Farming Management:
शेतकरी नियोजन । डाळिंब
शेतकरी : समाधान बाबूराव येलपले
गाव : अजनाळे, ता. सांगोला, जि. सोलापूर
एकूण शेती : १४ एकर
डाळिंब क्षेत्र : ८ एकर
एकूण झाडे : ३६०० झाडे
अजनाळे (ता. सांगोला) येथे समाधान बाबूराव येलपले यांची १४ एकर शेती आहे. त्यात ८ एकर डाळिंब, ३ एकर पेरू लागवड आहे. सिंचनासाठी एक एकरमध्ये शेततळे आहे. समाधान येलपले यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर २००४ पासून पूर्णवेळ शेती करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला डाळिंब लागवड होती, मात्र मर आणि तेल्या यासारख्या रोगांच्या प्रादुर्भावामुळे बाग काढून टाकावी लागली.
त्यानंतर २०२३ मध्ये पुन्हा नव्याने डाळिंबाच्या भगवा वाणाची लागवड केली. दोन ओळींत १३ फूट, तर दोन झाडांत ८ फूट अंतर राखत लागवड केली आहे. पहिल्यांदा ४ एकरवर लागवड करून नंतर टप्प्याटप्प्याने विस्तार केला. सध्या ८ एकरांवर डाळिंब लागवड असून, त्यात सुमारे ३६०० झाडे आहेत. त्यात मुख्यतः हस्त बहर धरला जातो. सध्या ४ एकर बागेतील फळांची काढणी पूर्ण झाली असून, उर्वरित बाग दोन महिन्यांनी काढणीला येईल. या बागेत नियोजनाप्रमाणे सिंचन आणि खत व्यवस्थापनावर भर दिला जाईल.
पत्नी सौ. सुनंदा यांच्यासह मुलांची शेतीकामांमध्ये मदत होते. योग्य व्यवस्थापनाने उत्पादनही चांगले मिळते आहे. डाळिंबाचे एकरी सरासरी १५ ते १६ टनांपर्यंतचे उत्पादन मिळते. आतापर्यंत प्रति झाड सर्वाधिक २० ते २५ किलोपर्यंतचे उत्पादन मिळाले असल्याचे श्री. येलपले सांगतात.
व्यवस्थापनातील बाबी
हस्त बहराच्या नियोजनानुसार जुलै-ऑगस्ट महिन्यात बाग ताणावर सोडली जाते. हा ताण साधारणपणे १ सप्टेंबरच्या दरम्यान तोडला जातो.
या कालावधीत बागेतील झाडांची छाटणी केली जाते. छाटणीवेळी झाडांवरील रोगग्रस्त फांद्या कापल्या जातात. त्यानंतर कापलेल्या ठिकाणी जखमा होऊन बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यासाठी बोर्डो पेस्टचा वापर केला जातो. बागेतील कापलेल्या फांद्या बागेबाहेर काढून त्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जाते.
बागेतील झाडांना रासायनिक खते आणि शेणखताचा बेसल डोस दिला जातो. प्रतिझाड ५० किलो प्रमाणे शेणखत तसेच निंबोळी पेंड अर्धा किलो प्रमाणे दिले जाते. बागेत जास्त करून जैविक खतांच्या वापरावर भर दिला जातो.
साधारणपणे १ सप्टेंबरच्या दरम्यान बागेत इथरेल फवारणी करून पानगळ करून घेतली जाते.
अन्नद्रव्ये व्यवस्थापन
बागेत संतुलित अन्नद्रव्ये व्यवस्थापनावर भर दिला जातो. त्यामुळे फळांचा दर्जा आणि चकाकी राखण्यात यश मिळते.
बहर धरल्यानंतर ई-एम द्रावण आणि त्यानंतर दीड महिन्यांने डी-कंपोजरचा वापर केला जातो. ही स्लरी आणि द्रावण दर आठ दिवसांतून एकदा आलटून-पालटून सोडली जाते.
ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीस कळी निघताना ०ः४२ः४७, ०ः६०ः२० यांचा ठिबकद्वारे वापर केला जातो.
बहर धरल्यानंतर अडीच महिन्याने सरकी पेंड, शेंगदाणा पेंड, करंजी पेंड यांचे मिश्रण करून ठिबकद्वारे सोडले जाते.
फळधारणा झाल्यानंतर १०ः२६ः२६, निंबोळी पेंड आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये दिली जातात.
डाळिंब काढणीपर्यंत दर १५ दिवसांनी झाडांना नियमितपणे ०ः३७ः३७, ०ः९ः४६, ०ः०ः५० या खतांचा आलटून-पालटून वापर केला जातो.
बागेत मधमाशीला महत्त्व
बागेमध्ये मधमाश्यांचा वावर महत्त्वाचा असतो. मधमाशीशिवाय फळ सेटिंग होऊ शकत नाही. त्यामुळे रासायनिक घटकांचा वापर शक्य तितका टाळला जातो. रासायनिक कीटकनाशक, बुरशीनाशकांचा वापर मर्यादित केला जातो. त्याऐवजी दशपर्णी अर्क तयार करून महिन्यातून एकदा फळ काढणीपर्यंत फवारणी केली जाते. कॅल्शिअम बोरॅान, झिंक, फेरस यांचा वापर केला जातो.
आगामी कामकाज
मागील १५ दिवसांपासून बागेत डाळिंब फळांची काढणी सुरू आहे. तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे सिंचनावर अधिक भर दिला जात आहे. सध्या एकदिवसाआड ४ तास सिंचन करत आहे. आगामी काळात वाफसा स्थितीचा अंदाज घेऊन सिंचनाचा कालावधी ठरविला जाईल.
सध्या ४ एकर बागेतील फळांची काढणी पूर्ण झाली आहे. उर्वरित ४ एकर बाग दोन महिन्यांनी काढणीलास येणार आहे. या बागेत नियोजनाप्रमाणे सिंचन आणि खत व्यवस्थापनावर भर दिला जाईल. सध्या बागेतील तण काढून बाग स्वच्छ करण्याचे काम सुरू आहे.
पुढील पंधरवड्यात काढणीस आलेल्या बागेमध्ये शेंगदाणा, सरकी पेंड स्लरीचा आलटून-पालटून वापर केला जाईल. तसेच आवश्यकतेनुसार हवामानाचा अंदाज घेऊन कीटकनाशक व बुरशीनाशकांच्या फवारण्या घेतल्या जातील.
क्रॉप कव्हरचा वापर
बागेतील झाडांचे आणि फळांचे वाढत्या उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी बागेवर क्रॉप कव्हर टाकण्यात आले आहे. त्यामुळे फळांचा दर्जा उत्तम राखण्यास मदत होते. शिवाय पहाटेच्या वेळी दव पडून फळांवर पडणारे तेलकट डाग टाळण्यास मदत झाली आहे. वाढत्या उन्हामुळे फळांवर चट्टे पडून फळांचा दर्जा ढासाळतो. त्यासाठी क्रॉप कव्हर उत्तम काम करते, समाधान येलपले सांगतात.
- समाधान येलपले, ९९७०४४९११०
(शब्दांकन : सुदर्शन सुतार)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.