतु टाकीपासून वाड्यावस्त्या दीड- अडीच किलोमीटरवर असल्याने पाइपलाइन अभावी पाणी उपलब्ध होत नव्हते. अशावेळी ‘सकाळ सोशल फाउंडेशन’ने दखल घेत पाण्याची टाकी ते मांडवखडकपर्यंत जलवाहिनीच्या खर्चाची जबाबदारी उचलली. भोसरी येथील ‘न्यूमन ॲण्ड इस्सार इंजिनिअरिंग’ या कंपनीने सामाजिक उत्तरदायित्व निधी अंतर्गत मदत केली. या कामामुळे आज सर्व वाड्यावस्त्यांवरील पाण्याचा प्रश्‍न कायमचा सुटला आहे.

गावाचा विकास

माजी सरपंच भाऊ मरगळे यांनी आपल्या कार्यकाळात वीज, पाणी, रस्ते आदी विविध समस्या सोडविण्यावर भर दिला. गावकऱ्यांनीही त्यांना तेवढीच साथ दिली. प्रत्येक घरात सौरदिवे व गावात पथदिवे आले. गावातील अंधार दूर झाला. शाळा अद्ययावत झाली. आज गावातील घरे महिलांच्या नावावर झाली आहेत. भाऊंचा सरपंचपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांची पत्नी यमुना मरगळे यांनी सरपंचपदाची जबाबदारी सांभाळून पाणीप्रश्‍न सोडवला. आता त्या पोलिस पाटील म्हणून कार्यरत आहेत.

पर्यटनाला चालना देणार

वेगेरेच्या विद्यमान सरपंच राजश्री रामदास मरगळे म्हणाल्या, की पुणे शहरापासून अवघ्या ५५ किलोमीटवर असलेल्या आमच्या गावात विकासाची बरीच कामे होणे अद्याप बाकी आहे. टप्प्याटप्प्याने आम्ही पुढे जात आहोत. प्रसिद्ध लवासा सिटीजवळ असलेल्या आमच्या गावाला भरपूर निसर्गसंपदा लाभली आहे. टेमघर धरणाचे ‘बॅकवॉटर’ ही लाभले आहे. निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून गावाचा विकास व्हावा व स्थानिकांना त्यातून रोजगार निर्माण व्हावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. रस्‍त्यासाठी आमदार संग्राम थोपटे यांच्या विकासनिधीतून साडेचार कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यास लवकरच सुरुवात होणार आहे.

राजश्री रामदास मरगळे, ९१५८३३१२८८ (सरपंच)

भाऊ मरगळे ९७६४६५९१५५ (माजी सरपंच)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com