Sugarcane Crop Management : पूरपरिस्थितीतील ऊस पिकाचे व्यवस्थापन

Sugarcane Farming : अति पाऊस आणि पूरपरिस्थितीमुळे ऊस पिकाच्या वाढीवर परिणाम झाला आहे. पूर ओसरल्यानंतर उसाच्या वाढीसाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि वाढीच्या टप्प्यानुसार नियोजनामध्ये बदल करणे आवश्‍यक आहे.
Sugarcane Crop
Sugarcane CropAgrowon
Published on
Updated on

डॉ.अशोक पिसाळ

Sugarcane Production : अति पावसामुळे नद्यांना पूर येऊन काठावरील ऊस १० ते १५ दिवस पाण्याखाली बुडला आहे. पुराचे पाणी झपाट्याने वाढते, परंतु पुराचे पाणी ओसरण्यास जास्त कालावधी लागतो. त्यामुळे अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीत ऊस पिकाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी पुढीलप्रमाणे उपाययोजना करावी.

अ) पूर्ण बुडालेल्या उसाचे पुराच्या

पाण्यामुळे झालेले नुकसान

उसाच्या शेंड्यात तसेच पानावर गाळमिश्रीत ओल्या चिखलाचा थर बसल्याने शेंडा कुजून पाने वाळू लागतात, वाढ खुंटते. शेंड्याकडून ऊस खाली वाळत जातो.

पाण्यात बुडालेल्या कांड्यांना मुळ्या फुटतात. पांगशा फुटू लागतात. पांगशा फुटलेल्या उसामध्ये दशी (पोकळी) होण्याचे प्रमाण वाढते.

पुराच्या पाण्यात ८ ते १० दिवसांच्या कालावधीसाठी पूर्ण बुडालेल्या पिकाचे ८० ते १०० टक्के नुकसान होऊ शकते.

उपाययोजना

पूरबुडित क्षेत्रातील साठलेले पाणी चराद्वारे बाहेर काढावे.

पूरबुडित क्षेत्रातील उसाला १५ ते २० कांड्या असतील तर अशा ठिकाणी वाफसा येताच जमिनीलगत तोडणी करून ऊस कारखान्यास पाठवावा किंवा गूळ करण्यासाठी वापरावा.

पुरात बुडालेल्या उसाला पांगशा फुटण्याची दाट शक्यता असते. अशावेळी साखर कारखाने चालू होईपर्यंत (ऑक्टोबर/नोव्हेंबर दरम्यान) उसाला आलेल्या पांगशा काढाव्यात. फक्त शेंड्याकडील एक ते दोन पांगशा तशाच ठेवाव्यात. साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होताच अशा उसाच्या तोडणीस प्राधान्य देऊन त्याचे प्रथम गाळप करावे.

पूरबुडित क्षेत्रातील ऊस पूर्ण पाण्याखाली राहून कुजून वाळला असल्यास असा ऊस जमिनीलगत कोयत्याने तोडून कंपोस्ट खत तयार करण्यासाठी वापरावा. जमिनीलगत तोडलेल्या उसाचा खोडवा राखल्यास तोडणी केलेल्या बुडख्यावर एक ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

Sugarcane Crop
Sugarcane Farming : अभ्यासूवृत्तीने वाढवली उसाची उत्पादकता

ब) उसाचे शेंडे (वाढे) पुराच्या पाण्याच्यावर राहिल्यास होणारे नुकसान

उसाची खालील पाने पाण्यात जास्त दिवस राहिल्यास तसेच कांडीवर ओल्या मातीचा थर बसून पाने कुजून वाळून जातात.

कांडीवरील पानाच्या टोपणामध्ये गाळाची माती बसते, त्यामुळे कांड्यांना मुळे फुटतात. कांडीवरील डोळे फुगीर होऊन पांगशा फुटण्यास सुरुवात होते. त्यामुळे उत्पादनात घट येते. प्रत बिघडते.

ऊस क्षेत्रात जास्त दिवस पाणी राहिल्याने जमिनीची सच्छिद्रता व जमिनीची जैविक पातळी कमी होते. जमिनीमध्ये असणारी अन्नद्रव्ये वाहून जातात. अन्नद्रव्यांचे स्थिरीकरण होऊन रासायनिक सुपीकता कमी होते.

पीक वाढीसाठी लागणाऱ्या अन्नद्रव्यांची कमतरता भासते. त्यामुळे वाढ खुंटते, तसेच पुराच्या पाण्यामुळे मुळ्या अकार्यक्षम होऊन लोळण्याचे प्रमाण वाढते.

नत्र, स्फुरद, पालाश, गंधक, जस्त इत्यादी अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी होऊन उत्पादनावर परिणाम होतो.

पूरबडित क्षेत्रातील उसाच्या कांड्या पुराच्या पाण्यात आणि उसाचे शेंडे पुराच्या पाण्याच्यावर असल्यास उत्पादनात २० ते ३० टक्के घट येऊ शकते.

उपाययोजना

वाफसा येताच सरीमध्ये साठून राहिलेले पाणी चर काढून शेताबाहेर काढावे.

खालील वाळलेली, कुजलेली पाने सरीत टाकून हवा खेळती ठेवावी.

पूरबुडित क्षेत्रातील ऊस खाली लोळले असतील, तर ते उभे करून एकमेकास बांधून घ्यावेत, जेणेकरून कांड्या जमिनीला चिकटून त्यांना मुळ्या किंवा डोळे (पांगशा) फुटणार नाहीत.

पूरबुडित क्षेत्रामध्ये लहान उसाचे शेंडे (वाढे) कुजले किंवा वाळले तर असे ऊस जमिनीलगत छाटून शेताबाहेर नष्ट करावेत.

पूरबुडित क्षेत्रामध्ये सुरू ऊस लागण (डिसेंबर/जानेवारी) क्षेत्रासाठी शिफारशीच्या २५ टक्के नत्र, स्फुरद आणि पालाश ही रासायनिक खते पाणी ओसरल्यानंतर जमीन वापशावर असताना सरीमधून द्यावीत. म्हणजे उसाची वाढ चांगली होऊन उत्पादनात होणारी घट कमी करता येईल.

पूरबुडित क्षेत्रासाठी एकरी १० किलो झिंक सल्फेट सेंद्रिय खतामधून द्यावे.

Sugarcane Crop
Sugarcane Farming: कमी खर्चात ऊस लागवड करणारे यंत्र

नदीबुडित क्षेत्रात लागण करताना घ्यावयाची काळजी

नदीबुड क्षेत्रात लागवडीसाठी लवकर आणि उंच वाढणाऱ्या को-८०१४, को-८६०३२ आणि कोएम-०२६५ या ऊस जातींची निवड करावी.

नदीबुड क्षेत्रात लागवड पूर्व हंगामी(ऑक्टोबर/नोव्हेंबर) महिन्यात करावी. लागण लवकर केल्याने पूर परिस्थितीत (जुलै/ऑगस्ट) उसाचे शेंडे पुराच्या पाण्यावर राहतील.

पूर ओसरल्यावर उशिरा आडसाली अथवा लवकर पूर्वहंगामी लागण करताना प्लॅस्टिक ट्रेमध्ये कोकोपीट वापरून तयार केलेली ४५ ते ५० दिवस वयाची रोपे लागवडीसाठी वापरावी.

नदीबुड क्षेत्रात खरिपातील भात पिकानंतर ऊस लागवड करावयाची असल्यास अशा ठिकाणी हंगाम साधण्यासाठी प्लॅस्टिक पिशवीत ऊस रोपे तयार करून लागणीकरिता ४५ ते ५० दिवसांनंतर वापरावीत.

नदीबुड क्षेत्रातील उसाला सेंद्रिय व रासायनिक खतांची संतुलित मात्रा द्यावी. त्यामुळे उसाची जोमदार वाढ होते. शेंड्यावरील भाग पुराच्या पाण्याच्या पातळीवर राहिल्याने नुकसान कमी होते.

नदीकाठच्या क्षेत्रात नवीन लागवड करताना रुंद सरी, सरी, जोड ओळ, पट्टा पध्दतीचा अवलंब करावा.

मूलस्थानी जलसंधारण

कोरडवाहू क्षेत्रात ओलीचा पुरेपूर फायदा घेऊन रब्बी पिकांची पेरणीची तयारी करावी. यामध्ये मूलस्थानी जलसंधारणासाठी मध्यम खोल जमिनीत ६ बाय ६ मीटर आणि खोल जमिनीत १० बाय १० मीटर आकाराचे सपाट बंदिस्त वाफे तयार करून पडणारा प्रत्येक पावसाचा थेंब जमिनीत जिरवला असता ओलाव्यात वाढ होऊन रब्बी ज्वारीचे उत्पादन वाढते.

हलक्या जमिनीत समपातळीत बांध केल्यास पाणी अडविले जाऊन वाहून जाणारे मातीचे कण, अन्नांश तसेच ओलावा जमिनीत साठविण्यास मदत होते. दोन बांधामधील जमिनीवर मशागत करताना उताराला आडवे सारे अथवा सरी वरंबे करून पावसाचे पाणी मूलस्थानी जिरवावे.

डॉ. अशोक पिसाळ, ९९२१२२८००७

(सहयोगी संशोधन संचालक, विभागीय कृषी संशोधन केंद्र, शेंडा पार्क, कोल्हापूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com