डॉ. सागर जाधव
Dairy Animals : जास्त दुधाळ जनावरे सांभाळण्यापेक्षा कमीत कमी पण चांगल्या जातीची जास्त दूध देणारी जनावरे सांभाळल्यास दुग्ध व्यवसाय फायदेशीर ठरतो. नेहमी दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेताच्या गायी, म्हशी निवडाव्यात. दुधाळ जनावरांची निवड करताना उत्पादनक्षमता हाच निकष डोळ्यासमोर ठेवावा.
गाय किंवा म्हैस खरेदी करताना तिच्या वंशाच्या इतिहासाची माहिती घ्यावी. शक्यतो दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेताचे जनावर खरेदी करावे. कारण या वेतामध्ये जनावराची दूध उत्पादन क्षमता जास्तीत जास्त असते. अशा जनावरांना प्रसूतीच्या वेळी आजार होण्याची शक्यता कमी असते. पशुपालक गाय किंवा म्हशीचे दिसणारे गुण पाहून खरेदी करतात, यामुळे त्यांचे दोष लक्षात येत नाहीत.
१) ज्यांच्याकडून जनावर खरेदी करायचे आहे त्या पहिल्या गाय किंवा म्हैस मालकाला प्रत्यक्ष भेटून संपूर्ण माहिती घ्यावी. या माहितीमध्ये दुधाळ जनावराचा स्वभाव, गुण, उत्पादन क्षमता, सवयी, आजार व व्यवस्थापन यांच्याविषयी चौकशी करावी. दुधाळ जनावर खरेदी करताना दूध उत्पादन तपासण्यासाठी किमान चार वेळा म्हणजे पहिल्या दिवशी सकाळ - सायंकाळ आणि दुसऱ्या दिवशी सकाळ - सायंकाळ दूध काढून खात्री करावी. त्यानंतरच खरेदी करावे.
२) जनावर कोणत्या जातीचे आहे हे प्रथम पाहावे. गाईमध्ये होल्स्टिन फ्रिजियन (एचएफ), जर्सी, साहिवाल, गीर आणि म्हशीमध्ये मुऱ्हा, मेहसाणा, जाफराबादी, पंढरपुरी या जाती चांगल्या दूध देणाऱ्या आहेत.
३) सर्वधारणपणे गायी, म्हशींचा पार्श्वभाग मोठा असावा. जनावर पाठीमागून पाहिले असता मागच्या दोन पायांतील अंतर जास्त असावे. दुधाळ जनावराची कातडी तजेलदार व निरोगी असावी.
४) कासेची शरीराशी घट्ट बांधणी असावी. कास योग्यरीतीने पूर्ण वाढलेली असावी. कासेवर अनेक फाटे असणारे शिरांचे जाळे असावे. शिरा जाड असाव्यात. चारही सड समान अंतरावर असावेत. सड दंडगोलाकार, एकसमान आकार, मध्यम लांबी आणि व्यास असावा. कासेस चार व्यतिरिक्त अधिक सड असू नये. पुढील दोन सड आकाराने थोडे मोठे आणि मागील सड त्यामानाने काहीसे लहान असावेत. कासेला रक्तपुरवठा करणाऱ्या खालच्या पोटावरील रक्तवाहिन्या जाड व ठळक दिसणाऱ्या असाव्यात.
५) दुधाळ जनावरांना खालच्या पोटाच्या बाजूने बघितल्यास एक मोठी शीर दिसते, तिला दुधाची शीर म्हणतात. ही जितकी जाड व वळणावळणाची असेल तितके जनावर जास्त दूध देणारे समजावे. धार काढण्यापूर्वी दुधाने भरलेली कास आकाराने मोठी दिसते, सड फुगलेले दिसतात. धार काढल्यानंतर, कासेचा आकार पूर्ववत लहान होणारा असावा.
६) डोळे पाणीदार असावेत. नाकपुड्याचा पृष्ठभाग ओलसर असायला हवा. नाकपुड्या रुंद व श्वसन उत्तम असावे.
७) चारही पाय समांतर असावेत. सरळ व मध्यम आकाराचे असावेत. खूर छोटे, गोल असतात. त्यांचा तळवा सरळ असून बरोबर जमिनीवर टेकतो.
८) गायी, म्हशींची निवड करताना त्यांची प्रजनन क्षमता विचारात घेणे गरजेचे आहे. प्रत्येक वर्षी एक वेत मिळावे.
९) दुधाळ जनावरे आकाराने मोठी असली तरी शरीराचा बांधा व्यवस्थित असावा. गाय, म्हैस खरेदी करण्यापूर्वी रक्त नमुन्यांद्वारे ब्रुसेलोसिस (सांसर्गिक गर्भपात), टीबी (क्षयरोग), आयबी आर या आजाराची तपासणी करावी.
१०) जास्त दूध देणे आणि नियमित माजावर येणे हे गुण गायीच्या आनुवंशिकतेवर अवलंबून असतात. म्हणून गाय, म्हैस निवडताना जातीचा विचार करणे उचित ठरेल.
११) रागीट स्वभावाच्या गायी, म्हशी उत्तेजित झाल्यावर पान्हा चोरतात, म्हणून निवड करताना शांत स्वभाव असणाऱ्या गायी, म्हशींची निवड करावी.दुधाळ जनावरांचे लक्षण म्हणजे शांत व तरतरीत दिसते.
१२) शरीराचा आकार, मागून, पुढून निरीक्षण केले असता पाचरीप्रमाणे त्रिकोणाकृती असावा. वरून पाहिले असता, कमरेची हाडे दूरवर असावीत. बाजूने पाहिले असता शेपटीवरील दोन हाडे
आणि कास यामध्ये जास्त अंतर असावे.
१३) गाय, म्हैस लठ्ठ नसावी. लांब व सडपातळ असावी, पाठीचा कणा सरळ असावा.मान लांब असावी. पोटाचा भाग मोठा आणि खोल असावा.
१४) अनेक आजारांचे जनावरांच्या बाह्य लक्षणांवरून निदान केले जाऊ शकते जसे की डोळा, नाकातून स्राव येणे हे जनावर आजारी असल्याचे लक्षण आहे. योनी मार्गातून रक्त किंवा अस्वाभाविक स्राव येणे योनीच्या आजाराचे लक्षण आहे. आजारी जनावर सुस्त, मलूल व अशक्त झालेले असते. अशी जनावरे अजिबात खरेदी करू नयेत. आजारापासून वाचण्यासाठी जनावरांचे नियमित लसीकरण केले जाते का याची चौकशी करावी. पशुवैद्यकीय प्रमाणपत्र दाखवण्याचा आग्रह करावा.
१५) जनावरे खरेदी करताना त्याचे दात तपासून पाहावेत. त्यावरून वय लक्षात येते. जनावरांच्या दातांची पाहणी करून वयाची खात्री करावी. दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेतातील जनावरे चार दाती असतात.
१६) जनावरांमध्ये गर्भपाताच्या घटनेचे प्रमाण तसेच कासदाह या आजाराचा प्रादुर्भाव कधी झाला होता का याची माहिती घ्यावी.
१७) चांगल्या जनावरांचे लक्षण म्हणजे ते चंचल व चाणाक्ष असते. डोळे निरोगी व कान लांबसडक असतात. शिंगे खुडलेली असावीत. जनावरांची त्वचा चिमटीत धरून सोडल्यास ताबडतोब पहिल्यासारखी झाली पाहिजे.
१८) जनावरांची छाती रुंद असावी. जनावरांची छाती जर अधिक रुंद असेल तर रक्ताभिसरण अधिक होते. असे जनावर शेतीकामासाठी सक्षम आहे असे समजावे. अशा गायींचे दूध उत्पादनही चांगले असते. जनावरांचे मागील दोन पायांतील अंतर अधिक असल्यास जनावराच्या कासेच्या वाढीसाठी भरपूर जागा मिळते. गर्भाशयाचा आकार वाढल्याने गर्भाची वाढ चांगली होते. वासराच्या जन्माच्या वेळी वजन जास्त असते. त्यामुळे वासराच्या मरतुकीचे प्रमाणही कमी होते.
१९) भाकड जनावर खरेदी करत असाल तर त्याच्या कासेवर कातडीच्या घड्या असाव्यात, म्हणजे जनावर दुधावर असल्यास त्याची कास किती मोठी होऊ शकते याची कल्पना येईल.
२०) जनावर लंगडत नाही ना याची खात्री करावी.
जनावरे खरेदी केल्याबरोबर विमा उतरवा. शक्य असल्यास तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जनावरे खरेदी करावीत.
शेळीची निवड :
१) नाकपुड्या मोठ्या असाव्यात. डोळे पाणीदार असावेत.
२) वयाप्रमाणे पूर्ण वाढ झालेली असावी. शक्यतो एक वेत झालेली शेळी विकत घ्यावी.
३) एका वर्षात शेळीचे वजन ३० किलोपेक्षा कमी नसावे.
४) कास मोठी व मऊ असावी. सड सारख्या लांबीचे असावेत. सड सुके नसावेत.
५) खांद्यापासून पुठ्ठ्यापर्यंतचा भाग सरळ असावा.
६) छाती भरदार, पोट मोठे व डेरेदार असावे. केस व त्वचा तुकतुकीत असावी.
७) पाय मजबूत व सरळ असावेत.
८) नियमित प्रमाणे माजावर येणारी व न उलटणारी असावी. जुळे करडे देणारी असावी.
९) आकाराने मोठी असावी. तिची मान लांब असावी. तोंडापासून शेपटीपर्यंत असणारा लांबपणा हेही महत्त्वाचे लक्षण आहे.
मेंढीची निवड ः
१) पैदाशीसाठी मेंढी आकाराने मोठी असावी. पाय सरळ, पिळदार व खूर उंच असावेत.
२) दुभत्या मेंढीची धार काढून पाहावी. दुधाचे प्रमाण, दुधाचा रंग, कासेवर सूज या गोष्टी पारखून घ्याव्यात. कास नीट पारखून घ्यावी.
३) दुभती मेंढी निवडताना तिचे वय, कोकरांची संख्या, दुधाचे प्रमाण इत्यादी गोष्टींकडे लक्ष द्यावे.
४) दुभती मेंढी लठ्ठ व मंद नसावी. टवटवीत व चपळ असावी.
मेंढीचे सर्व दात बळकट व सुस्थितीत असावेत. शक्यतो एक ते दोन वर्षे वयाची (दोन ते चार दाती) मेंढी विकत घ्यावी. केस मऊ व चमकदार दिसणारे असावेत. भरदार छाती असावी. बांधा मोठा असावा, जेणेकरून दोन किंवा अधिक कोकरांना मेंढी आपल्या गर्भाशयात जोपासू शकेल.
डॉ. सागर जाधव, ९००४३६१७८४
(पशुधन विकास अधिकारी, बाचणी, जि. कोल्हापूर)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.