डॉ. अभिनंदन पाटील, डॉ. गणेश पवार
Sugarcane Cultivation Method : प्रचलित कांडी लागण पद्धत
ऊस कांडी लागण पद्धतीने बेणे गुणन दोन कांड्यांतील अंतर कमी करून वाढविता येते. दोन डोळा कांडीचे टोकास टोक टक्कर पद्धतीने लागण केल्यास बेणे गुणन प्रमाण १:१५ पेक्षा जास्त मिळते. यामध्ये बेणे ऊसाची जाडी कमी मिळत असली तरी या बेण्याची उगवण क्षमता ८५ ते ९५ टक्यांपर्यंत मिळते.
ऊस रोप लागण पद्धत
अ) गादीवाफा पद्धत
यासाठी १ मीटर रुंद आणि १० मिटर लांबीचे वाफे तयार करावेत. गादीवाफे तयार करताना तळाशी प्लॅस्टिक पेपर किंवा खतांच्या रिकाम्या पिशव्या अंथरून त्यावर चांगले कुजलेले शेणखत व मातीच्या मिश्रणाचा सहा इंच थर देऊन त्यावर बुरशीनाशक व कीटकनाशकाची प्रक्रिया केलेल्या दोन इंचाच्या एक डोळा कांड्या १ ते २ इंच कांड्यांतील अंतर आणि दोन ओळींतील अंतर १ इंच याप्रमाणे ठेवून मांडणी करावी. त्यावर २ इंच मातीचा थर द्यावा. अशाप्रकारे अर्धा गुंठा क्षेत्रामध्ये एक एकराला पुरेशी रोपे तयार करता येतात.
ब) प्लॅस्टिक प्रो ट्रे पद्धत
प्लॅस्टिक ट्रे ४२ कपांचे ५६० मिमी × ३६० मिमी × ७० मिमी आकार आणि ७८० मायक्रॉन जाडीचे वापरावेत.
एक ट्रे भरण्यासाठी कोको पीट १.७५ किलो, शेणखत ०.५ किलो, पोयटा माती ०.५ किलो, रेती ०.२५ किलो या प्रमाणात लागते. त्यामुळे या मिश्रणाचा गोळा रोप लागण करताना फुटत नाही.
साधारणतः ३० ते ३५ दिवसांचे रोप लागणीस योग्य असते. ही रोपे जोमाने वाढतात. फुटव्यांची संख्या जास्त मिळते.
४२ कपांच्या प्लॅस्टिक ट्रेमधील रोपांच्या मरीचे प्रमाण तुलनेने कमी असते. बेणे गुणन प्रमाण १:१५ पर्यंत निश्चितपणे मिळू शकते.
रोपापासून लागवड करताना घ्यावयाची काळजी
रोपाचे वय ३० ते ३५ दिवसांचे असताना लागवड करावी. जास्त वयाच्या रोपांची लागवड केल्यास फुटव्यावर परिणाम होतो.
रोप लागवडीपूर्वी एक दिवस अगोदर रोपांना पाणी द्यावे.
रोपांची लागवड योग्य खोलीवर करावी. हलक्या प्रवाहाने पाणी द्यावे.
लागवड करताना ट्रेमधील मिश्रणाचा गोळा फुटणार नाही याची काळजी घ्यावी.
रोप लागवडीपूर्वी वसंत ऊर्जा/ बुरशीनाशक/ कीटकनाशक / सूक्ष्म अन्नद्रव्य यांची रोपांवर फवारणी/ आळवणी करावी.
क) उती संवर्धित रोप लागवड पद्धत
रोगमुक्त चांगल्या प्रतीचे बेणे निर्मिती व नवीन जातींचा प्रसार जलद करण्याकरिता हे तंत्र उपयुक्त आहे. उती संवर्धित रोपांचा वापर केल्यास पायाभूत बेणे मळ्याचे गुणन निश्चितपणे १:२५ पेक्षा जास्त मिळते.
ऊस बेणे मळा कार्यक्रम यशस्वी राबवण्यासाठी महत्त्वाच्या बाबी
कारखान्याच्या गाळप क्षमतेप्रमाणे हंगाम व गटनिहाय तसेच विविध जातींचा आराखडा तयार करावा.
आराखड्याप्रमाणे प्रथम स्तर बेण्याची हंगाम व वाणनिहाय मागणी संबंधित संस्थेकडे करावी.
बेणे उत्पादक शेतकऱ्यांची निवड रस्त्यालगत जमीन व पाण्याची उपलब्धता पाहून करावी.
योजना राबविण्यासाठी सक्षम ऊस विकास विभाग असावा.
बेणेमळा निरीक्षणासाठी स्वतंत्र प्रशिक्षित पाहणी पथक असावे.
पथकाच्या शिफारशीनंतर बेणेमळातील बेणे वाटप करावे.
बेणे उत्पादक शेतकऱ्यांची नोंद करून त्यांना ओळखपत्र द्यावे.
चांगल्या दर्जाचे बेणे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांची पुढील वर्षासाठी निवड करावी.
बेणे मळा विद्यापीठ, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून महाराष्ट्रासाठी प्रसारित झालेल्या जातींचा असावा.
रोपवाटिकेसाठी बेणे हे प्रमाणित असावे.
एक डोळा रोप निर्मितीसाठी प्रमाणित बेणे वापरणाऱ्या रोपवाटिकेची निवड कारखाना स्तरावर करावी.
डॉ. अभिनंदन पाटील, ९७३७२७५८२१
डॉ. गणेश पवार, ९६६५९६२६१७
(वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी, जि. पुणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.