Farmers Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Farmers Protest: ‘शक्तिपीठ’च्या विरोधात राज्यात शेतकऱ्यांचा एल्गार

Shaktipeeth Highway: राज्यात शक्तिपीठ महामार्गासाठी होणाऱ्या भूसंपादनाच्या विरोधात मंगळवारी राज्यात बाधित जिल्ह्यातील गावागावांतील शेतकरी मंगळवारी (ता.१) कुटुंबकबिल्यासह रस्त्यावर उतरला होता. या वेळी सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली.

गणेश कोरे

Pune News: राज्यात शक्तिपीठ महामार्गासाठी होणाऱ्या भूसंपादनाच्या विरोधात मंगळवारी राज्यात बाधित जिल्ह्यातील गावागावांतील शेतकरी मंगळवारी (ता.१) कुटुंबकबिल्यासह रस्त्यावर उतरला होता. या वेळी सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली. तर कोल्हापूर येथे शेतकऱ्यांनी नदीत उड्या घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला.

कोल्हापूर, परभणी, लातूर, सोलापूर, बीड, नांदेड, सांगली या बाधित जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. या वेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. कोल्हापूर येथे ‘एकच जिद्द शक्तिपीठ रद्द’ असा नारा देत जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता.१) सुमारे दोन तास पुणे-बंगळूर महामार्ग रोखून धरला.

कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शक्तिपीठ विरोधी सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या माध्यमातून जोरदार आंदोलन केले. आंदोलन सुरू असताना काही संतप्त शेतकऱ्यांनी पुलावरून नदीत उडी मारत जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. परभणी व हिंगोली जिल्ह्यांत ठिकठिकाणी ‘रास्ता-रोको’ करण्यात आला.

महामार्गाच्या संयुक्त मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी मोजणीविना माघारी पाठविले. परभणी-ताडकळस राज्यरस्त्यावर पिंगळी (ता. परभणी) शिवारात बैलगाड्यासह शेतकरी रस्त्यावर उतरले. दुपारचे जेवणही रस्त्यावरच केले. परभणी गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावर पोखर्णी नृसिंह फाटा (ता. परभणी) येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, तहसीलदार सौदागर तांदळे यांच्या पथकाने मोठ्या पोलिस बंदोबस्तात मंगळवारी (ता. एक) सकाळी शक्तिपीठ महामार्गासाठी मोजणी (सीमांकन) करण्याचा प्रयत्न केला. मात्र शक्तिपीठ विरोधी कृती समितीचे पदाधिकारी व शेतकऱ्यांनी त्याला तीव्र विरोध केला. शेतकऱ्यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवत मोजणीला विरोध केला. शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका पाहून प्रशासनाने मोजणी प्रक्रिया स्थगित केली.

बीड जिल्ह्यातील परळी, अंबाजोगाई तालुक्यातील प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष बाधित शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता.१) कृषिदिनी अनेक ठिकाणी रास्ता रोको करून या महामार्गास तीव्र विरोध केला. अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर, धायगुडा पिंपळा आणि परळी तालुक्यातील तळेगाव या ठिकाणी शेतकरी महिला आणि त्यांचे कुटुंबीय एकत्र येत रास्ता रोको करत शासनाचा निषेध करत महामार्गाला विरोध केला.

नांदेड येथे शक्तीपीठ महामार्ग विरोधात मालेगाव (ता. अर्धापूर) येथे मंगळवारी (ता. १) बाधित शेतकऱ्यांनी मुला-बाळांसह राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या देत दोन तासांपेक्षा जास्त महामार्ग रोखला. विविध पक्षांचे प्रतिनिधी तसेच शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी या वेळी बाधित शेतकऱ्यांना कुठल्याही परिस्थितीत माघार घेऊ नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे अश्‍वस्त केल्यामुळे आंदोलन तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

सोलापूर जिल्ह्यात मोहोळ ‘मोहोळ तालुका शक्तीपीठ बाधित शेतकरी संघर्ष समिती’च्या वतीने शिवाजी चौकात रास्ता रोको करण्यात आला. यावेळी संघर्ष समितीचे सदस्य सत्यवान देशमुख म्हणाले, की या शक्तिपीठ महामार्गास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असून, शेतकऱ्यांनी हरकतीच्या वेळी ही बाब स्पष्ट केली आहे, तसे लेखीही दिले आहे.

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतही कडाडून विरोध

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील बागायती पट्ट्याचे तर पूर्ण नुकसान होणार आहे, पण भरावामुळे अगोदच महापुराच्या छायेत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर भराव पडल्याने महापुराचा धोका आणखी गडद होणार असल्याने महामार्गाविरोधातील आंदोलन तीव्र करण्याचा इशारा माजी खासदार राजू शेट्टीसह अन्य वक्त्यांनी दिला. महामार्गामुळे समृद्धी नष्ट होणार असल्याने भविष्यातही हे आंदोलन तीव्र करू, असे विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

सांगली येथे ‘जमिनी आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची...’ ‘शक्तिपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे...’ ‘सरकारचा धिक्कार असो...’ अशा जोरदार घोषणात देत बाधित शेती बचाव कृती समितीसह शेतकऱ्यांनी दिल्या. जिल्ह्यातील १९ गावांतील शेतकरी उपस्थित होते.जोपर्यंत शक्तिपीठ महामार्ग रद्द होणार नाही, तोपर्यंत लढा सुरूच ठेवू अशी भूमिका घेतली आहे. दरम्यान, पोलिंसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.

सरकार शेतकरी विरोधी भूमिका घेत असून शेतकऱ्यांना भूमिहीन करून देशोधडीला लावणारा शक्तिपीठ महामार्गाच्या सीमांकन आणि जमीन संपादन करण्यासाठी सरकार पोलिसी बळाचा वापर करीत आहेत. अधिकारी देखील शेतकऱ्यांना धमक्या देण्याचा प्रकार बीड जिल्ह्यात सुरू आहे. सत्तेचा आणि बळाचा गैरवापर करत असतील तर हे आंदोलन यापेक्षा अधिक तीव्र स्वरूप घेईल.
- ॲड. अजय बुरांडे, किसान सभा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Inspiring Farmer Story: जीवनात ही घडी अशीच राहू दे

Pusad Tree Dispute : ‘ते’ झाड रक्तचंदनाचे नसून बीजासालाचे

Indian Politics: शक्ती परीक्षेची उत्कंठा

Bamboo Project India : बांबू आधारित उद्योगासाठी चार हजार कोटींचा प्रकल्प

Mango Orchard Management : अतिघन आंबा बागेतील व्यवस्थापन

SCROLL FOR NEXT