Sugarcane Management : ऊस बेणे मळ्याचे व्यवस्थापन

Sugarcane Farming : मूलभूत बियाणे हे कारखाना रोपवाटिका किंवा संशोधन केंद्रावरून आणलेले असावे. त्याचे गुणन करून बेणे मळ्यासाठी वापरावे. बेणेमळा हा कारखाना कार्यक्षेत्राच्या विविध गटांत आणि वेगवेगळ्या जातींचा घेतलेला असावा. शेतकऱ्यांना बेणे वितरणासाठी सोयीचे असावे.
Sugarcane Farming
Sugarcane FarmingAgrowon
Published on
Updated on

डॉ. गणेश पवार, डॉ. अभिनंदन पाटील, डॉ. अशोक कडलग

Sugarcane Crop : कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस लागवडीखालील जमिनीची पाच भागांमध्ये विभागणी करावी. प्रत्येक वर्षी एका भागात बेणे बदल करावा. साधारणपणे गवताळ वाढ, काणी, रेड रॉट आणि वायएलडी अशा रोगामुळे ऊस उत्पादनामध्ये १० टक्के घट येऊ शकते. ही घट बेणे बदल करून टाळता येऊ शकते.

लागण वेळ

बेण्याचे वय ८ ते १० महिन्यांचे असताना तोडले जावे. शेतकरी कोणत्या महिन्यात जास्त लागण करतो, त्यानुसार पाठीमागे जाऊन बेणे मळा लागण करावी.

जमीन

जमीन ही क्षारपड, चोपण किंवा पाणथळयुक्त नसावी.

बेणेमळा हा कारखाना कार्यक्षेत्राच्या विविध गटांत आणि वेगवेगळ्या जातींचा घेतलेला असावा. शेतकऱ्यांना बेणे वितरणासाठी सोयीचे असावे.

बेणे मळ्यापासून चांगल्या रस्त्याची सोय असावी त्यामुळे वाहतूक खर्च कमी करता येईल.

बेणे मळ्यासाठी प्रगतिशील शेतकऱ्यांची निवड करावी.

मूलभूत बियाणे हे कारखाना रोपवाटिका किंवा संशोधन केंद्रावरून आणलेले असावे. त्याचे गुणन करून बेणे मळ्यासाठी वापरावे.

जमीन मशागत

चांगली खोलवर नांगरट करून उभी-आडवी वखरणी करावी. उसाच्या चांगल्या वाढीसाठी जमिनीत २५ ते ३० टन एवढे चांगले कुजलेले शेणखत दुसऱ्या वखरणी अगोदर मिसळून मातीआड करावे किंवा शेणखत उपलब्ध नसेल तर १० टन चांगली कुजलेली प्रेसमड  मिसळावी किंवा ५ टन गांडूळ खताचा वापर करावा.

Sugarcane Farming
Sugarcane Crop Disease : ऊस पिकावरील विषाणूजन्य रोगांचे नियंत्रण

बेणे  

बेण्याची निर्मिती एक डोळा, दोन डोळा, कांडी किंवा उती संवर्धित रोपांपासून केली जाते. बेण्यासाठी लागण केलेला ऊस  तोडण्यापूर्वी ६ आठवडे अगोदर अतिरिक्त नत्र खताची मात्रा द्यावी त्यामुळे कांडीतील रसरशीतपणा व पोषणद्रव्य वाढून बेण्याची उगवण क्षमता वाढीस लागते.

व्यवस्थितरीत्या पाला काढून बेणे धारदार कोयत्याने थोडे तिरक्या पद्धतीने एका झटक्यात तोडावे म्हणजे कांडी फुटणार नाही किंवा डोळा खराब होणार नाही, शक्यतो बेणे शेतावर नेऊन तिथेच तोडून बेणे प्रक्रिया करून लागण करावी.

मूळकुज, कांडीकुज यांसारख्या रोगांच्या नियंत्रणासाठी १०० लिटर पाण्यात १०० ग्रॅम कार्बेन्डाझिम मिसळून  त्यामध्ये बेणे १० ते १५ मिनिटे भिजत ठेवावे.

सरीरातील अंतर

जमिनीच्या पोताप्रमाणे ४.५ ते ५.० फूट × १५ ते २० सेंटिमीटर दोन डोळ्यांतील अंतर ठेवून लागण करावी. बेणे तोडताना डोळ्याच्या वरचा १/३ व खालचा २/३ भाग ठेवून टिपरी तोडावी, वरंब्याच्या बगलेला डोळे येतील याप्रमाणे दोन डोळा टिपरी सरीत  ठेवून डोळ्यावर दोन ते अडीच इंच माती लावून कोरडी लागण करून हलक्या प्रवाहाने पाणी द्यावे.

नेहमीच्या बेण्याचे गुणन १: १० ते १:१२ असे होते म्हणजे १ हेक्टर क्षेत्रावर तयार केलेल्या बेणेमळ्यातून  साधारणपणे १० ते १२ हेक्टर लागण होते. परंतु हा बेणेमळा उती संवर्धित रोपांचा वापर करून केल्यास त्याचे १:२० ते १:२५ प्रमाणे गुणन होऊ शकते.

बेणे टिपरी संख्या

हेक्टरी २५ हजार दोन डोळा टिपरीचा वापर करावा.

उष्ण बाष्प हवा प्रक्रिया केलेले बेणे हे मूलभूत बेण्यासाठी वापरताना २५ टक्के जास्तीचे बेणे लागण करावी. कारण उष्ण बाष्प हवा प्रक्रियेमुळे कमकुवत बेणे मरण पावतात.

Sugarcane Farming
Sugarcane Management : दर्जेदार ऊस बेणे मळ्याचे नियोजन

आंतरमशागत

योग्य वेळी बाळ बांधणी, मोठी बांधणी तसेच खुरपणी व एकात्मिक तण व्यवस्थापन करावे.

बेणे मळ्यामध्ये रोगग्रस्त (काणी, गवताळ वाढ) बेटे तसेच दुसऱ्या ऊस जातीची बेटे दिसून आल्यास ती तत्काळ काढून नष्ट करावीत. बेणेमळ्यातील उसाचे पाचट काढू नये.

रासायनिक खतांची मात्रा

बेणेमळातील जोमदार वाढीसाठी नेहमीपेक्षा खत मात्रा जास्त द्यावी लागते. लागणीच्या वेळी सरीत ५० किलो नत्र, ७० किलो स्फुरद  आणि ७० किलो पालाश द्यावे. प्रति हेक्टरी २५ किलो फेरस सल्फेट, २० किलो झिंक सल्फेट १० किलो आणि मॅग्नेशिअम सल्फेट लागणीच्या वेळी शेणखतात मिसळून द्यावे.

लागणीनंतर एक महिन्याने ५० किलो, दोन महिन्यांनंतर १०० किलो तिसऱ्या व चौथ्या महिन्यानंतर ५० किलो नत्र खताची मात्रा  द्यावी.

मोठ्या बांधणीच्या वेळी १०० किलो नत्र, ६० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश एकत्रित मिसळून मोठी बांधणी करावी.

मोठ्या बांधणीनंतर एक व  दोन महिन्यांनी ५० किलो नत्र पाण्यातून किंवा ठिबक सिंचनमधून द्यावे. 

ऊस बेणे प्लॉट तोडणीपूर्वी राहिलेले १०० किलो नत्र प्रति हेक्टरी द्यावे.

एक हेक्टर बेणेमळा क्षेत्रासाठी ५ टन गांडूळ खत, ६०० किलो नत्र, २३० किलो  स्फुरद आणि १२० किलो पालाश खत मात्रेची शिफारस आहे.

टीप :  बेण्याचे दर्जेदार व अधिक उत्पादन मिळविण्यासाठी आणि  २५ टक्के नत्र आणि २५ टक्के स्फुरद या अन्नद्रव्यांच्या बचतीसाठी जैविक खताची शिफारस संयुक्त कृषी परिषदेमध्ये करण्यात आली आहे.     बेणेमळा लागवडीपूर्वी एक हेक्टर उसाचे बेणे १० किलो ॲसिटोबॅक्टर आणि १.२५ किलो स्फुरद विरघळणारे जिवाणू संवर्धक १०० लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात ३० मिनिटे बुडवून लागण करावी.    बेणेमळ्यास  माती परिक्षणाच्या अहवालानुसार हेक्टरी २० टन शेणखत, ४५० किलो नत्र, १७२ किलो स्फुरद आणि ११५ किलो पालाश या रासायनिक अन्नद्रव्याचा वापर करावा.

कारखानापातळीवर लागवडीचे नियोजन

पहिले  वर्ष दुसरे वर्ष तिसरे वर्ष चौथे वर्ष पाचवे वर्ष सहावे वर्ष सातवे वर्ष

२० हेक्टर २०० हेक्टर २००० हेक्टर

२० हेक्टर २०० हेक्टर २००० हेक्टर

२० हेक्टर २०० हेक्टर २००० हेक्टर

२० हेक्टर २०० हेक्टर २००० हेक्टर

२० हेक्टर २०० हेक्टर २००० हेक्टर

बेणे मळा खत व्यवस्थापन

खत देण्याची वेळ गांडूळ खत नत्र स्फुरद पालाश

लागणीच्या

वेळी सरीमध्ये २.५ टन ५० १७० ७०

लागणीनंतर

एक महिन्याने ५०

लागणीनंतर

दोन महिन्यांनी १००

लागणीनंतर

तीन महिन्यांनी ५०

लागणीनंतर

चार महिन्यांनी ५०

मोठ्या बांधणीच्या वेळी २.५ टन १०० ६० ५०

मोठ्या बांधणी नंतर एक महिन्याने ५०

मोठ्या बांधणी नंतर दोन महिन्यांनी ५०

तोडणीपूर्वी एक महिना १००

एकूण ५ टन ६०० किलो २३० किलो १२० किलो

डॉ. अभिनंदन पाटील, ९७३७२७५८२१

डॉ. गणेश पवार, ९६६५९६२६१७

(वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी, जि. पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com