Sugarcane Crop  agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Varieties : ऊस वाणांचा ऱ्हास: कारणे आणि उपाययोजना

Sugar Farming : दर्जेदार व शास्त्रशुद्ध पीक व्यवस्थापनाचा वापर केल्यास नक्कीच आपल्याला जुन्या प्रचलित ऊस वाणांचा तसेच नवीन प्रसारित झालेल्या वाणांचा व्यावसायिक कालावधी वाढवता येईल. शाश्वत ऊस विकासामधून आर्थिक प्रगतीकडे वाटचाल करता येईल.

Team Agrowon

डॉ.गणेश पवार, डॉ.अभिनंदन पाटील, डॉ.अशोक कडलग

Sugarcane Crop Management : उसाचे नवीन वाण प्रसारित होत असताना त्यांचे व्यवस्थापन हे संतुलित वातावरणात केलेले असते. योग्य अशा निविष्ठा वापरून संशोधन प्रक्षेत्रावर संशोधन केले जाते, त्यामुळे हे वाण जेव्हा वेगवेगळ्या प्रक्षेत्रावर व्यावसायिक लागवडीसाठी लागवड केले जातात तेव्हा त्यांच्यामध्ये वातावरणामुळे जैविक व अजैविक ताण निर्माण होतात. हळूहळू त्या वाणांची अनुकूलता व उत्पादन क्षमता कमी होत जाते. चांगले उत्पादन व साखर उतारा देणाऱ्या वाणांची अनुकूलता व उत्पादन क्षमता कमी होणे यालाच वाणांचा ऱ्हास असे म्हणतात. उष्णकटिबंधीय भारतात पहिले वंडर केन असलेल्या को ४१९ आणि को ४७० या प्रमुख लोकप्रिय वाणांचा ऱ्हास होऊन कालबाह्य झाल्याचे आपल्या पुढे उदाहरण आहे. चांगल्या वाणांचा ऱ्हास होणे ही भारतासारख्या प्रमुख ऊस उत्पादक देशाबरोबर जगातील इतर प्रमुख ऊस उत्पादक देशांसाठी सुद्धा समस्या बनत आहे.

वाणांच्या ऱ्हासामुळे प्रमुख व्यावसायिक वाणांचा सुरवातीचा असलेला वाढीचा जीवनचक्र, दिनमान व उत्पादन क्षमता घटल्यामुळे कमी होत आहे. त्याचबरोबर वातावरण बदलामुळे वाढलेल्या रोग व किडींच्या प्रादुर्भावामुळे चांगले वाण कालबाह्य होऊन त्यांची लागवड कमी होऊन शेवटी बंद होत आहे. रेड रॉट या रोगामुळे समशितोष्ण आणि तटीय/ द्वीपकल्पीय प्रदेशातून काही महत्त्वाचे वाण नष्ट झाले आहेत. मागील काही वर्षांमध्ये मर रोगामुळे गुजरात मधून को ६७१ या वाणाचे समूळ उच्चाटन झाले आहे. आता हेच वाण रेड रॉट रोगामुळे तमिळनाडूमध्ये नष्ट झाले आहे.

ऊस वाणांच्या ऱ्हासाचा अभ्यास :

१) ऊस वाणांच्या ऱ्हासाचा आपल्याकडे शास्त्रीयदृष्ट्या सखोल अभ्यास झालेला नाही, त्यामुळे ऊस पैदास केंद्रामध्ये अन्न मंत्रालयामार्फत ऊस अनुकूल संशोधन प्रकल्पांतर्गत वाणांच्या ऱ्हासाची कोणती संभाव्य कारणे आहेत हे उद्दिष्ट घेऊन ऱ्हासाचे प्रमुख कारण, उत्पादन घटण्यामागची कारणमीमांसा आणि ऱ्हास होणाऱ्या चांगल्या वाणांचे पुनर्जीवन/ नूतनीकरण करून त्यांची व्यावसायिक उत्पादन क्षमता टिकवण्यासाठी हा प्रकल्प सुरू केला. १९९० ते १९९५ या पाच वर्षात या अभ्यासाची निरीक्षणे नोंदवण्यात आली.

२) विविध वाणांच्या उत्पादनामध्ये २० ते ५० टक्के घट दिसून आली आहे.ऱ्हास झालेल्या वाणांची जाडी ही अत्यंत कमी होत जाते तसेच वाढ्याकडील भाग निमुळता होतो, वाढ खुंटते, कांड्या आखूड होतात. मुळ्यांची संख्या कमी होणे, आखूड व लहान पिवळी पाने होतात. मुळांची संरचना ही वरच्या भागात राहाते. त्यांचा विकास कमी होत जातो. ही काही ठळक वैशिष्ट्ये प्रामुख्याने दिसून आली. सध्या ही सर्व लक्षणे बेणे बदल न झाल्यामुळे को ८६०३२ या वाणामध्ये दिसून येऊ लागले आहेत, विशेषतः खोडवा पिकामध्ये याचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

वाणांच्या ऱ्हासाची प्रमुख कारणे :

अ) रोग व किडींचा प्रादुर्भाव

ब) पीक व्यवस्थापनाचा अभाव

क) असंतुलित वातावरणामध्ये ऊस लागवड (हंगाम सोडून लागवड)

ड) शुद्ध बेण्याचा अभाव (बेणे बदलाकडे दुर्लक्ष)

अ) रोग आणि किडींचा प्रादुर्भाव :

खोडवा वाढ खुंट (आर एस डी) हा या श्रेणीतील महत्त्वाचे वाणाच्या ऱ्हासाचे जागतिक कारण आहे. हा एक जीवाणूजन्य रोग आहे.

रोगग्रस्त बेटांची वाढ खुंटलेली असते. कांड्या आखूड होऊन त्यांची जाडी कमी होते, पाने पिवळसर पडतात, उसाच्या टोकाकडील भाग निमुळता होत जातो.

कांडीचे भाग केले असता टाचणीच्या डोक्यासारखे नारंगी रंगाचे जिवाणू कांडीच्या भागाकडे आढळून येतात. उत्पादन क्षमतेत घट होते.

हा रोग खोडवा पिकामध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. रोगाचा प्रादुर्भाव दूषित बेण्यामुळे होते. तोडणी करते वेळेस यंत्रामुळे याचा प्रादुर्भाव वाढत जातो.

रोगामुळे कांड्यांची उगवण क्षमता कमी होऊन उत्पादनात घट येते. त्यामुळेच याच्या उपाययोजनेसाठी उष्ण बाष्प हवा प्रक्रिया केलेले व त्रिस्तरीय बेणे मळा व्यवस्थापन केलेल्या बेणे मळ्यातीलच शुद्ध बेणे वापरायला हवे.

वेगवेगळ्या ऊस क्षेत्रातील वाणांच्या ऱ्हासाच्या अभ्यासांती आर एस डी हा रोग प्रमुख कारण दिसून आला आहे. ज्या भागांमध्ये वाणाचा ऱ्हास होत असतो, त्या भागांमध्ये अति प्रमाणात अर्ली शूट बोरर, खोड पोखरणारी अळी (कांडी कीड) व खवले कीड या किडींचा प्रादुर्भाव वाढलेला आढळून येतो.

ब) पीक व्यवस्थापनाचा अभाव

- अतिशय चुकीच्या पद्धतीने आणि सुमार दर्जाच्या ऊस उत्पादन तंत्रज्ञानाचा वापर हे वाणांच्या ऱ्हासाचे अप्रत्यक्षरीत्या महत्त्वाचे कारण आहे. यामुळे कीड व रोगांचा प्रचार प्रसार वाढतो. वाणांचे क्षरण

सुरू होते. यामध्ये पुढील बाबींचा समावेश होतो.

१) असंतुलित पोषण तत्त्वांचा वापर:

यामध्ये सेंद्रिय खतांचा कमी वापर, लागणीच्या वेळी रासायनिक खतांच्या मात्रेचा अभाव, स्फुरद व पालाश खतांचा कमी किंवा अपुरा वापर, तसेच नत्र स्फुरद पालाश यांचा २:१:१ या प्रमाणापेक्षा वेगळ्या प्रमाणात व भरमसाट नत्र खतांचा वापर. चुकीच्या पीक वाढ आणि पक्वता अवस्थेपर्यंत पाण्यामध्ये विरघळणाऱ्या विद्राव्य खतांचा वापर.

२) अशुद्ध बेण्याचा वापर:

बरेच शेतकरी हे स्वतःच्या शेतातील अतिपक्व किंवा खोडवा पिकातील बेणे किंवा रोगग्रस्त ऊस मळ्यातील बेणे किंवा रोपे लागवडीस वापरतात. वाणांच्या ऱ्हासामागील हे अत्यंत महत्त्वाचे कारण आहे.

३) दुर्लक्षित खोडवा पीक:

लागण ऊस पिकाकडे दुर्लक्ष असेल तर खोडवा पिकाकडे अति दुर्लक्ष होते, त्यामुळे पीक वेगवेगळ्या कीड व रोगांना बळी पडते, तसेच दोन ते तीन सलग खोडवे जर योग्य काळजी न घेता घेतले तर अशा क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. वाणांचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात घडून येतो. यातून जमिनीची उत्पादकता व एकूणच उत्पादन क्षमता घटते.

४) अति सिंचन आणि अयोग्य निचरा प्रणाली:

कॅनॉल सिंचित क्षेत्रामध्ये अति प्रमाणातील पाण्याचा वापर ही प्रमुख समस्या आहे. जमिनीतून पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य निचरा प्रणाली नसणे, यातून खारपण, चोपन जमिनीचे वाढते प्रमाण, पाणी पातळीचे जमिनीलगत वाढणे, अति ओलावा, पाणथळ जमिनी तसेच बहुवार्षिक तणांची समस्या वाढताना दिसत आहेत. यामुळे ऊस पिकाची होणारी सुमार वाढ व जमिनीची घटणारी उत्पादकता या आणि अशा अनेक समस्यांमुळे वाणांचा ऱ्हास होण्याची प्रमाण वाढत आहे.

५) एकल ऊस पीक पद्धती:

वर्षानुवर्षे एकाच क्षेत्रावर उसानंतर ऊस हे पीक घेतल्यामुळे जमिनीची उत्पादकता व सुपीकता कमी होत आहे. कीड, रोगांचे जीवनचक्र त्या क्षेत्रावर वाढत जाऊन वाणांचा ऱ्हास वाढत आहे. तेथील कीड व रोगांची प्रतिकारकता वाढत जाऊन रासायनिक कीडनाशकांचा वापर करून नियंत्रण होत नाही येत नाहीत त्यामुळे त्यांचा वाढता वापर व त्यातून होणारे सूक्ष्मजीवांची हानी हे दृष्टचक्र व यातून पीक व्यवस्थापन करणे अत्यंत कष्टाचे व खर्चिक बनत आहे.

क) प्रतिकूल ऊस वाढ परिस्थिती

प्रतिकूल परिस्थितीमध्ये खारपण, चोपण, अति आम्ल जमिनी, पाणथळ, अति ओलावा, पाण्याची कमतरता, खडकाळ व हलक्या जमिनीवर लागण यासारख्या जमिनीमुळे उसाच्या वाणांची उत्पादन क्षमता घटत आहे.

सद्य स्थितीमध्ये वाढते क्षेत्र, लहरी मॉन्सून पावसामुळे पाण्याचा अभाव/ दुष्काळ, पूर परिस्थिती व अशास्त्रीय व्यवस्थापन यातून हा ऱ्हास वाढत आहे. त्यातूनच नवीन शिफारस झालेल्या वाणांची सुद्धा उत्पादनक्षमता अशा परिस्थितीमुळे अचानक घटत आहे. त्यामुळे त्या वाणांचा व्यावसायिक जीवनक्रम घटत आहे. नवीन वाण निर्माण करणे हे ऊस पैदासकार शास्त्रज्ञांसाठी अत्यंत आव्हानात्मक बनत आहे.

ड) बेणे बदलाकडे दुर्लक्ष

बऱ्याच कारखान्याकडे बेणेमळा आणि रोप उत्पादनांचा अभाव आहे, त्यामुळे शेतकरी स्वतःकडे बेणे वापरतात. त्यातूनच वेगवेगळे रोग आणि किडींचा प्रादुर्भाव वाढतो. चार-पाच वर्षात त्या वाणांची उत्पादन क्षमता घटते. आरएसडी, गवताळ वाढ, काणी व मर या रोगामुळे वाणांचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात घडून येतो. - कारखान्याकडे स्वतःचे बाष्प उष्ण हवा प्रक्रिया सयंत्राचा अभाव आहे. या प्रक्रियेमुळे कमकुवत बेणे मरत असल्यामुळे रोपवाटिकेत रोप तयार करणारे या संयंत्राचा वापर करत नाहीत. त्यामुळे या संयंत्राचा वापर कमी होत आहे.

मंड्या जिल्ह्यातील (कर्नाटक) सटानुर भागामध्ये को ४१९ हे वाण तेथील ऊस विकास अधिकाऱ्याने शेतकऱ्यांना उष्ण बाष्प हवा प्रक्रिया करून पुरविल्यामुळे हे वाण त्या परिसरात चांगले वाढले व टिकून राहिले, परंतु बाजूच्या खेड्यातील की ४१९ या वाणाचा विना प्रक्रियेमुळे ऱ्हास झाल्याचे दिसून आले.

त्यामुळे ऊस उत्पादनामध्ये शुद्ध बेण्याचा वापर महत्त्वाची बाब आहे.

मोठ्या प्रमाणातील वाणांच्या ऱ्हासामुळे नव्याने प्रसारित झालेल्या वाणांचा व्यावसायिक कालावधी घटत आहे, त्यामुळे वातावरण अनुकूल व लवकरात लवकर नवीन वाण तयार करणे हे संशोधकांसाठी मोठे आव्हान ठरत आहे.

वाणांचे पुनर्जीवन :

उत्कृष्ट शेती पद्धतीच्या माध्यमातून जुन्या वाणांची उत्पादन क्षमता शुद्ध व रोग मुक्त (ऊतीसंवर्धित) बेणे बदलाच्या माध्यमातून अधिकतम पातळीवर आणणे महत्त्वाचे आहे. तयार केलेल्या वाणांचा यामुळे व्यावसायिक लागवड कालावधी वाढवता येणे शक्य होईल. नवीन शिफारस झालेल्या वाणांची उत्पादकता टिकून ठेवण्यास मदत होईल.

वाणांचे नूतनीकरण करण्यासाठी उष्ण बाष्प हवा प्रक्रीया,उती संवर्धित रोपांची लागण,(बेणेमळा) व शास्त्रशुद्ध पीक व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब या तीन बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.

वाणांच्या ऱ्हासांच्या कारणांमध्ये आरएसडी, खोडवा वाढ खुंट रोग, जीएसडी (गवताळ वाढ),काणी, मर, अर्ली शूट बोरर, पाणथळ, खारपण व चोपण जमिनी,पूर परिस्थिती तसेच अवर्षण परिस्थिती, रासायनिक खतांचा असंतुलित वापर, कमी दर्जाच्या बेण्याचा वापर, सुमार दर्जाचे खोडवा व्यवस्थापन, भरमसाट पाण्याचा वापर व निकृष्ट निचरा प्रणाली, बहुवार्षिक तणांचा प्रादुर्भाव, उष्ण बाष्प हवा प्रक्रियायुक्त बेण्याचा अभाव, एकल पीक पद्धती, विषारी घटकांचा जैविक व अजैविक ताण, बेसुमार कीडनाशक आणि तणनाशकांचा वापर, सेंद्रिय कर्बाचे घटते प्रमाण (सेंद्रिय खतांचा अभाव) हे सर्व घटक मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरतात.

ऊतीसंवर्धित बेणे हे खात्रीशीरपणे रोगमुक्त असते. हे बेणे वाढीस जोमदार व नत्रयुक्त खतांना चांगला प्रतिसाद देतात. या तंत्राने बेण्याचे गुणन मोठ्या प्रमाणात करता येते. त्यातून बेणे बदल वेगाने होऊ शकतो. तसेच बेणेमळ्याचे व्यवस्थापन हे दर्जेदारपणे केल्यास बेण्याची उगवण क्षमता वाढते. हेक्टरी एक लाख गाळपायोग्य उसाची संख्या मिळून एकूण उत्पादन क्षमता वाढीस लागते.

डॉ. गणेश पवार, ९६६५९६२६१७

डॉ. अभिनंदन पाटील,९७३७२७५८२१

(वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी, पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT