Medical to Agriculture Success Story: वैद्यकीय व्यवसायामध्ये कार्यरत व्यक्ती शक्यतो लवकर निवृत्त होत नाही. पण लातूर येथील प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डाॅ. श्रीकांत गोरे मात्र सेवानिवृत्तीनंतर शेतीत रमले. डॉक्टर, प्राध्यापक व आता शेतकरी असा त्यांचा प्रवास आहे. आयुष्यभर कमावलेली पुंजी त्यांनी शेतीत गुंतवली. आनंद शोधला तर मिळतो. त्यामुळे वाट्याला आलेला प्रत्येक क्षण असोशीने जगायचा, हेच त्यांचे तत्त्व आहे. .डॉक्टरांची शेती म्हणजे सुरुवातीला जगाच्या हसण्याचा विषय. ते करत असलेली कामे अनेकांना उमगत नव्हती. आयुष्यभराची पुंजी शेतात आणि पाण्यात हरवून बसणार हा, असाच सर्वांचा समज. पण बंधूनंतर स्वतःच आनंदाचे काम म्हणून शेतीत उतरलेल्या डॉ. श्रीकांत जनार्दन गोरे यांनी आपल्या वैद्यकीतील तत्त्वे शेतात वापरली. येणाऱ्या रुग्णाचे योग्य निदान आणि उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी तेच गणित शेतीतही लावले. शेतीची सुरुवातच माती परीक्षणापासून, त्यातील खाचाखोचा समजून घेण्यातून झाली. लोकांनी टीका केली. पण ते डगमगले नाहीत. ज्या मातीतून आलो, त्या मातीत आयुष्यभराची कमाई गुंतवली, असे ते म्हणतात..Farmer Success Story : प्रयत्नवादातून प्रगतीकडे.``जीवनाचा खुल्या दिलाने अनुभव घेणारा मी माणूस आहे. वेगवेगळ्या क्षेत्राचा अनुभव का घ्यायचा नाही. निदान ज्यात आपल्याला स्वारस्य (इंटरेस्ट) आहे, त्या क्षेत्राचा तरी घ्यायलाच पाहिजे. आयुष्यात केलेल्या गोष्टी नेहमीच कमी असतात. हे करायचे राहिले, ते व्हायचे राहिले, असेच जास्त असते. पण शक्य तितके केले पाहिजे. दुसऱ्यावर दोष ढकलून रडत बसणे म्हणजे मानसिक विकलांगता आहे. कोणत्याही कामाला नकार मिळाला, तर मी तयारच असतो. गाऱ्हाणे गाण्यापेक्षा समस्यांवर मार्ग काढण्याची गरज आहे,’’ असे डॉ. गोरे सांगतात..आजचा आनंद आजच शोधायचाआयुष्याच्या या वळणावर मागे वळून बघताना डॉक्टर आठवणींत रमून जातात. ‘‘माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम काळ शिक्षणातील आणि शिकविण्यातील आहे. शिक्षणातून जे आदर्श घेऊन बाहेर पडलो, त्याउलट अनुभव समाजात मिळत होते. मात्र प्राध्यापक म्हणून शिकविताना नव्या सळसळत्या, नवनिर्माणाची ऊर्जा असलेल्या युवकांसोबत चांगला काळ गेला. ते तुमचं ऐकतात, तुम्हाला समजून घेऊ पाहतात, तुम्हाला मान देतात, संवाद साधतात. वैद्यकीय शिक्षणातील थिअरी व व्यवसायातील प्रॅक्टिकल मला त्यांच्यासोबत शेअर करता आलं, याचा आनंद आहे. एकेकाळी मी आक्रमक होतो..मात्र नकारात्मकता बाजूला ठेवून प्रशासनातही शक्य तितक्या चांगल्या माणसांना जोडत काम केले. शेतीत यायचा निर्णय घेतल्यानंतर सूर्यकांत जगताप या गावातील बालमित्राने खंबीर साथ दिली. पहिली चार वर्षे नुकसानीत गेली. पण शेतीतून मिळालेल्या अनुभवाच्या, आनंदाच्या तुलनेत तो तोटा खूपच कमी आहे. अभियंता असलेल्या मुलाची पुण्यात स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी आहे, तर मुलगीही अभियंता असून, सध्या ऑस्ट्रेलियात आहे. कुणासाठी कमवायचं, कुणासाठी साठवायचं. आजचा आनंद आजच मिळवायचा. आयुष्यात जमलेली सारी पुंजी शेतातच घातली असून, त्यातून आनंदाचे पीक घेत आहे,’’ ते सांगतात..Agriculture Success Story: नाशिकच्या मातीत घेतले ‘ॲव्होकॅडो’चे यशस्वी उत्पादन.आनंदाचे डोही आनंदाचे तरंगडॉक्टरांना लहानपणापासून शेतीची आवड होती. गावी आले की, शिवारफेरी व्हायचीच. दिवसभर शेतात हुंदडायचं. अगदी शाळेत जाण्यापू्र्वीही एखादी फेरी व्हायचीच. सुट्टी तर जनावरांसोबत, गुराख्यासोबत फिरतीतच जायची. त्यामुळे शहरी माणसांना ज्या सापविंचवांची भीती वाटते, तशी डॉक्टरांना कधी वाटत नाही. गवतात शिरताना साप किंवा श्वापदापेक्षा त्याचे तुरे, त्याचा ओलावा झेलायला त्यांचं मन उतावीळ असतं. निसर्ग माणसांप्रमाणे फसवत नाही, दगा देत नाही. इथे आपल्याला कोणाची गरज नाही, हा विश्वास जगण्याची उमेद वाढवतो व आनंद देतो, असे ते सांगतात. ते वैद्यकीय व्यवसायात होते तेव्हा अनेकदा चांगल्या गोष्टी करूनही शिव्या शाप खावे लागायचे, तसा अनुभव शेतीत येत नाही..‘‘सकाळी साडेपाच सहाला उठतो. सुबाभुळीचे फाटे आणतो. शेतातल्या कामाचे नियोजन करून दुपारी एक वाजता घरी येतो. जेवण करतो. उन्हे उतरल्यावर पुन्हा शेतात. ठरवून दिलेली कामे झाली का याची खात्री करतो. साडेसहा ते सात दरम्यान घरी जातो. आठ वाजता जेवण व नऊच्या आधी झोपणे... अशी माझी दिनचर्या आहे. गाडी असूनही दिवसभरात दहा किलोमीटर चालणे होते,’’ असे ते सांगतात..ढकलपास ते डॉक्टरडॉ. श्रीकांत यांना तीन भाऊ व चार बहिणी. थोरले भाऊ केशेगावच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अरविंद गोरे, त्यानंतरचे साहेबराव, तिसऱ्या नंबरचे स्वतः श्रीकांत व चौथ्या नंबरचे शरदराव. शरदराव पुण्यात असून ते अभियंता आहेत. नवीन साखर कारखाना उभारणीत ते आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करतात. बुक्कनवाडी (ता. धाराशिव) जिल्हा परिषद शाळा, बार्शीच्या जगदाळे मामांचे वसतिगृह, सहावीत पुण्याच्या वाकडेवाडीतील महानगरपालिका शाळा नंबर ४७ व त्यानंतर सातवीत विमलाबाई गरवारे हायस्कूलमध्ये प्रवेश असा डॉक्टरांचा प्राथमिक शिक्षणाचा प्रवास आहे. .‘‘मी कधीही वाचत नव्हतो. अभ्यास करत नव्हतो. यामुळे सहावी व नववीमध्ये दोन वर्षे काढावी लागली. दुसऱ्यांदा नववीत असताना चांगल्या शिक्षकांमुळे वाचन व शिक्षणाची गोडी लागली. त्यामुळे ढकलपास होणारा मी पहिल्यांदाच नववीत पास झालो. दहावीत ५५ टक्के व अकरावीत ६५ टक्के मिळाले. फर्ग्युसन कॉलेजला बारावीनंतर बी. जे. मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळाला. त्यानंतर आर्थोपेडिकमध्ये एम.एस. झालो,’’ डॉक्टर सांगतात.(संपूर्ण लेख वाचा २०२५ च्या अॅग्रोवन दिवाळी अंकात)अंक खरेदीसाठी लिंक- https://shorturl.at/TJmdc.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.