Vegetable Farming : फुलशेती, भाजीपाला लागवडीतून मिळाला शाश्‍वत उत्पन्नाचा मार्ग

Floriculture : भायेगाव (ता.जि. नांदेड) येथील प्रयोगशील महिला शेतकरी सीमा रामदास कोल्हे यांनी बाजारपेठेची गरज ओळखून पारंपरिक पिकांऐवजी फुलशेती, भाजीपाला पिकांच्या लागवडीचे नियोजन सुरू केले. सुधारित शेती तंत्रज्ञानासाठी त्यांनी कृषी विज्ञान केंद्रातून प्रशिक्षण घेतले.
Women Empowerment
Women EmpowermentAgrowon
Published on
Updated on

Improved Agricultural Technology : नांदेड शहरापासून साधारणपणे वीस किलोमीटर अंतरावर गोदावरी नदी काठावर असलेल्या भायेगाव (ता. जि. नांदेड) येथील कृषी सखी सीमा रामदास कोल्हे यांनी व्यवस्थापन आणि बाजारपेठेची गरज ओळखून फुलशेती तसेच भाजीपाला पिकांच्या लागवडीचे नियोजन सुरू केले.

शेतातील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी घरी सेंद्रिय निविष्ठा तयार करण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांना पोखर्णी कृषी विज्ञान केंद्राकडून प्रशिक्षण मिळाले. या सेंद्रिय निविष्ठांचा त्यांना शेतीत खर्च कमी करण्यात फायदा होत आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानकडून (उमेद) त्यांची कृषी सखी म्हणून निवड झाली आहे. या माध्यमातून त्यांनी गावातील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली आहे.

पीक बदलाच्या दिशेने...

दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या सीमा रामदास कोल्हे यांच्या एकत्रीत कुटुंबाकडे नऊ एकर शेती आहे. गोदावरी नदी जवळ असल्याने शेतीला पाण्याची सोय आहे. तसेच विहीर, कूपनलिकाही त्यांच्याकडे आहे. तीन कुटुंबांचा विस्तार असलेल्या सीमा कोल्हे यांच्या कुटुंबाच्या शेतीत पूर्वी ऊस, केळी लागवड होती. परंतु या पिकांना रानडुकरांचा त्रास वाढला. यामुळे नाइलाजाने ऊस, केळी लागवड बंद करून सोयाबीन, कापूस, गहू, हरभरा, ज्वारी या पिकांच्या लागवडीकडे त्या वळल्या.

परंतु या पिकांच्या उत्पादनातून फारशी मिळत होत नव्हती. त्यामुळे कोल्हे दांपत्याने वर्षभर उत्पन्न मिळण्यासाठी वांगी, गवार, मेथी, कोथिंबीर या भाजीपाल्यासह कागडा, मोगरा, गुलाब या फुलझाडांच्या लागवडीचा निर्णय घेतला. नांदेड शहरजवळ असल्याने त्यांना भाजीपाला आणि फुलांच्या विक्रीतून आर्थिक गणित बसविले. पीक व्यवस्थापनासाठी सेंद्रिय निविष्ठा निर्मिती त्यांनी सुरू केली.

Women Empowerment
Vegetable Farming : व्यावसायिक भाजीपाला लागवडीचे नियोजन

पंधरा गुंठ्यांत फुलशेती

सीमा कोल्हे यांनी गावालगत असलेल्या शेतीत कागडा, मोगरा लागवड केली आहे. आठ गुंठे क्षेत्रावर कागडा आणि सात गुंठे क्षेत्रात नव्याने मोगरा लागवड केली आहे. दरवर्षी ऑगस्ट ते मार्च या कालावधीमध्ये कागडा फुलांचे उत्पादन मिळते.

दररोज सरासरी दहा ते पंधरा किलो फुलांचे उत्पादन मिळते. कागड्याला बाजारात मागणीनुसार प्रतिकिलो शंभर ते तीनशे रुपये दर मिळतो. मागील वर्षी आठ महिन्यांत वीस क्विंटल कागडा फुलांचे उत्पादन मिळाले, यातून खर्च वजा जाता ८० हजार रुपयांची मिळकत झाली.

वर्षभर भाजीपाल्यांचे उत्पादन

सीमा कोल्हे यांनी आर्थिक उत्पन्न वाढीसाठी नांदेड बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन वांगी, गवार, मेथी, कोथिंबीर, लागवडीचे नियोजन केले आहे. सध्या त्यांच्याकडे आठ गुंठे क्षेत्रावर वांग्याची लागवड आहे. दर दोन दिवसाला ७० किलो वांगी उत्पादन होते. सध्या नांदेड बाजारात वांग्याला पन्नास रुपये प्रति किलो दर मिळतो.

वांगी उत्पादनातून प्रतिमहिना खर्च वजा जाता पंधरा हजाराचे उत्पन्न मिळते. सात गुंठ्यांतील गवार लागवडीतून एक दिवस आड तीस किलो शेंगा निघतात. गवारीस प्रति किलो पन्नास रुपये दर मिळतो. गवारीपासून महिन्याला पंधरा रुपये उत्पन्न मिळते, असे सीमाताई सांगतात.

Women Empowerment
Agriculture Success Story : आदिवासी पाड्यांवर महिलांनी घडवली धवलक्रांती

शेणखताची उपलब्धता

सीमा कोल्हे यांच्याकडे तीन गावरान गाई, दोन बैल आणि तीन कालवडी आहेत. या पशुधनापासून मिळणारे शेणखत भाजीपाला व फुलशेतीसाठी वापरले जाते. गोमूत्रापासून जिवामृत, बीजामृत, दशपर्णी अर्क, अग्निशास्त्र, निमास्त्र आदी निविष्ठा तयार करून त्या शेतात वापरल्या जातात. यासाठी त्यांना पोखर्णी कृषी विज्ञान केंद्रामध्ये सात दिवसांचे प्रशिक्षण मिळाले आहे. या निविष्ठांच्या उत्पादनातून त्यांनी व्यवस्थापन खर्चात बचत केली आहे.

महिला उत्पादन समूहाची नोंदणी

भायेगावमध्ये १८ सप्टेंबर २०२० मध्ये महिलांनी एकत्र येत महालक्ष्मी माता फुलशेती महिला उत्पादन समूहाची स्थापना केली. याची नोंदणी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाकडे करण्यात आली आहे. या गटात १७ महिलांचा समावेश आहे. या गटाचे खाते तुप्पा येथील भारतीय स्टेट बँकेत आहे. या खात्यामध्ये प्रत्येक सदस्या दर महिन्याला प्रत्येकी ५० रुपयांची बचत करतात. यातून सध्या अंतर्गत आर्थिक गरजा भागविल्या जात आहेत.

महालक्ष्मी माता फुलशेती महिला उत्पादन समूहामध्ये जयाबाई संजय पुयड (अध्यक्ष), ऊर्मिला शंकर खोसडे (सचिव) आणि सदस्या म्हणून निकिता राजू कोचार, सीमा प्रकाश खोसडे, महानंदा संजय कोचार, कविता कोडिंबा खोसडे, ज्योती माधव पुयड, रेवता बाबू खोसडे, गिरिजा बालाजी खोसडे, सविता आनंद खोसडे, दीपाली भुजंग कोचार, छाया त्रिमुख पुयड, लक्ष्मी गोविंद कोल्हे, प्रियंका माधव खोसडे, सीमा रामदास कोल्हे यांचा सहभाग आहे.

कृषी विज्ञान केंद्राचे मार्गदर्शन :

महालक्ष्मी माता फुलशेती महिला उत्पादन समूहातील सदस्यांची समूह आद्यरेशीय तेलबिया व कडधान्य पीक प्रात्यक्षिकासाठी निवड करण्यात आली होती. या समूहाला कृषी विज्ञान केंद्राचे संचालक डॉ. एस. डी. मोरे, वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉ. देविकांत देशमुख यांच्या उपस्थितीत सोयाबीन, उडीद आणि तूर बियाणे वाटप करण्यात आले.

या वेळी कृषी विद्या तज्ज्ञ संदीप जायभाये, माणिक कल्याणकर, अलका पवळे-पाटील, डॉ. महेश अंभोरे उपस्थित होते. समूहातील सदस्यांना बीज प्रक्रियेसाठी जिवाणू संवर्धक आणि ट्रायकोडर्मा वितरित करून वापरण्याबाबत प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. समूहाच्या गरजेनुसार सुधारित शेती तंत्रज्ञानविषयक प्रात्यक्षिकांचे आयोजन केले जाते.

- सीमा कोल्हे ९८८१६४६६८०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com