डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, डॉ. मत्स्यगंधा पाटील
Animal Husbandry : कमी वजन असणाऱ्या कालवधीत गर्भधारणेचे प्रमाण कमी असते. वासरू, कालवडीच्या आहारात मिल्क रिप्लेसर, काफ स्टार्टर आणि पौष्टिक एकदल चारा आणि द्विदल चाऱ्याचा वापर केल्यास निश्चितपणे वयात येताना आवश्यक शरीर वजन गाठण्यास मदत होते. वासरांना समतोल दिल्यास त्यांचे शरीर वजन लवकर वाढून ते लवकर वयात येते.
शुक्राणू तयार होणे, कॅपेसिटेशन होणे आणि फलित होणे, गर्भ तयार होण्यासाठी आहारातील प्रथिने आणि कर्बोदकांचा खूप महत्त्वाचा सहभाग असतो. गायींना गरजेपेक्षा जास्त प्रथिने (आवश्यकतेपेक्षा १० ते १५ टक्क्यांपेक्षा जास्त) दिल्यास प्रति गर्भधारणेसाठी जास्त रेतनाची गरज लागते, तसेच जनावरांतील भाकड काळ वाढतो.
कोठीपोटात विघटनीय जास्त प्रथिनांचा जनावरांच्या आहारात वापर केल्यास प्रजननक्षमतेवर नकारात्मक प्रभाव पडतो. कोठीपोटात विघटनीय जास्त प्रथिनांचा जनावरांच्या आहारात वापर केल्यामुळे जनावर माजावर येण्यास वेळ लागतो किंवा स्त्रीबीज सुटण्यास वेळ लागतो, गर्भधारणेचे प्रमाण कमी होते, जनावर जास्त दिवस खाली राहते आणि गर्भधारणा दर कमी होतो.
जास्त विघटनीय प्रथिनांमुळे तुलनेने ऊर्जेची कमतरता होऊन तसेच युरिया आणि अमोनियाचा स्त्रीबीज व शुक्राणू यांच्यावर अनिष्ट परिणाम होऊन गर्भधारणा प्रमाण कमी होते. गर्भ वाढीवरही अनिष्ट परिणाम होतो, त्यामुळे गर्भाचा गाभणकाळाच्या सुरुवातीच्या काळात गर्भाशयातच मृत्यू होतो.
चयापचयक्षम प्रथिनांचा आहारात थोडे जास्त प्रमाण झाल्यास कोटीपोटात जास्त विघटनशील प्रथिनाएवढा अनिष्ट परिणाम प्रजोत्पादनावर होत नाही. जास्त उत्पादनशील जनावरांमध्ये दूध देण्याच्या सुरुवातीच्या काळात एकूण आवश्यक प्रथिनांच्या ३५ टक्के प्रथिने ही संरक्षित प्रथिनांच्या स्वरूपात आहारातून देणे गरजेचे आहे. ऊर्जा व प्रथिनांची गरज-ऊर्जा व प्रथिनांची गरज ही जनावरांचे वजन, वाढीचा दर आणि दूध उत्पादनानुसार बदलत असते.
ऊर्जेचे स्रोत : मका, ज्वारी, बाजरी, तांदूळ, एकदल चारा इत्यादी
प्रथिनांचे स्रोत : सर्व प्रकारच्या पेंडी/ ढेप, डाळी, मीट मिल, सोयाबीन, हरभरा, तूर, इत्यादी.
आहारातील स्निग्ध पदार्थाच्या समावेशामुळे सुधारित ऊर्जा स्थितीद्वारे आणि संश्लेषणासाठी पूर्ववर्ती वाढवून अंडाशयावरील फॉलिकल आणि कॉर्पस ल्यूटियमच्या कार्यात सुधारणा होऊन पुनरुत्पादनावर सकारात्मक परिणाम होतो तसेच स्टिरॉइड्स आणि प्रोस्टॅग्लँडिन सारख्या पुनरुत्पादक संप्रेरकांचे तयार होण्याचे प्रमाण वाढण्यास मदत होते. तेलबिया, तेल, संरक्षित स्निग्ध पदार्थ हे स्निग्ध पदार्थांचे स्रोत आहेत.
जीवनसत्त्व अ :
हिरव्या चाऱ्यामध्ये कॅरोटीन असते, त्याचे जनावरांच्या शरीरामध्ये जीवनसत्त्व अ मध्ये रूपांतर होऊन हे जीवनसत्त्व जनावरांच्या यकृत, स्नायू आणि दुधामध्ये साठवले जाते. या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे कालवडी/ रेड्या/ वगारी यांची वाढ खुंटते, वयात लवकर येत नाहीत तसेच माजावर लवकर येत नाहीत. गर्भधारणा दर कमी राहतो, प्रसूतिपूर्व मृत्युदर जास्त असतो, भ्रूण मृत्यूदर जास्त असतो, नवजात वासरे अंध आणि कमकुवत जन्मतात आणि नरांमध्ये कामवासना कमी असते.
जीवनसत्त्व अ च्या पुरवठ्यामुळे जनावर माजावर आल्यानंतर ३, ५ आणि ६ व्या दिवशी प्रोजेस्टेरॉन या संप्रेरकाची पातळी वाढते. त्यामुळे भ्रूण जिवंत राहून वाढ होण्यास मदत होते. अ जीवनसत्त्वाच्या पुरेशा प्रमाणामुळे पचलेली पोषणतत्त्वे शरीरात चांगल्या पद्धतीने शोषली जातात, गर्भाची वाढ उत्तम होते, वासरू चांगले निपजते.
गायी-म्हशींमध्ये जीवनसत्त्वाची गरज : ३०००० ते ५०००० आई यू /जनावर/ दिन
स्रोत: पिवळा मका, गाजर, हिरवा चारा
जीवनसत्त्व ई आणि सेलेनियम :
सेलेनियम आणि जीवनसत्त्व ई दरम्यान नेहमीच मजबूत संबंध असतो. हे दोन्ही प्रामुख्याने सेल्युलर अँटीऑक्सिडंट्स म्हणून कार्य करतात, जे हायड्रोजन पेरोक्साइड आणि स्निग्ध आम्लापासून तयार झालेल्या इतर काही पेरोक्साइड्सच्या काही हानिकारक प्रभावांपासून पेशींचे संरक्षण करण्यास मदत करतात.
सेलेनियमचे मुख्य कार्य असे आहे, की ते सायटोसोलिक जीएसएच-पीएक्सचा घटक म्हणून कार्य करते, जे पेरोक्साइडची पातळी कमी करण्यास मदत करते, तर जीवनसत्त्व ई पेशीच्या पडद्याच्या बाबतीत विशिष्ट स्निग्ध पदार्थ विद्राव्य अँटिऑक्सिडेंट म्हणून कार्य करते. जीएसएच-पीएक्स सामान्यत: पेशींच्या आवरणावर हल्ला करण्यापूर्वी पेरोक्साइडला नष्ट करते, तर जीवनसत्त्व ई पेशी पडद्यामध्ये कार्य करते, जे ऑटो-ऑक्सिडेशन म्हणजेच आवरणातील स्निग्ध पदार्थांच्या साखळी प्रतिक्रियाशीलतेस प्रतिबंधित करते.
जीवनसत्त्व ई आणि सेलेनिअमच्या कमतरतेमुळे जनावर अधूनमधून माजावर येणे, उशिरा गर्भधारणा होणे, मुका किंवा कमी कालावधीचा माज येणे, गर्भधारणेचे प्रमाण कमी होणे, अंडाशयावर सिस्ट तयार होणे, शुक्राणूंची गतिशीलता कमी होणे, गर्भाशयाची हालचाल कमी होणे, कासदाह होणे आणि झार अडकणे अशा समस्या उद्भवतात.
गायी-म्हशींमध्ये (शारीरिक अवस्थेनुसार) जीवनसत्त्व ईची गरज : १५० ते ३७५ आई यू /जनावर/ दिन
स्रोत : कडधान्ये, हिरवा चारा, मोड आलेले गहू, मटकी, तेल बिया इत्यादी
तांबे आणि मॉलिब्डेनम :
तांबे आणि मोलिब्डेनम यांचा एकत्र विचार करणे नेहमीच चांगले असते, कारण दोन मूलद्रव्यांमध्ये होणाऱ्या परस्परसंवादामुळे तांब्याचा कमी वापर होऊ शकतो. मोलिब्डेनम आणि सल्फर (सल्फाइड) यांच्यातील काही क्रियांनंतर कोटीपोटामध्ये थायमोलिब्डेट तयार झाल्याचे दिसून येते.
थायोमोलिब्डेट् हे सतत तांब्याशी अभिक्रिया करून अघुलनशील तांबे थायोमोलिब्डेट तयार करतात, त्यामुळे जनावरांच्या शरीरामध्ये तांबे शोषले जाऊ शकत नाही. तांबे-मॉलिब्डेनम-सल्फर यांच्यातील गुंतागुंतीमुळे तांब्याच्या वापरावर मर्यादा येतात. आहारातून तांब्याचा कमी पुरवठा हे तांब्याच्या कमतरतेचे मुख्य कारण आहे.
तांबे-जस्त, तांबे-लोह आणि तांबे-फायटेट यातील परस्परक्रियांमुळे तांब्याची दुय्यम कमतरता तयार होते आणि त्याचा अनिष्ट परिणाम हा पशुप्रजननावर होतो. विशेषत: चरणाऱ्या जनावरांमध्ये तांब्याच्या कमतरतेमुळे गर्भपात होणे आणि भ्रूण मृत्यू, माज उशिरा येणे किंवा चांगला माज न येणे, प्रजनन क्षमता कमी होणे, व्याल्यानंतर जनावर लवकर माजावर न येणे, भ्रूण मृत्यू आणि वंध्यत्व अशा समस्या दिसून येतात.
जनावरांच्या बाबतीत मॉलिब्डेनमची आवश्यकता अत्यंत कमी असून त्याची गरज सामान्य आहारातून नेहमीच सहजपणे पूर्ण होण्याची शक्यता असते.
तांब्याची कमतरता ही नेहमी दुय्यम स्वरूपाची कमतरता असते. जी उच्च मॉलिब्डेनम पातळीशी संबंधित असते. तांब्याच्या कमतरतेमुळे वळू वासरांच्या बाबतीत वंध्यत्व आणि कामेच्छा कमी होण्याची समस्या दिसून येते तसेच ऊतींचे नुकसान आणि शुक्राणू तयार होण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे काही पुनरुत्पादन विकार उद्भवतात.
जनावरांमध्ये दररोज तांब्याची ५ ते ७ मिलिग्रॅम प्रति किलो आहार एवढी गरज असते.
तांब्याचे स्रोत: शेंगदाणा पेंड, सरकी, यकृत आणि ग्लाडूंलार मिल, कॉपर सल्फेट.
महत्त्वाचे मुद्दे :
जनावरांतील प्रजोत्पादनक्षमता चांगली ठेवण्यासाठी आहारात प्रथिनांचा समावेश १७ ते १९ टक्क्यांपेक्षा जास्त नसावा. जनावरांना त्यांच्या गरजेनुसार संतुलित आहार द्यावा, ज्यामध्ये सर्व पोषणतत्त्वे योग्य प्रमाणात असतील.
जनावरांना नियमित पुरेशा प्रमाणात क्षेत्रीय खनिज मिश्रण (विशिष्ट क्षेत्रामध्ये कमतरता असलेल्या विशिष्ट खनिजांची युक्त) द्यावे.
विषारी वनस्पती असलेल्या शेतात जनावरांना चारू नये. काळे वनस्पतीमुळे भ्रूण मृत्यू होतो. रेड क्लोव्हर (ट्रायफोलियम ढोंग), भूमिगत क्लोव्हर (ट्रायफोलियम भूमिगत), बार्ली , ओट धान्य इत्यादीमुळे जनावरामधील संप्रेरक संतुलन बिघडू शकते, ज्यामुळे लवकर भ्रूण मृत्यू होऊ शकतो.
डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, ८३२९७३५३१४
(पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.