Animal Husbandry : पशुपालनातून सावरली आर्थिक घडी

Farmer Success Story : गणेश आणि पोपट लक्ष्मण कातळे (धालेवाडी तर्फे हवेली, ता. जुन्नर, जि. पुणे) या दोन सख्ख्या भावांनी शेळीआणि गाईंच्या संगोपनातून आर्थिक स्थैर्य मिळविले आहे.
Animal Husbandry
Animal HusbandryAgrowon
Published on
Updated on

Management of Animal Husbandry : धालेवाडी तर्फे हवेली, (ता. जुन्नर, जि. पुणे) येथील गणेश आणि पोपट लक्ष्मण कातळे हे पारंपरिक शेळीपालन करणारे शेतकरी. आई-वडिलांचा पहिल्यापासून आर्थिक उत्पन्नाचा मार्ग शेळीपालन व्यवसाय असल्यामुळे लहानपणापासूनच दोघे शेळ्या चरायला माळरानावर घेऊन जायचे. शेळीपालन करत असतानाच दोघांचे नववीपर्यंत शिक्षण झाले. वडिलांच्या आजारपणामुळे आर्थिक मिळकतीसाठी शिक्षण अर्धवट सोडल्यानंतर गणेश यांनी उदरनिर्वाहासाठी रिक्षा खरेदी करून प्रवासी वाहतूक सुरू केली. हळूहळू शेळीपालनासह प्रवासी वाहतूक त्यानंतर भाजीपाला वाहतुकीसाठी पिकअप गाडी घेत वाहतूक व्यवसाय वाढविला. गेल्या पंधरा वर्षांपासून शेळीपालन आणि नऊ वर्षांपासून वाहतूक व्यवसायातून कातळे बंधूंनी आर्थिक प्रगतीची दिशा पकडली आहे.

बंगल्यासोबतच बांधला गोठा

शेळीपालन आणि भाजीपाला वाहतूक व्यवसायातील आर्थिक बचतीमधून कातळे कुटुंबीयांनी चांगले घर बांधण्याचा निर्णय घेतला. तीन मजली घर बांधण्याचे नियोजन करताना, तळमजल्यावर शेळी आणि गाईसाठी बंदिस्त गोठा आणि त्यावर राहण्यासाठी दोन मजले बांधण्याचे नियोजन केले. त्यानुसार तीन वर्षांपूर्वी बंगला आणि गोठा एकत्रितपणे उभारला. कमी जागेचा योग्य वापर करण्यासाठी तळमजल्यावर गोठा बांधण्यात आला. यामध्ये निम्या भागात लाकडी माळा तयार करून शेळ्यांच्या निवाऱ्याची सोय केली आहे. उर्वरित निम्या भागात गाईंचे संगोपन केले जाते. रात्रीच्या वेळी लाकडी माळ्यावर शेळ्या ठेवण्यात येतात. माळ्यावर लाकडी पट्ट्यांचे फ्लोरिंग असल्याने शेळ्यांच्या लेंड्या आणि मूत्र खाली जमिनीवर पडते. ते सकाळी संकलित करून कंपोस्ट खत निर्मितीसाठी वापरले जाते.

Animal Husbandry
Animal Husbandry : पशुधन संगोपनासाठी कमी खर्चिक मुक्त संचार गोठा

जनावरांचे व्यवस्थापन

शेळ्या, गायींना वर्षभर हिरवा चारा उपलब्ध होण्यासाठी कातळे यांनी गावशिवारात ५० गुंठे शेती खंडाने घेतली आहे. या ठिकाणी मेथी घास, हत्ती गवत आणि मक्याची लागवड केली जाते. हंगामानुसार मक्याचा मुरघास केला जातो. उन्हाळ्यात हा मुरघास टप्प्याटप्प्याने वापरला जातो.

शेळ्यांना हिरव्या चाऱ्यासह शेंगदाणा पेंड, सोयाबीन तूस, गव्हाचा भरडा असा खुराक दिला जातो. त्यामुळे त्यांचे चांगले पोषण होते.

शेळ्यांना पशुवैद्यकाकडून दरवर्षी नियमित लसीकरण केले जाते. यामुळे शेळ्यांचे आरोग्य चांगले राहिले आहे. त्यांना कोणताही संसर्गजन्य आजार होत नाही. शेळ्यांची वाढ चांगली होत असल्याने बाजारपेठेत अपेक्षित दर मिळतो.

गोठ्यामध्ये सध्या ५० शेळ्या, चार संकरित गाई आणि तीन कालवडी आहेत. शेळ्यांना माळरानावर सकाळी चरायला सोडले जाते. दुपारी गोठ्यात आणून पाणी पाजले जाते तसेच कोरडा खुराक दिला जातो.

चार संकरित गाई आणि कालवडींचे चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करण्यात आले आहे. पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने चारा, खुराक आणि लसीकरण केले जाते. सध्या दोन गाई दुधात असून, दररोज ३० लिटर दुधाचे संकलन आहे. यामधील १५ लिटर दूध डेअरी दिले जाते. सध्या डेअरीचा प्रति लिटर ३० रुपये दर मिळतो. उर्वरित १५ लिटर दूध ४० रुपये प्रति लिटर दराने रतिबाने दिले जाते.

शेण आणि लेंडीपासून कंपोस्ट खत तयार करून ते चारा पिकांसाठी वापरले जाते.

Animal Husbandry
Animal Husbandry : म्हशींच्या संगोपनात खाद्य, आरोग्य व्यवस्थापनावर भर

मुलांच्या शिक्षणासाठी धडपड

गणेश आणि पोपट यांना लहानपणी हालाखीच्या परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागले होते. त्यामुळे चांगले शिक्षण न मिळाल्याची त्यांना खंत आहे. मात्र मुलांना उच्च शिक्षण देण्याचे त्यांचे स्वप्न आहे. त्यासाठी अधिकचे कष्ट घेण्याची त्यांनी तयारी केली आहे.

महिलांकडे शेळी, गाईंचे व्यवस्थापन

गणेश यांची पत्नी उषा आणि पोपट यांची पत्नी आश्‍विनी या दोघी शेळ्या आणि गायींचे दैनंदिन व्यवस्थापन पाहतात. गणेश आणि पोपट हे दोघे शेतीमाल वाहतुकीचा व्यवसाय करतात. पशुपालन आणि वाहतूक व्यवसायातून कातळे कुटुंबाने आर्थिक स्थैर्य मिळविले आहे. आतापर्यंत शेळी आणि गाईंच्या संगोपनासाठी शासनाची कोणतीही योजना घेता आली नाही. परंतु आता नवीन जागी गोठा वाढवून केवळ बोकडांचे संगोपन आणि विक्री करण्याचे नियोजन त्यांनी केले आहे.

शेळ्यांची विक्री

सध्या गोठ्यात शेळ्या आणि बोकड मिळून ५० संख्या आहे. यामध्ये दोन बोकड आणि सिरोही, काठेवाडी, गावठी आणि कोठा आदी जातींच्या शेळ्या आहेत. चाकण आणि बेल्हा बाजारपेठेत शेळ्या, बोकड आणि करडांची विक्री केली जाते. वर्षभरात ३० शेळ्या आणि बकरी ईदसाठी चार बोकडांची विक्री होते. साडेतीन महिन्यांच्या करडाला पाच हजार असा दर मिळतो. तसेच ईद सणाच्या वेळी एका बोकडाला २० ते २२ हजारांचा दर मिळाला आहे. शेळीपालनातून वर्षभरात दोन लाखांची उलाढाल होते.

गणेश कातळे ९०२११००२८७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com