Nagar News : नगर जिल्ह्यात फळपिके, भाजीपाल्यावर उन्हाच्या तीव्रतेचा गंभीर परिणाम होताना दिसत आहे. उन्हामुळे झाडाच्या मुळ्या कोरड्या पडत असल्याने काही भागात फळपिकांची झाडे वाळत असल्याचे दिसत आहे. टोमॅटोसह अन्य फळ व भाजीपाल्याच्या उत्पादनात वीस ते पंचवीस टक्के घट झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आंबा, कलिंगड, केळीलाही उन्हाचा फटका बसतो आहे.
नगर जिल्ह्यात साधारणपणे पंधरा हजार हेक्टरपर्यंत क्षेत्रावर भाजीपाला तर दहा हजार हेक्टरपर्यंत क्षेत्रावर फळपिकांचे उत्पादन घेतले जाते. नगर जिल्ह्यात यंदा बहुतांश भागात पाण्याची टंचाई आहे. टंचाईची तीव्रता दक्षिण भागात अधिक आहे. ज्या भागात पाणी उपलब्ध आहे, तेथे शेतकऱ्यांनी चारा आणि भाजीपाला, फळपिकांना प्राधान्य दिले आहे.
यंदा जिल्ह्याभरात सध्या उन्हाचा तडाखा अधिक आहे. सध्या ४० अंश सेल्सियसपेक्षा अधिक तापमान आहे. नगर जिल्ह्यातील उत्तर भागातील अकोले, संगमनेर, काही प्रमाणात कोपरगाव, राहाता, राहुरी भागात टोमॅटो, कोबी, वांगी, फ्लावर, गवार, काकडी, कारले, भोपळा, तसेच अन्य भाजीपाला उत्पादनाला प्राधान्य दिले.
मात्र तापमान वाढीचा फटका भाजीपाला आणि उन्हाळी टोमॅटो उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना बसला आहे. पॉलिहाऊस, शेडनेटमध्ये उन्हामुळे होणारे नुकसान कमी आहे. मात्र खुल्या प्लॉटवर अधिक फटका बसत आहे. टोमॅटोशिवाय कोबी, फ्लॉवरचीही वाढ होईना. वांगी, काकडीच्या फळांवर उन्हामुळे डाग पडत आहेत. अजून आंब्याचा सीझन जोरात सुरू झाला नाही. मात्र आंब्यावर उन्हामुळे डाग पडत आहेत.
कलिंगडाचीही पुरेशी वाढ होईना. केळीची पाने करपत असल्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. डाळिंब, संत्रा यांसारख्या फळांचे उन्हापासून नुकसान टाळण्यासाठी साड्या व अथवा कापडाचे बागेवर आवरण टाकण्याची शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. संगमनेर, राहुरी, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर, श्रीगोंदा भागात भाजीपाला, फळांना उन्हाचा अधिक फटका बसत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.
मी अनेक वर्षांपासून टोमॅटो, कारल्याचे उत्पादन घेतो. यंदा उन्हाचा कडाका अधिक आहे. त्यामुळे टोमॅटो व अन्य भाजीपाल्याला उन्हाचा मोठा फटका बसत आहे. रोपांच्या मुळांची अन्नद्रव्य शोषून घेण्याची कार्यक्षमता कमी झाली आहे. झाडे जागेवरच करपत असून उत्पादनात पन्नास टक्के घट होत आहे.संदीप गुंजाळ, शेतकरी, खांडगाव, ता. संगमनेर
...असा होतोय उन्हाचा परिणाम
टोमॅटोसारख्या पिकांची झाडे उन्हामुळे जागेवर करपत आहेत. फळे येतात मात्र कमी कालावधीत पक्क होत आहेत. फळांची पुरेशी वाढ होत नाही. मल्चिंग पेपर आणि ठिबक सिंचनावर टोमॅटोची लागवड केली जाते. मात्र बहुतांश भागात चाळीच्या वर तापमान असल्याने मल्चिंग पेपरही तापतोय. त्याचा परिणाम नव्याने केलेल्या लागवडीवर होतोय, वाढीचा वेग कमी झाला आहे. नवीन रोपांची लागवड केली तर त्यात रोपे जळण्याचे प्रमाण वाढले आहे. पुरेसा वाढ होत नसल्याने पुढील काळात त्यातून आर्थिक फटका सोसावा लागणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.