Flower Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Flower Production : दर्जेदार फूल उत्पादनासाठी काटेकोर नियोजनावर भर

Flower Farming : सांगली जिल्ह्यातील मालगाव (ता. मिरज) येथे रविकिरण श्रीधर सावंत यांची स्वतःची दीड एकर शेती आहे. तर अर्धा एकर शेती त्यांनी कराराने करण्यासाठी घेतली आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Flower Farming Management :

शेतकरी नियोजन

पीक : फुलशेती

शेतकरी : रविकिरण श्रीधर सावंत

गाव : मालगाव, ता. मिरज, जि. सांगली

फुलशेती : दोन एकर (झेंडू, शेवंती, बटण गुलाब)

सांगली जिल्ह्यातील मालगाव (ता. मिरज) येथे रविकिरण श्रीधर सावंत यांची स्वतःची दीड एकर शेती आहे. तर अर्धा एकर शेती त्यांनी कराराने करण्यासाठी घेतली आहे. मालगाव हे गाव पूर्वी पानमळ्यासाठी प्रसिद्ध होते. म्हैसाळचे पाणी आल्यानंतर या भागात द्राक्ष, ऊस आणि भाजीपाल्यासह फुलशेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

सिंचनासाठी एक कूपनलिका असून, शाश्‍वत पाण्यासाठी शेततळेदेखील घेतले आहे. सावंत यांनी आयटीआयचे शिक्षण घेतले आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर शेतीची आवड असल्याने मागील ८ वर्षांपासून ते फुलशेती करत आहेत. हंगामानुसार झेंडू, शेवंती या फुलपिकांची लागवड केली जाते. मागील पाच वर्षांपासून ते बटण गुलाब लागवडीकडे वळले आहेत.

साधारण २० गुंठे क्षेत्रावर बटण गुलाबाची लागवड आहे. या गुलाबाची एकदा लागवड केल्यानंतर सलग पाच वर्षे उत्पादन सुरू राहते. दरवर्षी बाजारपेठांतील दर आणि सण, उत्सव या बाबी लक्षात घेऊन लागवडीचे नियोजन केले जाते. फुलशेतीमध्ये रविकिरण यांना पत्नी सौ. स्नेहाली यांची मोठी मदत मिळते.

जोखीम कमी

रोपवाटिकेतून दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण तयार रोपांची खरेदी केली जाते. प्रामुख्याने गणपती, दसरा आणि दिवाळी या सणांदरम्यान फुलांना अधिक मागणी असते. या काळात फुले विक्रीसाठी उपलब्ध होण्यासाठी मे, जून आणि जुलै असा हंगाम घेतला जाते.

त्यानुसार काटेकोर नियोजन करून दर्जेदार फुलांचे उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला जातो. फुलांचा हंगाम संपल्यानंतर शेतीला विश्रांती दिली जाते. फुलपिकांचे लागवड क्षेत्र कमी असल्याने जोखीम कमी असते, असे रविकिरण सांगतात.

लागवड नियोजन

लागवडीपूर्वी जमिनीची नांगरट करून सहा दिवस जमीन उन्हामध्ये तापू दिली जाते. त्यानंतर एकरी सहा ट्रॉली शेणखत शेतात पसरले जाते. सिंगल सुपर फॉस्फेट खताची मात्रा देऊन रोटर मारला जातो.

लागवडीसाठी बेड तयार करून त्यावर ठिबकच्या नळ्या टाकून मल्चिंग पेपर अंथरून घेतला जातो.

झेंडू, शेवंती या फुलपिकांच्या लागवडीसाठी पाच फुटांचे, तर बटण गुलाब लागवडीसाठी आठ फुटांचे बेड तयार केले जातात.

शेवंती आणि झेंडूच्या दोन रोपांमध्ये सव्वा फूट अंतर ठेवून समोरासमोर लागवड केली जाते. लागवडीसाठी ६ हजार रोपांची आवश्यकता असते.

बटण गुलाबाच्या दोन रोपांमध्ये दोन फूट, तर ओळीमध्ये ८ फूट अंतर राखत डिसेंबरमध्ये लागवड केली जाते. २० गुंठे क्षेत्रावर लागवडीसाठी साधारणपणे १२०० रोपांची आवश्यकता असते.

बटण गुलाब रोपांची खरेदी बंगलोर येथून केली जाते. घरपोच प्रति रोप १८ ते २० रुपये दराने रोपांची खरेदी होते.

अन्नद्रव्य व्यवस्थापन

रोपांची लागवड केल्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी रासायनिक घटकांची पहिली आळवणी केली जाते.

ह्युमिक ॲसिड, १९ः१९ः१९ः यांची दुसरी आळवणी केली जाते.

रोपांची वाढ चांगली होण्यासाठी १२ः६१ः०० चा आळवणीद्वारे वापर केला जातो.

रोपांच्या वाढीच्या अवस्थेनुसार ठिबकद्वारे ४ दिवसांच्या अंतराने रासायनिक खतांचे नियोजन केले जाते. त्यात प्रामुख्याने १२ः६१ः२२, १३ः४०ः१३, १९ः१९ः१९, १२ः६१ः०० या विद्राव्य खतांचा वापर होतो.

कीड-रोग व्यवस्थापन

फुलपिकांमध्ये हवामान बदलानुसार विविध कीड-रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. प्रामुख्याने नागअळी, करपा रोग, लाल कोळी आदी कीड रोगांचा प्रादुर्भाव होते. बटण गुलाबमध्ये बुरशीजन्य रोग डाऊनी, भुरी यांचा प्रादुर्भाव दिसतो.

त्यासाठी दर पंधरा दिवसांनी रासायनिक कीडनाशके आणि बुरशीनाशकांच्या प्रतिबंधात्मक फवारणीचे नियोजन केले जाते. वाढीच्या काळात पिकाचे सातत्याने निरीक्षण केले जाते. कीड-रोगांचा प्रादुर्भाव दिसून आल्यास आवश्यकतेनुसार रासायनिक फवारण्या घेतल्या जातात.

चन व्यवस्था

संपूर्ण फुलशेतीमध्ये ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला आहे.

लागवडीनंतर एक दिवसाआड साधारण तीन ते चार तास पाणी दिले जाते.

हंगामानुसार फुलांचे उत्पादन सुरू झाल्यानंतर सिंचनाचे काटेकोर व्यवस्थापन केले जाते. आवश्यकतेनुसार बदल केला जातो.

पावसाळ्यात सिंचनाची आवश्यकता कमी असते. पाऊस न पडल्यास आवश्यकतेनुसार एक दिवसाआड अर्धा तास सिंचन केले जाते.

उत्पादन आणि विक्री

बटण गुलाबाच्या फुलांची लागवडीनंतर साधारण अडीच ते तीन महिन्यांनी तोडणी सुरू होते. साधारण ६ महिन्यांनी एकसारखे उत्पादन मिळण्सास सुरुवात होते.

बटण गुलाबाचे दररोज १० ते १५ किलो फुलांचे उत्पादन मिळते. त्यास प्रति किलो सरासरी २० ते १२० रुपये दर मिळतो.

झेंडू आणि शेवंती फुलांची एक दिवसाआड तोड केली जाते. प्रत्येक तोड्याला ५० ते ६० किलो फुलांचे उत्पादन मिळते.

सर्व उत्पादित फुलांची मिरज येथील फूल मार्केटमध्ये विक्री केली जाते.

फुलांची काढणी सकाळच्या वेळी लवकर करण्यावर भर दिला जातो.

रविकिरण सावंत ७०२०९९३०७७

(शब्दांकनः अभिजित डाके)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election : शेतकरी संघटनांना भुलवतेय आमदारकीची मोहमाया

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची ससेहोलपट

Sanjay Kulkarni Death : ‘जलसंपदा’ला दिशा देणारे संजय कुलकर्णी यांचे निधन

Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीक कर्जाचे ६८५ कोटींचे उद्दिष्ट

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रात थंडीची चाहूल

SCROLL FOR NEXT