Badnera Animal Market : जातिवंत म्हशींसाठी चला बडनेराच्या बाजारात

Animal Care : जातिवंत मुऱ्हा म्हशी व अन्य जनावरांच्या खरेदी विक्रीचे केंद्र म्हणून बडनेरा (जि. अमरावती) बाजार समितीने वेगळी ओळख निर्माण केली आहे. उत्तरप्रदेशातील व्यापारी थेट या बाजारात म्हशी विक्रीसाठी आणतात. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांतून येथे खरेदीदारांची रेलचेल राहते.
Badnera Animal Market
Badnera Animal MarketAgrowon

Animal Market Update : अमरावती हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील शहर असल्याने भागात दळणवळणाच्या सुविधा मुबलक आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांची संख्या येथे मोठी असते. अमरावतीची बाजार समितीही प्रसिद्ध आहे.

याच जिल्ह्यातील बडनेरा महापालिकेच्या भाडेतत्वावरील जागेवर अनेक वर्षे जनावरांचा बाजार भरायचा. सहा एप्रिल १९९० पासून अमरावती बाजार समितीच्या मालकीच्या जागेवर जनावरांच्या बाजार नियमनास सुरवात झाली. पाच एकरांवर विस्तारित असलेला हा बाजार आता दर शुक्रवारी भरतो.

जातिवंत पशुधनाची विविधता

जातिवंत देशी गायी बैल, म्हशी, शेळ्या-मेंढ्यांची खरेदी विक्री येथे होते. मुऱ्हा, जाफराबादी म्हशींची किंमत ५० हजार रुपयांपेक्षा अधिक, बैलांची ८० हजार रुपयांपेक्षा जास्त तर शेळीची किंमत सरासरी अडीच हजार रुपयांपासून पुढे राहते.

बडनेऱ्यातील या बाजाराचे वैशिष्टय म्हणजे येथे उत्तर प्रदेशातील आग्रा येथून म्हशी तसेच गुजराती दुधाळ म्हशीही येतात. अशा प्रकारे जातिवंत दुधाळ म्हशींची विविधता देणारा हा विदर्भातील एकमेव बाजार असावा. त्यामुळेच पूर्व विदर्भातील भंडाऱ्यापासून ते पश्‍चिम विदर्भातील बुलडाण्यापर्यंतचे शेतकरी येथे मुद्दाम हजेरी लावतात.

Badnera Animal Market
Animal Market : सोलापुरात जनावरांचे आठवडे बाजार भरविण्यास सशर्त परवानगी

कोरोनानंतर वाढली रेलचेल

दिवाळीनंतर या बाजारात तेजी राहते. साहजिकच त्यानंतरच उलाढालही वाढीस लागते व खरेदीदार तसेच विक्रेत्यांची गर्दी अनुभवता येते. कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळात अनेक निर्बंध लादण्यात आल्याने बाजार भरलाच नाही. प्रशासनाकडून परवानगी देण्यात आल्यानंतर मात्र बाजार आता पुन्हा पूर्वीप्रमाणेच फुलू लागला आहे.

केवळ जनावरेच नव्हे तर त्यासोबतच जनावरांना सजविण्यासाठी उपयोगी पडणारे साहित्य तसेच जनावरे हाकण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या बांबूच्या काठ्याही येथे विक्रीसाठी उपलब्ध होतात.

बाजार समितीच्या सुविधा

बाजार समितीने विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. कार्यालय, लिलाव भवन, शेडस, व्यक्तींसाठी तसेच जनावरांसाठी स्वतंत्र पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. पूर्वी बाजार समिती च्या आवारात अतिक्रमणाची घटना घडल्याने खबरदारी म्हणून संपूर्ण क्षेत्राला भिंतीचे संरक्षक कुंपण बांधले आहे. पशुवैद्यकाची सेवाही येथे उपलब्ध आहे.

समस्येबाबत बोलायचे तर कॉक्रिटीकरणाचा अभाव असल्याने पशुपालकांना त्रास होतो. येत्या काळात त्याचे काम पूर्ण केले जाणार आहे. पर्याप्त शेड नसल्याने जनावरे उन्हातच बांधावी लागतात. व्यापारी प्रसंगी कापडी मंडपाची उभारणी आपल्या स्तरावर करतात. बाजार समितीने शेड उभारण्याची मागणी त्या पार्श्‍वभूमीवर व्यक्‍त केली जात आहे.

पॅकेज अंतर्गत शेतकऱ्यांना वितरित केल्या जाणाऱ्या जनावरांची निवड देखील कृषी विभागाकडून या बाजारातून होते.

सेस आकारणी

बाजार समितीकडून एक रुपया पाच पैसे प्रति शेकडा सेस आकारला जातो. या माध्यमातून २०२२-२३ मध्ये १८ लाख ८६ हजार ४८४ रुपयांचे उत्पन्न बाजार समितीला झाले. बाजारात जनावर दाखल झाल्यानंतर मोठ्या जनावरासाठी प्रति पाच रुपये तर शेळीसाठी तीन रुपये प्रवेश शुल्क आहे.

बाजारातील आवक- विक्री नगात (२०२२-२३) (प्रातिनिधीक)

आवक - विक्री

शेळी - १६४९ १०५२

गाय - ८७९ ४१९

बैल - १३५२ ९५९

म्हैस - ९१०६ ६३७३

वळू - ३०९ १९३

रेडा - ११०५ ७१२

जनावरांची पारख

खास करून म्हशींच्या उलाढालीसाठी प्रसिद्ध असलेल्या बडनेराच्या बाजारात मथुरा भागातून म्हशींची सर्वाधीक आवक होते. कुंडल (गोल शिंग) असलेली म्हैस सर्वाधिक दूध देते असे शेतकऱ्यांचे म्हणणे असल्याने अशा म्हशींना मागणी अधिक राहते.

दोन्ही वेळचे मिळून अशा म्हशी १४ लिटरपर्यंत दूध देतात. मथुरेहून दर आठवड्याला १५ ते २० ट्रक संख्येने त्यांची आवक होते. एका ट्रकमध्ये १४ म्हशी सरासरी राहतात. शिंगे थोडी खुंटलेली असलेल्या म्हशींची किंमत ७० हजार रुपयांपर्यंत राहते. त्यांची

दूध देण्याची क्षमता १० लिटरच्या घरात राहते. अकोला, चंद्रपूर, वाशीम, दारव्हा, दिग्रस, चांदूरबाजार यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यातून बडनेरा बाजारातील म्हशींना मागणी राहते. हैदराबाद (तेलंगण) भागातूनही व्यापारी खरेदीसाठी येतात असे बाजार समितीचे कर्मचारी विवेक देशमुख यांनी सांगितले.

Badnera Animal Market
Animal Health Care : पावसाळ्यात गायी, म्हशी आजारी पडू नयेत म्हणून काय करावे?

उत्तरप्रदेशातील फैजाबाद, फिरोजाबाद, (जि. मैनपूरी) भागातूनही म्हशींची आवक होते. रतलाम (मध्यप्रदेश) भागातील म्हशींची दूध देण्याची क्षमता अधिक असल्याने त्यांना मागणी राहते.

अलीकडील काही वर्षात दुग्ध व्यवसायिकांकडून म्हशींना वाढती मागणी असल्याने दर ५० हजार रुपयांहून अधिक वाढीस लागल्याचे अजित गाणू यांनी सांगितले.

गावरान बैल लाखात

अधिक उंच, राकट हरियाना बैलांचीही आवक होते. संत्रा बागायतदार प्रामुख्याने त्याची खरेदी करतात. सत्तर हजारांपासून ते दीड लाख रुपयांपर्यंत याची जोडी मिळते. हे बैल काटक राहतात. परिणामी बागेत चिखल असताना ते गावरान बैलांच्या तुलनेत प्रभावी काम करतात अशी माहिती व्यापारी प्रवीण शिराळे यांनी दिली.

बाजार समितीचे परवानाधारक व्यापारी साजिद शेख यांनी सांगितले की स्थानिक जातिवंत बैलांचीही आवक चांगली राहते. वय, देखणेपणा आणि काटकपणा या आधारे त्यांची ३५ हजार ते एक लाखापर्यंत अशी किंमत ठरते. शेतीकामी लागणाऱ्या बैलांचे लाखात व्यवहार ठरतात.

संपर्क - राजेंद्र वानखडे- ८२०८७६६२५२, (विभाग प्रमुख, बडनेरा बाजार समिती)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com