Nandurbar News : तळोदा तालुक्यात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह झालेला अवकाळी पाऊस, तसेच ढगाळ वातावरणामुळे (Cloudy Weather) रब्बीतील गहू, हरभऱ्यासोबतच केळी आदी पिकांना मोठा फटका (Crop Loss) बसण्याची शक्यता आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे अनेक पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव होत, उत्पादनात घट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
तसेच किडींचा बंदोबस्त करण्यासाठी आता शेतकऱ्यांना कीटकनाशकांची फवारणी करावी लागणार. त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी आर्थिक फटका बसणार असल्याचे बोलले जात आहे.
तळोदा शहरासह तालुक्यातील शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षांत अनेकदा निसर्गाचा लहरीपणाचा सामना करावा लागला आहे. यंदादेखील ऐन रब्बीच्या हंगामात झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक पिकांना जोरदार फटका बसला आहे.
यंदा चांगला पाऊस झाल्याने व हिवाळ्यात थंडीचे प्रमाण चांगले राहिल्याने, रब्बीत चांगले उत्पन्न घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या बळीराजाच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडली आहे.
तळोदा शहरासह तालुक्यातील रांझणी, प्रतापपूर, चिनोदा, रोझवा पुनर्वसनसह अनेक गावांमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे गव्हाला मोठा फटका बसला आहे. परिपक्व झालेले गहू पीक पावसामुळे सर्वत्र आडवे पडल्याचे चित्र दिसून येत आहे.
त्यामुळे बळीराजा हतबल झाला आहे. त्याचबरोबर कापण्यात आलेला हरभरा, तसेच परिपक्व झालेला हरभरा यांनाही या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. वादळी वाऱ्यामुळे काही शेतकऱ्यांच्या शेतातील केळीचे खांबही कोसळले असल्याचे सांगितले जात आहे.
यादरम्यान, गेले काही दिवस वातावरणदेखील ढगाळ होते. त्यामुळे एकंदरीत वातावरणातील बदलामुळे अनेक पिकांना धोका निर्माण झाला आहे.
दरम्यान, परिसरात मोठ्या प्रमाणावर घरकुलांचे काम सुरू असून, अचानक आलेल्या या पावसामुळे बांधकाम करणाऱ्यांचीही भंबेरी उडाली असून, त्यांचे संसार उघड्यावर आल्याचे चित्र आहे.
आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आता रब्बीलाही नुकसान सोसावे लागणार असल्याचे दिसून येत आहे. शासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी यानिमित्ताने शेतकऱ्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.