Nashik news : ऑगस्ट महिना लोटत आला. श्रावण सुरू झाला; मात्र अधूनमधून बरसणाऱ्या श्रावण सरीही सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अजून नशिबी नाहीत. अनेक गावात अद्यापही उन्हाळा सरलाच नाही अशीच गंभीर परिस्थिती आहे. पाऊसच नसल्याने पेरणी तर दूरच मात्र शिवारात नांगरलेल्या शेतात अजूनही ढेकळे फुटलेली नाहीत. पाऊस नसल्याने शेतकरी तणावात आहे. परिणामी, जगण्याचा संघर्ष अजूनच बिकट बनला आहे. तालुक्याच्या वावी, पांगरी, नांदूर शिंगोटे, शहा, गोंदे या ५ महसूल मंडलांत ५५ गावांत सरासरीच्या ५० टक्क्यांहून कमी पर्जन्यमान आहे. तर पूर्व भागातील काही गावांमध्ये ‘‘ना पाऊस, ना पाणी, ना झाली पेरणी’’ अशीच भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.
जून व जुलै महिन्यांत झालेल्या पावसाच्या ओलीवर शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरणी केली होती. पिके अंकुरली. मात्र जवळपास एक महिनाभर पावसाचा खंड पडल्याने काही होरपळून गेली. तर आता वाढीच्या अवस्थेतील सोयाबीन, मका, भुईमूग बाजरी ही पिके तग धरून होती, ती आता करपू लागली आहेत. थोडीफार घेतली जाणारी भाजीपाला पिके यंदा दिसत नसल्याची स्थिती आहे. अनेकांनी पेरणीसाठी पाभरच धरली नाही, ज्यांनी चाऱ्यासाठी धरली ती पिके अंकुरली, मात्र नंतर जळून गेली. पाण्याची कायमच टंचाई असल्याने शाश्वत उत्पन्न देणारी पिके नाहीत. त्यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून पोल्ट्री व दूध व्यवसाय शेतकरी करतात. मात्र या दुष्काळी परिस्थितीत व्यवसायसुद्धा संकटात सापडला आहे. एकीकडे चारा महाग झाला, आता पाणी नसल्याने अनेकांच्या पोल्ट्री व्यवसायाला तूर्त ब्रेक लागला आहे.
पाऊस नसल्याने परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे सरकारने सद्यःस्थिती विचारत घेऊन तातडीने प्राथमिक गरजांवर काम करणे गरजेचे आहे. जनावरांसाठी चारा छावण्या तातडीने सुरू झाल्या पाहिजेत, यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व महसूलमंत्री यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे.-माणिकराव कोकाटे, आमदार-सिन्नर
अशी परिस्थिती फक्त १९७२ मध्ये पहिली होती. त्या वेळी जगणे अवघड होते. हा भाग अवर्षणप्रवण असल्याने आता पुन्हा तीच वेळ आली आहे. २० वर्षांपासून पोल्ट्री व दूधधंदा या भागात विस्तारला आहे. त्यासाठी आम्हाला एप्रिल ते जूनदरम्यान पाणी विकत घ्यावे लागते. यंदा मात्र भर पावसाळ्यात ऑगस्टपर्यंत पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. मात्र या वर्षी पुढे कशी परिस्थिती राहील, हे देवही सांगू शकत नाही.
खरीप वाया गेला, आता पाऊस झाला तरी चारा उपलब्ध होणार नाही. बोटावर मोजता येईल अशा शेतकऱ्यांच्या थोड्याफार पाण्यावर भाजीपाला लागवडी होत्या. मात्र दरात घसरण झाल्याने खर्च निघण्याची आगामी काळात शाश्वती नाही. पूर्व भागातील शेतकरी दूध व कुक्कुटपालन व्यवसायावर अवलंबून आहेत मात्र ही परिस्थिती अडसर ठरत आहे.- बाबासाहेब कांदळकर, दूध उत्पादक, मिठसागरे, ता. सिन्नर
मागील वर्षी ओल्या दुष्काळाने पिके काढणीच्या अवस्थेत मातीमोल झाली. तर यंदा कोरड्या दुष्काळाने ती घालविली. अजूनही उन्हाळा जाणवतो आहे, कर्जाऊ रक्कम घेऊन पशुपालकांना नगर जिल्ह्यात जाऊन चारा खरेदी करावी लागत आहे. जगण्याचा हा संघर्ष मोठा आहे, अशी खोल गेलेल्या कातरत्या आवाजात कहांडळवाडी (ता. सिन्नर) येथील शेतकरी भास्कर यशवंत कहांडळ हे परिस्थिती सांगत होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.