Vegetable  Agrowon
ॲग्रो विशेष

Healthy Vegetable : आरोग्यदायी रानभाजी करटुल्याची लागवड

Kartule Vegetable : करटुली ही बारमाही वेल असून, तिला कंदयुक्त मुळे असतात. ४ मीटर लांब द्राक्षाच्या घड्यासारख्या लता तंतू असतात. भारतामध्ये मेघालय राज्यात सर्वांत जास्त प्रमाणात आढळते.

Team Agrowon

डाॅ. ए. पी. गरडे , आर. आर. राठोड, ए. एस. काळे

Forest Vegetables : करटुली ही बारमाही वेल असून, तिला कंदयुक्त मुळे असतात. ४ मीटर लांब द्राक्षाच्या घड्यासारख्या लता तंतू असतात. भारतामध्ये मेघालय राज्यात सर्वांत जास्त प्रमाणात आढळते. कोवळे, नाजूक, हिरव्या रंगाचे कच्चे फळ सामान्यतः भाजी म्हणून वापरले जाते. त्याच्या विशिष्ट कडसर चवीमुळे त्याचे लोकप्रियता वाढत आहे. या पिकाची पाने, फुले व कंदयुक्त मुळे यांचाही आहारामध्ये वापर करता येतो.

शास्त्रीय नाव : मोमोर्डिका डायोका (Momordica dioica)

कुळ : Cucurbitaceae

प्रमुख आढळणारे देश ः भारत, पाकिस्तान, बांगलादेश व श्रीलंका.

औषधी गुणधर्म

पानांच्या रसाने ताप कमी होतो. कंदमुळाच्या सेवनाने डोकेदुखी कमी होते. अतिरिक्त घाम येणे थांबते. मधुमेह आणि ताप कमी होतो.

कंदमुळाचे सेवन हे मूतखडा, डोकेदुखी, हगवण, संधिवात, रक्त प्रवाह, इ. व्याधींवर रामबाण इलाज ठरतो.

करटुल्याच्या बियांचा वापर छातीच्या समस्या दूर करण्यासाठी करतात. लघवी प्रवाह उत्तेजित करते.

वातावरण / हवामान

उष्ण व दमट वातावरणात करटुल्याचे पीक चांगले येते. तापमान २५ ते ३५ अंश सेल्सिअस लागते. सरासरी वार्षिक पर्जन्यमान १५० ते २०० सेंमी एवढे असावे.

लागवडीसाठी जमीन

जमिनीचा सामू ५.५ ते ७, रेताड, चिकण किंवा वालुकामय माती चालते. चिकण मातीमध्ये पीक चांगले येते. पाण्याचा निचरा चांगला होणारी व सेंद्रिय पदार्थ जास्त असणारी जमीन लागवडीसाठी योग्य आहे.

मशागत

जमीन चांगली नांगरल्यानंतर एक वखरणी करावी. शेवटच्या वखरणीच्या आधी १५ ते २० टन चांगले कुजलेले कंपोस्ट खत टाकावे. लागवडीसाठी २ मी. × १ मी. किंवा २ मी. × २ मीटर अंतरावर सुमारे ५० × ५० × ५० सेंमी आकाराचे खड्डे करून घ्यावेत. या खड्ड्यामध्ये माती, वाळू आणि चांगले कुजलेले शेणखत ५ किलो या प्रमाणात मिसळून भरावे. बेसल डोस म्हणून १५० ग्रॅम सिंगल सुपर फाॅस्फेट आणि ५० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश मिसळावे. नत्रयुक्त खत २ वेळा विभागून टाकावे. त्यातील जवळपास ८० ग्रॅम नत्र हे झाडांच्या मुळांच्या परिसरात विखरून गेले पाहिजे. त्यामुळे वेलीची चांगल्या प्रकारे वाढ होते. खड्ड्यांमध्ये वाढलेली तणे वेळच्या वेळी काढून घ्यावीत.

लागवडीचा काळ

उन्हाळ्यामध्ये खोदून ठेवलेल्या खड्ड्यामध्ये माती, वाळू, कुजलेले शेणखत यांचे मिश्रण भरून ठेवले असेल. या खड्‍ड्यांमध्ये चांगल्या पावसानंतर जूनअखेर ते जुलै महिन्यामध्ये लागवडीला सुरुवात करावी. हे ११५ ते १२४ दिवसांचे पीक आहे. आता लागवड केल्यानंतर सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यांमध्ये पीक काढणीला येते. या पिकाच्या ४ तोडणी होतात. करटुले पिकाचे कंद ४ ते ५ वर्षांपर्यंत राहतात. लागवड बिया व कंद लावून दोन्ही प्रकारे करता येते.

खते

जमिनीच्या मशागतीवेळी शेणखत १५ ते २० टन प्रति हेक्टरी जरूर वापरावे. पीक कालावधीमध्ये नत्र, स्फुरद, पालाश १२०ः८०ः८० किलो प्रति हेक्टर या प्रमाणात द्यावे. स्फुरद आणि पालाश खते लागवडी वेळी द्यावीत. नत्रयुक्त डोस दोन वेळा विभागून द्यावा. पहिला हप्ता वेल पडायला सुरू झाल्यानंतर, आणि दुसरा अर्धा हप्ता फुले येण्याच्या आधी द्यावा.

सिंचन

पेरणी किंवा कंद लागवडीनंतर लगेच पाणी द्यावे. जमिनीच्या मगदुराप्रमाणे व पावसाळ्यातील पावसाचा अंदाज घेऊन ४ चे ५ दिवसांनी किंवा आठवड्याच्या अंतराने एक किंवा दोन वेळा पाणी द्यावे. जास्त पाणी साचू देऊ नये, अन्यथा मुळे कुजून जातात.

वेलीला आधार देण्याची पद्धत

वेलवर्गीय पीक असल्यामुळे वेलींना आधार देण्यासाठी लाकूड किंवा बांबूचा वापर केला जातो. त्यासाठी सिंगल स्टेक सिस्टिम, बोअर आणि किनिफिन सिस्टम वापरतात. आधार दिला तर वेलीची वाढ चांगली होऊन फळांचे अधिक उत्पादन मिळते.

कीड व रोग व्यवस्थापन

या पिकामध्ये मावा, पांढरी माशी, फळमाशी या किडींचा प्रादुर्भाव होतो. तर रोगांमध्ये भुरी, ॲन्थ्रक्नोज, पानावरील ठिपके, मोझॅक यांचा समावेश असतो. तसेच विषाणूजन्य रोगामुळे पिवळ्या रंगाचे पॅटर्न फुलांवर व पानांवर दिसतात. पाने आणि पानाचे देठ खालील बाजूला वाकतात व मुरगळतात. वाढ खुंटते आणि फुलांवर पांढऱ्या रेषा दिसतात. शेतात सूत्रकृमींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मशागतीवेळी निमकेक टाकावा. शेतामध्ये झेंडू किंवा सूत्रकृमींचे यजमान नसलेली पिके आंतरपीक म्हणून घेता येतात.

फुले व फळे येण्याचा कालावधी

लागवडीनंतर साधारणतः ५० ते ६० दिवसांनी फुले येण्यास सुरुवात होते. पहिल्या वर्षी ७५ ते ८० दिवसांनी फळे तोडणी सुरू होते. दुसऱ्या वर्षी ३५ ते ४० दिवसांनी फळांची सुरू होते. फळ हिरवे कोवळ्या स्थितीतच तोडावे. हेक्टरी साधारण ४० ते ५० क्विंटल इतके उत्पादन मिळते.

पोषक घटक

१०० ग्रॅम करटुल्यामधील

प्रमुख घटक व मूलद्रव्ये

घटक प्रमाण

क्रूड प्रथिने १९.३८ ग्रॅम

क्रूड लिपिड ४.७० ग्रॅम

क्रूड फायबर २१.३० ग्रॅम

कर्बोदके ४७.९२ ग्रॅम

कॅलोरिफिक मूल्य ३११.५० ग्रॅम

राख ६.७ ग्रॅम

कॅल्शिअम ३३ मिलिग्रॅम

फॉस्फरस ४२ मिलिग्रॅम

लोह ४.६० मिलिग्रॅम

रिबोफ्लॅविन ०.१८ मिलिग्रॅम

थायमिन ०.०५ मिलिग्रॅम

आर्द्रता ८४-८७%

कॅरोटिन बिटा करोटिन.

ॲण्टिऑक्सिडेंट, जीवनसत्त्व सी

लागवडीसाठी महत्त्वाच्या जाती

जाती प्रकाशन वर्षे उत्पादन (क्विंटल / हेक्टर) लागवडीसाठी शिफारशीत क्षेत्र

इंदिरा कंकोडा -१ २००७ / सी.व्ही.आर.सी. ३०-३५ महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर प्रदेश

इंदिरा कंकोडा -२ २०२०/सी.व्ही.आर.सी. ३५-४५ महाराष्ट्र, झारखंड

स्थानिक जात -- -- महाराष्ट्र

बियांचे प्रमाण दर

३०००-५००० कंद प्रति हेक्टर

२५००-२६५० कंद प्रति हेक्टर

बियाणे - २.५ ते ५ किलो प्रति हेक्टर.

नर : मादी प्रमाण १ः८

(म्हणजेच नर झाडे ३००-३५० इतकी, तर मादी झाडे २२००-२३०० असावीत.)

डाॅ. ए. पी. गरडे, ८४०८८३८४५०, (सहायक प्राध्यापक, उद्यान विद्या विभाग, छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था, कृषी महाविद्यालय, कांचनवाडी, छत्रपती संभाजीनगर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Road Committee: शेतरस्त्यांसाठी समिती स्थापन करणार : फडणवीस

Mahakrushi App: ‘महाकृषी’ ॲपमुळे कामकाजात पारदर्शकता

APMC Cess Scam: सेस चोरीप्रकरणी ‘पणन’ने अहवाल मागविला

Maize Production: राज्यात यंदा खरिपात मका क्षेत्र वाढीचा अंदाज

Raisin Illegal Import: चीनमधून बेदाण्यांची बेकायदा आयात थांबवा

SCROLL FOR NEXT