Satara News : सातारा जिल्ह्यातील १८ साखर कारखान्यांपैकी पाच कारखान्यांनी मागील हंगामात गाळप केलेल्या शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे थकविले आहेत. ही थकीत रक्कम येत्या ३१ ऑगस्टपर्यंत दिली जाईल, असे आश्वासन संबंधित कारखान्यांच्या प्रतिनिधींनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली थकीत ऊसबिलासंदर्भातील आढावा बैठक झाली. या वेळी जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी, लेखा विभागाचे संजय गोंदे, जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे कार्यकारी संचालक, साखर आयुक्त ार्यालय व लेखा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील १८ कारखान्यांपैकी किसन वीर भुईंज, किसन वीर खंडाळा कारखाना, लोकनेते बाळासाहेब देसाई कारखाना, ग्रीन पॉवर गोपूज, प्रतापगड सहकारी या कारखान्यांकडे शेतकऱ्यांची उसाची बिले थकली आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी राजू शेळके, अर्जुनराव साळुंखे यांनी शेतकऱ्यांच्या थकीत रकमेचा मुद्दा या बैठकीत उचलून धरला. अनेक कारखान्यांनी बैठकीला येण्यापूर्वीच थकीत रकमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केल्या आहेत. याचे पुरावे या वेळी सादर केले. मात्र, ज्या कारखान्यांनी अजूनही थकीत रकमा दिलेल्या नाहीत. त्यांनी त्या येत्या ३१ ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्या जातील, असे सांगितले.
दरम्यान, किसन वीर साखर कारखान्याला शासनाच्या वतीने थकहमीपोटी मोठी रक्कम मिळणार आहे. त्यातूनच कारखान्याने एफआरपीच्या थकीत रकमा शेतकऱ्यांना द्याव्यात, अशी सूचना स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली. त्यावर कार्यवाही करावी, अशी सूचना निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी संबंधित कारखान्याच्या प्रतिनिधींना केली.
वाईच्या प्रांताधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
किसन वीर साखर कारखान्याने शेतकऱ्यांची बिले अनेक वर्षांपासून रखडवली आहेत. थकीत बिले मिळत नसल्याने शेतकरी हतबल असून, या कारखान्यावर आरआरसीची कारवाई करण्याचे शासनाचे आदेश मिळूनही वाईच्या प्रांताधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केली आहे, त्यामुळे या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी बैठकीत दिला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.