Sugarcane Management : दर्जेदार ऊस बेणे मळ्याचे नियोजन

Sugarcane seed : शुद्ध व गुणवत्तापूर्ण बेणे उपलब्ध होण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतामध्ये दर्जेदार बेणे उपलब्ध होण्यासाठी त्रिस्तरीय बेणेमळा व्यवस्थापन करावे. उसाचे बेणे किमान ३ ते ५ वर्षांतून एकदा बदलावे.
Sugarcane
SugarcaneAgrowon
Published on
Updated on

डॉ.अभिनंदन पाटील, डॉ.गणेश पवार, डॉ.अशोक कडलग

Sugarcane Crop : शुद्ध व गुणवत्तापूर्ण बेणे उपलब्ध होण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतामध्ये दर्जेदार बेणे उपलब्ध होण्यासाठी त्रिस्तरीय बेणेमळा व्यवस्थापन करावे. उसाचे बेणे किमान ३ ते ५ वर्षांतून एकदा बदलावे.

कारखाना कार्यक्षेत्रावर प्रत्येक वर्षी किमान ३३ टक्के क्षेत्रावरील बेणे बदल आवश्यक आहे. यामुळे शेतकऱ्यांचे ऊस उत्पादन, उत्पादकता आणि साखर उतारा वाढवण्यास बरीच मदत होईल.

महाराष्ट्रामध्ये उसाचे उत्पादन दिवसेंदिवस घटत आहे. त्यातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शेतकऱ्यांचे बेण्याच्या शुद्धतेकडे व गुणवत्तेकडे होणारे दुर्लक्ष. बऱ्याच वेळा लागणीसाठी घाई केल्यामुळे चाऱ्यासाठी व गाळपासाठी जाणाऱ्या अतिपक्क तसेच पैशाअभावी खोडवा पिकातील बेणे लागणीसाठी वापरले जाते.

त्यामुळे अशा बेण्यांची उगवण कमी व एकसारखी होत नाही, तसेच फुटवे जोमदार येत नाहीत. तसेच तूट न भरल्यास प्रति हेक्टरी गाळपा योग्य उसाची अपेक्षित एक लाख संख्या मिळत नाही. त्यामुळे एकूण ऊस उत्पादनात खूपच घट येते. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ व पैसा वाया तर जातोच तसेच जमीन, पाणी आणि सूर्यप्रकाश या साधनांचा कार्यक्षम असा वापर होत नाही.

शुद्ध आणि गुणवत्तापूर्ण बेणे उपलब्ध होण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतामध्ये दर्जेदार बेणे उपलब्ध होण्यासाठी त्रिस्तरीय बेणेमळा व्यवस्थापन करून बेणे मळ्यातील बेणे वापरावे. सध्याच्या स्थितीत हा बेणे बदल फक्त ७ ते ८ टक्के एवढाच होताना दिसतो आहे.

उसाचे बेणे किमान ३ ते ५ वर्षांतून एकदा बदलणे आवश्यक आहे. कारखाना कार्यक्षेत्रावरती प्रत्येक वर्षी किमान ३३ टक्के क्षेत्रावरती बेणे बदल होणे गरजेचे आहे. त्यामुळे या बदलास प्रचंड वाव असून त्यातून शेतकऱ्यांचे उत्पादन, उत्पादकता व साखर उतारा वाढवण्यास बरीच मदत होईल. बेणे मळ्यासाठी शेतकऱ्यांनी ऊतीसंवर्धित रोपे अथवा पायाभूत बेणे हे प्रमाणित बेणे मळ्यासाठी वापरावे.

गुणवत्तापूर्ण बेणे वापराचे फायदे ः

१) उसाचे उत्पादन दहा ते पंधरा टक्के वाढते.
२) रसरशीत ९ ते १० महिन्याचे डोळे फुगलेले बेणे वापरल्यामुळे उगवण ९० टक्यांपर्यंत एकसारखी होते. तूट होत नाही. बेणे खर्चात आणि खोडवा पिकातील नांग्या भरण्याच्या खर्चात बचत होते.
३) उसाची उगवण, वाढ जोमाने आणि एकसारखी होते. मुळ्यांची वाढ चांगली होऊन पीक खते, पाणी व मशागतीस चांगला प्रतिसाद देते.
४) रोग, कीडमुक्त बेणे वापरल्यामुळे पुढील काळात पिकावर रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी होतो.
५) गाळपायोग्य उसाची संख्या प्रती हेक्टरी एक लाख संख्या राखण्यास मदत होते.
६) लागण चांगली आल्यामुळे खोडवा पिकाचे उत्पादन चांगले येते.

गुणवत्तापूर्ण बेण्याची वैशिष्ट्ये ः

१) उसाचे बेणे रसरशीत, जाड कांड्या व डोळे फुगलेले असावेत.
२) बेणे जनुकीयदृष्ट्या शुद्ध, भेसळरहित असावे.
३) नऊ ते दहा महिने वयाचे बेणे असावे.
४) बेण्यासाठी कोणता ऊस वापरू नये.
५) बारा महिन्यापेक्षा जास्त वयाचा, पक्व झालेला आणि डोळे निस्तेज झालेला ऊस वापरू नये.
६) आखूड कांड्यांचा व पाण्याचा ताण पडलेला ऊस बेण्यासाठी वापरू नये.
७) दशी पडलेला, मुळ्या, पागंशा फुटलेला व तुरा आलेला ऊस बेण्यासाठी वापरू नये.
८) लोळलेल्या उसाचे प्रमाण दहा टक्के पेक्षा जास्त असलेल्या शेतातील ऊस बेण्यासाठी वापरू नये.
९) मोठ्या प्रमाणात पांढरी माशी, लोकरी मावा ग्रस्त ऊस बेण्यासाठी वापरू नये.
१०) खोडवा ऊस बेणे मळ्यासाठी वापरू नये.
११) गवताळ वाढ व काणीग्रस्त बेणेमळ्यातील ऊस वापरू नये.
वरील सर्व दोष टाळण्यासाठी बेणे हे शास्त्रीय पद्धतीने
जोपासलेल्या त्रिस्तरीय बेणे मळ्यातून द्यावे. काही अपरिहार्य कारणास्तव जास्त वयाचे बेणे वापरायचे असेल तर बुडख्याकडील जुन्या कांड्या काढून हिरवट रंगाच्या व फुगलेले डोळे असलेल्या उसाचा वरचा भाग बेण्यासाठी वापरावा.

त्रिस्तरीय बेणे मळा व्यवस्थापन ः

गवताळ वाढ, पोक्का बोंग यासारख्या रोगामुळे उसाचे आर्थिक नुकसान होऊन उत्पादन घटतेच परंतु चांगल्या वाणांचा लवकर ऱ्हास होतो. त्यामुळे गुणवत्तापूर्ण ऊस बेण्यासाठी साखर कारखान्याच्या ऊस विकास विभागामार्फत त्रिस्तरीय बेणे मळा योजना राबवणे अत्यंत गरजेचे आहे. मूलभूत बेणेमळातील बेण्यावर लागणी अगोदर गरम पाण्याची, उष्ण हवेचे, उष्ण बाष्प हवेची अथवा गरम वाफेचे प्रक्रिया करतात.


गरम पाण्याची प्रक्रिया ः

यामध्ये पाणी ५० अंश सेल्सिअस पर्यंत उकळावे. त्यामध्ये २ ते २.५ तास बेणे बुडवून ठेवावे किंवा पाणी ४०० ते ४५ अंश सेल्सिअसएवढे गरम करावे. त्यात कांड्या टाकून नंतर ते ५० अंश सेल्सिअसपर्यंत गरम करून प्रक्रिया करावी. म्हणजे डोळ्यांना एकदम उष्णतेचा शॉक बसणार नाही. त्याचबरोबर आपण बुरशीनाशकाची सुद्धा प्रक्रिया करू शकतो.

उष्ण हवा/ उष्ण बाष्प हवा ः

१) प्रक्रियेमध्ये कोरडी हवा (५४ अंश सेल्सिअस ) तयार करून ती मोठ्या चेंबरमध्ये फिरवून २.५ तासांकरिता बेण्यावर प्रक्रिया करतात.
२) ही प्रक्रिया काणी या रोगाच्या निर्मूलनासाठी उपयुक्त आहे. अशी प्रक्रिया केलेले बेणे आणि हे सयंत्र कारखान्यांनी किंवा बियाणे तयार करणाऱ्या संशोधन संस्थांनी घेऊन त्यापासून मूलभूत, पायाभूत व शेवटी प्रमाणित बेणे किंवा शेतकऱ्यांना व्यापारी तत्त्वावर लावण्यासाठी प्रसारित करावे.
३) उष्ण बाष्प हवा प्रक्रिया केलेले बेणे हे रोगमुक्त राहाते. प्रत्येक पाच वर्षांतून हा बेणे बदल करणे गरजेचे आहे.

मूलभूत बेणे (ब्रीडर सीड)

- या प्रकारचे बेणे हे फक्त विविध संशोधन संस्था जसे की वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी, पुणे, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, विभागीय ऊस व गूळ संशोधन केंद्र, कोल्हापूर आणि विविध कृषी विभागाच्या प्रक्षेत्रावर ऊस पैदासकार शास्त्रज्ञांच्या देखरेखीखाली तयार करून ते साखर कारखाना किंवा संशोधन संस्थांच्या प्रक्षेत्रावर पायाभूत बेणे तयार करण्यासाठी दिले जाते.
- नवीन वाण तयार होऊन विद्यापीठामार्फत संयुक्त कृषी संशोधन परिषदेमध्ये मान्यता होऊन प्रसारित झाल्यावर किंवा पूर्वप्रसारित झाल्यावर ऊस पैदासकाराकडचे केंद्रीय बेणे (न्यूक्लियस सीड) मूलभूत बेणे तयार करण्यासाठी वापरतात.
- या प्रकारच्या बेणे निर्मितीसाठी उष्ण बाष्प हवा सयंत्रामध्ये ५४ अंश सेल्सिअस तापमानास २.५ तास प्रक्रिया करून बेणे लागणीसाठी दिले जाते किंवा ५२ अंश सेल्सिअस ४ तास प्रक्रिया केली जाते. त्यामुळे गवताळ वाढ, काणी व मर रोगाचे नियंत्रण होतो. बेणे रोग व कीड मुक्त होऊन त्याची जनुकीय शुद्धता टिकण्यास मदत होते. यापासून तयार झालेले बेणे पायाभूत बेणे म्हणून वापरता येते.

पायाभूत बेणे (फाउंडेशन सीड) ः

- मूलभूत बेण्यापासून तयार झालेल्या बेण्यास पायाभूत बेणे म्हणतात. हे बेणे कारखाना प्रक्षेत्रावर किंवा निवडक प्रगतशील शेतकऱ्यांच्या शेतात तयार केले जाते.
- या बेणे मळ्यात रोगग्रस्त उसाची बेटे आढळून आल्यास ती बेटे मुळासकट काढून नष्ट करावीत.

प्रामाणिक बेणे (सर्टिफाइड सीड)

- पायाभूत बेण्यापासून प्रमाणित बेणेमळा तयार करण्यासाठी हे बेणे वापरले जाते. कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये प्रत्येक विभागात/ गटांमध्ये प्रगतशील शेतकऱ्यांच्या शेतावर प्रमाणित बेणेमळा वाढवून इतर शेतकऱ्यांना ऊस लागवडीसाठी पुरवला जातो.
- हा बेणेमळा कारखान्याच्या ऊस विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करावा. वेळोवेळी ऊस शास्त्रज्ञांकडून तपासणी करून घ्यावा.
- रोग, कीड व उसाच्या इतर जातीची भेसळ आढळून आल्यास विविध तपासणी वेळी काढून त्यांची नोंद घ्यावी. - अशा प्रकारे तयार केलेले बेणे हे शेतकऱ्यांना लागवडीसाठी दिले जाते. प्रमाणित बेणे शेतकऱ्यांनी किमान ३ ते ५ वर्षातून एकदा बदलणे आवश्यक आहे. बेणे बदल न केल्यास उसाच्या जातीचे मूळ गुणधर्म काही अंशी बदलतात. त्यांची उत्पादन क्षमता, रोग व कीड प्रतिकारक शक्ती कमी होऊन उत्पादनात घट येते.

पायाभूत बेण्यासाठी ऊतिसंवर्धित रोपांची लागवड ः

- शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतावर एक गुंठा पायाभूत बेणे तयार करण्यासाठी ऊतिसंवर्धित रोपांची लागवड करावी. हे बेणे १०० टक्के रोगमुक्त व चांगल्या प्रतीच्या बेणे निर्मितीस व नवीन वाणांचा जलद प्रसार प्रचार करण्यासाठी सोयीचे आहे.
- ऊतिसंवर्धित रोपांचा वापर केल्यास पायाभूत बेणे मळ्याचे गुणन निश्चितपणे १:२५ पेक्षा जास्त मिळते. उती संवर्धित रोपापासून १ गुंठा क्षेत्रावरती साधारणपणे १२० ते १५० रोपे लावून त्याचे १:२५ गुणन केल्यास १ गुंठ्यातून एक हेक्टर एवढी उसाचे पायाभूत बेण्यासाठी लागवड करता येईल. त्या एक हेक्टर पासून दहा हेक्टर प्रामाणिक बेणे लागवडीसाठी वापरता येईल. त्यातून शंभर हेक्टर एवढे क्षेत्र नवीन क्षेत्र लागवडीखाली आणता येईल.

संपर्क ः
डॉ. अभिनंदन पाटील,९७३७२७५८२१
डॉ. गणेश पवार, ९६६५९६२६१७
अनिल मुंढे,९७३०८०२२३२
-------
(वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी, जि. पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com