Pune News : गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून पुणे जिल्ह्याच्या तापमानाचा पारा कमालीचा वाढला आहे. त्याचा फळे व भाजीपाला पिकांना याचा मोठा प्रमाणात फटका बसू लागला आहे. भाजीपाला पिके सुकू नये म्हणून शेतकऱ्यांची ओलिताची कसरत वाढली आहे. तापमान वाढीमुळे भाजीपाल्याची आवक घटली. परिणामी दरवाढही झाली आहे. जिल्ह्यातील अल्पभूधारक बागायतदार उन्हाची पर्वा न करता पीक काढत आहेत.
पुणे जिल्ह्यातील हवेली, दौंड, खेड, जुन्नर आणि आंबेगाव हे तालुके प्रामुख्याने भाजीपाला व फळभाज्यासाठी ओळखली जातात. परंतु मागील काही दिवसांपासून कमाल तापमानात वाढ होत असल्याने बाष्पीभवनातही वाढ होत आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादनात घट होत असल्याने बाजार पेठेत कमी आवक होत आहे.
भाज्यांचे दर वधारले आहेत. उन्हाळी भाजीपाला पिकाला पहाटे किंवा सायंकाळच्या वेळी ओलित केले जात आहे. मात्र ज्या ठिकाणी वीज किंवा पाण्याची समस्या आहे तेथे दुपारी किंवा रात्रीही ओलित केले जात आहे. पाण्याची उपलब्धता आणि बाजारातील मागणी लक्षात घेऊन या काळात उन्हाळी भाजीपाला जसे भेंडी, गवार, चवळी, काकडी, टोमॅटो लागवड सुरू करावी, असा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात येत आहे.
या वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये सिंचनाची सुविधा असणाऱ्या तुरळक शेतकऱ्यांनी विविध पद्धतीने भाजीपाला व फळबाग लागवड केली आहे. या भागातील बहुतांश शेतकरी भाजीपाला व फळवर्गीय पिकांची लागवड करतात. त्यामुळे भाजीपाला व फळ पिकांच्या क्षेत्रात वाढ होत आहे; परंतु सद्यःस्थितीत तापमान दिवसेंदिवस वाढत असून, तापमानाचा पारा ४३ अंशांच्या पुढे सरकत असल्याने भाजीपाला व फळ पिकावर वाढत्या उष्णतेचे संकट घोंघावत आहे.
भाजीपाला पिकांना भरपूर प्रमाणात पाणी दिले तरी उच्च तापमानामुळे पालेभाज्या तग धरणे कठीण झाले आहे. त्यामुळे भाजीपाला जोपासणे अवघड झाले आहे. सध्या काही शेतकऱ्यांच्या शेतात वांगे, मिरची, टोमॅटो, मेथी, कोथिंबीर आदी भाजीपाला असून काही शेतकऱ्यांनी पेरू, डाळिंब, चिकू आदी फळबाग लागवड केली आहे.
त्याचबरोबर भुईमूग, ऊस व भाजीपाला पिके शेतकऱ्यांनी घेतली आहेत. या पिकांनाही उन्हाचा फटका बसत आहे. भाजीपाला व फळबाग अति उष्णतेमुळे दुपारच्या वेळेस माना टाकत असून, काही ठिकाणी करपून जात आहे. त्यामुळे भाजीपाला, फळ लागवड केलेला शेतकरी संकटात आहे.
बोअरवेल, विंधन विहिरी कोरड्याठाक :
पूर्व भागातील पुरंदर, बारामती, इंदापूर, खेड, शिरूर परिसरांतील मागील तीन महिन्यांपासून विहीर, बोअरवेल कोरडे पडले आहेत. त्यामुळे पिकांना जगविण्यासाठी पाण्याची कमतरता भासत आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. अति उष्णतेमुळे पालेभाज्या तग धरणे कठीण झाले आहे.
अनेकांच्या पालेभाज्या सुकून जात आहेत. तीव्र स्वरूपाच्या उन्हाळ्यात स्थानिक पालेभाज्यांची आवक कमी होत आहे. त्यामुळे बाजारातील आवक काही प्रमाणात घटली असून, दरही वाढले आहेत. पाण्याची कमतरता आणि वाढती उष्णतेमुळे भाजीपाला व फळबागा सुकत असल्याने आर्थिक नुकसान होत असल्याचे तुकाराम धुमाळ यांनी सांगितले
फळबागांना कसे वाचवाल?
सद्यःस्थितीत अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी ४० मायक्रॉनचे पॉलिथिन फळबागांसाठी मल्चिंग (आच्छादन) म्हणून वापरले आहे. काही ठिकाणी काडीकचरा, गव्हाचे कांड, भुसा, पालापाचोळा आदींचा वापर आच्छादन म्हणून केलेला आहे. टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा हा गढूळ, कचरायुक्त व क्षारयुक्त असल्याचे बऱ्याच ठिकाणी दिसून येत आहे. यामुळे आगामी काळात ठिबक संचामध्ये काही अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.