Cucumber Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Cucumber Farming : काकडीचे आंतरपीक ठरतेय किफायतशीर

Cucumber Production : गुंडा (ता. वसमत, जि. हिंगोली) येथील शेतकऱ्यांनी हळद आणि कपाशीमध्ये काकडीच्या आंतरपिकाचा पॅटर्न तयार केला आहे. अडीच महिन्यांत शेतकऱ्यांना काकडी पिकातून अतिरिक्त उत्पन्न मिळू लागले आहे.

माणिक रासवे

माणिक रासवे

Intercropping : गुंडा (ता. वसमत, जि. हिंगोली) येथील शेतकऱ्यांनी हळद आणि कपाशीमध्ये काकडीच्या आंतरपिकाचा पॅटर्न तयार केला आहे. अडीच महिन्यांत शेतकऱ्यांना काकडी पिकातून अतिरिक्त उत्पन्न मिळू लागले आहे. यातून मुख्य पिकांचा खर्च कमी होण्यास मदत झाली. काकडी पिकामुळे हिंगोली, परभणी बाजारपेठेत गुंडा गावाने वेगळी ओळख तयार केली आहे.


परभणी ते वसमत राष्ट्रीय महामार्गावरून झीरोफाट्याहून जवळा बाजार मार्गे औंढा नागनाथकडे जाणाऱ्या राज्य रस्त्यावर सुमारे दहा किलोमीटरवर गुंडा (ता.वसमत) फाटा आहे. तेथून एक किलोमीटर आत गावशिवार आहे. पूर्णा नदीवरील येलदरी-सद्धेश्‍वर धरण कालव्याच्या पाण्याचा गावाला सिंचनासाठी फायदा होतो. कालवा, कूपनलिका, विहिरीद्वारे गावातील सुमारे साडेनऊशे हेक्टर क्षेत्र हंगामी बागायती आहे. यामध्ये हळद, ऊस, कापूस, सोयाबीन ही प्रमुख पिके आहे. बरेच शेतकरी छोट्या क्षेत्रावर भाजीपाल्याचे उत्पादन घेतात.
अलीकडच्या काळात काकडी उत्पादक म्हणून गुंडा गावाची ओळख तयार झाली आहे. गावातील प्रयोगशील शेतकरी देवीदास चव्हाण, ज्ञानोबा चव्हाण, मारुती चव्हाण, गोविंद चव्हाण, ज्ञानेश्‍वर भालेराव यांच्यासह १५ अल्पभूधारक शेतकरी मागील सहा वर्षांपासून हळद, कपाशी पिकांमध्ये काकडीचे आंतरपीक घेत आहेत. या पद्धतीमुळे इतर पिकांच्या तुलनेने कमी खर्चात किफायतशीर उत्पन्न मिळू लागले आहे. मार्केटमध्ये तेजी असल्यास अपेक्षित नफा शिल्लक राहत असल्याने ही आंतरपीक पद्धती शेतकऱ्यांमध्ये चांगली रुजली आहे. खरिपातील काकडीचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक असते. साधारणतः २५ ते ३० एकरांवर काकडीची लागवड असते. रब्बी हंगामाध्ये उसामध्ये काकडीचे आंतरपीक तीन शेतकरी घेतात.

हळद, कपाशीमध्ये काकडीचे आंतरपीक ः
१) हळद हे गावशिवारातील प्रमुख नगदी पीक आहे. शेतकरी दरवर्षी साधारणतः जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये गादी वाफ्यावर ठिबक सिंचन पद्धतीने हळद लागवड होते. दोन गादी वाफ्यामध्ये साडेचार फूट अंतर असते. उगवणीनंतर हळद पिकास माती लावली जाते. त्यानंतर १५ दिवसांनी हळदीमध्ये लागवडीचा एक गादीवाफा सोडून दुसऱ्या गादीवाफ्यावर काकडीचे बी टोकले जाते. दोन ओळींमध्ये ९ फूट आणि दोन वेलींमध्ये अडीच ते तीन फूट अंतर ठेवून काकडीच्या बियाण्याची टोकण होते.
२) कपाशीची साडेचार बाय ३ फूट अंतरावर लागवड असते. कपाशीमध्ये एक ओळ सोडून साधारणपणे ९ फूट बाय ३ फूट अंतरावर काकडी बियाणे टोकले जाते.
३) काकडी हे अडीच महिन्यांचे पीक आहे. लागवडीनंतर साधारणपणे ३५ दिवसांनी काकडीचा पहिला तोडा येतो. त्यानंतर सुमारे ३० ते ४० दिवसांच्या कालावधीत एक दिवसाआड एकूण १५ तोडे होतात. एका तोड्यात १२ ते १५ क्विंटल काकडीचे उत्पादन मिळते. सुरुवातीच्या आणि शेवटच्या काही तोड्यांमध्ये कमी उत्पादन मिळते. खरिपात काकडीचे एकरी १० ते १५ टन उत्पादन मिळते. रब्बीत लागवड कमी असते. मात्र उत्पादन एकरी १५ ते १७ टन मिळते. पीक व्यवस्थापनानुसार शेतकऱ्यांचे काकडीचे उत्पादन थोडे कमी अधिक उत्पादन मिळते.

पीक व्यवस्थापन ः
खरीपात पाऊस सुरू असल्यास काकडी पिकाला पाणी देण्याची गरज नसते. पावसाच्या खंडकाळात हळद, कपाशीसाठी असलेल्या ठिबक संचाद्वारे काकडीला पाणी देता येते. तसेच विद्राव्य खतांच्या मात्रा दिल्या जातात. कपाशी, हळदीला दिलेल्या खतांच्या मात्रा काकडीस लागू होतात. रसशोषण करणाऱ्या कीड, तसेच बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी दर आठ दिवसांनी तज्ज्ञांच्या सल्ल्याने फवारणी केली जाते. फळमाशीच्या नियंत्रणासाठी सापळे लावले जातात. येथील शेतकरी काकडीच्या वेलीसाठी मांडव करत नाहीत. जमिनीवरच वेली सोडल्या जातात.

प्रतवारीवर भर ः
जमिनीवर वेली सोडलेल्या असल्याने पावसाळ्यात काकडीला माती लागते. दिवसभर काकडीचा तोडा केला जातो. त्यानंतर पाण्याने काकडी धुऊन स्वच्छ केली जाते. त्यानंतर एक आणि दोन नंबर अशी प्रतवारी केललीजाते. यामुळे अपेक्षित दर मिळण्यासाठी फायदा होतो. सायंकाळी मार्केटमध्ये नेण्यासाठी प्लॅस्टिक बॅगमध्ये २० ते २२ किलो वजनाचे पॅकिंग केले जाते. गावातून जाणाऱ्या वाहनातून विविध मार्केटमध्ये काकडी विक्रीस पाठवली जाते. गावापासून ३५ किलोमीटरवरील परभणी येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केट हे जवळचे मोठे मार्केट आहे. परभणी मार्केटमध्ये काकडी विक्रीस नेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. बाजारातील तेजीनुसार नांदेड आणि हिंगोली येथील मार्केटमध्ये देखील काकडी विक्रीस जाते. दरवर्षी श्रावण महिना संपेर्यंत काकडीचे दर कमी असतात. त्यानंतर दर वाढतात. सध्या प्रति किलो ८ रुपये दर आहेत. दरवर्षी खरिपातील काकडीला सरासरी ७ ते ८ रुपये प्रति किलो आणि रब्बी हंगामातील काकडीला १५ रुपये प्रति किलो दर मिळतो. बाजारपेठेतील दर आणि व्यवस्थापन खर्च वजा जाता एकरी सरासरी ३५ ते ४० हजारांचा नफा मिळतो, असे शेतकरी सांगतात.

काकडी ठरतेय फायद्याची...
काकडी उत्पादक देविदास चव्हाण म्हणाले, की माझी पाच एकर शेती आहे. सिंचनासाठी विहीर, कूपनलिकेची सुविधा आहे. हळद, कापूस, सोयाबीन, ऊस ही मुख्य पिके आहेत. दरवर्षी अडीच एकर हळद लागवड असते. तसेच प्रत्येकी एक एकर कपाशी, सोयाबीन आणि ऊस लागवड असते.
मागील पाच वर्षांपासून खरीप हंगामात हळद, कपाशी पिकांमध्ये काकडीचे आंतरपीक घेत आहे. यंदा कपाशीमध्ये काकडी लागवड केली आहे. सोयाबीननंतर रब्बीत ऑक्टोबर-नोव्हेंबर उसामध्ये काकडी लागवड करतो. खरिपाच्या तुलनेत रब्बीत लागवड कमी असते. परंतु एकरी १५ ते १७ टन उत्पादन मिळते. सरासरी १५ रुपये प्रति किलो दर मिळतो. उसाच्या एका ओळीनंतर काकडी लागवडीसाठी आच्छादन तसेच ठिबक सिंचन करावे लागते. त्यामुळे खरिपाच्या तुलनेत जास्त खर्च लागतो. काकडीच्या वेलींची वाढ झाल्यानंतर हळद, कपाशीमध्ये तणांची फारशी वाढ होत नाही. परंतु काकडी लागवडीपूर्वी खुरपणीद्वारे तण नियंत्रण करून घेतो.

किफायतशीर उत्पन्न ः
मारुती चव्हाण म्हणाले, की दरवर्षी मी चार एकरांवर हळद लागवड करतो. त्यापैकी एक एकर हळदीमध्ये काकडीचे आंतरपीक घेतो. अडीच महिन्यांत माफक खर्चात एकरी ४० हजार नफा शिल्लक राहतो. त्यातून हळद लागवड, व्यवस्थापनावर होणारा खर्च निघतो. मिळणारा नफा बाजारपेठेवर अवलंबून असतो.
ज्ञानोबा चव्हाण म्हणाले, की एकूण अडीच एकर शेती आहे. दरवर्षी एक एकर हळद, एक एकर सोयाबीन आणि वीस गुंठे कपाशीची लागवड असते. हळदीमध्ये काकडीचे आंतरपीक घेतो. गतवर्षी कपाशीमध्ये खर्च जाता काकडीपासून ४५ हजार रुपये उत्पन्न मिळाले होते. यंदा हळदीमध्ये काकडी लागवड आहे.
गोविंद चव्हाण म्हणाले, की कापूस, हळदीमध्ये काकडीचे उत्पादन हे पीक व्यवस्थापन तसेच त्या काळातील हवामानावर अवलंबून आहे. गतवर्षी पावसाचे आगमन उशिरा झाल्यामुळे लागवडीस विलंब लागला. त्यामुळे उत्पादनात घट आली होती. यंदा चांगल्या उत्पन्नाची आशा आहे.

संपर्क ः देविदास चव्हाण ः ९६५७६७७७०३
मारुती चव्हाण ः ७६२०६९०६३४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

GM Crop Import : जीएम अन्नपदार्थांना लगाम घाला; गाय आधारित सेंद्रिय शेतीला चालना द्या, भारतीय किसान संघाची मागणी

Mosambi Pest Control : नवीन किडीविषयी संशोधन करून त्यावर उपाययोजना करणार

Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर मंदावला

Onion Market : कांदा बाजारभावावरील गंभीर स्थितीवर लासलगावी होणार चर्चा

Ladki Bahin Yojana: ५० लाखांवर लाडक्या बहीणींना मिळणार डच्चू; अपात्र बहीणींची संख्या वाढणार

SCROLL FOR NEXT