Fodder Production Agrowon
ॲग्रो विशेष

Fodder Production : दुधेभावी गावाने मिळवली चाऱ्यामध्ये समृद्धी

Success Story of Dudhebhavi Gaon : सांगली जिल्ह्यातील एकेकाळी अवर्षण प्रणव असलेलं दुधेभावी गाव. काही वर्षांपूर्वी टेंभू योजनेचे पाणी मिळालं. मग चाऱ्यासाठी मका लागवड वाढली. आज चारानिर्मितीत समृद्ध आणि मुरघासचा व्यवसाय करणारे अशी दुहेरी ओळख दुधेभावी गावाने जिल्हा व जिल्ह्याबाहेर तयार केली आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Fodder use : अलीकडील काळात हवामानबदल व दुष्काळाची तीव्रता वाढताना दिसत आहे. उन्हाळ्यात तर स्थिती अजून गंभीर होऊन जाते. अन्नधान्य पिकांएवढाच फटका चारा पिकांना बसतो. जनावरांचे संगोपन, दुग्धव्यवसाय धोक्यात येतात.

अशा संकटमय परिस्थितीतून वाट काढणारे शेतकरी व काही गावेही पाहण्यास मिळतात. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्याच्या उत्तरेला असलेले दुधेभावी हे त्यापैकीच एक गाव आहे. पाच हजार लोकसंख्येचे तालुक्याच्या शेवटी ते वसले आहे.

सांगली जिल्ह्यातील जत आणि सोलापूर जिल्ह्यांच्या सांगोला तालुक्याची हद्द गावापासून जवळच आहे. हा भाग पूर्णपणे दुष्काळग्रस्त. भुईमूग, ऊस आणि कापूस ही या एकेकाळची गावची मुख्य पिके दुष्काळात केव्हाच संपून गेली.

रोजगार हमीच्या कामातून मिळणाऱ्या उत्पन्नावर गावकऱ्यांचा उदरनिर्वाह चाले. अनेक जणांनी सांगली बाजार समितीत हमालीचा व्यवसाय पत्करला.प्रत्येकाच्या दावणीला एक दोन जित्राबं. या सर्वांतून कुटुंबाचं अर्थचक्र चालायचं. तरीही संकटासोबत दोन हात करण्याऱ्या शेतकऱ्यानं धीर सोडला नाही.

टेंभूच्या पाण्यावर फुलली चारापिकांची शेती

गावातील शेतकरी सांगतात की कुटुंब चालवायला पशुपालनाचा आधार होता. उसाचे वाढे विकत घेतले जायचे. जोडीला ज्वारीचा कडबा होताच. पण वर्षभराचा विचार करता तो किती काळ पुरवठ्याला येणार? तो विकत घेण्यास सुरुवात झाली. पण मग खर्च वाढला. दरम्यान सहा वर्षांपूर्वी टेंभू योजनेचं पाणी गावातील दुधेभावी नावानेच असलेल्या तलावात आलं.

सुमारे २०० शेतकऱ्यांनी तेथून पाइपलाइन केली. शाश्वत पाणी झाल्याने प्रत्येक वर्षी मका क्षेत्रात वाढ होऊ लागली. वर्षभर पुरेल इतका ओला चारा होऊ लागला. सध्या गावात प्रति शेतकऱ्याकडे एक एकरापासून ते चार एकरांपर्यंत मका पीक पाहण्यास मिळते. त्यामुळे चार- पाच वर्षापासून चारापिके घेणारे गाव अशी दुधेभावीची ओळख निर्माण होऊ लागली आहे.

मुरघास निर्मितीचा मिळाला व्यवसाय

अडीच ते तीन वर्षांपूर्वी गावात मुरघास निर्मिती करणारे यंत्र आले. त्याद्वारे दीर्घकाळासाठी दर्जेदार चारा मिळू लागल्याने परिसरातील गावांतील शेतकरीही मुरघासासाठी दुधेभावीकडे धाव घेऊ लागले. सांगोला, कवठेमहांकाळ, जत तालुक्यांतून मागणी वाढू लागली. ही संधी ओळखून गावात मुरघास निर्मिती व विक्री व्यवसाय वाढीस लागला.

आपल्या शेतीच्या गरजेएवढा मुरघास तयार करून शिल्लक मुरघासाची गावकरी विक्री करू लागले. मागील वर्षभरात सुमारे अडीच हजार टनांपर्यंत मुरघासाची विक्री झाली. अशा प्रकारे सुमारे १२ लाख ते १५ लाखांची उलाढाल होत असल्याचे गावकरी सांगतात.

चारा पिकातील दुधेभावी गाव

एकूण कुटुंब संख्या- सुमारे ३५०

भौगोलिक क्षेत्र- १३२० हेक्टर, पिकांखालील क्षेत्र- १०३९ हेक्टर

गावात ९० टक्के पशुपालन व्यवसाय

प्रति कुटुंबाकडे तीनपासून ४० पर्यंत जनावरांची संख्या.

एकूण जनावरांची संख्या- हजारांपर्यंत.

शाश्वत चारा उपलब्धतेमुळे जनावरांच्या संख्येत वाढ

एक एकरापासून ते पाच एकरांपर्यंत चारा पिकांची लागवड

दूध संकलन केंद्रे- सात

प्रति दिन दूध संकलन- सुमारे पाच हजार लिटर (दोन्ही वेळचे मिळून)

मुरघास निर्मिती यंत्रांची संख्या- १५ ते २०

शेतकऱ्यांकडून मुरघास तयार करण्यासाठी प्रति टन शुल्क- दोन हजार रुपये

उन्हाळ्यात मुरघासाची प्रति टन ७ ते ८ हजार रुपये दराने तर एरवी साडेपाच हजार रुपये दराने विक्री.

गावातील ओल्या चारा पिकाखालील क्षेत्र

वर्ष क्षेत्र (एकर)

२०२०-२१ ९५

२०२१-२२ ११२

२०२२-२३ १३५

२०२३-२४ १७०

पशुसंवर्धन विभागाकडून

उपलब्ध चारा

वर्ष उपलब्ध चारा (टनांत)

२०२०-२१ २३

२०२१-२२ २७

२०२२-२३ २५

२०२३-२४ २८

मागील वर्षी स्वतःसाठी मुरघास तयार करण्याचे यंत्र एक लाख ६० हजार रुपयांना खरेदी केले. त्यातून चाऱ्याची बचत होण्याबरोबर किंमान सहा महिने दर्जेदार चारा उपलब्ध होऊ लागला आहे. गरजू शेतकऱ्यांचा प्रति टन दोन हजार रुपयांप्रमाणे मुरघास तयार करून देतो.
विशाल दत्तू घागरे, ७८२१०६८८०७
दरवर्षी दोन एकरांवर मका घेतो. मुरघास यंत्राद्वारे प्रति टनाच्या ३० बॅग्ज तयार करतो. पैकी वीस बॅग्ज घरच्या जनावरांसाठी ठेवतो. उर्वरित मुरघासाच्या विक्रीतून अतिरिक्त उत्पन्न हाती येते. जे घरच्या व शेतीच्या अर्थकारणाला हातभार लावते.
सोपान महादेव फोंडे, ७८७५०८४२७६
दरवर्षी दोन एकरांवर मका घेतो. मुरघास यंत्राद्वारे प्रति टनाच्या ३० बॅग्ज तयार करतो. पैकी वीस बॅग्ज घरच्या जनावरांसाठी ठेवतो. उर्वरित मुरघासाच्या विक्रीतून अतिरिक्त उत्पन्न हाती येते. जे घरच्या व शेतीच्या अर्थकारणाला हातभार लावते. =
सोपान महादेव फोंडे, ७८७५०८४२७६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT