Jaggery Business : रेणुकामाता गुळाने केले अर्थकारण गोड

Article by Santosh Munde : जालना जिल्ह्यातील सोमठाणा (ता. जालना) येथील भगवान आणि बंडू या बोडखे बंधूंनी वडिलांनी सुरू केलेली गूळनिर्मितीची परंपरा टिकवून धरली आहे. दररोज सात क्विंटलपर्यंत उत्पादन व थेट विक्री यातून आपल्या गुळाला सक्षम बाजारपेठ त्यांनी विकसित केली आहे.
Bodkhe Family Jaggery Business
Bodkhe Family Jaggery BusinessAgrowon

Jaggery Production Success Story : गूळनिर्मिती किंवा गुऱ्हाळघरांची संस्कृती मुख्यत्वे कोल्हापूर जिल्हा, पुणे, सोलापूर किंवा पश्‍चिम महाराष्ट्रात विकसित झाली आहे.

परंतु राज्यातील अन्य भागांतील शेतकऱ्यांनी देखील या प्रक्रिया व्यवसायाचा पर्याय निवडून तो आर्थिकदृष्ट्या यशस्वी करण्याचा प्रयत्न यशस्वी केला आहे. काहींनी सेंद्रिय गुळाचे ‘मार्केट’ ओळखून ऊस उत्पादन व गूळनिर्मिती त्या पद्धतीची ठेवली आहे.

बोडखे यांची गूळनिर्मिती

जालना जिल्ह्यात बदनापूर तालुक्यात असलेल्या सोमठाणा येथील बोडखे कुटुंबाची नऊ एकर जमीन आहे. भगवान दौलतराव बोडखे, पत्नी कविता, बंधू बंडू व त्यांची पत्नी जनाबाई असे हे कुटुंब आहे.

पूर्वी भगवान यांचे वडील कापूस किंवा अन्य हंगामी पिके घ्यायचे. सन २००८ मध्ये त्यांनी पहिल्यांदा एक एकर ऊस लावला. तो कारखान्याला देण्याऐवजी त्यापासून गूळनिर्मिती करण्याचे ठरविले.

टप्प्याटप्प्याने एक एकर उसाचे क्षेत्र गुऱ्हाळाच्या गरजेनुसार वाढवत पाच एकरांपर्यंत नेले. सन २०१० ते २०१६ या कालावधीतील काही टप्प्यावर गूळनिर्मिती काही प्रमाणात खंडित झाली. सन २०१६ मध्ये दौलतरावांचे निधन झाले. त्यानंतर मुलगा भगवान यांनी बंधू बंडू यांच्या मदतीने वडिलांची ही परंपरा पुढे सुरू ठेवण्याचे ठरविले.

त्या दृष्टीने घरच्या संपूर्ण नऊ एकरांत ऊस लागवड केली. आजमितीला उसाचे १०००१, ३१०२, ८००५, ८६०३२ हे वाण घेतले जातात. ज्या वाणापासून जास्त गूळ तयार होईल त्याचे क्षेत्र जास्त व त्यापाठोपाठ अन्य वाण लागवड असे तंत्र अवलंबिले आहे. खोडवा व निडवाही घेण्यात येतो.

Bodkhe Family Jaggery Business
Jaggery Production : शिराळ्यातील गुऱ्हाळघरांना ब्रेक

...असा आहे गूळनिर्मिती व्यवसाय

कुटुंबातील चौघेही सदस्य आपल्या रेणुकामाता गुऱ्हाळघराची उत्पादन निर्मित ते विक्री अशी सर्व जबाबदारी सांभाळतात. दरवर्षी दसरा किंवा विलंब झाल्यास दिवाळीच्या सुमारास गुऱ्हाळ सुरू होते. जूनपर्यंत ते सुरू राहते.

स्वतःकडील नऊ एकरांतील उसाव्यतिरिक्त दहा ते बारा शेतकऱ्यांकडून ऊस विकत घेण्यात येतो. यंदा सुमारे ३२०० रुपये प्रति टन दर देऊन ऊस खरेदी केला. बोडखे यांना लागवडीच्या उसाचे एकरी ६० ते ७० टन उत्पादन मिळते.

पाण्याची उपलब्धता ही व्यवसायासाठी जमेची बाजू ठरली आहे. ऊस व गूळ उत्पादनात रासायनिकपेक्षा सेंद्रिय घटक वापरण्यावर अधिक भर दिला जातो. गुऱ्हाळघरातील प्रत्येक कढई रसासाठी साधारणतः दीड टनापर्यंत ऊस लागतो. त्यापासून पावणेदोन क्विंटल गूळ तयार होतो.

एक कढई तापवलेल्या उसाच्या रसापासून गूळ बनविण्यापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेला सुमारे साडेतीन तासांचा अवधी लागतो. दररोज सहा ते सात क्विंटल गूळनिर्मिती होते. सकाळी ७ ते रात्री १० पर्यंत गुऱ्हाळघर सुरू असते. अर्थात, मजुरांच्या उपलब्धतेवर त्याची वेळ अवलंबून ठेवावी लागते.

Bodkhe Family Jaggery Business
Jaggery Industry : दौंड तालुक्यात गूळ उद्योगाचे ‘क्लस्टर’

थेट विक्रीव्यवस्था

प्रत्येक कढईत तयार झालेल्या पाकापासून गूळ तयार करताना पहिल्या १०० ढेपा (भेल्या) एक किलो वजनाच्या असतात. ग्राहकांची मागणी ओळखून सव्वा किलो, पाच किलो वजनी ढेपाही तयार केल्या जातात. जालना- छत्रपती संभाजीनगर मुख्य रस्त्यावरच बाजूलाच गुऱ्हाळघर आहे. भोकरदन, सिल्लोड व राजूर आदी गावांना जाण्यासाठी येथूनच मार्ग आहे.

त्यामुळे लोकांची सतत ये- जा सुरू असते. हीच संधी ओळखून भगवान यांनी रस्त्याकडेला स्टॉल उभारला असून तेथून थेट विक्री केली जाते. गुळाचा स्वाद ग्राहकांच्या पसंतीस उतरल्याने विक्रीला अडचण येत नाही. ७० रुपये प्रति किलो असा दर गुळाचा ठेवला आहे. तर दीड किलो वजनी बॉटल पॅकिंगमधील काकवीची शंभर रुपये दराने विक्री होते. रेणुकामाता गुऱ्हाळ नावाने पिशव्याही तयार केल्या असून, गुळाच्या प्रचाराला त्याची मदत होते.

व्यवसायाने दिले समाधान

वर्षभरातील काही महिनेच व्यवसाय सुरू असला, तरी तेवढ्या काळात २० ते २५ लाखांपर्यंत व काही वेळा त्यापुढेही उलाढाल होते. मागणीनुसार साडेतीन हजार रुपये प्रति कढई दराने गूळ तयारही करून देण्यात येतो. असे २५ ते ३० शेतकरी आपल्या संपर्कात असल्याचे भगवान सांगतात. या व्यवसायातून चार ते पाच मजुरांना कायमस्वरूपी रोजगार मिळाला आहे.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही गुऱ्हाळघराला भेट देऊन येथील गूळ खरेदी केला आहे. पारंपरिक पिकांना समाधानकारक दर नाहीत. त्यामुळे गूळनिर्मितीसारख्या पर्यायी व्यवसायाकडे वळलो. गुळाला चांगला दर मिळत असल्याने व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती होते. वास्तू उभारणे शक्य झाले. मुख्य म्हणजे कुटुंब खाऊन-पिऊन समाधानी ठेवणे शक्य झाले असल्याचे भगवान यांनी सांगितले.

भगवान बोडखे ७४९९८६९९११

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com