शेतकरी नियोजन
उन्हाळी भाजीपाला
शेतकरी : राहुल पांडुरंग कदम
गाव : भूड, ता. खानापूर, जि. सांगली
एकूण शेती : १० एकर
लीजवर घेतलेली शेती : १५
भाजीपाला पिके : टोमॅटो, कारले
माझी शेती भूड (जि. सांगली) १० एकर आहे. अवर्षणग्रस्त या भागात गेल्या सात वर्षांपासून टोमॅटो, ढोबळी मिरची, कारले सुमारे १० एकरांवर घेतो. भाजीपाल्यामध्ये कितीही तेजी-मंदी असली तरी मी या पिकामध्ये सातत्य ठेवले आहे. माझ्या वडील एल.एल.बी. केल्यानंतर मुंबईत एका कंपनीत १९८३ पर्यंत नोकरीला होते. त्यानंतर गावाकडे येऊन १९८४ मध्ये द्राक्ष लागवड करून शेतीत रमले.
शेतात घेतलेल्या विहिरीला जेमतेम पाणी लागले. पण तेवढ्या पाण्यावर द्राक्ष शेती फुलवली. मी पदवीधर झालो होतो. अन्न प्रक्रिया तंत्रज्ञानाचा (फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी) आणि आयात निर्यातीचे शिक्षण घेतले. २०१५ मध्ये वडिलांचे निधन झाल्यानंतर शेतीची जबाबदारी माझ्यावर आली. तोपर्यंत शेतीचा फारसा अनुभव नसल्यामुळे जय काटकर या शेतकरी मित्रावर अवलंबून होतो.
त्यांच्या सांगण्यानुसार प्रत्येक गोष्ट करत करत शिकत गेलो. २०१५ मध्ये पहिल्यांदा टोमॅटोची लागवड केली. पहिल्या प्रयत्नात अपेक्षित उत्पादन व उत्पन्न मिळाल्याने हुरूप वाढला. हळूहळू भाजीपाला पिकाचा अभ्यास होत बारकावे लक्षात आले. यात केवळ उत्पादन करून चालत नाही, तर योग्य वेळी विक्रीचे व्यवस्थापन बसवावे लागते, हे लक्षात आले. श्री. रेवणसिद्ध भाजीपाला संघाकडून विक्रीसाठी मदत घेतली. मी या संघाशी जोडलो गेलो.
सन २०१७ मध्ये काकांची शेती भाडेतत्त्वावर कसण्यासाठी घेतली. त्यातही भाजीपाला लागवड सुरू केली. दर्जेदार भाजीपाला पिकविण्यासाठी उत्तम व दर्जेदार रोपांची गरज असते, त्यावर भर दिला. सोबत काटेकोर नियोजनाची जोड दिल्याने भाजीपाल्यामध्ये यश मिळाले आहे.
उन्हाळी हंगामातील भाजीपाला : टोमॅटो, कारले
उन्हाळी भाजीपाला क्षेत्र : ८ एकर
टोमॅटो : ३ एकर दोन टप्प्यांत
कारले : ३ एकर
उर्वरित क्षेत्रात पाण्याच्या उपलब्धतेनुसार.
उन्हाळ्यासाठी नव्या वाणाची लागवड.
...असे असते नियोजन
हंगाम संपल्यानंतर जानेवारी महिन्यात तीन वेळा मशागत
मशागत झाल्यानंतर दोन महिने रान तापवले जाते. यामुळे निर्जंतुकीकरण होण्यास मदत होते.
शेणखत, कोंबडी खत, सिंगल सुपर फॉस्पेट ही खते मिश्रण करून जमिनीत टाकली जातात. त्यानंतर रोटरच्या साह्याने माती आड केली जातात.
लागवडीपूर्वी १०ः२६ः२६, डीएपी, एमओपी, निंबोळी पेंड, मायक्रोन्यूट्रंट मिश्रण करून बेड तयार केला जातो.
साडेचार फुटाचा बेडवर ठिबकच्या लॅटरल्स अंथरून घेतल्यानंतर मल्चिंग पेपरचे आच्छादन केले जाते.
रोप लावण्यापूर्वी बेड ठिबकने पूर्ण भिजवला जातो.
दोन रोपांतील अंतर दीड फूट अशी झिकझॅक पद्धतीने लागवड केली जाते. टोमॅटोची एकरी ६५०० हजार रोपे लागतात
दोन बेडमधील अंतर ८ फूट तर दोन रोपांतील अंतर तीन फुट ठेवले जाते. कारल्याची एकरी २५०० रोपे बसतात.
लागवडीपूर्वी २२ दिवस अगोदर रोपवाटिकेत रोपांची मागणी नोंदवली जाते.
दर्जेदार रोपांची खरेदी रोपवाटिकेतून केली जाते.
लागवड पद्धती
मार्च - एप्रिल दरम्यान, लागवड.
प्रत्येक प्लॉटमध्ये १५ दिवसांपासून ते एक महिन्याचे अंतर.
खत व्यवस्थापन
रोप लागवडीनंतर चौथ्या दिवशी मर होऊ नये यासाठी बुरशीनाशक, कीटकशानक आणि एनपीके अशी पहिली आळवणी केली जाते. त्यानंतर सहाव्या दिवशी ह्युमिक ॲसिड, एनपीके यांची दुसरी आळवणी केली जाते. तर त्यानंतर पुन्हा एनपीके, ॲमिनो ॲसिड, मायक्रोन्यूट्रंट यांची तिसरी आळवणी केली जाते.
त्यानंतर मात्र ठिबकमधून खते आणि पाणी देणे सुरू केले जाते.
प्रतिबंधात्मक कीड-रोग नियंत्रणावर भर असतो. त्यासाठी नियमित अंतराने कीटकनाशक व बुरशीनाशकाची फवारणी घेतो.
पहिला महिना पीक वाढीवर लक्ष केंद्रित केले जाते. पीक वाढीच्या काळात १९ः१९ः१९, १२ः६१ः००ः ह्युमिक ॲसिड खतांचा वापर केल्याने मुळांची वाढ चांगली होती.
दुसरा महिना फुल आणि फळ धारणावर लक्ष असते. या काळात १३ः४०ः१३, १३ः००ः४५, ॲमिनो ॲसिडचा खतांचा वापर केला जातो.
फुगवणीसाठी १३ः००ः४५, फॉस्फरिक ॲसिड खतांचा वापर केला जातो.
दर्जेदार उत्पादनासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि अन्नद्रव्ये व्यवस्थापनावर विशेष भर असतो.
पाणी व्यवस्थापन
दोन विहिरी, चार कूपनलिका, दीड कोटी क्षमतेचे शेततळे आणि बंधारा अशा पद्धतीने पाण्याची शाश्वत सोय केली आहे.
वाफसा पद्धतीने पाण्याचे नियोजन केले जाते
पिकाच्या वाढीनुसार पाणी कमी अधिक केले जाते
उन्हाळ्यात एक दिवसाआड तीन तास ठिबकने पाणी
उत्पादन व मिळणारा दर (प्रति किलो)
टोमॅटो : एकरी ५० टन
टोमॅटोला मिळणारा सरासरी दर प्रति किलो : २० रुपयांपासून पुढे
कारली : एकरी २५ टन
कारल्यास मिळणारा सरासरी दर प्रति किलो : ३० रुपये
काढणीनंतर मालाची प्रतवारी महत्त्वाची
प्रामुख्याने मुंबई येथे विक्री.
सांगली, कोल्हापूर येथील मार्केटमध्ये देखील विक्री केली जाते.
वातावरणानुसार नियोजन
वातावरण आणि तापमानातील बदलानुसार फवारणीचे नियोजन असते.
तापमानातील बदलानुसार ठिबकचा कालावधी कमी जास्त केला जातो.
कीड-रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पिकांचे वेळोवेळी निरीक्षण करण्यात येते.
राहुल पांडुरंग कदम, ८२७५०५७६१८
(शब्दांकन : अभिजित डाके)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.