Cultivated Land Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Cultivated Land : खडकाळ प्रक्षेत्राचे लागवडयोग्य जमिनीमध्ये रूपांतर

Article by D.D. Nangare : राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेने अजैविक ताण कमी करण्यासाठी विविध कृषी प्रणाली विकसित केल्या आहेत. संस्थेने खडकाळ जमिनीचे लागवडीयोग्य उत्पादक जमिनीत रूपांतर करण्यासाठी व्यवहार्य तंत्रज्ञान विकसित केले आहे.

Team Agrowon

Agriculture Land : खडकाळ किंवा ओसाड जमिनीखालील क्षेत्र सहसा लागवडीखाली नसते, कारण अशी जमीन उंच-सखल असते. मुख्यत: गवत किंवा काटेरी झुडुपांनी व्यापलेली असते. उथळ माती व कठीण खडक या अजैविक ताणामुळे या जमिनी बागायती पिकांसह कोणत्याही पिकांच्या लागवडीस योग्य नसतात.

देशाच्या दख्खन पठारावरील उथळ मातीचा ओसाड, मुरमाड आणि खडकाळ भूप्रदेश जिथे शेती करणे अतिशय अवघड आहे. असे क्षेत्र लागवडीखाली आणण्यासाठी संस्थेने तंत्रज्ञान विकसित केले आहे.

सुधारित तंत्रज्ञान

संस्थेने तीन वर्षांच्या अल्पावधीत खडकाळ जमिनीचे लागवडीयोग्य उत्पादक जमिनीत रूपांतर करण्यासाठी व्यवहार्य तंत्रज्ञान विकसित केले आहे. उथळ बेसाल्टिक खडकाळ जमीन लागवडीस तयार करणे शक्य आहे.

भौगोलिक परिस्थिती आणि जमिनीच्या उतारानुसार पडीक जमिनीची समतल टप्पे आणि उपभूखंडांमध्ये विभागणी करण्यात आली. वरच्या थरातील ०.१ ते ०.३ मीटर मुरमाड माती खरवडून डोझरने गोळा केली.

अवजड यंत्रसामग्री आणि त्याच्या टायन्सद्वारे ०.९ मीटर खोलीपर्यंत झिजलेला आणि न झिजलेला कठीण खडक व मुरूम फोडण्यात आला.

डोझरने वरच्या उथळ मुरूमाचे तुकडे काढून टाकल्यानंतर, उघड्या पडलेल्या कठीण खडकाळ भागात ०.५ ते १ मीटर आणि ०.६ ते ०.९ मीटर खोलीच्या अंतरावर ट्रॅक्टर- ड्रील यंत्राद्वारे जमीन खोदण्यात आली.

कठीण खडकाळ भागावर, रासायनिक विघटनाद्वारे मृदा विकासाची प्रक्रिया वाढविण्यासाठी साखर कारखान्याची मळी (डिस्टिलरी स्पेंट वॉश) पसरण्यात आली. खडकाळ बेसाल्टिक दगडाची मळीमुळे झीज झाल्याने नांगरणी करणे सहज साध्य झाले.

पीक लागवडीसाठी काही क्षेत्रावर बाहेरून काळी माती आणून दोन फूट खोलीपर्यंत भरण्यात आली.

विकसित झालेल्या मुरमाड जमिनीची सुपीकता कमी असल्याने (सेंद्रिय कार्बन ०.०४ टक्के आणि उपलब्ध नत्र आणि स्फुरद १४ आणि १.४ किलो प्रती हेक्टरी) स्पेंट मशरूम सब्सट्रेट आणि हिरवळीच्या पिकांची पेरणी करून सेंद्रिय कर्ब वाढविण्यात आले.

जमिनीचे सपाटीकरण केल्यामुळे पाण्याचा योग्य वापर आणि पिकांची उत्पादकता वाढविणे सहज शक्य झाले.

तंत्रज्ञानाची कार्यक्षमता

खडकाळ व उथळ जमिनीची कार्यक्षमता वाढविण्यासाठी फळबागांच्या प्रारंभिक स्थापनेपासून नावीन्यपूर्ण पद्धतींचा विकास व वापर केल्यानंतर शेतातील पिके व फळपिकांची वाढ अतिशय चांगली होते.

एक हेक्टर खडकाळ भूभागापासून लागवड योग्य जमीन विकसित करण्यासाठी, उताराचे स्वरूप व खडकाच्या कठीणतेनुसार ५५,००० ते ७०,००० रुपये खर्च आला. पीक लागवडीच्या नियोजनानुसार शेतकऱ्यांना दुसऱ्या वर्षापासून ६०,००० रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. परिस्थितीनुसार खर्च आणि उत्पन्नाचे आकडे बदलू शकतात.

मातीचे प्रमाण वाढल्याने, उत्पादनात वाढ होते. दख्खन भागातील वापरात नसलेल्या पडीक जमिनीच्या भागात हे तंत्रज्ञान वापरता येते. या तंत्राचा वापर करून बागायती फळपिकांची उत्पादकता वाढल्याने शेतकऱ्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारते.

प्रभाव आणि प्रसार

पडीक खडकाळ उथळ जमिनीवरील शेतजमीन सुधारण्यासाठी मळी, काळ्या मातीचा वापर करून काही शेतकऱ्यांनी या नावीन्यपूर्ण तंत्राचा अवलंब केला आहे.

याचबरोबर एनआयबीएसएम, रांची आणि डीओएफआर, पुणे संस्थांमध्ये या तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्यात आला आहे.

या तंत्रामुळे पडीक जमीन प्रभावीपणे लागवडीखाली आणणे शक्य आहे.

संस्थेने विकसित केलेले तंत्रज्ञान

भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अंतर्गत बारामती (जि.पुणे) येथे राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था कार्यरत आहे. मूलभूत आणि धोरणात्मक संशोधन या संस्थेच्या प्रक्षेत्रावर केले जाते. संस्थेने अजैविक ताण कमी करण्यासाठी विविध कृषी प्रणालींचे मूल्यांकन करून अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले.

काही उदयोन्मुख तंत्रज्ञान हे अजैविक ताणांचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यामध्ये उपयुक्त ठरले आहे. संस्थेने पंधरा वर्षांच्या कालखंडामध्ये विविध समस्यांवर मात करणारे तंत्रज्ञान विकसित केले आहे.

यामध्ये प्रामुख्याने निकृष्ट व नापिक जमिनीचे उत्पादक फळबागांमध्ये रूपांतरण, ड्रॅगनफ्रूटसाठी परागीभवन आणि सावली व्यवस्थापन तंत्र, फळे आणि भाजीपाला उत्पादनात पाण्याची बचत करण्याच्या पद्धती, भाजीपाला उत्पादन वाढवण्यासाठी संजीवकांचा वापर, उसामध्ये पाचट व पोषक द्रव्यांचे व्यवस्थापन, हवामान-लवचिक एकात्मिक शेती प्रणाली, ऊस वाड्याचे जनावरांसाठी मिश्र-पोषण सायलेज, मत्स्यपालनामधील ताण कमी करण्यासाठी नॅनो-उत्पादने आणि फुलशेतीसाठी सांडपाणी व्यवस्थापन यांचा समावेश आहे.

फळ पिकांची लागवड

चिकू, पेरू व डाळिंब लागवडीसाठी या अभिनव पद्धतींचा वापर केला. उथळ भूप्रदेशातील मोठ्या खड्ड्यांमध्ये/खंदकातही झाडाची मुळे खोलीवर जाऊ शकत नाहीत त्यामुळे वनस्पती वाढीसाठी अडथळे निर्माण होतात. यासाठी मोठे खड्डे खोदण्यात आले.

मुळांच्या वाढीसाठी जमिनीची खोली वाढविण्यासाठी नियंत्रित मायक्रो-ब्लास्टिंगद्वारे खड्डे १.० चौरस मीटरपर्यंत फोडण्यात आले. ते मुरूम आणि काळी माती (१:१) यांच्या मिश्रणाने भरले.

फळझाडे लावण्यासाठी साधारणपणे ०.५ मीटर उंच गादी वाफ्याची शिफारस केली जाते. परंतु कोरडवाहू, बेसाल्टिक परिस्थितीत १.५ मीटर रुंदीचे रुंद आणि किमान ०.८ ते १ मीटर उंच असणारे गादी वाफे तयार केल्याने नागपूर संत्रा व लिंबूवर्गीय पिकांच्या मुळांच्या वाढीसाठी पुरेशी भुसभुशीत माती उपलब्ध झाली.

डॉ. डी.डी.नांगरे, ९६६५२०४८९५

(राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था, माळेगाव (बु.), बारामती,जि. पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Assembly Election : कोल्हापुरात महाडिक पॅटर्न; मुश्रीफ, यड्रावकरांनी गड राखला, महाविकास आघाडीचा सुफडासाफ

Chana Wilt Disease : हरभरा पिकातील ‘मर रोग’

Animal Care : म्हशींच्या प्रजननासाठी हिवाळा ठरतो लाभदायक

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT