Pomegranate Farming: डाळिंबाची यशोगाथा! आधुनिक व्यवस्थापनामुळे निर्यातक्षम उत्पादन

Pomegranate Production: सोलापूरच्या ऋषिकेश पाटील यांनी सेंद्रिय व रासायनिक व्यवस्थापनाचा योग्य मेळ साधत ९ एकर डाळिंब बाग फुलवली आहे. हस्त बहर व्यवस्थापनावर भर देत निर्यातक्षम उत्पादन कसे मिळवावे, याचा आदर्श त्यांनी उभा केला आहे.
Pomegranate Farming
Pomegranate FarmingAgrowon
Published on
Updated on

Pomegranate Farming Management:

शेतकरी नियोजन । पीक : डाळिंब

शेतकरी : ऋषिकेश रामभाऊ पाटील

गाव : अकोले खुर्द, ता. माढा, जि. सोलापूर

एकूण शेती : १५ एकर

डाळिंब क्षेत्र : ९ एकर

एकूण झाडे : ३३५० झाडे

अकोलेखुर्द (ता. माढा) येथे ऋषिकेश रामभाऊ पाटील यांची १५ एकर शेती आहे. त्यापैकी ९ एकरांत डाळिंबाच्या भगव्या वाणाची सुमारे ३३५० झाडे आहेत. बागेत प्रामुख्याने हस्त बहर धरला जातो. त्यातून साधारपणे एकरी १५ ते १८ टन डाळिंबाचे उत्पादन मिळते. उत्पादित डाळिंबाची निर्यात केली जाते. त्यामुळे निर्यातक्षम डाळिंब उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न केले जातात.

ऋषिकेश पाटील यांनी सिव्हिल इंजिअरींगचे शिक्षण घेतले आहे. शिक्षण घेतल्यानंतर नोकरी न करता, त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. २०१४ मध्ये शेतीमध्ये लक्ष देण्यास सुरुवात केली, त्या वेळी शेतामध्ये केळीची बाग होती. दरम्यान २०१७-२०१८ मध्ये त्यांनी डाळिंबाची पिकाची अभ्यासपूर्ण माहिती घेत डाळिंब लागवडीचा निर्णय घेतला. त्या वेळी ७ एकरांत डाळिंब लागवड केली. सध्या नव्याने २ एकरांत लागवड करत क्षेत्रात वाढ केली आहे. त्यामध्ये ७५० झाडे आहेत. डाळिंब बागेत दोन ओळींत १३ फूट आणि दोन झाडांत ९ फूट अंतर राखत लागवड केली आहे. उर्वरित क्षेत्रामध्ये पपई, केळी, ऊस इत्यादी पिकांची लागवड आहे.

Pomegranate Farming
Pomegranate Production: हस्त बहरातील डाळिंब उत्पादनाला पावसाचा फटका; ३०% घटण्याची शक्यता!

डाळिंब बागेत बहर नियोजन योग्य पद्धतीने करून दर्जेदार उत्पादन घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. शिफारशीत घटकांची फवारणी, योग्य वेळी वापर, छाटणी, सिंचन व्यवस्थापन, खत व्यवस्थापन आदी बाबींविषयी अनुभवातून माहिती होत गेली. शेती उजनीच्या बॅकवॉटरला आहे. त्यामुळे दरवर्षी जास्त पाऊस झाल्यास अतिरिक्त पाण्याचा फटका बसतो. पावसाळ्यात बागेत रोगांचा प्रादुर्भाव जास्त होण्याची शक्यता असते. त्यासाठी नियोजनबद्ध कामकाजावर भर दिला जातो.

मागील कामकाज

सध्या बाग सेटिंग अवस्थेत आहे.

मादी कळी जास्त निघण्यासाठी ०ः४२ः४७ आणि ६ः४५ः६, ०ः४५ः४५, ०ः ६०ः२० या खतांचा वापर ड्रीपद्वारे आलटून-पालटून करण्यात आला आहे.

दर पंधरा दिवसांतून एकदा ड्रीपद्वारे कॅल्शिअम, बोरॉन यांच्या मात्रा सोडण्यात आल्या.

बागेत वाढलेले तण काढून घेतले. बाग स्वच्छतेची कामे करण्यात आली. तसेच झाडावरील वॉटरशूट काढून घेतले.

आगामी नियोजन

आगामी काळात बागेत पूर्ण सेटिंग होईल. या काळात बागेत सनबर्न आणि तेलकट डाग रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यासाठी संपूर्ण बागेवर क्रॉप कव्हरचा वापर करण्यात येणार आहे. जेणेकरून वाढलेल्या तापमानाचा बागेवर तसेच फळधारणेवर विपरीत परिणाम होऊ नये.

सेटिंग चांगली होण्यासाठी शिफारशीत घटकांची फवारणी केली जाईल.

बागेत सिंचनाचे काटेकोर नियोजन केले जाईल. सध्या एक दिवसाआड अडीच तास सिंचन करत आहे. तापमानात वाढ संभवत असल्याने सिंचनाचा कालावधी वाढविला जाईल.

बागेतील झाडांचे नियमितपणे निरिक्षण केले जाईल. आवश्यकतेनुसार रासायनिक कीटकनाशके, बुरशीनाशकांचा फवारणीद्वारे वापर केला जाईल. तसेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रासायनिक फवारण्यांवर भर दिला जाईल.

फळ फुगवणीसाठी ०ः४५ः४५, ०ः०ः५० यांचा वापर केला जाईल. फळांचा दर्जा राखण्यासाठी प्रयत्न केले जातील.

झाडांच्या बुंध्यात उसाचे पाचटाचे आच्छादन केले जाईल.

Pomegranate Farming
Pomegranate Export: समुद्रमार्गे सोलापूरचे डाळिंब पोहोचले ऑस्ट्रेलियाला

व्यवस्थापनातील बाबी

सध्या ७ एकरांतील बागेत हस्त बहर धरला आहे. त्यासाठी मागील हंगाम संपल्यानंतर बाग ताणावर सोडण्यात आली. हा ताण साधारणपणे १२ डिसेंबरच्या दरम्यान तोडला. साधारणपणे अडीच महिने बागेला ताण बसतो. ताण तोडण्याच्या २० दिवस अगोदर बागेत छाटणी केली जाते.

बहर धरण्या अगोदर बागेतील झाडांना शेणखत तसेच रासायनिक खतांचे बेसल डोस दिले जातात. प्रतिझाड ४० किलो शेणखताची मात्रा दिली जाते.

बहर छाटणीनंतर प्रत्येकी दोन महिन्यांच्या अंतराने एकदा रासायनिक खतांच्या मात्रा दिल्या जातात. त्यामध्ये ६ः४५ः६, ०ः४५ः४५, ०ः०ः५० यांचा आलटून-पालटून वापर केला जातो.

बागेमध्ये मधमाशीचा वावर महत्त्वाचा आहे. मधमाशीशिवाय फळसेटिंग होऊ शकत नाही. त्यामुळे सेटिंगच्या काळामध्ये मधमाश्यांना कोणताही धोका होऊ नये, यासाठी तीव्र स्वरूपाच्या रासायनिक घटकांचा वापर जाणीवपूर्वक टाळला जातो.

रासायनिक खतांबरोबर सेंद्रिय खते आणि जीवामृत स्लरी यांचा देखील प्राधान्याने वापर केला जातो. आठवड्यातून एकदा २०० लिटर स्लरी ड्रीपद्वारे सोडली जाते.

मर रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दर दोन महिन्यांनी झाडाभोवती शिफारशीत रासायनिक कीटकनाशक आणि बुरशीनाशक यांची आळवणी केली जाते. तसेच दर १५ दिवसांनी फवारणीद्वारे शिफारशीत घटकांचा वापर केला जातो. प्रतिबंधात्मक उपायांवर भर दिल्यामुळे बागेत मर रोग आणि पिनहोल बोररचा प्रादुर्भाव टाळणे शक्य झाल्याचे श्री. पाटील सांगतात.

पांढरी मुळीच्या वाढीसाठी बेडवर उसाच्या पाचटाचे आच्छादन केले जाते. यामुळे तणांचे नियंत्रण होतेच, शिवाय पांढऱ्या मुळीची चांगली वाढण्यास चालना मिळते.

बागेमध्ये सूत्रकृमींच्या प्रादुर्भावामुळे मोठे नुकसान होते. त्यासाठी सेंद्रिय खतांच्या नियमित वापरावर भर दिला जातो.

अद्यापपर्यंत बागेमध्ये तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव आढळून आलेला नाही. यामागे योग्य सिंचन नियोजन, खतांचा संतुलित वापर आणि प्रतिबंधात्मक उपाय या बाबी महत्त्वाच्या असल्याचे पाटील सांगतात.

बहर धरल्यानंतर सुरुवातीच्या काळात पहिल्या पंधरा दिवसांत अर्धा तास, त्यानंतर पुढील महिन्यात एक तास सिंचन केले जाते. त्यानंतर झाडाच्या परिस्थितीनुसार आणि बागेतील वाफशानुसार सिंचन करण्यावर भर दिला जातो.

- ऋषिकेश पाटील ९७६३४११७१७

(शब्दांकन : सुदर्शन सुतार)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com